Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

मराठवाड्यातले हे तरुण ब्लॉगिंगच्या जोरावर दरमहा लाखो रुपये कसे कमावत आहेत?

Webdunia
सोमवार, 13 मार्च 2023 (18:05 IST)
“ब्लॉगिंगमुळे आयुष्यात बरेच बदल झाले. ब्लॉगिंगच्या पूर्वी एक छोटसं साधं घर होतं. त्यानंतर घराचं काम केलं. जमीन वगैरे घेतली. आयफोन घेतला, लॅपटॉप घेतला.” – आदित्य पाटील “पहिलं काहीच नव्हतं. मोबाईल वगैरे चांगला नव्हता. बाईक वगैरे नव्हती. आता ब्लॉगिंगच्या नंतर मी स्वत:चं घर बांधलं. एक स्पोर्ट बाईक घेतली. आयफोन घेतला, लॅपटॉप घेतला. औरंगाबादला एक प्लॉट घेतला.” - सौरभ लोंढे
 
ब्लॉगिंगमुळे आयुष्य कसं बदललं, असं विचारल्यावर आदित्य आणि सौरभ यांनी दिलेलं हे उत्तर.
 
19 वर्षांचा आदित्य आणि 20 वर्षांचा सौरभ दोघेही ब्लॉगर आहेत. तेही मराठवाड्यातल्या बीड जिल्ह्यातले.
 
ज्या भागाला कायम दुष्काळी म्हणून हिणवलं जातं, त्याच भागातील हे दोघे जण आहेत.
 
बीड जिल्ह्यातल्या गेवराई तालुक्यातील कोळगाव येथे ते राहतात. याच कोळगावला आता ‘ब्लॉगरचं गाव’ म्हणून ओळखलं जात आहे.
 
कारण काय, तर या गावात आता जवळपास 250 जण ब्लॉगिंग करत आहे. इथं बारावी पास तरुणांपासून ते इंजिनियरिंगरच्या पदवीधरांपर्यंत अनेक जण ब्लॉगिंग करताना दिसतात.
त्यामुळे या गावात दररोज कुणी, किती डॉलर्स कमावले, याचीच चर्चा असते. पण, या गावात ब्लॉगिंगची सुरुवात कशी झाली, असा प्रश्न तुम्हाला पडला असेल.
 
अशी झाली सुरुवात...
तर शेतकरी पुत्र अक्षय रासकर यांच्या पुढाकारानं गावात ब्लॉगिंगची सुरुवात झाली.
 
पुण्यातील नोकरीत मन रमेना म्हणून अक्षय गावात परत आले. त्यात त्यांचं एकदा नाशिकला जाणं झालं. तिथं त्यांनी शेतकऱ्यानं शेतात फवारणीसाठी केलेल्या ‘इंडियन जुगाड'चा व्हीडिओ कॅमेऱ्यात टिपला आणि त्यांना त्यांचं पहिलं पेमेंट मिळालं.
 
अक्षय यांच्या या व्हीडिओला तब्बल 58 लाख लोकांनी पाहिलं. यूट्यूबवरून कमाई करता येते, या गोष्टीवर विश्वास नसणाऱ्या अक्षय यांनी मात्र या अनुभवानंतर यूट्यूबला सीरियसली घेतलं.
 
अक्षय सांगतात, “जेव्हा माझं 222 डॉलरचं पेमेंट मिळालं होतं, तेव्हाच मी ब्लॉगिंगबद्दलची माहिती काढली होती. कारण आणखी यामध्ये काहीतरी होऊ शकतं अशा माझ्या अपेक्षा वाढल्या होत्या.
 
“यूट्यूबवर जे व्हीडिओज आहेत. त्यावरती मी सर्च केलं, तिथं मला ब्लॉगिंगविषयी माहिती मिळाली. मला कुणी शिकवलं नाही काही नाही. मी माझा पूर्ण रिसर्च यूट्यूब आणि गुगलवरुन केला.”
 
अक्षय यांनी ‘टेक्निकल सपोर्ट’ या त्यांच्या यूट्यूब चॅनेलच्या नावानंच पहिला ब्लॉग सुरू केला. नंतर डोमेन विकत घेतलं आणि आपला ब्लॉग लोकांपर्यंत पोहचण्यासाठी फेसबुक, व्हॉट्सअपचा पुरेपूर वापर केला.
 
पण, आपल्या ब्लॉगवर कंटेट काय असावा, हे कसं ठरवलं, यावर अक्षय सांगतात, “माझ्या आसपासचे लोक पूर्ण शेतकरी होते आणि शेतकऱ्यांना योजनेविषयी माहिती म्हणजे गव्हर्नमेंटच्या योजनेविषयी माहिती पोहचवण्याचं कोणतंही साधन नव्हतं. जेव्हा जीआर (शासन निर्णय) यायचे, त्यानंतर शासकीय अधिकारी गावात येऊन सांगतील किंवा ग्रामपंचायतमध्ये सांगतील तेव्हाच लोकांना माहिती व्हायचं.
 
“त्याचा मी फायदा घेतला आणि ठरवलं की आपण ही माहिती लोकांपर्यंत पोहचवायची. सरकारचे निर्णय, योजना शेतकऱ्यांपर्यंत पोहचवण्याचं मी ठरवलं. तिथून पुढे माझी कमाई चांगल्या प्रकारे वाढली.”
सध्या अक्षय एकूण 8 ब्लॉग चालवत असून त्याच्यावर सबडोमेन म्हणून 24 ब्लॉग चालवत आहेत. असे मिळून त्यांच्या एकूण ब्लॉग्सची संख्या 30 आहेत.
 
एका बेवसाईटच्या कमाईविषयी विचारल्यावर अक्षय यांनी त्यांचं गुगल एडसेन्सचं एक अकाऊंट ओपन करून त्यातील आकडेवारी दाखवली.
 
तर अयक्ष यांच्या एका वेबसाईटवर 20 फेब्रुवारी 2023 रोजी दुपारच्या 12 वाजेपर्यंत 1 लाख 34 हजार व्हिजिटर आले होते आणि दुपारपर्यंतची त्यांची कमाई (earning) 206 डॉलर होती. फेब्रुवारीची 20 तारखेपर्यंतची कमाई 9 हजार 360 डॉलर होती आणि जानेवारी महिन्याची कमाई 15 हजार डॉलर होती (12 लाख रुपये). तीही एका वेबसाईटची.
 
पण, तुमच्या मनात प्रश्न आला असेल की, ब्लॉगिंगच्या माध्यमातून कमाई होते तरी कशी? यावर अक्षय त्यांचा एक ब्लॉग उघडून दाखवला.
 
“ही एक पोस्ट बनवलेली आहे आमच्या मुलांनी. तर ही पोस्ट ओपन केल्याच्या नंतर आपल्याला या अशा जाहिराती दिसतात. या जाहिरातींमधूनच आपल्याला revenue generate होतो. गुगल आपल्या पोस्टमध्ये अशा वेगवेगळ्या जाहिराती दाखवतं.”
 
अक्षय दाखवत असलेल्या पोस्टमध्ये चारचाकी गाड्या, गृह उत्पादनं यांच्या जवळपास 4 जाहिराती होत्या.
 
2015 ते 2019 च्या काळात अयक्ष यांनी HTML CODING, SITE DESIGNING शिकल्यानंतर अक्षय वर्डप्रेसवर शिफ्ट व्हायचा निर्णय घेतला. याचा फायदा झाल्याचं ते सांगतात.
 
“जेव्हा आम्ही ब्लॉगवरती होतो, तेव्हा आम्हाला फक्त डायरेक्ट आणि शेयरेबल ट्राफिक मिळायचा. म्हणजे जे लोक आमच्याकडे यायचे, ते एकतर व्हाट्सअप किंवा फेसबुकच्या माध्यमातून यायचे. पण आम्हाला गुगलवरली रँक करायचं होतं की आम्ही पोस्ट शेयर जरी नाही केली तरी गुगलनी आमच्याकडे व्हिजिटर पाठवावेत.”
 
“वर्डप्रेसवरती काम सुरू केल्यानंतर आम्हाला पोस्टचा SEO कसा करायचा, वेबसाईट SEO कसा करायचा, इमेज SEO कसा करायचा ह्याबद्दल माहिती मिळाली. म्हणजे SEO केला तर गुगल चांगल्याप्रकारे आपली पोस्ट गुगलमध्ये रँक करतं. इथं प्लग इन्स वगैरे सगळ्या गोष्टी फ्रीमध्ये मिळत आहेत, तिथून आम्हाला चांगल्या प्रकारे ट्रिक्स म्हणजे Key word, focus key word या गोष्टी चांगल्याप्रकारे माहिती झाल्या. त्याचा आम्हाला खूप फायदा झाला. यामुळे आम्हाला खूप चांगल्याप्रकारे organic traffic यायला सुरुवात झाली.”
अक्षय यांनी गावातच ऑफिस थाटलंय. गावातील काही तरुण हे या वेबसाईट्स सांभाळण्याचं काम करताहेत. ब्लॉगिंगच्या दरमहा येणाऱ्या revenue मधून 60 % रक्कम अक्षय स्वत: घेतात, तर 40 % रक्कम मुलांना दिली जाते. पण, यासाठीची त्यांची गुंतवणूक किती असेल?
 
"मी सध्या गुंतवणूक फक्त माझ्या होस्टिंगवरती आणि डोमेनवरतीच करतो. माझ्याकडे इतर काही टुल्स नाहीयेत. यामध्ये माझी सध्याची दरमहा गुंतवणूक एका डोमेनसाठी 10 ते 12 हजार रुपये आहे."
 
ब्लॉगिंगमधून मिळालेल्या पैशातून अक्षय मातीच्या घरातून आरसीसीच्या घरात शिफ्ट झालेत. त्यांनी गाडी घेतली, जमीनही घेतलीय. त्यांची ही प्रगती पाहून आता गावात जवळपास 250 जण ब्लॉगिंग करत असल्याचं ते सांगतात. यापैकी एक आहे 19 वर्षांचा आदित्य.
बारावी पूर्ण झालेल्या आदित्यनं सध्या बीएससीला प्रवेश घेतला आहे.
 
तो शिक्षणासोबत ब्लॉगिंगही करत आहे. अगदी वेळ मिळेल तसं शेतात झाडाखाली बसून मोबाईलचं इंटरनेट वापरून तो ब्लॉगिंग करतो.
 
तो सांगतो, “ब्लॉगिंग म्हणजे जवळपास लॉकडाऊन लागल्याच्या नंतर एक-दीड वर्षापासून करतोय मी. त्यात कंटेट लिहून पोस्ट करेपर्यंत, SEO वगैरेचं काम करतो.”
 
“लास्ट ईयरचं समजा शेवटच्या 12 महिन्यांचं average काढलं तर मंथली दोन लाख रुपये पडतं पेमेंट.”
 
गुंतवणुकीविषयी विचारल्यावर तो सांगतो, “गुंतवणूक काहीच नाही. फक्त आपलं मंथली इंटरनेटचं हजार-पाचशे रुपयांचं रिचार्ज लागतं. तेवढीच गुंतवणूक आहे.”
 
20 व्या वर्षी नवं घर आणि स्वत:चा प्लॉटही
20 वर्षांचा सौरभ लोंढेही शिक्षणासोबत ब्लॉगिंग करत आहे.
 
तो सांगतो, “सध्या तर मी मोबाईलचंच इंटरनेट वापरतो. वायफाय वगैरे नाहीये. महिन्याला मी जसं काम करेल तसं इन्कम मिळतं. पण सरासरी जर पकडलं तर अडीच लाख पर्यंत जातं.”
 
ब्लॉगिंगमधून आलेल्या कमाईतून सौरभनं स्पोर्ट्स बाईक घेतलीय, औरंगाबादला प्लॉट घेतलाय. शिवाय आयफोन, लॅपटॉपही घेतलाय.
 
गावातील जुन्या घराशेजारीच त्याच्या नवीन घराचं बांधकाम सुरू आहे.
या घरापुढे आमची भेट सौरभचे वडील दत्ता लोंढे यांच्याशी झाली.
 
“ब्लॉगिंग म्हणजे काय ते मला काही समजत नाही. माझा मुलगा काहीतरी करतोय इतकंच माहिती आहे. पण त्याला त्यातून इन्कम चालू झालंय.”
 
दत्ता यांच्याकडे एकर शेती आहे. त्यात ते कापूस, गहू, ज्वारी, बाजरी ही पिके घेतात.
 
ते सांगतात, “नुसतं शेतीवर भागत नाही. शेती प्लस ब्लॉगिंग पुरतं. पार्ट टाईम ब्लॉगिंग केलं की पुरतं. नुसतं शेतीवर भागत नाही. शेतकऱ्यासारखे हाल कुणाचे नाही. आज गव्हाला पाणी द्यायचं होतं, मोटर चालू केली आणि पाणी संपलं. हे असे हाल आहेत शेतकऱ्याचे.”
 
इंजिनियरिंगनंतर ब्लॉगिंगकडे
अभिजीत रासकरनं पुण्यातून इंजिनियरिंगचं शिक्षण पूर्ण केलं. पण, सध्या तो गावातच ब्लॉगिंग करतोय.
 
"तो सांगतो, इंजिनियरिंगनंतर मला जास्तीत जास्त 15 हजार पगार मिळाला असता, त्याच्या भरवशावर एवढं घर कधी बांधलं असतं मी?"
 
गावात अभिजीतच्या टोलेजंग आणि प्रशस्त घराचं बांधकाम सध्या सुरू आहे.
 
तो पुढे सांगतो, “लॉकडाऊनचा काही लोकांना तोटा झाला, आम्हाला मात्र फायदा झाला. तेव्हापासूनच आम्ही ब्लॉगिंग करायला लागलो. अक्षय यांच्याकडे येऊन ते शिकायला लागलो. आता आमच्या गावाला ब्लॉगरचं गाव ही नवी ओळख मिळालीय.”
 
“आता गावात सगळीकडे कुणी, किती डॉलर्स कमावले, याचीच चर्चा असते. पुण्या-मुंबईप्रमाणे मराठवाड्यातही आता यूट्यूबवर लाईफ जगताहेत. गाड्या, घर घेताहेत,” असंही अक्षय पुढे सांगतो.
 
ब्लॉगिंगसमोर आव्हानं काय?
ग्रामीण भागातल्या मुलांना ब्लॉगर म्हणून काम करायचं असेल तर त्यासाठी 2 प्रमुख आव्हानं असल्याचं अक्षय सांगतात.
 
एक म्हणजे योग्य मार्गदर्शन नसणं आणि दुसरं म्हणजे वीजेची अनियमितता.
 
अक्षय सांगतात, “जेव्हा मी ब्लॉगिंगला सुरुवात केली, तेव्हा मला मार्गदर्शन करायला कुणीही नव्हतं. आजही यात मार्गदर्शन करू शकेल, अशी माणसं ग्रामीण भागात आढळत नाही. त्यामुळे ब्लॉगर म्हणून करिअर करण्यातला सगळा मोठा अडथळा मार्गदर्शनाचा अभाव हा आहे.
 
“दुसरं म्हणजे ग्रामीण भागात वीज नियमितपणे राहत नाही. लोडशेडिंगही असतं. अशास्थितीत ब्लॉगिंग करण्यास अडथळा येतो.”
कोळगावात दररोज सकाळी 2 तास लाईन जात असल्याचं ऋषीकेश रासकर सांगतो.
 
ब्लॉगिंगमध्ये यशस्वी व्हायचा मंत्रा काय, यावर अक्षय स्पष्टपणे सांगतात, “तुम्ही ज्या क्षेत्रात वावरताय आणि त्या क्षेत्रातील लोकांना तुमच्याकडून काय अपेक्षा आहेत, हेच जर तुम्ही ब्लॉगच्या माध्यमातून माडलं तरी तुम्ही लोकांपर्यंत चांगल्या दृष्टीनं पोहचू शकता. तिथून चांगल्याप्रकारे revenue generate करू शकता.”
 
दरम्यान, केवळ मराठी भाषेत गुंतून न राहता आंतरराष्ट्रीय भाषांमध्ये ब्लॉगिंग करण्याचा अक्षय यांचा प्रयत्न आहे. त्यादृष्टीनं त्यांनी वाटचाल सुरू केली आहे.
 
Published By- Priya Dixit 
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

22 डिसेंबर रोजी कालाष्टमी व्रत, या दिवशी 4 शुभ योग तयार होत आहेत, तिप्पट फळ मिळणार

जुन्या कपड्यांचा पोछा वापरल्याने दुर्दैव येते का?

चांगल्या झोपेसाठी या गोष्टी करा, तुमचे आरोग्यही चांगले राहील

Christmas special : या रेसिपी नक्की बनवा

रावणाचा भाऊ कुंभकरण खरोखरच इंजिनिअर होता का?

सर्व पहा

नवीन

पंतप्रधान मोदींना कुवेतचा सर्वोच्च नागरी सन्मान; 'द ऑर्डर ऑफ मुबारक अल कबीर' ने सन्मानित

LIVE: शरद पवारांच्या ताफ्याला भीषण अपघात या अपघातातून शरद पवार थोडक्यात बचावले

शरद पवारांच्या ताफ्याला भीषण अपघात या अपघातातून शरद पवार थोडक्यात बचावले

नागपूर : सिनेमागृहातून 'पुष्पा 2'चित्रपट बघताना खून आणि तस्करीच्या आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतले

डोंबिवलीत बांगलादेशींवर पोलिसांची मोठी कारवाई, 1 महिलेसह 6 नागरिकांना अटक

पुढील लेख
Show comments