Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

कोल्हापूर : रिकव्हरी कमी दाखवून महाडिकांनी 300 कोटींचा ढपला पाडला;-सर्जेराव माने

कोल्हापूर : रिकव्हरी कमी दाखवून महाडिकांनी 300 कोटींचा ढपला पाडला;-सर्जेराव माने
, शनिवार, 22 एप्रिल 2023 (09:00 IST)
कसबा बावडा : उस उत्पादक सभासद हाडाची काडं करून राजाराम कारखान्याला साडेबारा ते तेरा रिकव्हरीचा उस घालतात. मात्र महाडिकांनी दीडने रिकव्हरी कमी दाखवून गेल्या 28 वर्षात 300 कोटीचा ढपला पाडला असा आरोप कारखान्याचे माजी अध्यक्ष सर्जेराव माने यांनी केला. शाहू परिवर्तन आघाडीच्या कुंभोज, भेंडवडेतील सभासद संवाद मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी आमदार सतेज पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.

माने म्हणाले, राजाराम कारखाना दरवर्षी सुमारे चार लाख टन उसाचे गाळप करतो. सभासद कारखान्याला चांगल्या रिकव्हरीचा ऊस घालतात. मात्र राजाराम कारखान्यात महाडिकांकडून रिकव्हरी 11.72 दाखवली जाते. म्हणजेच दरवर्षी 40 लाख किलो साखर उत्पादन कमी दाखवले जाते. या साखरेचा दर प्रतीकिलो 30 रुपये एवढा धरला तर वर्षाला 12 कोटी पेक्षा जास्त एवढी रक्कम होते. महाडिकांच्या 28 वर्षाचा सत्तेचा हिशोब केला तर जवळपास 300 कोटी रुपयांचा ढपला महाडिकांनी पाडला आहे.

कारखान्यात गाळप होणाऱ्या चार लाख टन उसापैकी तीन लाख टन उस कारखान्याच्या पाच किलोमिटर परिसरातच आहे. असे असतानाही वाहतूक खर्च जादा कसा काय? महाडिकांनी कारखान्याच्या सत्तेच्या माध्यमातून स्वत:ची घरे भरली. सभासदांना मात्र देशोधडीला लावले, अशी टीका माने यांनी केली.

Edited By - Ratnadeep ranshoor 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

आता शिक्षकांच्या नावासमोर टीआर पदवी लागणार !