शीना बोरा हत्या प्रकरणातील आरोपी इंद्राणी मुखर्जीला सर्वोच्च न्यायालयाने जामीन मंजूर केल्यानंतर बुधवारी सहा वर्षांनंतर भायखळा तुरुंगातून इंद्राणी मुखर्जी बाहेर पडली आहे. न्यायालयाकडून जामिनाची रक्कम दोन लाख रुपये एवढी निश्चित करण्यात आली असून, इंद्राणीला दोन आठवड्यांत ही रक्कम जमा करावी लागणार आहे. 6 वर्षे तुरुंगवास भोगल्यानंतर जामिनावर बाहेर आलेल्या इंद्राणी मुखर्जीने माध्यमांशी संवाद साधताना आपल्याला अत्यंत आनंद होत असल्याचं सांगितलं. इंद्राणी मुखर्जी हीने पहिल्या पतीपासून झालेली मुलगी शीना बोरा हिच्या हत्येच्या प्रकरणात (Sheena Bora Case) मुख्य आरोपी आहे. 2012 मध्ये शीना बोराचे अपहरण करून तिची हत्या करण्यात आली होती. त्यानंतर मुंबईच्या हद्दीतील एका जंगलामध्ये खड्ड्यात पुरलेल्या अवस्थेत तिचा मृतदेह आढळून आला होता.
इंद्राणी मुखर्जीचा पती आणि मीडिया व्यावसायक पीटर मुखर्जी हे देखील या प्रकरणात आरोपी होते. या प्रकरणात पीटर मुखर्जी यांनी तुरुंगवासही भोगला आहे. इंद्राणी आणि पीटर, यांनी 2007 मध्ये INX नेटवर्कची स्थापना केली होती. परंतु दोन वर्षांनंतर घोटाळ्याच्या आरोपांनंतर त्यांचा हिस्सा विकला गेला. यावेळी अंमलबजावणी संचालकांनी आरोप केला होता की, 2008 मध्ये कार्ती चिदंबरम या जोडप्याला त्यांच्या उद्योगात कोट्यवधी रुपयांच्या विदेशी गुंतवणुकीसाठी मंजुरी मिळवून देण्यात मदत केली होती. ज्यासाठी त्याने लाच घेतल्याचा आरोप केला होता. या प्रकरणाची अद्याप चौकशी सुरू आहे.