Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

फिलिपाईन्स डायरी 3

Webdunia
PR
हाय, आह... शेवटी महिनाभराच्या प्रतिक्षेनंतर मला मनिलामधली पहिली सुट्टी उपभोगायला मिळाली.... मनिला.... पिनॉय मात्र न चुकता 'मेट्रो मनिला' म्हणून उल्लेख करतात. पासिगसिटी, केझॉन सिटी, कविटे, मंडालुयांग अशा अनेक छोट्या मोठ्या उपनगरांनी बनलेली 'मेट्रो मनिला'. आम्ही राहतो मकाती सिटीमध्ये. आपल्या जगन्नाथ शंकरशेठांसारखाच मकाती नावाच्या उद्योगपतीने विकसीत केलेली मकाती सिटी. दक्षिण मुंबईप्रमाणेच आर्थिक व्यवहारांचे केंद्र असणारा मकाती सिटीचा भाग... उंचंच उंच इमारतीची 'स्कायलाईन' नरीमन पॉइंट सारखी परदेशी प्रवाशांसाठी एक सुरक्षित आणि मस्त विभाग.

जगभरचे टॅक्सीवाले, रिक्षावाले पण सारखेच. तुम्हाला जर रस्ता माहित नसलाच तर झालेच. तो टॅक्सीवाला मनिला दर्शन घडवणार याची खात्री! रोज ऑफिसला जाताना टॅक्सीवाला योग्य शॉर्टकटने नेतो आहे की नाही यावर लक्ष ठेवावे लागते. पहिल्या आठवड्यात मी घरी परतताना टॅक्सीवाल्याने रस्ता चुकवला. त्या नवीन भागातून जाताना माझे लक्ष एका म्युझियमकडे गेले. आणि दोन तीन मिनिटातच टॅक्सी आमच्या सर्व्हिस अपार्टमेंटपाशी पोहोचली. हम्म् म्हणजे जवळपास संग्राहालय आहे तर... मी मनाशीच नोंद केली.

विमानतळावर मिळालेल्या 'सिटी गाईड' मध्ये मनिला मधल्या तब्बल 48 संग्रहालयांची माहिती होती. बाहुल्यांच्या संग्रहालयापासून पादत्राणांच्या संग्रहालयापर्यंत बरीचशी संग्रहायले आध‍ुनिक इतिहास, स्पॅनिश आणि अमेरिकन शासनाचा काळ, पिनॉय (फिलिपिनो) लोकांचा स्वातंत्र्यलढा अशा विषयांवर आहेत.

मी पाहिले होते 'योचेंग्को संग्रहालय'. आल्फ्रेड युचेंग्को हे एक आघाडीचे चिनी उद्योगपती, RCBC या एका मोठ्या फिलिपिनो बँकेचे अध्यक्ष, अनेक देशांमध्ये राजदूत म्हणून वावरलेले. सालारजंगप्रमाणेच यांनीही संग्रहित केलेल्या चित्रांचे, कलाकृतींचे प्रदर्शन इथे आहे. संग्रहालयात प्रसिद्ध पिनॉय चित्रकार फर्नांडो अमोरसोलो (माझे सर्व्हिस अपार्टमेंट 'अमोर सोलो' रस्त्यावर 'अमोरसोलो मॅन्शन' याच नावाने आहे), ह्युआन ल्यूना, कार्लोस फ्रान्सिस्को अशा दिग्गजांनी ‍विचारलेली चित्रे प्रदर्शित केली आहेत. अमोरसोलोची चित्रे म्हणजे डोळ्यांसाठी अप्रतिम मेजवानीचं. राजा रविवर्मा, बेंद्रे, पंडित यांच्या चित्रांची आठवण करून देणारी. नैसर्गिक प्रकाशाचा पुरेपुर वापर करत पिनॉय सौंदर्याचे पुरेपूर दर्शन अमोर सोलो घडवतो. संग्रहालयाच्या एका भागात काही धातूच्या कलाकृती आणि जर्मन फॅशन फोटोग्राफीचे प्रदर्शन होते.

संध्याकाळी दर आठवड्याच्या खरेदीसाठी 'अयाला सेंटर ला' गेलो. आयला सेंटर म्हणजे अनेक मॉल्सनी बनलेले एक विस्तृत जाळे आहे. सगळे मॉल्स एकमेकांना 'स्काय वॉक'ने जोडलेले. रस्ता ओलांडणे हा प्रकार नाही. ग्रीनबेल्ट मॉलचे ( Greenbelt) पाच भाग, लँडमार्क मॉल, ग्लोरिएटा मॉलचे पाच भाग, रस्टन्स मॉल असा प्रचंड पसारा आहे. अयाला प्रॉपर्टिजने विकसित केलेला हा प्रचंड मोठा शॉपिंग एरिया आहे. अयाला समूह म्हणजे आपल्याकडच्या टाटा समूहासारखे प्रकरण आहे. 175 वर्ष जुन्या असलेल्या या औद्योगिक घराण्यात एक कलावंतही जन्माला आला... झोबेल अयाला. स्वत: चित्रकार असणार्‍या झोबेल अयालांनी 'अयाला संग्रहालय' स्थापन केले. अयाला सेंटरमध्येच असणारे संग्रहालय शोधून काढले. रविवार असल्यामुळे संग्रहालय उशीरापर्यंत खुले होते. तिकिट घेत असतानाचं चवथ्‍या मजल्यावर सुवर्ण एका सभागृहात मी प्रवेश केला. मला माहितीपट पहायचा आहे का? म्हणून तिथल्या सहायकाने मला विचारले. मी हो म्हणताच समोरची वीस फुटी अर्ध गोलाकार भिंतीवर माहितीपट उलगडू लागला. माहितीपट सोन्याबद्दल होता. प्राचीन भारतात फिलिपाईन्सचा उल्लेख 'सुवर्णद्विप' असा केला जायचा. या देशात सोन्याचा भरपूर साठा होता. इतका की लोकांना नदीच्या पा‍त्रात सोन्याचे दगड सापडायचे. सोन्याचे शु्द्धीकरण ही इथे खूप प्रगत झालेली प्रक्रिया होती. जेव्हा स्पॅनिश लोकांचे इथे आगमन झाले तेव्हा फिलिपिनो लोकांची स्वत:ची शुद्धतेची मानके (18 कॅरेट, 24 कॅरेट सारखी) विकसित झाली असल्याची नोंद त्यांनी केली. सोन्याचा वापर लोकांमध्ये इतका रुळला होता की लहान मुले सुद्धा नुसत्या नजरेने सोन्याची शुद्धता पारखू शकत होती. सर्वांकडे भरपूर सोने होते. सोन्याचा वापर ही काही फार नाविन्याची गोष्ट नव्हती. याच सोन्याच्या प्राप्तीसाठी राज श्री विजय सुमात्रावर राज्य करत असताना भारतीयांनी सुवर्णद्विपासोबत व्यापारउदिम चालू केला.... इसवी सनाच्या सातव्या शतकात...

तो माहितीपट तांत्रिकदृष्टया इतका परिपूर्ण आखला होता ती एका क्षणी माहितीच्या ओघात समोरच्या पडद्यावर अंधार झाला आणि त्याच क्षणी छतामध्ये बसवलेला एक स्पॉटलाईट जमिनीवर पडला. काचेने बनवलेल्या जमिनीखाली असणारे सोन्याचे तुकडे, दागिने, नाणी चमकू लागली. अरे... इतका वेळ तर माझे लक्षच गेले नव्हते या खजिन्याकडे. ते दृश्य, तो परिणाम तांत्रिक सुसंबद्धतेमुळे मनावर छाप सोडून गेला.

एका बांधकाम कामगाराला बांधकाम करताना सापडलेला हा खजिना सरकारच्या हाती पडण्याआधीच लुटला गेला. लिओनार्डो लॉकसिन नावाच्या वास्तुतज्ञाने आपल्या हौसेखातर हा खजिना विकत घ्यायला सुरूवात केली. त्याने जमवलेला हा संग्रह अनेक वर्ष दडवून ठेवला होता. गरिबीचे साम्राज्य असलेल्या या देशात संपत्तीचे प्रदर्शन करण्यास तो तयार नव्हता. शेवटी एकदाचे 2004 मध्ये या संग्रहालयाचे उद्‍घाटन झाल्यावर त्याने हा खजिना संग्रहालयाकडे सुपूर्द केला. हजारापेक्षा जास्त सुवर्ण कलाकृती इथे मांडला आहेत. हातकडे, ब्रेसलेट्‍स, मृतांच्या चेहर्‍यावर ठेवण्याचे मुखवटे, कर्णआभूषणे, सोन्याच्या साखळ्या तगालू लिपी (पिनॉय लोकांची बोली भाषा 'तगालू'. जुनी लिपी मात्र आता वापरात नाही) मधले सुवर्ण पट. 800 ग्रॅम वजनाचे नेकलेस आणि कंबरपट्टे पाहून सोन्याचा सुकाळ कसा असेल ते जाणवले. कलाकुसर फार नक्षीदार नसली तरी आकर्षक होती. भारतीय संस्कृतीचा प्रभाव जाणवत होता. गरुडाच्या आकाराची कर्णभूषणे, अर्धे शरीर मानवाचे आणि अर्धे पक्ष्याचे असणारी किन्नरी... प्रदर्शनाचा केंद्रबिंदू असणारी कलाकृती पाहून मी मंत्रमुग्ध झालो.

ते होते एक 'यज्ञोपवित'... मराठीमध्ये 'जानवे' हिंदीतले 'जनेयू' पिनॉय समाजातील उच्च वर्गातील लोक डाव्या खांद्यावरून हे जानवे घ्यायचे. स्पॅनिश इतिहासकारांनी 'बॉक्सर कोडेक्स' या पुस्तकातही या प्रथेची नोंद केली आहे.

फिलिपाईन्सच्या सुरिगाओ विभागातून हे जानवे सापडले. याचे वैशिच्टय म्हणजे, हे जानवे सोन्याने बनले आहे. अनेक साखळ्यांची गुंफण करून जवळपास एक मीटर लांबीचे हे जानवे, झळाळत्या चार किलो सोन्यापासून बनवले गेले आहे. अगदी गाठसुद्धा त्या कलाकाराने कौशल्याने बनवली आहे.

संग्रहलयात कॅमेरा नेण्याची परवानगी नसल्याने छायाचित्र घेता आले नाही. नेटवर सुद्धा या सुरेख दागिन्यांचे सोंदर्य पुरेपूर दाखवणारा फोटो मिळाला नाही.

दोन्ही संग्रहालयांनी, औद्योगिक घराण्यांमध्ये असणारी सामाजिक जबाबदारीची जाणीव मला दाखवली, अगदी आपल्या राजा केलकर संग्रहालयात सुद्धा अनेक अद्भुत वस्तूंचा खजिना आहे. परंतु मर्यादित साधनांमुळे अपुर्‍या आर्थिक बळामुळे आपण तो जगापुढे आणण्यात मागे पडतो.

धन्यवाद श्री अयला, श्री योगचेंग्को, तुम्ही माझ्यासाठी राखलेल्या खजिन्याबद्दल!

- चारू वाक ( अनुवादित)
charuwaq@gmail.com

अयोध्या विशेष : राम जन्मस्थळ अयोध्यांचे 10 मुख्य प्रेक्षणीय स्थळ...

कुणकेश्वरचा इतिहास

सफर निसर्गरम्य बूंदीची

पलरुवी अर्थात दुधाचा धबधबा

रामेश्वरम्: एक प्रसिद्ध तीर्थक्षेत्र

'अनुपमा' अभिनेत्री रुपाली गांगुली भाजपमध्ये दाखल

हरमन बावेजा पुन्हा बाबा झाला, पत्नीने दिला गोंडस मुलीला जन्म

रांजणगावाचा महागणपती

आमिर, शाहरुख आणि सलमान एकत्र काम करणार?कपिलच्या शो मध्ये खुलासा!

Funny Summer Camp Joke विवाहित पुरुषांसाठी समर कॅम्प

Show comments