Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

बिपरजॉय : चक्रीवादळ येतंय, आपत्कालीन किटसह या गोष्टींची तयारी करा

Webdunia
मंगळवार, 13 जून 2023 (21:34 IST)
भारतीय उपखंडात मान्सूनआधी आणि मान्सूननंतर चक्रीवादळं येणं नवं नाही. प्रशासन, कोस्ट गार्ड आणि अन्य सरकारी यंत्रणांनी त्यासाठी सतर्क आणि सज्ज राहणं कायम अपेक्षित असतं.
 
पण वादळाची शक्यता असेल, तर सामान्य लोकांनीही काही काळजी घ्यायला हवी.
 
अशा परिस्थितीमध्ये कोणत्या गोष्टी कराव्यात आणि काय टाळावं, याची माहिती हवामान विभाग आणि राष्ट्रीय आपदा निवारण दल यांनी वेळोवेळी प्रसिद्ध केली आहे.
 
या टिप्स नक्कीच तुम्हाला उपयुक्त ठरतील.
 
त्याआधी, चक्रीवादळामुळे नेमका कुठल्या गोष्टींचा धोका असतो, तेही लक्षात घेणं गरजेचं आहे.
 
चक्रीवादळादरम्यान समुद्राला उधाण येतं, किनाऱ्यावर मोठ्या लाटा उसळतात. वादळाचा प्रभाव असलेल्या क्षेत्रात सोसाट्याच्या वाऱ्यासह जोरदार पाऊस पडतो.
 
वादळामुळे झाडे पडणे, इमारतींच्या छप्पर आणि काचांचं नुकसान, अतीवृष्टी झाल्यास पूर आणि भूस्खलन अशा आपत्तींची शक्यता असते आणि गावा-शहरांतही मोठं नुकसान होऊ शकतं.
 
याचा सामना करण्यासाठी आधीच सज्ज राहणं गरजेचं आहे.
 
वादळाआधी ही तयारी करा
* घराची काळजी घ्या. घरातील फरश्या, खिडक्या, दरवाजे निखळले असतील तर त्यांची तातडीने दुरुस्ती करून घ्या.
* घराच्या आजूबाजूच्या स्थितीची पाहणी करा. मेलेली आणि उन्मळत आलेली झाडं काढून टाका.
* खिडक्या आणि दारं बंद ठेवा. घरात लाकडी फळ्या ठेवा. त्याचा उपयोग काचेच्या खिडक्यांना लावण्यासाठी आधार म्हणून करता येईल. लाकडी फळ्या नसतील तर खिडक्यांच्या काचांना कागद चिटकवून ठेवा, जेणे करून काच फुटली तरी तुकडे आत पसरणार नाहीत.
* धारदार वस्तू, रॉकेलचे डबे, शेती अवजारं, बागकामातील अवजारं, फलक अशा वस्तू वादळात धोकादायक ठरतात. वादळात अशा वस्तू तुमच्यावर आदळू शकतात. अशा वस्तू हटवून योग्य ठिकाणी झाकून ठेवा.
* इलेक्ट्रिक उपकरणं, गॅस बंद करून ठेवा.
* रॉकेलचा कंदील, मेणबत्त्या, काडेपेट्या तयार ठेवा. याशिवाय टॉर्च आणि जास्तीचे बॅटरी सेल असतील याची दक्षता घ्या.
* कोरडे खाद्यपदार्थ स्वतःजवळ जास्त प्रमाणात ठेवा. पिण्याच्या पाण्याची उपलब्धता ठेवा. रेड क्रॉस संस्थेच्या मते सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करत असाल तर साधारण दोन-तीन दिवस पुरेल एवढ्या अन्नपाण्याची व्यवस्था करावी आणि घरीच असाल तर दोन आठवडे पुरेल एवढ्या गोष्टी साठवून ठेवा. माणशी साधारण तीन लीटर पाणी गरजेचं असतं.
* घरात रेडिओ असेल तर तो सतत सुरू राहील याची दक्षता घ्या. रेडिओवर हवमानाची स्थिती आणि इतर सूचना प्रसारित केल्या जातात. ते काळजीपूर्वक ऐका आणि इतरांनाही त्याची माहिती द्या. इतरांना फक्त अधिकृत माहितीच द्या.
* तुमचा मोबाईल फोन चार्ज करून ठेवा. एसएमएसचा वापर करा.
* एखादी मोठी दोरी जवळ ठेवा, जी बचावकार्यात मदत करू शकेल.
* मजबूत आणि टिकाऊ शूज घाला.
* मच्छीमारांनी आपल्या बोटी सुरक्षित जागी बांधून ठेवाव्यात, समुद्रात जाऊ नका.
* सखल भागातल्या समुद्र किनाऱ्यांपासून दूर राहा. उंच ठिकाणी वेळेत पोहोचा. जर तुमचं घर उंचावर असेल तर तुमच्यासाठी सर्वात सुरक्षित आहे. पण तरी सुद्धा तुम्हाला सुरक्षित जागी जाण्यास सांगितलं तर सूचनांचे पालन करा.
* धोकादायक इमारतींपासून सतर्क राहा.
* जास्त पावसात ज्या ठिकाणी नद्यांना पूर येतो तिथून दूर राहा.
* जर तुमचं घर असुरक्षित ठिकाणी असेल तर नुकसानीचं प्रमाण कमी करण्यासाठी मौल्यवान आणि इतर वस्तू वरच्या मजल्यावर ठेवा. महत्त्वाची कागदपत्रं, मौल्यवान वस्तू वॉटरप्रूफ डब्यात ठेवा.
* आपात्कालिन परिस्थितीचा सामना करण्यासाठी एक किट तयार ठेवा. या किटमध्ये काय असायला हवं, हे खाली दिलं आहे.
 
आपात्कालीन किटमध्ये या गोष्टी ठेवू शकता.
 
* पाणी, कोरडे खाद्यपदार्थ
* रेडियो किंवा ट्रान्झिस्टर, सेल फोन, चार्जर, पॉवरबँक
* टॉर्च, एक्स्ट्रा बॅटरी सेल, मेणबत्त्या आणि काडेपेटी
* फर्स्ट एड किट, औषधं,
* सॅनिटरी पॅड्स, पाणी शुद्ध करणाऱ्या गोळ्या किंवा लिक्विड, कचरा ठेवण्यासाठी एखादी पिशवी
*कात्री-चाकू किंवा स्विस नाईफसारखं मल्टीपर्पज टूल
* महत्त्वाच्या कागदपत्रांच्या प्रती – या प्रती वॉटरप्रूफ बॅगमध्ये किंवा डब्यात ठेवा
* फॅमिली आणि इमर्जन्सी काँटॅक्ट माहिती
* पैसे
* परिसराचा नकाशा
* शिटी
* मास्क
* रेनकोट
* एखादं ब्लँकेट, टॉवेल आणि एखाद्या दिवसाचे कोरडे कपडे
* घर, गाडीच्या चाव्या
* मुलं किंवा पाळीव पाण्यांचं सप्लाय किट
 
वादळ आल्यावर काय करावं?
* शांत राहा. आणीबाणीच्या परिस्थितीमध्ये लढण्याची तुमची क्षमता इतरांनाही मार्गदर्शक ठरेल
* मुलांची आणि वृद्धांची तसंच घरातील पाळीव प्राण्यांची काळजी घ्या.
* वादळाचा डोळा जर तुमच्या परिसरावर असेल तर यावेळी पाऊस आणि वाऱ्यापासून दिलासा मिळतो. यावेळात अर्धा तास किंवा त्यापेक्षा जास्त वेळ काही दुरुस्तीची कामं करू शकता. पण यावेळी सुरक्षित राहण्याची काळजी घ्या. कारण विरुद्ध दिशेनं अधिक वेगानं वारा येऊ शकतो.
* समाजविघातक घटकांना चुकीच्या गोष्टी करण्यापासून प्रवृत्त करा. त्यांची माहिती पोलिसांना द्या.
* वाहन चालवताना काळजी घ्या.
* झालेल्या नुकसानाची माहिती प्रशासनाला द्या. आपत्तिग्रस्त परिसरातील लोकांच्या सुरक्षेची माहिती त्यांच्या नातेवाईकांना कळवा.
 
हे अजिबात करू नका
* अफवांवर विश्वास ठेऊ नका.
* जोपर्यंत आपत्ती व्यवस्थापनातील कर्मचारी सांगत नाहीत, तोपर्यंत सुरक्षित निवारा सोडू नका.
* वादळ शांत असल्याच्या काळात सुद्धा सुरक्षित निवारा सोडू नका. यावेळी किरकोळ दुरुस्तीची कामं करू शकता.
* रस्त्यावरील विजेच्या खांबांना लटकणाऱ्या वायर, तारा यांना स्पर्श करू नका.
* पडझड झालेल्या इमारतीत शिरू नका
* लवकरात लवकर सुरक्षित जागी जा.
 
 Published By- Priya Dixit 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

मार्गशीर्ष गुरुवारी महाविष्णूच्या पूजेचे महत्त्व आणि उपासनेची सोपी पद्धत जाणून घ्या

हे 3 गुण असलेल्या महिला भाग्यवान असतात, नवरा आणि सासरचे लोक नेहमी आनंदी राहतात !

घरात या 5 पक्ष्यांचे फोटो लावा, ज्ञान- समृद्धी वाढते, तिजोरी धनाने भरलेली राहते

आपले नाते कसे मजबूत करावे, 5 गोष्टी लक्षात ठेवा

त्वचेच्या कर्करोगाच्या संरक्षणासाठी हे उपाय खूप प्रभावी आहेत

सर्व पहा

नवीन

महाराष्ट्र बोर्डाने परीक्षेच्या तारखा जाहीर केल्या असून, दहावीचा पेपर 21 फेब्रुवारीपासून तर बारावीचा पेपर 11 फेब्रुवारीपासून होणार

भाजप जिंकल्यास फडणवीस मुख्यमंत्री होणार ! या बैठकीनंतर गोंधळ वाढला

'महाराष्ट्रात एमव्हीए बहुमताने जिंकेल', निवडणूक निकालापूर्वी रमेश चेन्निथला यांचा दावा, मुख्यमंत्र्यांच्या चेहऱ्यावर हे बोलले

LIVE: महाराष्ट्र विधानसभा निवडणूक निकाल 2024 लाइव्ह कॉमेंट्री

भिवंडीतील भंगार गोदामाला भीषण आग,कोणतीही जीवितहानी नाही

पुढील लेख
Show comments