Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

मुंबईकरांसाठी पालिकेकडून 10 टक्के पाणी कपात अखेर रद्द

water tap
, मंगळवार, 8 ऑगस्ट 2023 (21:22 IST)
यंदाच्या पावसाळ्यामध्ये प्रारंभी मुंबईस पाणीपुरवठा करणाऱ्या तलाव क्षेत्रात अपूर्ण पर्जन्यवृष्टीमुळे जलसाठा घटला होता. ती स्थिती लक्षात घेऊन पर्जन्यवृष्टीत सुधारणा होईपर्यंत बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनातर्फे मुंबईच्या पाणीपुरवठ्यात दिनांक 1 जुलै 2023 पासून 10 टक्के कपात करण्याचा निर्णय घेण्यात आला होता.
 
मुंबई महानगराला पाणीपुरवठा करणाऱ्या अप्पर वैतरणा, मोडकसागर, तानसा, हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे मध्य वैतरणा जलाशय, भातसा, विहार आणि तुळशी या सात जलाशयांमध्ये मिळून संपूर्ण मुंबई महानगराला पाणीपुरवठा करण्यासाठी एकूण उपयुक्त जलसाठा 14 लाख 47 हजार 363 दशलक्ष लीटर इतका असावा लागतो. सद्यस्थितीत तलाव क्षेत्रात समाधानकारक पर्जन्यवृष्टी झाल्याने पाणीसाठा 80 टक्क्यांहून अधिक झाला आहे. या कारणाने आता 10 टक्के पाणी कपात रद्द करण्यात आली आहे.
 
असे असले तरी, ऑगस्ट व सप्टेंबर 2023 मध्ये काही प्रतिकूल परिस्थिती निर्माण झाल्यास, त्याप्रमाणे योग्य तो निर्णय घेण्यात येईल, असे महानगरपालिका प्रशासनातर्फे कळविण्यात आले आहे. तलाव क्षेत्रात पुरेशा प्रमाणात जलसाठा उपलब्ध होत असला तरी, नागरिकांनी पाण्याचा वापर काळजीपूर्वक करावा, असे आवाहनही महानगरपालिका प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.
 




Edited By - Ratnadeep Ranshoor
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

‘माझी माती, माझा देश’ अभियान : देश आणि वीरांच्या बलिदानाप्रति कृतज्ञता