Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

अतीक आणि अशरफच्या हत्येवेळी नेमकं काय घडलं?

Webdunia
रविवार, 16 एप्रिल 2023 (10:06 IST)
उत्तर प्रदेशच्या प्रयागराजचे माजी खासदार अतीक अहमद आणि त्यांचा भाऊ अशरफ यांना गोळी मारून हत्या करण्यात आली. प्रसारमाध्यमांच्या कॅमेऱ्यासमोर ही हत्येची घटना घडली.
हे हल्लेखोर पत्रकार बनून आले होते. तीन हल्लेखोरांना अटक करण्यात आलीय, अशी माहिती पोलिसांनी दिली.
 
या घटनेची उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी दखल घेतली असून, उच्चस्तरीय बैठकही घेतली. या घटनेचे योगी आदित्यनाथ यांनी चौकशीचे आदेश दिले असून, त्यासाठी तीन सदस्यीय न्यायालयीन आयोगाची स्थापन करण्यात आलीय.
 
प्रयागराजचे पोलीस आयुक्त रमित शर्मा यांनी या घटनेबाबत माहिती देताना म्हटलं की, “कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी अतीक अहमद आणि त्यांचा भाऊ अशरफ यांना वैद्यकीय तपासणीसाठी नेलं जात होतं. त्याचवेळी ही घटना घडली.”
अतीक अहमद आणि अशरफ यांना कॉल्विन हॉस्पिटलमध्ये वैद्यकीय तपासणीसाठी नेलं जात होतं.
 
पत्रकार बनून आलेल्या हल्लेखोरांनी हॉस्पिटलजवळ पोलिसांच्या गराड्यात असलेल्या अतीक आणि अशरफ यांच्यावर अत्यंत जवळून गोळ्या झाडल्या. त्यानंतर हल्लेखोरांनी धार्मिक घोषणाबाजी केली.
रमित शर्मा यांच्या माहितीनुसार, “पत्रकार अतीक अहमद त्यांच्या भावाशी बोलत होते. त्याचवेळी पत्रकार बनून आलेल्या हल्लेखोरांनी अचानक गोळीबार केला. तीन हल्लेखोरांना अटक करण्यात आलीय.”
 
पोलिसांनी या हल्ल्यानंतर हॉस्पिटलच्या आसपासच्या भागात नाकाबंदी केली.
माध्यमांशी काय संवाद साधला?
पोलिसांच्या गाडीतून उतरल्याच्या 10 सेकंदांच्या आतच अतीक आणि अशरफ यांना पत्रकारांनी गराडा घातला. पत्रकारांनी या दोन्ही भावांना विचारलं की, “तुम्ही काही बोलणार आहात, काही बोलायचंय?”
 
यावर अशरफ म्हणाले की, “काय बोलमार, कुठल्या गोष्टीबाबत काय बोलू?”
 
एका पत्रकारानं विचारंल, “आज असदच्या अंत्यसंस्काराला जाऊ शकला नाहीत. त्यावर काय म्हणणं आहे?”
 
अतीक म्हणाले, “घेऊन गेले नाहीत, त्यामुळे नाही गेलो.”
 
त्यानंतर अशरफ म्हणाले की, “मेन बात ये हैं की गुड्डू मुस्लिम...”
 
अशरफ इतकं बोलले आणि त्यानंतर अतीक यांच्यावर पहिली गोळी झाडली गेली. त्यानंतर अशरफ यांच्यावरही गोळी झाडण्यात आली. दोघेही तिथेच रक्ताच्या थारोळ्यात कोसळले.
 
दोन्ही भावांच्या हातात हातकड्या असल्याचे व्हीडिओत दिसतं.
 
हल्लेखोर अतीक आणि अशरफ यांच्यावर गोळ्या झाडत असल्याचंही व्हीडिओत दिसतंय. शर्ट, निळी जिन्स, पांढरे शूज अशा पेहरावात हल्लेखोर दिसतो.
 
हल्लेखोर कोण आहेत?
पोलिसांच्या माहितीनुसार, एकूण तीन हल्लेखोरांना ताब्यात घेण्यात आलंय. मात्र, पोलिसांनी अद्याप हल्लेखोरांची ओळख जाहीर केली नाहीय.
 
पोलिसांचं म्हणणं आहे की, हल्लेखोरांची चौकशी सुरू आहे. त्यानंतरच त्यांच्याबद्दल अधिक माहिती दिली जाईल.
हत्या कशी झाली?
अतीक अहमद यांना पोलिसांच्या सुरक्षेत गाडी उतरवून वैद्यकीय तपासणीसाठी घेऊन जात होते. अतीक आणि त्यांच्या भावाचे हात हातकड्यांनी बांधले होते.
 
अतीक आणि त्यांच्या भावाशी पत्रकार बोलत होते. त्याचवेळी अचानक गोळीबार सुरू झाला. काही क्षणातच अतीक आणि अशरफ या दोन्ही भावांची हत्या करण्यात आली.
 
प्रसारमाध्यमांच्या कॅमेऱ्यात रेकॉर्ड झालेला व्हीडिओ पाहिल्यास लक्षात येतं की, एक पत्रकार अतीकला प्रश्न विचारत असतानाच कॅमेऱ्यासमोर बंदुक रोखलेला माणूस येतो आणि अतीक, अशरफ यांच्यावर गोळीबार करतो.
अतीकवर गोळीबार झाल्यानंतर आणखी गोळ्या झाडण्याचा आवाज येऊ लागला. अतीक आणि अशरफ हे दोन्ही भाऊ काही क्षणात जमिनीवर कोसळले.
 
अतीक अहमद आणि त्यांचा भाऊ अशरफ हे आमदार राजू पाल यांच्या हत्या प्रकरणी तुरुंगात बंद होते.
 
अतीक अहमद यांचे वकील विजय मिश्र हे सुद्धा हत्येच्या घटनास्थळाच्या जवळच होते. माध्यमांशी बोलताना ते म्हणाले की, “अतीक आणि अहमद यांना गाडीतून उतरवून नेलं जात होतं. तेव्हाच गोळीबार झाला. ज्यांनी गोळीबार केला, त्यांना पोलिसांनी तातडीनं पकडलं. तिथं गोंधळ झाला होता.”
 
पोलिसांनीही सांगितलं की, हल्लेखोरांना पकडलं आहे. तर माध्यमांच्या वृत्तांनुसार, हल्लेखोरांनी पोलिसांसमोर आत्मसमर्पण केलं.
 
उत्तर प्रदेश पोलीस राजू पाल हत्या प्रकरणातील साक्षीदार उमेश पाल यांच्या हत्येप्रकरणी अतीक अहमद आणि अशरफ यांची चौकशी करत होते. दोन्हींच्या चौकशीनंतर त्यांना न्यायालयीन कोठडीत पाठवलं जाणार होतं. त्यापूर्वी, त्यांची वैद्यकीय तपासणी केली जाणार होती.
 
अतीक अहमदनं पोलीस कोठडीतील त्याच्या सुरक्षेसाठी सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली होती.
 
अतीक अहमद आणि इतर दोन आरोपींना राजू पाल हत्या प्रकरणात जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली होती. तर अशरफ यांना या प्रकरणातून निर्दोष सोडण्यात आलं होतं.
 
गुरुवारी अतीक अहमदचा मुलगा असद आणि त्याचा साथीदार गुलाम मोहम्मद यांचं उत्तर प्रदेश पोलिसांच्या स्पेशल टास्क फोर्सनं झाशीमध्ये कथित एन्काऊंटर केला.
 
असद आणि गुलाम यांच्यावर प्रयागराजमध्ये शनिवारी अंत्यसंस्कार करण्यात आले होते.
 
उत्तर प्रदेश पोलिसांच्या माहितीनुसार, असद आणि गुलाम हे उमेश पाल हत्या प्रकरणात फरार होते.
 
उत्तर प्रदेश पोलिसांच्या निशाण्यावर अतीक
उत्तर प्रदेशमधील योगी आदित्यनाथ यांच्या सरकारनं माफिया आणि गुन्हेगारांविरोधात कारवाई सुरू केली आहे.
 
गेल्या सहा महिन्यात अतीक अहमद यांच्या गँगच्या अनेक सदस्यांना अटक करण्यात आली.
 
अतीक अहदम आणि त्यांच्याशी संबंधित संपत्तीही उत्तर प्रदेश पोलिसांनी जप्त आणि जमीनदोस्त केलीय.
 
PUblished By- Priya Dixit
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

सूर्यनमस्काराने शरीर मजबूत होते, जाणून घ्या योग्य पद्धत

वर्षानुवर्षे आतड्यांमध्ये साचलेली घाण साफ होईल, सकाळी उठल्याबरोबर हे पाणी प्या

28 डिसेंबर रोजी कुंभ राशीत शुक्र आणि शनीचा संयोग 2025 मध्ये चमत्कार घडवेल, 5 राशी धनवान होतील

साप्ताहिक राशीफल 23 डिसेंबर ते 29 डिसेंबर 2024

Kanya Lal Kitab Rashifal 2025: लाल किताबनुसार कन्या राशी भविष्य 2025 आणि उपाय

पुढील लेख
Show comments