महाराष्ट्रातील बीडमध्ये ट्रकच्या धडकेत चार मुलांचा मृत्यू झाला. राज्य राखीव पोलीस दलात (एसआरपीएफ) आपल्या एका मित्राची निवड झाल्याचा आनंद साजरा करून हे सर्वजण परतत होते. अंबाजोगाईजवळील वाघाळा येथे ही घटना घडली. अझीम पश्मिया शेख (30) याची नुकतीच SRPF मध्ये निवड झाली होती आणि सोमवारी रात्री तो आपल्या मित्रांसोबत आनंदोत्सव साजरा करण्यासाठी मांजरसुंभ येथे गेला होता, असे एका अधिकाऱ्याने सांगितले.
परतत असताना त्यांची कार एका ट्रकला धडकली. बालाजी शंकर माने, दीपक दिलीप सावरे, फारुख बाबू मिया शेख आणि ऋतिक हनुमंत गायकवाड अशी मृतांची नावे आहेत. तीन मित्रांचा जागीच मृत्यू झाला, तर एकाचा रुग्णालयात मृत्यू झाला. अझीम पश्मिया शेख गंभीर जखमी असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहे. पोलिसांनी अपघाताचा गुन्हा दाखल केला असून पुढील कारवाई सुरू आहे.