Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

'आम्ही हार मानणार नाही' : मणिपूर व्हायरल व्हीडिओतील स्त्रिया

Webdunia
बुधवार, 8 नोव्हेंबर 2023 (14:29 IST)
दिव्या आर्य
सहा महिन्यांपूर्वी मणिपूरमध्ये जातीय हिंसाचार भडकलेला असताना जमावाने दोन महिलांना विवस्त्र करून त्यांची कथित धिंड काढली आणि सामूहिक बलात्कार केला.
 
या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर संपूर्ण देशाला ही घटना समजली. त्या व्हिडीओनंतर पहिल्यांदाच या महिला एका पत्रकारासमोर बसून बोलल्या आणि त्यांच्यावर गुदरलेल्या प्रसंगाविषयी अनुभव सांगितले.
 
इशारा : या लेखात लैंगिक अत्याचारांचं वर्णन आहे.
 
सगळ्यांत आधी तर मला फक्त त्यांची जमिनीकडे झुकलेली नजर दिसली. काळ्या मास्कने त्यांनी तोंड झाकून घेतलेलं होतं आणि उरलेल्या चेहऱ्यावर डोक्यावरून घेऊन कपाळ झाकेल अशी ओढणी ओढलेली होती.
 
तो व्हिडीओ समोर आल्यानंतर कुकी-जोमी समाजाच्या या दोन स्त्रिया - ग्लोरी आणि मर्सी - यांना जणू अदृश्य होऊन जावं असंच वाटत होतं.
 
पण आजही त्यांचा आवाज खणखणीत आहे. आज पहिल्यांदाच त्या एका पत्रकाराला भेटायला राजी झाल्या आहेत. आपलं दुःख, भोगलेल्या यातना आणि न्यायासाठीची लढाई याबद्दल जगाला सांगावं या उद्देशाने त्या पुढे आल्या आहेत.
 
सोशल मीडियावर शेअर झालेला त्यांचा अत्याचाराचा व्हिडीओ पाहणं अवघड आहे. जवळपास एका मिनिटाच्या या व्हिडीओत या दोघी मैतेई पुरुषांच्या गर्दीत मध्ये उभ्या दिसतात... विवस्त्र.
 
जमावातले पुरुष त्यांना ढकलताहेत, धक्काबुक्की करत त्यांच्या गुप्तांगांना जबरदस्तीने स्पर्श करत आहेत आणि मग त्यांना ओढत एका शेतात नेलं जातं. तिथे आपल्यावर सामूहिक बलात्कार झाल्याचं या स्त्रियांचं म्हणणं आहे.
 
त्या हल्ल्याच्या आठवणीने आजही ग्लोरीच्या अंगावर काटा आला. त्याबद्दल बोलताना गळा दाटून आला.
 
ती म्हणाली, "अक्षरशः जनावरासारखं वागवलं आम्हाला. त्या धक्क्यातून सावरणं अवघडच होतं. त्यात दोन महिन्यांनी या हल्ल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला. जिवंत राहण्याची इच्छाच मरून गेली माझ्यातली."
 
मर्सी म्हणते, "तुम्हाला तर माहिती आहे, भारतीय समाज कसा आहे... अशा घटनेनंतर स्त्रीकडे कशा नजरेने पाहिलं जातं... आता तर मी आमच्या समाजातल्या लोकांपुढेही नजर वर करून पाहू शकत नाही. माझी अब्रू गेली. मी आता पूर्वीसारखी कधीच नाही जगू शकणार."
 
त्या व्हिडीओमुळे दोन स्त्रियांच्या यातना चौपटीने वाढल्या खऱ्या, पण मणिपूरमध्ये कित्येक महिन्यांपासून सुरू असलेल्या मैतेई आणि कुकी-जोमी समाजांमधल्या जातीय हिंसाचाराकडे या व्हिडीमुळे लक्ष वेधलं गेलं.
 
लाज आणि भीती
व्हीडिओ समाजमाध्यमांवर आल्यानंतर चहूबाजूंनी खूप टीका झाली आणि पोलीस-प्रशासनाकडून कारवाई झाली. यामुळे अनेक कुकी महिला त्यांच्यावर ओढवलेल्या लैंगिक अत्याचारांबाबतच्या तक्रारी दाखल करण्यासाठी हिंमत गोळा करून पुढे सरसावल्या.
 
पण व्हीडिओ सगळीकडे पसरल्याने मर्सी आणि ग्लोरीला मात्र जगाच्या नजरेपासून दूर कुठेतरी आतल्या आत कुढत राहण्यावाचून पर्याय उरला नाही.
 
या घटनेपूर्वी ग्लोरी कॉलेजमध्ये शिकत होती. मैतेई आणि कुकी समाजातील विद्यार्थी एकत्रितपणे तिथे शिकतात.
 
मर्सी आपल्या दोन मुलांचं संगोपन, त्यांच्या शाळा, होमवर्क आणि चर्चमध्ये प्रार्थना यात मग्न असायची.
 
पण त्या हल्ल्यानंतर दोन्ही स्त्रियांना गाव सोडून पळून जावं लागलं आणि दुसऱ्याच एका शहरात लोकांच्या नजरेपासून दूर गुपचूप जाऊन राहायला लागलं.
 
भयंकर लाज आणि भीती यामुळे त्या आता कोण्या शुभचिंतकाच्या घरी चार भिंतीआडच राहात आहेेत आणि त्यांना असं लपून छपून कुढत जगावं लागतंय.
 
मर्सी आता चर्चमध्ये जात नाही आणि मुलांच्या शाळेत तर नाहीच नाही. एक नातेवाईक मुलांना सोडा-आणायचं काम करते.
 
मर्सी सांगते, "रात्री अजूनही डोळ्याला डोळा लागत नाही. आणि जरा झोप लागलीच तरी भीतीदायक स्वप्नांनी जाग येते. मी घराबाहेर पडू शकत नाही. लोकांना भेटायला लाज वाटते. भीती वाटते."
 
त्या घटनेच्या धक्क्यातून दोघीही अद्याप सावरलेल्या नाहीत. समुपदेशन झालं, कौन्सेलिंगमुळे मदत झाली पण घृणा आणि राग कायमचे मनात घर करून बसले आहेत.
 
मणिपूरमध्ये काय सुरू आहे?
मणिपूरच्या तेहतीस लाख लोकसंख्येत अर्ध्याहून अधिक मैतेई आहेत आणि 43 टक्के कुकी आणि नागा समाजाचे लोक आहेत.
मेमध्ये हिंसाचार नव्याने उफाळला. कारण आहे - मैतेई समाजाला अनुसूचित जाती-जमातींमध्ये स्थान मिळावे या मागणीला कुकी समाजाचा असलेला विरोध. आधीच प्रभावी असलेल्या मैतेई समाजाची ही मागणी मान्य झाली तर कुकींचं प्राबल्य असलेल्या भागातही जमिनी खरेदी करायला मैतेई मोकळे होतील आणि आणखी प्रभावी ठरतील, अशी भीती कुकींना आहे.
राज्य सरकार आणि मुख्यमंत्री एन. बीरेन सिंह(जे स्वतः मैतेई समाजाचे आहेत)या हिंसाचाराची सुरुवात कुकी समुदायाला भडकवणाऱ्या कुकी कट्टरवादी गटांमुळे झाल्याचे मानतात.
मणिपूरच्या हिंसाचारात आतापर्यंत २०० हून अधिक जणांचे जीव गेले आहेत. यातले बहुतांश कुकी समाजातील आहेत. दोन्ही समाजांमधील हजारो लोक बेघर झाले आहेत आणि विस्थापितांचं आयुष्य जगत आहेत.
मैतेई महिलांनीही कुकी पुरुषांकडून लैंगिक अत्याचार झाल्याचे आरोप केले आहेत. यासंबंधी एक एफआयआरसुद्धा दाखल झाली आहे. पण या घटनांवर अधिक चर्चा होऊन आपली अधिक बेअब्रू करून घेण्याची आपली इच्छा नसल्याचं बहुतांश महिलांचं म्हणणं आहे.
राग आणि घृणा
मैतेई मित्र किंवा विद्यार्थ्यांबरोबर एकत्रितपणे शिकायचा आता ग्लोरी विचारच करू शकत नाही. तिला तर आता त्या समाजातल्या कुठल्या व्यक्तीचा चेहराही बघायची इच्छा नाही.
 
ती म्हणते, "मी माझ्या गावी कधीच परत जाणार नाही. मी तिथेच वाढले. ते माझं घर होतं. पण आता तिथे परतायचं म्हणजे आसपासच्या गावातल्या मैतेई लोकांशी संबंध येणार. जे आता अशक्य आहे."
 
मर्सीचंसुद्धा असंच म्हणणं आहे. टेबलावर मूठ आपटून ती रागाने सांगते, "मला तर आता त्यांची भाषाही कानावर पडायला नको आहे."
 
मेमध्ये झालेल्या मणिपूरच्या हिंसाचारात होरपळलेल्या पहिल्या काही गावांमध्ये मर्सी आणि ग्लोरी यांचं गाव होतं. त्या दिवशी झालेल्या दंगलीत जमावाने ग्लोरीच्या वडिलांचा आणि भावाचा जीव घेतला.
 
दबक्व्या आवाजात ती सांगते, "माझ्या डोळ्यांदेखत त्यांना मारलं."
 
ग्लोरी सांगते की, त्यांचे मृतदेह तिथेच शेतात सोडून स्वतःचा जीव वाचवण्यासाठी तिला पळावं लागलं. आता ती तिथे परत जाऊही शकत नाही. हिंसाचार उफाळल्यानंतर आता मैतेई आणि कुकी समाज एकमेकांच्या इलाक्यात पाऊलही ठेऊ शकत नाहीत.
 
मणिपूर सरळ सरळ दन भागांत दुभंगलं गेलं आहे. मध्ये आहेत पोलीस, सैन्य आणि दोन्ही समाजांच्या स्वयंसेवकांनी बसवलेले चेक पॉइंट्स!
 
ग्लोरी सांगते, "मला तर अजूनही कल्पना नाही त्यांचे मृतदेह कुठव्या शवागारात ठेवले आहेत? मी जाऊन बघूही शकत नाही आणि चौकशीही करू शकत नाही. सरकराने स्वतःहून ते आमच्याकडे सोपवले पाहिजेत."
 
दुःख आणि अगतिकता
ज्या वेळी हल्ला झाला त्या वेळी खरं तर मर्सीच्या नवऱ्याने शेजारच्या मैतेई गावातील प्रमुखाबरोबर चर्चा केली होती. या बैठकीत शांतता प्रस्थापित करण्याचा निर्णयही झाला होता.
 
पण जसे या बैठकीतून सगळे प्रमुख नेते बाहेर पडले तसा जमावाने हल्ला केला. घरं जाळली आणि स्थानिक चर्चलाही आग लावली.
 
ते सांगतात, "दंगा सुरू झाल्यावर मी स्थानिक पोलिसांना फोन केला. तर त्यांनी उत्तर दिलं की, त्यांच्या पोलीस ठाण्यावरच हल्ला झालाय आणि ते इथे येऊ मदत नाही करू शकत. मी रस्त्यावर एक पोलीस व्हॅन उभी असलेली पाहिली. पण त्यातून कोणीही बाहेर आलं नाही."
 
मर्सीच्या पतीच्या म्हणण्यानुसार, भडकलेल्या जमावाने मग महिलांकडे आपला मोर्चा वळवला आणि त्यांचा विरोध पुरता मोडून पडला. ते एकटे पडले.
 
"मी काहीच करू शकलो नाही. नाही माझ्या बायकोला नाही गाववाल्यांना... कुणालाच वाचवू शकलो नाही. या विचाराने आजही दुःख वाटतं. अगतिक वाटतं. मन विषण्ण होतं. कधीकधी इतका त्रास होतो या अगतिकतेचा की वाटतं, उठावं आणि कुणाचा जीव घ्यावा."
 
पोलीस सूत्रांनी या घटनेबाबत बीबीसीला दिलेल्या माहितीनुसार, त्या पोलीस ठाण्याचा ऑफिसर इन चार्जसहित पाच जणांना निलंबित करण्यात आलं आहे आणि या प्रकरणाची चौकशी सुरू आहे.
 
मर्सीच्या नवऱ्याने सांगितलं की, त्या हल्ल्यानंतर दोन आठवड्यांनी त्यांनी यासंबंधी रीतसर तक्रार पोलिसांत दाखल केली होती. पण तो व्हिडीओ व्हायरल होईपर्यंत कोणीची कुठलीही कारवाई केली नाही.
 
व्हिडीओ समोर आल्यानंतर पंतप्रधान मोदींनी मणिपूर जातीय हिंसाचाराबद्दल पहिल्यांदा वक्तव्य केलं. त्यानंतर मणिपूर पोलिसांनी सात जणांना अटक केली.
 
सुप्रीम कोर्टाने या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपवला. आता सीबीआयने या सात जणांविरोधात सामूहिक बलात्कार आणि हत्येचा खटला दाखल केला आहे.
 
धैर्य आणि आशा
ग्लोरी, मर्सी आणि तिच्या नवऱ्याने सांगितलं की, व्हिडीओ समोर आल्यानंतर जगभरातून त्यांना सांत्वनाचे, धीर देणारे संदेश आले. त्यातून बराच आधार मिळाला. धीर मिळाला.
 
मर्सीचा नवरा सांगतो, "तो व्हिडीओ समोर आला नसता, तर कदाचित कोणी आमच्या वेदना समजून घेतल्या नसल्या. आमच्या बोलण्यावर विश्वास ठेवला नसता."
 
मर्सीला अजूनही भीतीदायक स्वप्न पडतात आणि भविष्याबद्दल्या विचाराने तिला कापरं भरतं.
 
आपल्या मुलांचं नाव घेत ती सांगते, "माझ्या मनावर कायमचं ओझं झालंय आता. आपल्या मुलांना वारसा म्हणून देण्यासारखं काहीच उरलेलं नाही आमच्याजवळ."
 
आता ती केवळ ईश्वर आणि त्याची प्रार्थना यातूनच मनःशांती शोधत आहे. तेच तिला सुरक्षित वाटतं. मर्सी म्हणाली, "मी स्वतःला समजावते की, हे एवढं सगळं सहन करण्यासाठी जर ईश्वराने माझी निवड केली असेल तर यातून वर येण्याची ताकदही तोच मला देईल."
 
त्या हल्ल्यात त्यांचं संपूर्ण गाव उद्ध्वस्त झालं. आता समाजाच्या मदतीने ते आपलं आयुष्य पुन्हा उभं करण्याच्या प्रयत्नात आहेत.
 
ग्लोरी सांगते की, दोन्ही समुदायांसाठी वेगवेगळं प्रशासन हाच एकमेव पर्याय आहे. "सुरक्षित आणि शांततेत जगायचं असेल तर तसंच करायला हवं."
 
ही कुकी समुदायाची वादग्रस्त मागणी आतापर्यंत अनेक वेळा पुढे आली आहे. पण मैतेई समाजाने या मागणीला विरोध केला आहे. दोन्ही बाजूंचं याविषयी आपापलं म्हणणं आणि कारणं आहेत. राज्याचे मुख्यमंत्री बीरेन सिंह मैतेई आहेत आणि मणिपूरच्या अशा विभाजनाला त्यांचा विरोध आहे.
 
भेदभाव आणि न्याय
ग्लोरी आणि मर्सी यांचा स्थानिक प्रशासनावर विश्वास नाही. प्रशासन कुकी समाजाबाबत भेदभाव करत असल्याचा त्या आरोप करतात.
 
ग्लोरी सांगते, "मणिपूर सरकारने माझ्यासाठी काहीच केलेलं नाही. माझा मुख्यमंत्र्यांवर विश्वास नाही. त्यांच्याच सरकारच्या कार्यकाळात तर आमच्याबरोबर हे सगळं झालं."
 
दोघींचाही आरोप आहे की, मुख्यमंत्री एन. बीरेन सिंह यांनी आतापर्यंत जातीय दंगलीत भरडलेल्या कुकी-जोमी परिवारांची भेट घेतलेली नाही किंवा त्यांच्याशी काही बोललेलेही नाहीत.
 
विरोधी पक्षांनी मुख्यमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी अनेकदा केली आहे. पण राज्य सरकारने त्यांच्यावर असलेले भेदभावाचे सगळे आरोप बिनबुडाचे असल्याचे सांगत फेटाळून लावले आहेत.
 
या आरोपांविषयी बोलण्यासाठी आम्ही मुख्यमंत्री एन बीरेन सिंह यांच्याशी संपर्क साधला आणि त्यांच्यापुढे हे मांडाया प्रयत्न केला पण त्यांनी बोलण्यास नकार दिला.
 
इंडियन एक्स्प्रेससाठी त्यांनी नुकतीच एक मुलाखत दिली होती. त्यात त्यांनी आपण मैतेई समाजाच्या परिवारांनादेखील भेटायला गेलो नाही, असं सांगितलं.
 
"माझ्या मनात आणि माझ्या कामात कुठलाही पक्षपात आणि भेदभाव नाही", असं त्यांचं म्हणणं आहे.
 
व्हिडीओची दखल घेत सुप्रीम कोर्टाने हिंसाचारात मारल्या गेलेल्या सर्व लोकांची ओळख पटवून त्यांच्या परिवाराकडे मृतदेह सुपूर्द करण्याचे आदेश राज्य सरकारला दिले आहेत.
 
ग्लोरीची आशा यावरच टिकून राहिलेली आहे. ती न्यायदेवतेवर विश्वास असल्याचं सांगते.
 
भविष्यात अन्य कुठल्या कॉलेजमध्ये दाखल होऊन शिक्षण पूर्ण करणार. पोलीस किंवा सैन्यात भरती होऊन अधिकारी होण्याचं तिचं स्वप्न आहे. ती ते पूर्ण करू इच्छिते. ग्लोरी म्हणते, "माझं हे पहिल्यापासून स्वप्न होतं. आता तर मी निश्यय केला आहे की ते स्वप्न पूर्ण करायचंच. म्हणजे मला कुठल्याही भेदभावाशिवाय लोकांसाठी काम करता येईल."
 
"मला कुठल्याही परिस्थितीत न्याय हवाय. म्हणूनच मी आज बोलतेय. म्हणजे मला जे सोसावं लागलं ते अन्य कुठल्या स्त्रीच्या वाट्याला कधी येऊ नये."
 
मर्सी नजर उचलून माझ्याकडे बघत सांगते, "आम्ही आदिवासी स्त्रिया खूप खंबीर असतो. अशी हार मानणार नाही."
 
मी निघण्याच्या तयारीत उठून उभी राहिले तशी ती म्हणाली, एक संदेश द्यायचा आहे. "मी सगळ्या समाजांच्या मातांना सांगू इच्छिते की, आपापल्या मुलांना शिकवण द्या... काहीही झालं तरी कधी स्त्रियांची बेअब्रू करू नका."
 
(दोन्ही स्त्रियांची नावं बदलली आहेत)
 
(इलस्ट्रेशन्स - जिल्ला दस्तमाल्ची)

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

हितोपदेशातील कहाणी ; आंधळा गिधाड आणि दुष्ट मांजर

Mesh Rashi Varshik Rashifal 2025 in Marathi : मेष रास 2025 राशिभविष्य: नवीन वर्ष कसे असेल, निश्चित उपाय जाणून घ्या

26 नोव्हेंबरपासून बुध दोषामुळे त्रास होईल, या क्षेत्रांवर नकारात्मक परिणाम होईल !

Premature Graying Hair मुलांचे केस आतपासूनच पांढरे होऊ लागले आहेत का? त्यांना हे 5 पदार्थ खाऊ द्या, केस नैसर्गिकरीत्या काळे होतील

कपालभाती प्राणायाम दररोज केल्याने हे 10 आरोग्य फायदे होतात, जाणून घ्या

पुढील लेख
Show comments