Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

स्वप्नील कुसाळेला कांस्य पदक, गावकऱ्यांचा आनंद गगनात मावेना; विजयानंतर म्हणाला-प्रशिक्षक दीपाली या आईसारख्याच

Webdunia
शुक्रवार, 2 ऑगस्ट 2024 (10:53 IST)
Swapnil Kusale, Paris Olympics
पॅरिस ऑलिंपिकमध्ये 50 मीटर एयर रायफल नेमबाजीच्या फायनलमध्ये भारताचा नेमबाज स्वप्नील कुसाळेने कांस्यपदक पटकावलं आहे. कोल्हापूरच्या स्वप्नीलने भारताला पॅरिस ऑलिंपिकमध्ये तिसरं पदक मिळवून दिलं आहे. भारताला पहिल्यांदाच नेमबाजीमध्ये तीन पदकं मिळाली आहेत.
 
50 मीटर एयर रायफल नेमबाजीमध्ये चीनच्या नेमबाजाला सुवर्णपदक तर, युक्रेनच्या नेमबाजाला रौप्यपदक मिळालं, तर तिसऱ्या क्रमांकावर राहत स्वप्नील कुसाळेने कांस्यपदक पटकावलं.या स्पर्धेच्या अंतिम फेरीपर्यंत पोहोचलेल्या स्वप्नीलने यापूर्वी 2022 साली एशियन गेम्समध्ये स्वप्निलनं सांघिक सुवर्णपदक मिळवलं होतं.
 
या स्पर्धेनंतर बोलताना स्वप्नीलनं त्याच्या प्रशिक्षकांचे विशेष आभार मानले आहेत. कोणत्याही प्रकारच्या दडपणाचा विचार न करता संयम ठेवत ही कामगिरी फत्ते केल्याचं स्वप्नील म्हणाला.
 
कोच दीपाली माझ्या आईसारख्याच
कांस्यपदक जिंकल्यानंतर प्रतिक्रिया देताना स्वप्नील कुसाळेनं या कामगिरीबाबत आनंद व्यक्त केला आहे.
 
फायनलमध्ये शूट करताना दबाव हा असतोच पण मी श्वासावर नियंत्रण ठेवलं आणि संयम ठेवत शूट करत राहिलो, असं स्वप्नील म्हणाला. मागच्या कामगिरीचा फार विचार न करता शांत राहून शूट करण्यावर लक्ष दिल्याचं त्यानं सांगितलं.
 
सुरुवातीला मागे पडल्याचं दडपण होतं का असंही स्वप्नीलला विचारलं. त्यावर, "मी मागे आहे किंवा काय याबाबत फारसा विचार केला नाही. स्कोअर बोर्डवर फार लक्ष दिलंच नव्हतं, असं तो म्हणाला.
 
मी जे ऐकत होतो त्याकडं दुर्लक्ष करत होतो. फक्त जे मागून मला चीअर्स करत होते, त्यांचे आवाज ऐकून चांगलं वाटत होतं. मला त्यांना आनंद द्यायचा होता. तेच मनात सुरू होतं," असंही स्वप्नील म्हणाला.
स्वप्नीलला यापूर्वी काही स्पर्धांमध्ये अपयश हातील आलं होतं. पण भूतकाळात जे काही केलं त्यातून शिकून, चुका दुरुस्त करून याठिकाणी कामगिरी केल्याचं त्यानं सांगितलं.
 
महाराष्ट्राला आधीच्या नेमबाजांना पदक मिळालं नसलं तरी ते सगळे मोठे खेळाडू आहेत. मला पदक मिळालं असलं तरी त्यानं त्यांचा मोठेपणा कमी होत नाही, असंही स्वप्नील म्हणाला.
 
स्वप्नीलनं कोच दीपाली देशपांडे यांच्याबद्दल अगदी भरभरून बोलला.
 
"यापूर्वी मी पात्र झालो नव्हतो. त्यानंतर प्रशिक्षक दीपली देशपांडे यांची मोठी मदत झाली. मला मानसिकदृष्ट्या मजबूत होण्यासाठी त्यांची खूप मदत झाली. त्या माझ्या दुसऱ्या आईसारख्या आहेत. त्यांच्याबद्दल बोलावं तेवढं कमी आहे," असं स्वप्नीलनं म्हटलं.

'सरावात असताना सर्वकाही विसरतो'
स्वप्नील जसजसा पदकाच्या जवळ जात होता तसे आमचे आनंदाश्रू वाहू लागले होते. त्याच्या विजयासाठी आम्ही विठ्ठलाचा धावा करत होतो, असं त्याच्या आईनं बीबीसी मराठीशी बोलताना सांगितलं.
 
"लहानपणापासून स्वप्नील अगदी लहान गावातून शिकला. नाशिकला गेल्यानंतर त्यानं रायफल शूटिंगमध्ये यश मिळवलं आणि नंतर मागे वळून पाहिलंच नाही."
स्वप्नीलच्या आई या गावच्या सरपंच आहेत. पण सरावाला तो एवढं महत्त्वं देतो की, सरपंच झाल्यानंतर तो भेटायलाही आला नव्हता. दोन महिन्यांनी तो भेटायला आला, असं स्वप्निलच्या आईनं सांगितलं.
 
सरावात तो सगळं काही विसरून जातो. त्याला सण उत्सवाचंही भान राहत नाही. आम्ही सांगतो तेव्हा त्याला सणांबद्दल किंवा इतर गोष्टींबाबत समजतं, असंही त्यांनी सांगितलं.
 
‘बुलेट खरेदीसाठी बँकेकडून कर्ज काढलं’
“नेमबाजीबाबत त्याने कधीही कंटाळा केल्याचं मला आठवतं नाही. तो याच्या सरावासाठी सतत तयार असतो. याशिवाय तो एकदम शांत आणि शिस्तबद्ध मुलगा आहे,” असं त्याचे वडील सुरेश कुसाळे बीबीसी मराठीशी बोलताना सांगतात.
 
सुरेश यांचं कुटुंब मुळचं राधानगरीतल्या कांबळवाडी गावचं. ते पेशानं शिक्षक आहेत तर स्वप्नीलची आई अनिता या कांबळवाडी गावच्या सरपंच आहेत.
मुलाची खेळातली आवड पाहून त्यांनी स्वप्नीलला नाशिकच्या क्रीडाप्रबोधिनीत दाखल केलं होतं. तिथे स्वप्नीलनं नेमबाजीची निवड केली. 2009 मध्ये वयाच्या 14 व्या वर्षापासून स्वप्नील नेमबाजीचा सराव करतो आहे. पण नेमबाजीचा खेळ खार्चिक असतो. रायफल, जॅकेट यांवर खर्च करावा लागतो. एका एका बुलेटसाठीही बरेच पैसे लागतात.
 
एक काळ असा होता की सरावासाठी बुलेट्स खरेदी करण्यासाठी पुरेसे पैसे नसायचे. पण वडिलांनी कर्ज काढलं आणि मुलाला खेळासाठी प्रोत्साहन दिलं.
“सराव थांबू नये, यासाठी माझ्या वडिलांनी बँकेकडून कर्ज घेतलं आणि बुलेट्स खरेदीसाठी पैसे दिले. तेव्हा एक बुलेटची किंमत 120 रुपये असायची. त्यामुळे मी नेमबाजीचा सराव करताना प्रत्येक बुलेट काळजीपूर्वक वापरायचो. कारण अधिकचा खर्च परवडणारा नव्हता. मी जेव्हा या खेळासाठी सुरुवात केली तेव्हा माझ्याकडे पुरेसं सामानही नव्हतं,” असं स्वप्नीलने माध्यमांना सांगितलं होतं.
 
आपल्या यशात आईवडिलांसोबत त्याच्या प्रशिक्षक दीपाली देशपांडे यांचं मोठं योगदान आहे, असं स्वप्नीलने सांगितलं.
"दीपाली मॅडममुळे आयुष्यात आणि खेळात योग्य शिस्त लागली. त्यांनी आम्हाला या गोष्टी त्यांच्या कृतीतून सिद्ध करून दाखवलं. नेमबाजीशिवाय माणूस म्हणून कसं वागायला पाहिजे याची शिकवणही त्यांनी दिली," असंही स्वप्नीलने सांगितलं.
 
2013 उजाडेपर्यंत स्वप्नीलनं नेमबाजीत आपली चुणूक दाखवायला सुरुवात केली. तेव्हा 'लक्ष्य स्पोर्ट्स' सारखी संस्था त्याच्या पाठीशी उभी राहिली.
 
पुढे रेल्वेनंही स्वप्नीलला नोकरी दिली. 2015 पासून मध्य रेल्वेच्या पुणे विभागात प्रवासी तिकीट परीक्षक (TTE) म्हणून नोकरीला आहे.तेव्हापासून त्याने बालेवाडीमधील छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा प्रबोधिनीमध्ये सराव केला.
 
टॉन्सिलचा त्रास असतानाही चमकदार कामगिरी
आजवरच्या कारकीर्दीत स्वप्नीलला नेमबाज विश्वजीत शिंदे आणि दीपाली देशपांडे यांचं मार्गदर्शन लाभलं आहे.स्वप्नीलविषयी त्याचे कोच विश्वजीत शिंदे सांगतात, “स्वप्नील हा अतिशय शांत मुलगा आहे आणि तो कधीच बडबड करत नाही. तो बाकी कोणत्याही फंदात न पडता सरावावर जास्त फोकस ठेवतो.”नेमबाजीत राष्ट्रीय पातळीवर पोहोचल्यावरही स्वप्नीलचा आजवरचा प्रवास मात्र सोपा नव्हता.
 
गेली अनेक वर्ष त्याला तीव्र वेदना, ताप आणि अशक्तपणा असा त्रास जाणवायचा. अधूनमधून टॉन्सिलचं दुखणं सतत डोकं वर काढायचं.हे का होतंय, याचं निदान लवकर निदान झालं नाही. त्यामुळे वेदना सहन करतच तो खेळत राहायचा.
 
शेवटी डिसेंबर 2023मध्ये या समस्येचं नेमकं कारण पुढे आलं. स्वप्नीलला दुधाची अ‍ॅलर्जी असल्याचं निष्पन्न झालं. दुधातल्या लॅक्टोजचा त्रास होत असल्यानं स्वप्नीलला दूध आणि दुग्धजन्य पदार्थ खाणं साफ बंद करावं लागलं.पण तेव्हापासून त्याच्या तब्येतीत सुधारणाही झाली.
 
नेमबाजीच्या नेमक्या कोणत्या प्रकारात स्वप्नील खेळतोय?
नेमबाजी या खेळात रायफल, पिस्तूल आणि शॉटगन हे तीन मुख्य प्रकार आहेत. त्यात गुठली बंदूक वापरली जाते आहे, यानुसार वेगवेगळे प्रकार आहेत.
 
स्वप्नील 50 मीटर रायफल थ्री पोझिशनमधील प्रकारात ऑलिम्पिक पदकासाठी खेळणार आहे.
थ्री पोझिशन म्हणजे नीलिंग (गुडघ्यावर खाली बसून), प्रोन (झोपून) आणि स्टँडिंग (उभ्याने) नेमबाजी करणे.नेमबाजीचा प्रकार हा इतरांपेक्षा आव्हानात्मक असतो, असं कोच विश्वजीत शिंदे सांगतात.
नेमबाजाला तीन वेगवेगळ्या शारिरीक पोझिशन्समध्ये फायरिंग करावी लागते आणि अचूक लक्ष्यवेध साधावा लागतो.
 
Published by- Priya Dixit 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

साडी नेसल्याने कॅन्सर होऊ शकतो का? ही सुरुवातीची लक्षणे असू शकतात

Amla Navami 2024: आवळा नवमीला पूजा विधी

वामनस्तोत्रम्

नारायणस्तोत्रम् आणि नारायणाथर्वशीर्षोपनिषत्

Tulsi vivah 2024: शालिग्रामचा विवाह तुळशीशी का करतात?

सर्व पहा

नवीन

Maharashtra Assembly Election 2024: व्होट जिहाद'चा 'व्होट धर्मयुद्ध'ने मुकाबला करावा फडणवीस म्हणाले

Maharashtra Live News Today in Marathi व्होट जिहाद'चा 'व्होट धर्मयुद्ध'ने मुकाबला करावा फडणवीस म्हणाले

भारताचा स्टार क्यू खेळाडू पंकजअडवाणीने 28 व्यांदा बिलियर्ड्सचे विजेतेपद पटकावले

महायुतीला सत्तेत राहण्याचा अधिकार नाही,बेरोजगारीवर शरद पवारांची टीका

नितीन गडकरींचा मोठा आरोप, 'काँग्रेसने ग्रामीण भारताला प्राधान्य दिले

पुढील लेख
Show comments