Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

अतीक अहमद हत्याकांड प्रकरणात आतापर्यंत काय काय घडलं?

Webdunia
सोमवार, 17 एप्रिल 2023 (08:32 IST)
उत्तर प्रदेशच्या प्रयागराजमध्ये माजी खासदार अतीक अहमद आणि त्यांचे भाऊ अश्रफ अहमद यांची शनिवारी (15 एप्रिल) रात्री पोलिसांच्या उपस्थितीत हत्या झाली.
दोन्ही अहमद भावंडांना पोलीस वैद्यकीय तपासणीसाठी कॉल्विन हॉस्पिटलमध्ये घेऊन जात होते. त्यावेळी पत्रकारांच्या वेशात आलेल्या तीन बंदुकधारी हल्लेखोरांनी त्यांच्यावर गोळीबार केला.
 
हे हत्याकांड टीव्ही कॅमेऱ्यात कैद झालं आहे. या प्रकरणाची देशभरात सर्वत्र चर्चा सुरू आहे.
 
उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव आणि मायावती यांनी राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे.
 
या प्रकरणानंतर उत्तर प्रदेशातील सुरक्षा बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. सरकारने या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले आहेत.
 
तिन्ही हल्लेखोरांना रविवारी कोर्टात हजर करण्यात आलं. त्यांना 14 दिवसांच्या पोलीस कोठडीत पाठवण्यात आलं आहे.
 
शनिवारी काय घडलं?
अतीक आणि अश्रफ अहमद भावंडांच्या हत्येची घटना माध्यमांच्या कॅमेऱ्यासमोर घडली.
 
व्हीडिओ चित्रकरणातील घटनाक्रमानुसार, पोलिसांच्या गाडीतून उतरल्याच्या 10 सेकंदांच्या आतच अतीक आणि अशरफ यांना पत्रकारांनी गराडा घातला. पत्रकारांनी या दोन्ही भावांना विचारलं की, “तुम्ही काही बोलणार आहात, काही बोलायचंय?”
 
यावर अशरफ म्हणाले की, “काय बोलमार, कुठल्या गोष्टीबाबत काय बोलू?”
 
एका पत्रकारानं विचारंल, “आज असदच्या अंत्यसंस्काराला जाऊ शकला नाहीत. त्यावर काय म्हणणं आहे?”
 
अतीक म्हणाले, “घेऊन गेले नाहीत, त्यामुळे नाही गेलो.”
 
त्यानंतर अशरफ म्हणाले की, “मेन बात ये हैं की गुड्डू मुस्लिम...”
 
अशरफ इतकं बोलले आणि त्यानंतर अतीक यांच्यावर पहिली गोळी झाडली गेली. त्यानंतर अशरफ यांच्यावरही गोळी झाडण्यात आली. दोघेही तिथेच रक्ताच्या थारोळ्यात कोसळले.
दोन्ही भावांच्या हातात हातकड्या असल्याचे व्हीडिओत दिसतं.
 
हल्लेखोर अतीक आणि अशरफ यांच्यावर गोळ्या झाडत असल्याचंही व्हीडिओत दिसतंय. शर्ट, निळी जीन्स, पांढरे बूट अशा पेहरावात हल्लेखोर दिसतो.
 
अहमद भावंडं खाली कोसळल्यानंतर हल्लेखोर त्यांच्यावर अनेक गोळ्या झाडतात. त्यानंतर बंदुका फेकून आत्मसमर्पण करतात.
यूपी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या घटनेदरम्यान एक पोलीस हवालदार आणि एक पत्रकारही जखमी झाले आहेत.
 
गोळीबारानंतर याठिकाणी गोंधळ उडाला. यानंतर पोलिसांनी हल्लेखोरांना पकडलं.
व्हीडिओमध्ये सरेंडर, सरेंडर आणि धार्मिक घोषणाबाजीचे आवाजही ऐकू येतात.
 
यानंतर पोलिसांनी हल्लेखोरांना पकडून गाडीत बसवलं आणि दूर घेऊन गेले.
 
या घटनेच्या दोनच दिवसांपूर्वी अतीक अहमद यांचा मुलगा असद आणि त्याचा सहकारी गुलाम मोहम्मद यांना उत्तर प्रदेश पोलिसांनी झाशी येथे झालेल्या कथित एनकाऊंटरमध्ये ठार केलं होतं.
 
उत्तर प्रदेशात हाय अलर्ट
प्रयागराजमधील या निर्घृण दुहेरी हत्याकांडानंतर संपूर्ण उत्तर प्रदेशात कलम 144 लागू करण्यात आलं आहे. अनेक भागांमध्ये इंटरनेट सेवा बंद करण्यात आली आहे.
 
ज्येष्ठ अधिकाऱ्यांच्या मते, राज्यात काही ठिकाणी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहेत. त्यामुळे आधीपासूनच कलम 144 लागू आहे.
 
मेरठ, बिजनौर, मुरादाबाद, मुजफ्फरनगरसह पश्चिम उत्तर प्रदेशातील अनेक जिल्ह्यांमध्ये पोलिसांनी पथसंचलन केलं.
 
तर याच प्रकरणी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांची एक बैठक घेतली.
 
उमेश पाल यांच्या निवासस्थानाबाहेरही सुरक्षा बंदोबस्त वाढवण्यात आला आहे.
 
दरम्यान, सर्व जिल्ह्यांमध्ये परिस्थिती नियंत्रणात असल्याचं अयोध्या परिक्षेत्राचे पोलीस महानिरीक्षक प्रवीण कुमार यांनी म्हटलं आहे.
 
हल्लेखोरांना 14 दिवसांची पोलीस कोठडी
पोलिसांनी रविवारी हल्लेखोरांना प्रयागराज कोर्टात हजर केलं. यावेळी संपूर्ण परिसरात अतिरिक्त सुरक्षा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. अरूण मौर्य, सनी आणि लवलेश तिवारी अशी या तिघांची नावे आहेत.
तिन्ही हल्लेखोरांची रवानगी पोलीस कोठडीत करण्यात आली आहे.
 
दरम्यान, अतीक अहमद यांची पत्नी शाईस्ता परवीन या पोलिसांसमोर शरणागती पत्करणार असल्याची बातमी आहे.
 
उमेश पाल हत्याकांडात परवीन यासुद्धा आरोपी आहेत. पोलीस त्यांचाही शोध घेत आहेत.
 
पोस्टमार्टम आणि दफनविधी
रविवारीच अतीक अहमद आणि अश्रफ अहमद यांच्या मृतदेहांचं शवविच्छेदन करण्यात आलं.
 
यानंतर दोघांना कसारी-मसारी कब्रस्तानात त्यांचे आई-वडील आणि आजी-आजोबांच्या शेजारी दफन करण्यात आलं.
 
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दोन दिवसांपूर्वी एनकाऊंटरमध्ये मारल्या गेलेल्या असद अहमद यालासुद्धा शनिवारी याच कब्रस्तानात दफन करण्यात आलं होतं.
 
कसारी-मसारी कब्रस्तानात यावेळी मोठ्या संख्येने पोलिसांचा फौजफाटा तैनात करण्यात आला होता. केवळ मोजक्या नातेवाईकांना यावेळी उपस्थित राहण्यास परवानगी देण्यात आली होती.
चौकशीसाठी समिती गठित
पोलिसांच्या ताब्यात असताना झालेल्या या दोन हत्यांच्या प्रकरणामुळे उत्तर प्रदेशात गदारोळ माजला आहे. संबंधित प्रकरणाच्या चौकशीसाठी राज्य सरकारने समिती गठित केली आहे.
 
मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या कार्यालयाने यासंदर्भात जारी केलेल्या प्रसिद्धिपत्रकानुसार, “गृह विभागाने कमिशन ऑफ इन्क्वॉयरी अक्ट 1952 अंतर्गत चौकशीचे आदेश देऊन त्यासाठी समिती नियुक्त केली आहे.”
 
ही समिती तीन सदस्यीय असून दोन महिन्यात या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करून ते राज्य सरकारकडे अहवाल सादर करतील.
 
इलाहाबाद हायकोर्टाचे निवृत्त न्यायाधीश अरविंद कुमार त्रिपाठी यांच्या अध्यक्षतेखाली निवृत्त पोलीस महासंचालक सुबेश कुमार सिंह आणि निवृत्त जिल्हा न्यायाधीश बृजेश कुमार सोनी अशी ही तीन सदस्यीय समिती आहे.
 
अतीक अहमद यांनी सुप्रीम कोर्टाकडे केली होती मागणी
अतीक अहमद यांनी दोन आठवड्यांपूर्वी उत्तर प्रदेश पोलिसांच्या कोठडीत असताना सुरक्षा पुरवण्याची मागणी केली होती.
 
यासंदर्भात त्यांनी सुप्रीम कोर्टात दाखल केलेली याचिका फेटाळून लावण्यात आली होती.
 
सुप्रीम कोर्टाने म्हटलं होतं की अतीक अहमद यांच्या जीवाला धोका असल्यास उत्तर प्रदेश प्रशासन त्यांचं संरक्षण करेल.
 
अतीक यांच्या याचिकेवर अजय रस्तोगी आणि न्यायमूर्ती बेला एम. त्रिवेदी यांनी त्यांना म्हटलं होतं की तुम्ही सुरक्षेच्या मागणीसाठी अलाहाबाद हायकोर्टात धाव घेऊ शकता.
विरोधी पक्षांचे टीकास्त्र, भाजप नेत्यांना ठरवलं जबाबदार
तृणमूल काँग्रेस नेत्या महुआ मोईत्रा यांनी या प्रकरणावर बोलताना म्हटलं, “भाजपने देशाला एका ‘माफिया रिपब्लिक’मध्ये रुपांतरित केलं आहे.
 
दुसऱ्या एका ट्विटमध्ये महुआ मोईत्रा म्हणतात, “सत्यपाल मलिक यांच्या मुलाखतीवरून लोकांचं लक्ष विचलित करण्यासाठी अतीक अहमद यांना मारलं गेलं आहे.”
 
बसपा नेत्या आणि माजी मुख्यमंत्री मायवती यांनी कायदा आणि सुव्यवस्था तसंच कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं. सुप्रीम कोर्टाने या प्रकरणाची दखल घेऊन कार्यवाही सुरू करावी, अशी मागणी त्यांनी केली.
 
लोकसभा खासदार आणि AIMIM अध्यक्ष असदुद्दीन ओवैसी म्हणाले, “एनकाऊंटर राजचा जल्लोष करणारेही या हत्येसाठी जबाबदार आहेत.”
 
काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे, प्रियांका गांधी, राशिद अल्वी, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, राष्ट्रीय लोकदलचे अध्यक्ष आणि राज्यसभा खासदार जयंत चौधरी, माजी खासदार पप्पू यादव, राज्यसभा खासदार कपिल सिब्बल, खासदार कुंवर दानिश अली, राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत यांनी कायदा आणि सुव्यवस्थेवरून उत्तर प्रदेशवर टीका केली आहे.
 
तर, भाजपमधील अनेक नेत्यांनी हे हत्याकांड योग्य असल्याचं सांगत नैसर्गिक न्याय असं त्याला संबोधलं आहे.
 
उत्तर प्रदेशचे अर्थ आणि संसदीय कार्य मंत्री सुरेश कुमार खन्ना यांनी हत्याकांड हा दैवी निर्णय असल्याचं म्हटलं. तर स्वतंत्र देव सिंह म्हणाले, “पाप-पुण्य यांचा हिशोब याच जन्मात होतो.”

Published By- Priya Dixit 
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

हितोपदेशातील कहाणी ; आंधळा गिधाड आणि दुष्ट मांजर

Mesh Rashi Varshik Rashifal 2025 in Marathi : मेष रास 2025 राशिभविष्य: नवीन वर्ष कसे असेल, निश्चित उपाय जाणून घ्या

26 नोव्हेंबरपासून बुध दोषामुळे त्रास होईल, या क्षेत्रांवर नकारात्मक परिणाम होईल !

Premature Graying Hair मुलांचे केस आतपासूनच पांढरे होऊ लागले आहेत का? त्यांना हे 5 पदार्थ खाऊ द्या, केस नैसर्गिकरीत्या काळे होतील

कपालभाती प्राणायाम दररोज केल्याने हे 10 आरोग्य फायदे होतात, जाणून घ्या

पुढील लेख
Show comments