Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

सामनाच्या अग्रलेखात एकनाथ शिंदेंचं नावही नाही, संपादक लिहितात....

Webdunia
बुधवार, 22 जून 2022 (10:19 IST)
शिवसेनेचे मुखपत्र सामनामध्ये एकनाथ शिंदे यांच्या बंडावर अग्रलेख प्रसिद्ध झाला आहे. मात्र या अग्रलेखाचा सर्व रोख एकनाथ शिंदे यांच्या बंडाच्या कारणाऐवजी भाजपावर आहे. भाजपामुळे चंद्रकांत हंडोरे पराभूत झाले असं या अग्रलेखात म्हटलं आहे.
 
'सामनाच्या अग्रलेखात' पुढील विचार मांडले आहेत.
 
"महाराष्ट्रातल्या सरकारचे काय व कसे होणार हा प्रश्न नसून महाराष्ट्रावर वार करणाऱ्यांचे, महाराष्ट्राशी बेईमानी करणाऱ्यांचे काय होणार? फितुरीचे बीज रोवणाऱ्यांचे काय होणार? धर्माच्या मुखवट्याखाली अधर्माशी संग करणाऱ्यांना जनता माफ करील काय? हे खरे प्रश्न आहेत.
 
संकटांशी व वादळांशी सामना करण्याची शिवसेनेला सवय आहे. गुजरातच्या भूमीवरून फडफड करणाऱ्यांनी हा इतिहास पुन्हा एकदा समजून घ्यावा. गुजरातमध्ये या मंडळींनी जरुर दांडिया खेळावा पण महाराष्ट्रात तलवारीस तलवार भिडेल हे नक्कीच.
 
महाराष्ट्रातील सरकारला खाली खेचण्याची एकही संधी भाजपवाले सोडत नाहीत. अडीच वर्षांपूर्वी अजित पवारांचे प्रकरण पहाटे झाले. त्यात यश आले नाही. आता तेच अस्वस्थ आत्मे एकनाथ शिंदे यांच्या मानगुटीवर बसून ऑपरेशन कमळ घडवत आहेत. काही करून राज्यातील सरकार घालवायचे याच ईष्येने ते झपाटलेले आहेत.
 
राज्यसभा निवडणुकीत सहावी जागा भाजपने कोणत्या छुप्या कारवायांमुळे जिंकली याचा उलगडा आता होत आहे. विधान परिषदेत भाजपास दहावी जागा जिंकण्यासाठी ज्यांनी मदत केली त्यांनीच राज्यसभेत भाजपचा धनदांडगा उमेदवार विजयी केला व संजय पवार या शिवसैनिकाचा पराभव घडवून आणला.
 
सोमवारी विधान परिषदेत दहावी जागा जिंकताच शिवसेनेच्या दहाएक आमदारांना उचलून गुजरातला नेण्यात आले. त्यांच्याभोवती कडक बंदोबस्त ठेवण्यात आला. यातील दोनचार आमदारांनी या गराड्यातून सुटण्याचा व पळून जाण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्यांना शारीरिक इजा होईपर्यंत मारहाण करण्यात आली. अकोल्याचे आमदार नितीन देशमुख यांना तर इतकी मारहाण झाली की त्यांना हृदयविकाराचा झटका आला व इस्पितळात दाखल करावे लागले.
 
कैलास पाटील हे आमदार घेराबंदीतून सटकले व भर पावसात चालत रस्त्यावर येऊन कसेबसे मुंबईत पोहोचले. अशाप्रकारे चार पाच आमदारांनी सुटकेचा प्रयत्न केला तेव्हा गुजरात पोलिसांनी त्यांना अटक करून ऑपरेशन कमळवाल्यांच्या ताब्यात दिले. हा काय प्रकार आहे? अशाने लोकशाहीची इभ्रत राहणार आहे? विधान परिषदेतील दहाव्या जागेचा विजय भाजपने मिळवला तो शिवसेनेतील तथाकथित निष्ठावंत वगैरे म्हणवून घेणाऱ्या लोकांना बेईमान करून.
 
या निवडणुकीत काँग्रेसचे अधिकृत उमेदवार चंद्रकांत हंडोरे यांना पाडून भाजपने विजय मिळवला. हंडोरे हे मुंबईतील दीन दलित समाजाचे नेते आहेत. अशा दीन दलितास पाडून भाजपने बेइमानांच्या मतांवर विजयोत्सव साजरा केला. त्याच बेइमानांना लगेच गुजरातच्या भूमीवर नेऊन जोरदार सरबराई सुरू झाली. शिवसेनेचे दोन उमेदवार सचिन अहिर आणि आमशा पाडवी विजयी झाले पण त्यांच्या अधिकृत मतातंही घट दिसत आहे. राष्ट्रवादीचे दोन्ही उमेदवार जिंकले पण पण मतांती फाटाफूट घडवून.
 
भाजपने जो पाचवा विजय मिळवला ती कपटनीती म्हणजे भाजपचा खरा चेहरा आहे. शिवसेनेच्या वर्धापनदिनी उद्धव ठाकरे यांनी तळमळीने भाष्य केले. महाराष्ट्रात सत्तेचा माज चालणार नाही. केंद्रीय सत्तेचा माज दाखवून महाराष्ट्रात फोडोफोडीचे राजकारण सुरू झाले आहे. आईचे दूध विकणारी अवलाद शिवसेनेत नको, असे शिवसेनाप्रमुख नेहमी म्हणत. असे लोक शिवसेनेत निर्माण व्हावेत ही महाराष्ट्राच्या मातीशीच बेईमानी आहे. शिवसेना ही आई. तिच्या आणाभाका घेऊन राजकारण करणाऱ्यांनी आईच्या दुधाचा बाजार मांडला. त्या बाजारासाठी जागा निवडावी सुरतची. हा योगायोग समजायचा काय?
 
छत्रपती शिवाजी महाराजांनी सुरत लुटली होती व त्याच सुरतमधून आज महाराष्ट्राच्या अस्मितेवर घाव घालण्याचे प्रयोग सुरू आहेत. भारतीय जनता पक्षाच्या डोळ्यात महाराष्ट्राचे ठाकरे सरकार खुपत आहे, त्यापेक्षा जास्त शिवसेना खुपते आहे. त्यामुळेआधी शिवसेनेवर वार करा मग महाराष्ट्रावर घाव घाला असे राजकारण दिसते. मध्य प्रदेश व राजस्थानात ज्या प्रकारे फोडाफोडीचे राजकारण करून सरकारे पाडली तोच पॅटर्न महाराष्ट्रात वापरायचा व स्वत:ला किंगमेकर म्हणून ओवाळून घ्यायचे असे तीन अंकी नाटक सुरू झाले आहे. विधान परिषद निवडणुकीच्या निमित्ताने झालेले मतदान व मतांची फाटाफूट ही तर सुरुवात आहे.
 
आता आम्ही मुंबई जिंकू, मुंबईवर ताबा मिळवू अशी भाषा मंगलप्रभात लोढा यांनी केली त्यातच सगळे आले. मुंबईवर ताबा मिळवायचा असेल तर शिवसेना डळमळीत करा हेच महाराष्ट्रद्रोह्यांचे धोरण आहे. स्वत:ला मावळे म्हणवून घेणारे त्या महाराष्ट्रद्रोह्यांच्या कपट कारस्थानाचे भागीदार होणार असतील तर शिवराय त्यांना माफ करणार नाहीत. महाराष्ट्र हे शहाण्यांचे राज्य आहे. शहाणपणाच्या बाबतीत महाराष्ट्र इतरांच्या बाबतीत दोन पावले पुढेच असेल.
 
इतर प्रांतात व कळपात दीडशहाणे असतील तर महाराष्ट्रात साडेतीन शहाणे असतात. दुसरे असे की महाराष्ट्रास वेगात व वेडात दौडणाऱ्या सात वीरांचा इतिहास आहे. पण ते सात वीर वेडात व वेगात दौडले ते स्वराज्यासाठी, स्वत:च्या नाही.
 
म्हणूनच त्या वीरांना आजही मानवंदना दिली जाते. राजकारण हे वाईट नाही, पण सत्तेची अति महत्त्वाकांक्षा हे जालीम विष ठरते. शिवसेनेने आईबाप मानून असंख्य फाटक्या लोकांना जे दिले ते इतर पक्षात भल्याभल्या वतनदारांना मिळवता आले नाही.
 
शिवसेनेसाठी छातीचा कोट करून जो मावळा उभा राहिला त्याभागातून भगवा झेंडा डौलाने फडकत राहिला. त्यामुळे विधान परिषदेत निवणुकीत ज्यांनी माती खाल्ली त्यांना महाराष्ट्राची माती व शिवसैनिक माफ करणार नाहीत. भारतीय जनता पक्षाने सत्तेच्या राजकारणासाठी लाजच सोडली. एखाद्या राज्यात सत्ता मिळवता आली नाही म्हणून ते राज्य अस्थिर आणि डळमळीत करायचे हेच त्यांचे धोरण आहे.
 
माणसे फोडायची, फितुरीचे बीजे रोवायची, त्या फितुरीचे पिक खडकावरही काढण्यात हे लोक पटाईत, पण देशातील बेरोजगार अग्निवीर रस्त्यावर उतरला आहे, काश्मीरात हिंदूंचे हत्याकांड सुरू आहे. लडाखमध्ये चीनचे सैन्य घुसले आहे त्यांना बाहेर काढण्यासाठी कोणताही योजना व धमक त्यांच्यात दिसत नाही. फितूर निर्माण करायचे व त्या जोरावरच राज्य आणायचे. हीच यांची किंग मेकर्स कंपनी. ब्रिटिशांच्या ईस्ट इंडिया कंपनीने तेव्हा हेच केले. ही ईस्ट इंडिया कंपनी शेवटी गाशा गुंडाळून गेली. विधान परिषद निकालाने त्या ईस्ट इंडिया कंपनीचा आत्मा महाराष्ट्रात फडफडताना दिसला.
 
बरे झाले, यानिमित्ताने महाराष्ट्र जागा झाला. महाराष्ट्र जागा झाला की पेटून उठतो हा इतिहास ईस्ट इंडिया कंपनीच्या फितूर मंडळाने लक्षात घ्यावा. महाराष्ट्रातल्या सरकारचे काय व कसे होणार हा प्रश्न नसून महाराष्ट्रावर वार करणाऱ्यांचे, महाराष्ट्राशी बेइमानी करणाऱ्यांचे काय होणार? फितुरीचे बीजे रोवणाऱ्यांचे काय होणार? धर्माच्या मुखवट्याखाली अधर्माशी संग करणाऱ्यांना जनता माफ करील काय? हे खरे प्रश्न आहेत. संकटाशी व वादळाशी सामना करण्याची शिवसेनेला सवय आहे. गुजरातच्या भूमीवरून फडफड करणाऱ्यांनी हा इतिहास पुन्हा एकदा समजून घ्यावा. गुजरातमध्ये या मंडळींनी जरुर दांडिया खेळावा, पण महाराष्ट्रात तलवारीस तलवार भिडेल हे नक्कीच!"

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

हितोपदेशातील कहाणी ; आंधळा गिधाड आणि दुष्ट मांजर

Mesh Rashi Varshik Rashifal 2025 in Marathi : मेष रास 2025 राशिभविष्य: नवीन वर्ष कसे असेल, निश्चित उपाय जाणून घ्या

26 नोव्हेंबरपासून बुध दोषामुळे त्रास होईल, या क्षेत्रांवर नकारात्मक परिणाम होईल !

Premature Graying Hair मुलांचे केस आतपासूनच पांढरे होऊ लागले आहेत का? त्यांना हे 5 पदार्थ खाऊ द्या, केस नैसर्गिकरीत्या काळे होतील

कपालभाती प्राणायाम दररोज केल्याने हे 10 आरोग्य फायदे होतात, जाणून घ्या

सर्व पहा

नवीन

LIVE: फ्रॉड आहे EVM मशीन म्हणाले संजय राऊत

या देशात फ्रॉड आहे EVM मशीन, महाराष्ट्र निवडणूक निकालावर म्हणाले संजय राऊत

नागपुरात पार्क केलेल्या क्रेनला रिक्षाची धडक, दोन महिलांचा मृत्यू

ठाण्यामधील भिवंडी मध्ये भूकंपाचे धक्के जाणवले

महाराष्ट्रात निकालाला चार दिवस उलटूनही मुख्यमंत्र्यांच्या नावाची घोषणा नाही, शिंदे नाराज का?

पुढील लेख
Show comments