Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

देवेंद्र फडणवीस : 'मी पुन्हा येईन'चं ट्वीट आणि तासाभरात डिलीट, याचे राजकीय अर्थ काय?

Webdunia
शनिवार, 28 ऑक्टोबर 2023 (14:17 IST)
भाजप महाराष्ट्रच्या X (ट्विटर) या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मच्या हँडलवरून शुक्रवारी एक पोस्ट (ट्वीट) करण्यात आली. यात माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची 'मी पुन्हा येईन' कविता होती.
ही पोस्ट समोर येताच एकच चर्चा सुरू झाली. काही वेळातच हे ट्वीट पुन्हा डिलिटही करण्यात आलं. भाजपकडून त्यावर लगेचच स्पष्टीकरणही देण्यात आलं.
 
पण ही पोस्ट केल्यानंतर सोशल मीडियावर नेटकऱ्यांनी लगेचच चर्चा सुरू केली. दोन्ही बाजुंनी आरोप प्रत्यारोप आणि टीकेलाही सुरुवात झाली.
 
माध्यमांवरही राजकीय नेत्यांनी प्रतिक्रिया देत सत्ताधारी आघाडीमध्ये सर्वकाही आलबेल नसल्याचं म्हटलंय. तर सत्ताधाऱ्यांनी सारवा-सारव केलीय.
 
ट्वीट आणि स्पष्टीकरण
भाजप महाराष्ट्रच्या पेजवरून शुक्रवारी (27 ऑक्टोबर) एक ट्वीट करण्यात आलं. नवमहाराष्ट्राच्या नवनिर्मितीसाठी मी पुन्हा येईल, असं लिहिलेल्या या ट्वीटमध्ये एक व्हिडिओदेखील पोस्ट करण्यात आला होता.
 
सध्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री असताना म्हटलेल्या 'मी पुन्हा येईन' या कवितेचा हा व्हिडिओ होता. अपेक्षेप्रमाणे ट्विट होताच यावर चर्चा सुरू झाली. काही वेळात ट्विट डिलिट झालं आणि भाजपचे प्रवक्ते केशव उपाध्येंनी यांवर स्पष्टीकरण दिलं.
 
"देवेंद्र फडणवीस हे भाजपचे नेते आहेत. त्यांच्याकडून कार्यकर्ते प्रेरणा घेत असतात. त्यामुळं याच हेतूनं हा व्हीडिओ टाकला", असं केशव उपाध्ये यांनी स्पष्ट केलं. यातून वेगळा अर्थ काढून राजकारण करू नये असंही उपाध्येंनी म्हटलं.
 
या व्हीडिओचा किंवा पोस्टचा संबंध आगामी निवडणुका किंवा मुख्यमंत्रीपदाशी नाही. एकनाथ शिंदेच मुख्यमंत्री असतील आणि त्यांच्याच त्यांच्याच नेतृत्वात आगामी निवडणुका होतील, असंही स्पष्टीकरण उपाध्येंनी दिलं.
 
दरम्यान, या ट्वीटवर प्रतिक्रिया आज (28 ऑक्टोबर) देताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, "एखाद्याला यायचं तर व्हीडिओ दाखवून येतो का?" तसंच, "मी एकनाथ शिंदेंच्या पाठीशी आहे आणि राहणार," असंही ते म्हणाले.
 
'मी पुन्हा येईन'चा इतिहास
भाजपकडून स्पष्टीकरण मिळाल्यानंतरही यावर सोशल मीडिया, माध्यमं आणि इतर ठिकाणी चर्चा मात्र सुरुच आहे. त्याचं कारणही तसंच आहे. मी पुन्हा येईन या एका वाक्याला जवळपास पाच वर्षांचा इतिहास आहे.
 
2019 च्या विधानसभा निवडणुकांच्या पूर्वी विधिमंडळाच्या अधिवेशनात देवेंद्र फडणवीस यांनी त्यांची भूमिका मांडताना मी पुन्हा येईन! अशा आशयाची एक कविता सादर केली होती. एकप्रकारे फडणवीस यांनी याद्वारे स्वतःला मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार म्हणून प्रोजेक्ट केलं होतं.
 
पण भाषणातील किंवा कवितेतील एका वाक्यापुरते हे शब्द मर्यादीत राहिले नाहीत. त्यानंतर देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वातील महाजनादेश यात्रेत हे जणू भाजपचं घोषवाक्य बनलं होतं. संपूर्ण प्रचारातही त्याचे व्हिडओ व्हायरल होत होते आणि तो प्रचाराचा एक भाग बनला.
 
पण निवडणुकांनंतर निर्माण झालेली परिस्थिती वेगळी होती. राज्यातलं संपूर्ण राजकारण बदललं. शिवसेनेनं काँग्रेस, राष्ट्रवादीच्या साथीनं महाविकास आघाडी करत सत्ता स्थापन केली. त्यानंतर विरोधकांकडून टीका करताना 'मी पुन्हा येईन' चा वापर गमतीनं केला जाऊ लागला.
 
पुढं शिंदेंच्या बंडानंतर पुन्हा सत्ता पालटली. भाजप सत्तेत आलं, पण फडणवीस उपमुख्यमंत्री बनले. तेव्हाही या वाक्याचा वापर करून काही प्रमाणात त्यांची खिल्ली उडवण्यात आली.
 
यामुळंच शुक्रवारी पुन्हा जेव्हा याच कवितेचा व्हिडिओ असलेलं ट्विट समोर आलं, तेव्हा त्यावर चर्चा होणं साहजिकच होतं, आणि तसंच घडलंही.
 
संदेश देण्याचा प्रयत्न!
राजकीय विश्लेषकांनी याचं विश्लेषण करताना अशाप्रकारचं ट्वीट चुकीने होऊ शकत नसल्याचं म्हटलं आहे. यामागे भाजपला नक्कीच काहीतरी संदेश द्यायचा असतो आणि तसंच यातून करण्याचा प्रयत्न असेल असं अभ्यासक म्हणत आहेत.
 
"अशा कोणत्याही गोष्टी एवध्या अनावधानाने घडत नसतात. भाजपला यातून काहीतरी संदेश द्यायचा असतो. तोच प्रयत्न भाजपने केलेला असावा", असं मत राजकीय विश्लेषक विजय चोरमारेंनी मांडलं.
 
"एकनाथ शिंदे आणि अजित पवार दोघेही त्यांचा अजेंडा राबवण्याचा प्रयत्न करत आहेत. फडणवीस स्पर्धेतही नाहीत असं दोन्ही नेते आणि कार्यकर्तेही गृहित धरतात. त्यांना वॉर्निंग देण्याचा हा प्रयत्न असू शकतो. तुम्ही कितीही दावे करत असले तरी तुमच्यापेक्षा मोठा आणि खरा दावेदार आमच्याकडे आहे, हा संदेश भाजपला शिंदे आणि अजित पवारांना द्यायचा असावा", असंही चोरमारे म्हणाले.
 
".. तर फडणवीस येऊ शकतात"
 
ज्येष्ठ पत्रकार हेमंत देसाई यांनीही, अशी चूक बेजबाबदारपणे होऊ शकत नाही, असं म्हटलं. भाजपच्या शिस्तीचा विचार केला, देवेंद्र फडणवीस स्वतः असं काही करतील असं वाटत नाही, असंही ते म्हणाले.
 
"अजित पवार मुख्यमंत्री झाले तर त्यांना पाच वर्षांसाठी मुख्यमंत्री करू, ते उर्वरित काळासाठी मुख्यमंत्री होणार नाही, असं फडणवीस म्हणाले होते. त्यामुळं पवार मुख्यमंत्री होऊ शकतात या विचाराने भाजपचे कार्यकर्तेही काहीशे निराश झाले. त्यामुळं त्या कार्यकर्त्यांना उभारी देण्यासाठीही हे ट्विट केलं असावं", असं देसाई म्हणाले.
 
"एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वावर सध्या नाराजी पाहायला मिळत आहे. सर्वेक्षणांमधून समोर येणारी माहिती पाहता शिंदे सरकार व्यवस्थित चालवत नाही, असंही भाजपला वाटत असावं. त्यामुळं निवडणुकीला जाण्यापूर्वी आपल्या नेत्याच्या नेतृत्वातील सरकार असेल तर त्याचा फायदा होऊ शकतो, असंही भाजपला वाटत असावं", असं मत त्यांनी मांडलं.
 
शिवाय आमदार अपात्रतेच्या निर्णयामुळं शिंदे गेलेच तर राज्याची जबाबदारी पुन्हा फडणवीसांकडे येऊ शकते. त्यामुळंही त्यांनी तसं ट्विट केलं असू शकतं, असं देसाई म्हणाले.
 
आरोप-प्रत्यारोप
अशा प्रकारचं ट्विट करणं, ते पुन्हा डिलिट करणं यामुळं या सगळ्यावरून विरोधक सरकारवर टीका करण्याची संधी सोडत नाहीयेत. तर सरकारच्या बाजुनं त्यावर सावध प्रतिक्रिया येत आहेत.
 
भाजपने व्हिडिओ पोस्ट केला आणि लगेचच डिलिट केला. त्यामुळं या कृतीतून फडणवीस आता परत येऊच शकत नाही, असा संदेश देण्यात आला आहे असं काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी अकोल्यात माध्यमांशी बोलताना म्हटलं.
 
दुसरीकडं, उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेतील नेत्या सुषमा अंधारे यांनी, जर देवेंद्र फडणवीस परत येणार तर शिंदे जाणार का? असा प्रश्न करत भाजपच्या मनसुब्यांवर शंका उपस्थित केली आहे. फडणवीस गृहमंत्री म्हणून अपयशी ठरले आहेत. त्यामुळं राज्यातील जनता आणि पक्षश्रेष्ठी त्यांच्यावर नाराज असण्याची शक्यता आहे. त्यामुळं आपणच श्रेष्ठ कसे हे दाखवून देण्याचा हा प्रयत्न असावा असं अंधारे यांनी म्हटलं आहे.
 
देवेंद्र फडणवीस यांनी दिल्लीत जावून महाराष्ट्रातील प्रश्न बाजुला ठेवून याच विषयावर चर्चा केली का? असा प्रश्न राष्ट्रवादीचे तरुण नेते रोहित पवार यांनी विचारला आहे.
 
दुसरीकडं, नितेश राणे यांनी पुन्हा मातोश्री आणि सिलव्हर ओकवर टीका केली. फक्त एक व्हिडिओ मातोश्री आणि सिलव्हर ओकची झोप उडवू शकतो. फडणवीस यांचे नावच पुरेसे आहे, असं ट्विट नितेश राणेंनी केलं.
 
एकनाथ शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांनी, यातून वेगळा अर्थ काढण्याची गरज नसल्याचं मत मांडलं. आगामी निवडणुकांत पूर्ण ताकदीने आम्ही परत येऊ असा त्याचा अर्थ होत असल्याचं ते म्हणाले.
 
प्रत्येकाकडून याबाबत अर्थ लावण्याचा प्रयत्न केला जात आहे. भाजपनं एकिकडं असे व्हिडिओ कार्यकर्त्यांना प्रेरणा देण्यासाठी असतात असं सांगितलं. मात्र, लगेचच हा व्हिडिओ डिलिटही केला. मग कार्यकर्त्यांसाठी प्रेरणा देणारा व्हिडिओ असेल, तर तो डिलिट का करावा लागावा? यासारखे अनेक प्रश्न निर्माण होत आहेत. परिणामी राज्याच्या राजकारणात गेल्या काही वर्षांत निर्माण झालेली अस्थिरता संपण्याची चिन्हं सध्या तरी दिसत नाहीत.
 






Published By- Priya Dixit
 
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

सूर्यनमस्काराने शरीर मजबूत होते, जाणून घ्या योग्य पद्धत

वर्षानुवर्षे आतड्यांमध्ये साचलेली घाण साफ होईल, सकाळी उठल्याबरोबर हे पाणी प्या

28 डिसेंबर रोजी कुंभ राशीत शुक्र आणि शनीचा संयोग 2025 मध्ये चमत्कार घडवेल, 5 राशी धनवान होतील

साप्ताहिक राशीफल 23 डिसेंबर ते 29 डिसेंबर 2024

Kanya Lal Kitab Rashifal 2025: लाल किताबनुसार कन्या राशी भविष्य 2025 आणि उपाय

सर्व पहा

नवीन

विनोद कांबळी यांची प्रकृती ढासळली, रुग्णालयात दाखल

LIVE: छगन भुजबळांची नाराजी दूर झाली का?भुजबळ भाजपमध्ये प्रवेश करणार!

नितीन गडकरींचा नागपूर विमानतळाबाबत अधिकाऱ्यांना अल्टिमेटम

छगन भुजबळांची नाराजी दूर झाली का?भुजबळ भाजपमध्ये प्रवेश करणार!

Shooting: भारत ज्युनियर नेमबाजी विश्वचषकाचे आयोजन करेल

पुढील लेख
Show comments