Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

पॅरिस ऑलिंपिक: अर्जुन बबुताचं पदक थोडक्यात हुकलं, मनू भाकर मिश्र नेमबाजीतही पदकाच्या शर्यतीत

Webdunia
सोमवार, 29 जुलै 2024 (16:39 IST)
पॅरिस ऑलिंपिकमध्ये मनू भाकरनं दुसऱ्यांदा फायनल गाठली आहे तर अर्जुन बबुताचं पदक थोडक्यात हुकलं.
नेमबाजीच्या 10 मीटर एयर रायफल प्रकारात अर्जुन बबुतानं शर्थ केली, पण त्याला चौथ्या स्थानावर समाधान मानावं लागलं. अर्जुन एकेकाळी दुसऱ्या स्थानावर होता. मात्र दुसऱ्या एलिमिनेशन राऊंडमध्ये एका शॉटवर त्यानं 9.9 गुणच मिळवले. मग तिसऱ्या स्थानासाठीच्या एलिमिनेशन राऊंडमध्ये अर्जुननं 9.5 गुणच मिळवले.

त्याचा प्रतिस्पर्धी मिरान मारिसिचनं मात्र 10.7 गुणांसह तिसरं स्थान निश्चित केलं. त्यामुळे पदकाच्या अगदी जवळ पोहोचूनही अर्जुनला रिकाम्या हाती माघारी फिरावं लागलं. महिलांच्या 10 मीटर एयर रायफल फायनलमध्ये भारताच्या रमिता जिंदालला सातव्या स्थानावर समाधान मानावं लागलं

दरम्यान मनू भाकरनं तिनं सरबजोत सिंगच्या साथीनं मिश्र सांघिक नेमबाजीची फायनल गाठली.
पात्रता फेरीत या दोघांनी 580 गुणांसह तिसरं स्थान मिळवलं. भारताची ही जोडी उद्या कांस्यपदकासाठीच्या लढतीत खेळेल. काल 10 मीटर एयर पिस्टल नेमबाजीत भारताचं पदकांचं खातं उघडलं होतं.
ऑलिंपिकमध्ये यंदा 32 क्रीडाप्रकारांत 329 सुवर्णपदकांसाठी हजारो अ‍ॅथलीट्स शर्यतीत आहेत. भारतानं या क्रीडा स्पर्धेसाठी 110 जणांचं पथक पाठवलं असून 16 क्रीडाप्रकारांत भारतीय खेळाडू सहभागी होत आहेत.
 
मनू भाकरनं उघडलं पदकांचं खातं (28 जुलै)
22 वर्षीय मनूनं 10 मीटर एयर पिस्टल नेमबाजीत कांस्य पदक पटकावून पॅरिस ऑलिंपिकमध्ये भारताचं पदकांचं खातं उघडलं.

मनू ऑलिंपिकमध्ये पदक मिळवणारी पहिली भारतीय महिला नेमबाज ठरली आहे. तिनं कमावलेल्या या कांस्य पदकामुळे भारताची ऑलिंपिक नेमबाजीत पदकांची 12 वर्षांची प्रतीक्षा संपुष्टात आली.
टोकियो ऑलिंपिकमध्ये मनू भाकरच्या पदरी निराशा पडली होती. ते अपयश मागे सारत तिनं पॅरिसमध्ये कांस्य पदकाची कमाई केली.
 
तिनं फायनलमध्ये 221.7 गुणांची कमाई करत तिसरं स्थान मिळवलं.
तसा 28 जुलैचा दिवस भारतीय नेमबाजांसाठी आशादायक ठरला. कारण 10 मीटर एयर रायफल नेमबाजीत रमिता जिंदाल आणि अर्जुन बबुटा यांनी फायनल गाठली.

महिलांच्या 10 मीटर एयर रायफल महिलांच्या गटात भारताच्या रमिता जिंदालनं 631.5 गुणांसह पाचवं स्थान मिळवलं फायनल गाठली. नेमबाजीच्या या प्रकारात भारताच्या इलानेविल वेलारिवानला मात्र दहाव्या स्थानावर समाधान मानावं लागलं. तर अर्जुन बबुटानं 630.1 गुणांसह सातवं स्थान गाठलं आणि फायनलमधला प्रवेश निश्चित केला. या गटात संदीप सिंगनं बारावं स्थान गाठलं.
 
तिरंदाजीच्या उपांत्यपूर्व फेरीत मात्र भारताच्या महिला टीमचा पराभव झाला. नेदरलँड्सनं भारतावर 6-0 अशी मात केली. टेनिसमध्ये सुमित नागल तर टेबल टेनिसमध्ये अचंता शरथ कमल आणि हरमीत देसाई यांचं आव्हान संपुष्टात आलं. बॅडमिंटनमध्ये पीव्ही सिंधू, बॉक्सिंगमध्ये निखत झरीन तर टेबल टेनिसमध्ये श्रीजा अकुला आणि मनिका बत्रा यांनी आगेकूच केली आहे. तर रोईंगमध्ये बलराज पनवर उपांत्यपूर्व फेरीसाठी पात्र ठरला.
 
मनू भाकरनं गाठली फायनल (27 जुलै)
22 वर्षीय मनूनं 27 जुलैला झालेल्या पात्रता फेरीत 580 गुणांची कमाई करत तिसरं स्थान मिळवलं.
 
मनूनं पात्रता फेरीच्या पहिल्या दोन सीरीजमध्ये प्रत्येकी 97 गुणांची कमाई केली. तिसऱ्या सीरीजमध्ये 98 गुण मिळवत मनूनं तिसरं स्थान गाठलं. पाचव्या सीरीजमध्ये तिनं एका खराब शॉटवर फक्त 8 गुण मिळवले, पण तेवढा एक शॉट वगळता मनूनं उत्तम कामगिरी करत फायनलमध्ये आपलं स्थान निश्चित केलं.
भारताची आणखी एक पिस्टल नेमबाज ऱ्हिदम सांगवान पात्रता फेरीत पंधरावी आली. तिनं 573 गुणांची कमाई केली.
 
शानदार उद्घाटन सोहळा
तब्बल 100 वर्षांनी पॅरिसमध्ये पुन्हा एकदा ऑलिंपिकचं आयोजन केलं जातंय. तसंच तिसऱ्यांदा पॅरिसनं ऑलिंपिकचं आयोजन केलं आहे.
 
ऑलिंपिकची सुरुवात जरी ग्रीसमध्ये झाली असली, तरी आधुनिक ऑलिंपिक पॅरिसमध्येच आकाराला आलं. साहजिकच या पॅरिसचं ऑलिंपिकशी खास नातं आहे. उदघाटन सोहळ्यातही त्याची झलक पाहायला मिळाली.
2024 चा उद्घाटन सोहळा न भूतो न भविष्यती असाच होता. या स्पर्धेत सहभागी झालेल्या 205 देशांच्या संघांची परेड यावेळी स्टेडियममध्ये नाही, तर सीन नदीत बोटींवरून निघाली. परेडच्या पूर्ण मार्गावर ठीकठीकाणी कलाविष्कार पाहायला मिळाले.

कार्यक्रमाच्या अखेरीस टॉर्च रिलेमध्ये फ्रान्सचा सुपरस्टार फुटबॉलर झिनेदिन झिदान सहभागी झाला. तर टेनिसस्टार राफेल नदाल, सेरेना विल्यम्स, अमेली मोरेस्मो तसंच अ‍ॅथलीट कार्ल लुईस आणि जिम्नॅस्ट नादिया कोमानेची यांच्यासह फ्रान्सचे अनेक दिग्गज खेळाडू रिलेच्या अखेरच्या टप्प्यात सहभागी झाले होते.
 
एका महिला आणि पुरुष अ‍ॅथलीटनं एकत्रितपणे ऑलिंपिक ज्योत प्रज्वलित केली आणि विविधतेत एकता आणि समानतेचा संदेश दिला. यंदा पहिल्यांदाच ऑलिंपिकमध्ये पुरुष आणि महिला खेळाडूंचं प्रमाण 50-50% एवढं समान आहे. लेडी गागा आणि सेलिन डियॉन सारख्या दिग्गज कलाकारांच्या सादरीकरणानं उद्घाटन सोहळ्यात रंगत आणली.

लेडी गागानं सुरुवातीला गाणं सादर केलं तर सेलिन डियॉननं आयफेल टॉवरच्या अर्ध्यावरील टेरेसावरून गात कार्यक्रमाची सांगता केली. दोन वर्षांपूर्वी एका दुर्धर आजारामुळे गाण्याचे कार्यक्रम सेलिन डियॉननं बंद केले होते. एक प्रकारे तिचं हे कमबॅक ठरलं.फ्रान्समधल्या कला, संगीत, इतिहास आणि ऑलिंपिक चळवळीची वाटचाल अशा गोष्टींचं प्रतीक त्यात पाहायला मिळालं.
 
Published By- Priya Dixit 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

मार्गशीर्ष गुरुवारी महाविष्णूच्या पूजेचे महत्त्व आणि उपासनेची सोपी पद्धत जाणून घ्या

हे 3 गुण असलेल्या महिला भाग्यवान असतात, नवरा आणि सासरचे लोक नेहमी आनंदी राहतात !

घरात या 5 पक्ष्यांचे फोटो लावा, ज्ञान- समृद्धी वाढते, तिजोरी धनाने भरलेली राहते

आपले नाते कसे मजबूत करावे, 5 गोष्टी लक्षात ठेवा

त्वचेच्या कर्करोगाच्या संरक्षणासाठी हे उपाय खूप प्रभावी आहेत

सर्व पहा

नवीन

महाराष्ट्राच्या विजयाबद्दल पंतप्रधान मोदींनी व्यक्त केले मतदारांचे आभार

LIVE: महाराष्ट्र विधानसभा निवडणूक निकाल 2024: पक्षाची स्थिती

LIVE: पंतप्रधान मोदींच्या धोरणाचा आणि अतूट विश्वासाचा परिणाम- मुख्यमंत्री योगी

5 वर्षाच्या पोटाच्या मुलीची गळा दाबून हत्या, आईला करायचे होते दुसरे लग्न

Assembly Election Result : पंतप्रधान मोदींच्या धोरणाचा आणि अतूट विश्वासाचा परिणाम- मुख्यमंत्री योगी

पुढील लेख
Show comments