Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

दसरा मेळावा : 'शिवाजी पार्क'वरून ठाकरे-शिंदे पुन्हा 'मैदानात', यंदा 'सामना' कोण जिंकणार?

Webdunia
रविवार, 1 ऑक्टोबर 2023 (10:24 IST)
Dussehra Gathering: शिवसेना पक्षाच्या स्थापनेपासून म्हणजे 1966 पासून 'दसरा मेळावा' मुंबईतील दादरमधील शिवाजी पार्क मैदानात पार पडतो. या मेळाव्याला शिवसेनेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्व आहे.
 
मात्र, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत बंड करून, पक्षात उभी फूट पाडली. 40 आमदारांसह पक्षाचं नाव आणि चिन्ह घेऊन शिंदे भाजपसोबत सत्तेत सहभागी झाले. तिथे त्यांनी थेट महाराष्ट्राचं मुख्यमंत्रिपद मिळालं.
 
या बंडानंतर शिवसेनेच्या ठाकरे आणि शिंदे या दोन गटात कधी शाखेवरून तर कधी आणखी कशावरून वादावादी होतच राहिलीय. दसरा मेळाव्यासाठी शिवाजी पार्क मैदानाच्या जागेचा मुद्दाही त्यातलाच.
 
तरीही गेल्यावर्षी म्हणजे 2022 रोजी ठाकरे गटाला शिवाजी पार्क मैदानाची जागा दसरा मेळाव्यासाठी मिळाली. मात्र, त्यासाठी ठाकरे गटाला मुंबई हायकोर्टाचे दार ठोठावावे लागले होते.
 
येत्या 24 ऑक्टोबर 2023 रोजी यंदाचा दसरा आहे. यानिमित्त ठाकरे आणि शिंदे गट पुन्हा एकदा आमने-सामने उभे ठाकले आहेत. कारण दोन्ही पक्ष आपापला दसरा मेळावा घेणार आहेत. मात्र, यंदा कुणाचा दसरा मेळावा शिवाजी पार्कवर होईल? याबाबत पुन्हा एकदा रस्सीखेच सुरू झालीय.
 
गेल्यावर्षीही दोन्ही गटांमध्ये दसरा मेळाव्यासाठी शिवाजी पार्क मैदान मिळवण्यासाठी राजकीय संघर्ष बघायला मिळाला होता. गेल्यावर्षीच्या संघर्षानं मुंबई हायकोर्टाची पायरी चढली होती.
 
यंदा ठाकरे गटाकडून शिवाजी पार्क मैदानासाठी दीड महिन्यांपूर्वी अर्ज केलाय, तर शिंदे गटाचे आमदार सदा सरवणकर यांनीही अर्ज केलाय. त्यामुळे शिंदे की ठाकरे, कुणाला परवानगी द्यायची, असा पेच मुंबई महापालिकेसमोर उभा राहिलाय.
 
शिवाजी पार्कसाठी शिंदे-ठाकरे गटाचे अर्ज
ठाकरे गटाचे दादरचे विभागप्रमुख महेश सावंत यांच्याकडून शिवाजी पार्क मैदान 'शिवसेना - उद्धव बाळासाहेब ठाकरे' पक्षासाठी मिळावा म्हणून अर्ज करण्यात आलाय.
 
महेश सावंत यांच्याशी बीबीसी मराठीनं बातचित केली. ते म्हणाले, "मागच्या वर्षी थाटामाटात आम्ही शिवाजी पार्क येथे दसरा मेळावा केला होता. मुंबई महापालिकेने आम्हाला शेवटपर्यंत शिवाजी पार्कसाठी परवानगी दिली नाही. त्यामुळे आम्ही न्यायालयात गेलो. मागच्या वर्षीचा न्यायालयाचा निकाल आमच्याकडे आहे. त्याची परवानगी आम्ही या वर्षीच्या पत्रात जोडली आहे."
 
तसंच, महेश सावंत पुढे म्हणाले की, "दीड महिन्यापूर्वीच आम्ही दसरा मेळावा घेण्यासाठी शिवाजी पार्क मैदानाची परवानगी द्यावी असं पत्र मुंबई महापालिकेला दिलंय. त्यामुळे यावर्षी आम्हाला शिवाजी पार्क दसरा मेळाव्यासाठी मिळण्यात अडचण येणार नाही, असा विश्वास आहे."
 
दुसरीकडे, शिंदे गटाचे आमदार सदा सरवणकर यांनीही शिवाजी पार्क यंदा आम्हालाच मिळेल, अशी आशा व्यक्त केलीय.
 
बीबीसी मराठीशी बोलताना सदा सरवणकर म्हणाले, “मी दरवर्षी दसरा मेळावा घेण्यासाठी शिवाजी पार्क मिळावं म्हणून मुंबई महापालिकेला अर्ज करतो. मी ऑगस्टमध्ये अर्ज केला आहे. मला अजून महापालिकेकडून कोणतही उत्तर आलेलं नाही. महापालिकेकडून उत्तर आल्यानंतर पुढे काय करायचं ते बघू. जर त्यांनी शिवाजी पार्क नाकारलं, तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे काय तो निर्णय घेतील.”
 
दोन्ही गटाकडून शिवाजी पार्कसाठी अर्ज करण्यात आला असला, तरी मुंबई महापालिकेने अजून कोणत्याही अर्जाबाबत निर्णय घेतलेला नाही.
 
दोन्ही गटाचे अर्जांवर विधी आणि न्याय विभागाकडून मत मागवलं जाणार आहे. त्यानंतर मुंबई महापालिका याबाबत निर्णय देईल, असं सांगण्यात येतंय.
 
मुंबई महापालिकेकडून या परवानगीबाबत अधिकृतपणे अद्याप काहीही सांगण्यात आलेले नाही.
 
मागच्या वर्षी काय झालं होतं?
 
मुंबई महानगरपालिकेने एकनाथ शिंदे गट आणि उद्धव ठाकरे गट या दोन्ही गटांना शिवाजी पार्क येथे दसरा मेळावा घेण्यास परवानगी नाकारली होती. दोन गटाकडून परवानगीसाठी अर्ज आल्याने आम्ही पोलिसांचा अभिप्राय मागवल्याचं मुंबई महापालिका प्रशासनाने म्हटलं होतं.
 
शिंदे गटाचे अर्जदार आमदार सदा सरवणकर यांच्या अर्जाला उत्तर देताना मुंबई महानगरपालिकेने म्हटलं होतं, 'कायदा आणि सुव्यवस्था यादृष्टीने आम्हाला पोलिसांचा अभिप्राय हवा होता. त्यानुसार शिवाजी पार्क पोलीस स्टेशनने म्हटलंय की, कोणत्याही एका अर्जदाराला परवानगी दिल्यास शिवाजी पार्क संवेदनशील परिसरात कायदा, सुव्यवस्थेचा गंभीर प्रश्न निर्माण होऊ शकतो. हा पोलिसांचा अभिप्राय पाहता तुमचा परवानगी अर्ज आम्ही नामंजूर करत आहोत.'
 
मुंबई महापालिकेच्या या निर्णयानंतर शिवसेनेचे पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडून पालिकेच्या या निर्णयाला कोर्टात आव्हान देण्यात आलं होतं.
 
उद्धव ठाकरे यांच्या वतीने मुंबई हायकोर्टात याचिका दाखल करण्यात आली होती. त्यावेळी युक्तिवाद करताना ठाकरे गटाच्या वकीलांनी आपली बाजू मांडताना म्हटलं, "दसरा मेळावा शिवसेनेकडून गेले कित्येक वर्षापासून घेतला जातो. यासाठी सरकारकडून परवानगी दिली जाते, अनिल देसाई दरवर्षी मागणी करतात. यावेळी 20 दिवस आम्हाला उत्तर मिळालं नाही. त्यामुळे आम्ही याचिका दाखल केली. सदा सरवणकर यांनी एक अर्ज दिला. त्यामुळे परवानगी नाकारली. हे योग्य कारण नाही. कायदा सुव्यवस्था सरकारचा प्रश्न आहे. सरकारने याकडे लक्ष द्यावं. हे कारण देत माझा अधिकार हिरावून घेऊ शकत नाही. दसरा मेळाव्याला कधीच खंड पडला नाही. यामुळे कायदा सुव्यस्थेचा प्रश्न निर्माण होईल हे कारण अत्यंत चुकीचं आहे.”
 
दुसरीकडे, शिंदे गटाच्या वकीलांनी युक्तिवाद केला होता की, "शिवेसना आमचीच आहे. शिवसेना नावाचा दुसरा कोणताही गट राज्यात अस्तिवात नाही. अनिल देसाईंची याचिका माझ्या अपरोक्ष दाखल करण्यात आली. त्यांच्याशिवाय दुसरा कोणता गट नाही असं गृहीत धरून ही याचिका दाखल केली. माझी याचिका शिवसेनेकडून आहे. सद्यस्थितीत राज्यात शिवसेना सत्तेत आहे.”
या राजकीय वादात मुंबई महापालिकेने नोटिशीला उत्तर देताना जे मुद्दे मांडले. त्याच मुद्यांवर कोर्टात युक्तिवाद केला होता.
 
ते म्हणाले, "शिवाजी पार्क हे मैदान शांतता क्षेत्रात मोडतं, ते खेळाचं मैदान आहे. त्यामुळे कायद्याला अनुसरुन आम्ही परवानग्या नाकारल्या आहेत. तसेच कोणालाच मला हीच जागा हवी, असं म्हणण्याचा अधिकार नाही. इथं मेळावा झाल्यास कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो असा अहवाल आल्यामुळे परवानगी नाकारली."
 
या सर्व युक्तिवादानंतर मुंबई हायकोर्टाने महापालिकेचा परवानगी नाकारण्याचा आदेश रद्द ठरवला आणि उद्धव ठाकरे गटाला शिवाजी पार्क मैदानात दसरा मेळावा घेण्यासाठी परवानगी दिली.
 
उद्धव ठाकरे यांचा दसरा मेळावा शिवाजी पार्कवर पार पडला. एकनाथ शिंदे यांच्याकडून वांद्र्याच्या बांद्रा-कुर्ला कॉम्प्लेक्स (बीकेसी) मैदानावर दसरा मेळावा घेण्यात आला होता.
 
यावर्षी मुंबई महापालिका कोणाच्या बाजूने निर्णय देते, हे पाहणं महत्वाचं आहे.
 
























Published By- Priya Dixit
 
 
 
 
 
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Birthday Wishes For Mother In Law In Marathi सासूला वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठीत

HMPV Virus: तो कसा पसरतो, लक्षणे आणि खबरदारी, ह्यूमन मेटापन्यूमोव्हायरस बद्दल तपशीलवार माहिती वाचा

HMPV व्हायरस काय आहे? ज्यामुळे लोक त्याला बळी पडत आहेत, जाणून घ्या

Makar Sankranti 2025: मकर संक्रांतीच्या दिवशी चुकूनही या वस्तूंचे दान करू नये?

१ जानेवारी ते ३१ डिसेंबर २०२५ पर्यंतचे मराठी सणवार

सर्व पहा

नवीन

सुकमामध्ये झालेल्या चकमकीत 3 नक्षलवादी ठार, नक्षलविरोधी ऑपरेशन सुरूच

तिरुपती चेंगराचेंगरी प्रकरण : आंध्र प्रदेश सरकारची मोठी घोषणा, मृतांच्या कुटुंबियांना 25 लाख रुपयांची मदत

विमानाच्या लँडिंग गियरमध्ये आढळले दोन मृतदेह, पाहून सर्वजण थरथर कापले

स्वामी विवेकानंदांचे शिकागो येथील ऐतिहासिक भाषण, जे ऐकून टाळ्यांचा कडकडाट होत होता

LIVE: दिल्लीत केजरीवाल शक्तिशाली, उद्धव यांची शिवसेना काँग्रेसविरुद्ध

पुढील लेख
Show comments