Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

ठाण्यात प्रेयसीला कारखाली चिरडण्याचा प्रयत्न, इन्स्टाग्राम पोस्टमुळे प्रकरण उघडकीस

Webdunia
रविवार, 17 डिसेंबर 2023 (10:04 IST)
ठाण्यात एका तरुणानं प्रेयसीलाच कारखाली चिरडण्याचा प्रयत्न केल्याची घटना घडली आहे. ही तरुणी गंभीर जखमी असून रुग्णालयात सध्या तिच्यावर उपचार सुरू आहेत. आरोपी तरुण हा महाराष्ट्रातील वरिष्ठ आयएएस अधिकाऱ्याचा मुलगा असल्याचा दावा या तरुणीनं केलं आहे.
 
प्रिया सिंह असं या पीडित तरुणीचं नाव असून, ती सोशल मीडिया इनफ्लुएन्सर आहे.
 
अश्वजित गायकवाड असं तिच्या बॉयफ्रेंडचं नाव असल्याचं सोशल मीडियावर केलेल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे. या अश्वजितनंच कारखाली चिरडण्याचा प्रयत्न केल्याचा प्रिया सिंहचा आरोप आहे.
 
"मी चार दिवसांपूर्वीच एफआयआर केला होता. पण कोणी यायला तयार नव्हतं, ते विलंब करत होते. पण आज मी सोशल मीडियावर पोस्ट केली. त्यामुळं आज पोलीस सहकार्य करत आहेत," असा प्रिया सिंह हिने केला आहे.
 
याबाबत माहिती देताना ठाण्याचे पोलीस उपायुक्त अमरसिंह जाधव म्हणाले की, "पीडितेचा अश्वजित गायकवाड, रोमील पाटील, सागर शेळके यांच्याशी वाद झाला. पीडितेच्या जबाबानुसार भारतीय दंड विधान कलम 279, 338, 323, 504, 34 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संशयित आरोपींवर कायदेशीर कारवाईची प्रक्रिया सुरू आहे."
 
आरोपी अश्वजितसोबत साडेचार वर्षे रिलेशनशिपमध्ये असल्याचा दावा प्रिया सिंह हिने केला आहे.
 
अश्वजितनं मला लग्नाचं आश्वासन दिलं होतं आणि त्याचे पुरावे फोनमध्ये असल्याचंही प्रिया सिंहचं म्हणणं आहे.
 
"त्यानं मला पत्नीबरोबर घटस्फोट झाल्याचं सांगितलं होतं. पण त्या दिवशी कार्यक्रमात अश्वजितला मी त्याच्या पत्नीबरोबर पाहिल्यानं तो संतापला होता. त्यामुळेच त्यानं मला जीवे मारण्याचा प्रयत्न केला," असंही तरुणीनं म्हटलं.
 
तरुणीनं सांगितली आपबिती
इन्स्टाग्रामवरील पोस्टच्या माध्यमातून प्रिया सिंहने या संपूर्ण घटनेचं भयावह वर्णन केलं आहे. ते खालीलप्रमाणे :
 
"सोमवारी पहाटे 4 वाजता मला माझा बॉयफ्रेंड (अश्वजित गायकवाड) याचा फोन आला तेव्हा मी त्याला भेटायला गेले. तो त्याचं कुटुंब आणि आमच्या काही मित्रांसह एका कार्यक्रमात होता. तिथं गेल्यावर मी काही मित्रांना भेटले, तेव्हा माझा बॉयफ्रेंड विचित्रपणे वागत असल्याचं माझ्या लक्षात आलं. त्यामुळं मी त्याला काय झाल्याचं विचारत, एकांतात बोलू, असं म्हणून बाहेर येऊन त्याची वाट पाहू लागले.
 
"तो मित्रांबरोबर बाहेर आला. मी त्याच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला, पण त्याच्या मित्रानं (रोमील पाटील) मला त्याच्याशी बोलूच दिलं नाही. उलट माझा अपमान केला. अपमान केल्यानं आमच्यात प्रचंड वाद झाला. त्यांनी शिवराळ भाषेचा वापर सुरू केला. मी माझ्या बॉयफ्रेंडला मला वाचवण्यास सांगितलं, तर त्यानंतर असं काही घडलं, ज्याची मी कधीही कल्पना केली नव्हती."
प्रिया सिंहने पुढे सांगितलं की, "बॉयफ्रेंडनं मला थोबाडीत मारलं, गळा दाबण्याचा प्रयत्न केला. त्याला ढकलण्याचा प्रयत्न केला, तेव्हा माझे केस ओढत मारहाण केली आणि त्याच्या मित्रांनीही मला ओढत मैदानावर नेलं."
 
ड्रायव्हरला सांगितलं, 'उडा दो उसे'
 
प्रिया सिंहने पुढे सांगितलं की, "मला काही कळण्याआधीच ते त्यांच्या कारकडं गेले. मी लगेच माझा फोन आणि बॅग घेण्यासाठी बॉयफ्रेंडच्या कारच्या दिशेनं धावले. त्यानं आधीच फोन आणि बॅग माझ्याकडून हिसकावून कारमध्ये ठेवले होते. पण मी कारजवळ जाताच त्यानं त्याच्या ड्रायव्हर (सागर) ला 'उडा दे उसे' असं सांगितल्याचं मी ऐकलं. त्याच्या ड्रायव्हरनंही कारचा वेग वाढवत कारच्या डाव्या बाजूनं मला धडक देत खाली पाडलं. त्यामुळं त्यांच्या कारचं चाक माझ्या उजव्या पायावरून गेलं.
 
"20-30 मिनिटं हा गोंधळ सुरू होता. मी प्रचंड वेदनांनी त्रस्त होते, मदत मागत होते. पण ते सगळे मला मदत न करता पळून गेले. मी फोन किंवा कोणत्याही मदतीशिवाय अर्धा तास रस्त्यावर पडून होते. त्यावेळी रस्त्यावरून जाणाऱ्या एकानं मला पाहिलं आणि स्थानिक पोलिसांना माहिती दिली.
 
"तो अनोळखी माणूस माझ्याजवळ थांबला होता. त्यावेळी ड्रायव्हर मी मेली की जीवंत आहे, हे पाहण्यासाठी आला. पण तिथं माणसाला पाहून पोलिसांपर्यंत प्रकरण जाऊ नये म्हणून ड्रायव्हर हॉस्पिटलमध्ये घेऊन गेला. पण हॉस्पिटमध्ये नेताना रस्त्यात ड्रायव्हरनं धमकावण्याचा प्रयत्न केला की, या प्रकरणात पोलिसांना आणू नको. कारण चिचू भाई (अश्वजित) यांची किती पोहोच आहे, तुला तर माहितीच आहे. मी सर्व आरोप स्वतःवर घेऊन टाकेल त्यामुळं तू त्यांना तसंही काहीही करू शकणार नाहीस."
 
दरम्यान, हॉस्पिटलला पोहोचल्यानंतर तरुणीनं कुटुबीयांना संपर्क करण्यासाठी फोन मागितला. पण जेव्हा डॉक्टरनं कुटुंबीयांना सांगण्यास सांगितलं, तेव्हा त्यानं तरुणीच्या बहिणीला कॉल लावून दिला.
 
कुटुंबीयांना धमक्या
प्रिया सिंह हिने पुढे म्हटलं की, "भूल दिलेली असल्यानं मी आजच शुद्धीत आले. माझा उजवा पाय मोडलेला असून मला शस्त्रक्रिया करावी लागली. मला पायात रॉड टाकावा लागला. माझ्या संपूर्ण शरीरावर जखमा आहेत. हात, पोट आणि पाठीवर खूप जखमा आहेत. मला 3-4 महिने अंथरुणावर राहावं लागेल आणि नंतरही 6 महिने मी मदतीशिवाय चालू शकणार नाही. मी माझ्या कुटुंबातील कमावणारी एकमेव सदस्य आहे," असं तिनं पोस्टमध्ये वर्णन करताना लिहिलं.
 
"आम्ही साडेचार वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये आहोत. पण तरीही तो मला पाहायलाही आला नाही, यावर माझा विश्वासच बसत नाही. त्यामुळं त्याला माझा जीवच घ्यायचा होता, हे स्पष्ट होतं."
 
"आम्ही या प्रकरणात पोलिसांत तक्रार केली आहे. त्यामुळं त्याचे काही मित्र सातत्यानं हॉस्पिटलमध्ये येत असून माझ्या बहिणीला धमक्या देत आहेत. मी प्रचंड घाबरलेली आहे. मला माझी आणि माझ्या कुटुंबाची काळजी वाटत आहे. मला जराही सुरक्षित वाटत नाही. माझा माणुसकीवरचा विश्वासच उडाला आहे. माझं जीवन पुन्हा पूर्वीसारखं सामान्य होईलही की नाही, हे मला माहिती नाही. कृपया माझ्यासाठी आणि मला न्याय मिळण्यासाठी प्रार्थना करा," असंही प्रिया सिंह म्हणाली.
 
प्रियाच्या वकिलांचं म्हणणं काय आहे?
एएनआयच्या वृत्तानुसार, प्रियाच्या वकिलांचं म्हणणं आहे की, कलम 307 अंतर्गत हा गुन्हा नोंदवायला हवा होता.
प्रियाच्या वकील दर्शना पवार म्हणाल्या, "घटना घडून चार दिवस उलटले आहेत. आम्ही वारंवार तपास अधिकाऱ्यांना कलम 307 आणि कलम 356 नुसार जबाब नोंदवण्यास सांगत आहोत, मात्र अद्याप तसे झालेले नाही. "असं झालं नाही तर आम्ही हायकोर्टात जाऊ. प्रियाला न्याय मिळायला हवा."
 
गुन्हेगाराला अटक कधी होणार? - काँग्रेस
या घटनेवर काँग्रेसचे प्रवक्ते अतुल लोंढे म्हणाले की, "या प्रकरणात गुन्हा दाखल झाला असला तरी गुन्हेगाराला मात्र अजून अटक करण्यात आलेली नाही. यात काहीतरी गौडबंगाल असून संशयाला बळ देणारे आहे. देवेंद्र फडणवीस हे अतिशय कार्यक्षम आणि सक्षम नेते आहेत असे सांगितले जाते. मग एवढे कार्यक्षम नेते गृहमंत्री पदावर असतानाही ठाण्यासारख्या शहरात मुलीला चिरडण्याचा गंभीर प्रकार होत असेल तर त्यांच्या कार्यपद्धतीवर व कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारे आहे. गृहविभाग काय करत आहे? आणि ठाणे प्रकरणातील गुन्हेगाराला अटक कधी होणार? याचे उत्तर महाराष्ट्राला द्या."
 
अतुल लोंढे पुढे म्हणाले की, "भाजपाने एक नवीन प्रशासकीय पॅटर्न आणला असून वरिष्ठ अधिकाऱ्यांना पुन्हा पुन्हा महत्वाच्या पदावर नियुक्त्या दिला जात आहेत. यातून या अधिकाऱ्यांची मुलेही निर्ढावत असल्याचे दिसत आहे. ठाण्यात एका मुलीला गाडीखाली चिरडून मारण्याचा प्रयत्न झाला त्यातील आरोपीचे नाव अश्वजित गायकवाड असून भारतीय जनता युवा मोर्चाचा तो नेता आहे तसेच MSRDC चे वरिष्ठ अधिकारी अनिल गायकवाड यांचा तो मुलगा आहे. त्या मुलीशी अश्वजितचे प्रेमसंबंध होते अशी माहिती मिळत आहे. वडिल प्रशासनात उच्च अधिकारी असल्यानेच अश्विजित गायकवाडला अटक होत नाही का?"
 
ठाणे प्रकरणातील गुन्हेगार कितीही मोठा असला तरी त्याला बेड्या ठोका व पीडित मुलीला न्याय द्या, असेही अतुल लोंढे म्हणाले.
 
दरम्यान, काँग्रेस प्रवक्ते अतुल लोंढे यांच्या आरोपावर आणि मागणीवर अद्याप राज्य सरकारकडून किंवा भाजपकडून कुणीही भूमिका मांडली नाहीय. अशी भूमिका मांडल्यास इथे अपडेट करण्यात येईल.
 
Published By- Priya Dixit
 
 
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

साडी नेसल्याने कॅन्सर होऊ शकतो का? ही सुरुवातीची लक्षणे असू शकतात

Amla Navami 2024: आवळा नवमीला पूजा विधी

वामनस्तोत्रम्

नारायणस्तोत्रम् आणि नारायणाथर्वशीर्षोपनिषत्

Tulsi vivah 2024: शालिग्रामचा विवाह तुळशीशी का करतात?

सर्व पहा

नवीन

महिलां विरोधातील टिप्पणी महागात पडणार!

महाराष्ट्र सरकारने तरुणांसाठी लाडला भाऊ योजना सुरू केली, माहिती जाणून घ्या

माजी गृहमंत्री लालकृष्ण अडवाणी आज 97वर्षांचे झाले.पंतप्रधान मोदी माजी राष्ट्रपती कोविंद यांनी दिल्या शुभेच्छा

भाजपच्या पोस्टरवरून एकनाथ शिंदे गायब, कांग्रेसने लगावला टोला

20 नोव्हेंबर रोजी मतदानाच्या दिवशी शेअर मार्केट बंद राहील

पुढील लेख
Show comments