Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

मनसे सरचिटणीस किर्तीकुमार शिंदे यांचा राजीनामा,वाचा फेसबुकवर पोस्टमध्ये काय लिहिले

Webdunia
गुरूवार, 11 एप्रिल 2024 (08:49 IST)
Facebbok
मनसे अध्यक्ष राज ठाकर यांनी  पंतप्रधान मोदींना बिनशर्त पाठिंबा देत महायुतीला पाठिंबा देत असल्याचे जाहीर केले. राज ठाकरेंच्या या भूमिकेमुळे  मनसे सरचिटणीस किर्तीकुमार शिंदे यांनी राजीनामा दिला आहे. पाच वर्षांपूर्वी 2019 लोकसभा निवडणुकांच्या धामधुमीत राजसाहेब ठाकरे यांनी भाजप-मोदी शाहविरोधात रणशिंग फुंकलं होतं आणि काल अत्यंत निर्णायक क्षणी राजसाहेबांनी भूमिका बदलली, असं किर्तीकुमार शिंदे यांनी म्हटलं आहे.
 
शिंदे यांनी सरचिटणीसपदाचा आणि सदस्यत्वचा राजीनामा दिला आहे. किर्तीकुमार शिंदे यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत मनातली खदखद मांडली आहे. त्यांनी फेसबुकवर पोस्ट करत पक्षाचा राजीनामा दिला आहे.
 
किर्तीकुमार शिंदे यांनी फेसबुकवर पोस्टमध्ये काय लिहिले आहे वाचा.
अलविदा मनसे!
 
"महाराष्ट्र नवनिर्माण सेना 'भाजप-शिवसेना-राष्ट्रवादी'च्या महायुतीला बिनशर्त पाठिंबा देत आहे. आम्हाला राज्यसभा नको, विधानपरिषद नको, बाकीच्या वाटाघाटी नको. हा पाठिंबा फक्त नि फक्त नरेंद्र मोदींसाठी आहे..." अध्यक्ष राजसाहेब ठाकरे यांनी गुढीपाडवा मेळाव्यात या शब्दांत आपली भूमिका मांडली आणि त्यांच्या राजकीय भूमिकांचं एक 'अनाकलनीय' वर्तुळ पूर्ण झालं.
 
पाच वर्षांपूर्वी 2019 लोकसभा निवडणुकांच्या धामधुमीत राजसाहेब ठाकरे यांनी भाजप-मोदी शाहविरोधात रणशिंग फुंकलं होतं तो माझ्यासाठी (राजकीय पातळीवर) अत्यंत महत्त्वाचा काळ होता. त्या दिवसांत त्यांनी घेतलेल्या सर्व जाहीर- 'लाव रे तो व्हिडिओ' सभांना मी उपस्थित होतो आणि सभांमध्ये ते जे भाजप-मोदी-शाह यांच्या विरोधात जे तथ्य-विचार मांडत होते त्यांबद्दल सविस्तर लेख लिहून त्यांची भूमिका अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रामाणिक प्रयत्न करत होतो.
 
आज पाच वर्षांनी देशाच्या इतिहासातील अत्यंत निर्णायक क्षणी राजसाहेबांनी त्यांची राजकीय भूमिका बदलली आहे. ती किती चूक, किती बरोबर, हे राजकीय विश्लेषक सांगतीलच. सध्याच्या काळात राजकीय नेते त्यांना हवे तेव्हा त्यांना हवी ती राजकीय भूमिका घेऊ शकतात. पण त्यांच्या विचारांवर विश्वास ठेवून लढणाऱ्यांची कुचंबणा होते. त्याचं काय?
 
गेल्या 10 वर्षांत, त्यातही विशेष करून मागच्या 5 वर्षांत 'भामोशा'ने देशाचं अक्षरशः वाटोळं केलं आहे. पारदर्शक कारभाराचा दावा करत सत्तेवर येऊन 'भामोशा' अपारदर्शक हुकूमशाहीने दडपशाही करत आहे. ईडी, सीबीआय, इन्कम टॅक्स यांच्या चौकशांचा ससेमिरा पाठीमागे लावून भाजपेतर राजकीय पक्षांच्या नेत्यांना आणि त्यांच्या निकटवर्तीयांना गजाआड पाठवण्याची भीती दाखवून वॉशिंग मशीनमध्ये घालून त्यांचे शुद्धीकरण करून त्यांचे 'भामोशा'मध्ये सक्तीने पक्षांतर करवून घेतले जात आहे. 'भामोशा'चे विचार ज्यांना पटतात ते राष्ट्रप्रेमी किंवा हिंदू, आणि 'भामोशा'च्या विरोधात आहेत ते राष्ट्रद्रोही किंवा अहिंदू! या नव्या समीकरणामुळे जातपातधर्माच्या नावाखाली माणसाला माणूसपणापासून तोडण्याचे काम सुरू आहे. अत्यंत नम्रपणे सांगतो की, प्रबोधनकारांची अनुपलब्ध पुस्तके प्रकाशित करून त्यांचा वैचारिक वारसा जपण्याचा प्रयत्न करणाऱ्या माझ्यासारख्याला 'भामोशा'चं असलं राष्ट्रीयत्व- 'हिंदुत्व' मान्यच होऊ शकत नाही.
 
राजसाहेब ठाकरे यांनी 'भामोशा'ची बाजू घेणं हे त्यांच्या स्वतःसाठी गरजेचं असू शकतं, पण त्यातून महाराष्ट्राचा- मराठी माणसाचा कोणताही लाभ होण्याची सुतराम शक्यता नाही. त्यांची ही भूमिका सत्तेच्या राजकारणात, मनसेचे आणि स्वत:चे अस्तित्व टिकवण्यासाठी योग्य असू शकेल, पण त्यांनी घेतलेली बाजू सत्याची नाही.
खरं तर असे अनेक मुद्दे राजसाहेबांशी भेटून बोलायचे होते. पण ते शक्य नाही! त्यामुळे हा प्रवास इथेच थांबवत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या सरचिटणीसपदाचा आणि प्राथमिक सदस्यत्वाचा आज मी राजीनामा देत आहे.
 
एक गोष्ट इथे आवर्जून नमूद करतो. राजसाहेब ठाकरे, अमित ठाकरे आणि मनसेचे सर्व पदाधिकारी-कार्यकर्ते यांनी मला नेहमीच प्रेमाने आणि उचित सन्मानाने वागवलं. त्यांच्यामुळे मला अनेक चांगल्या विषयांवर काम करता आलं. मनसे सोडण्याच्या माझ्या या भूमिकेचा- कृतीचा कुठल्यातरी उथळ गोष्टीशी बादरायण संबंध जोडून उठवळ राजकारणाचा धुरळा उडवण्याचा प्रयत्न केला जाणार नाही, ही अपेक्षा.
 
Edited by Ratnadeep Ranshoor

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

साडी नेसल्याने कॅन्सर होऊ शकतो का? ही सुरुवातीची लक्षणे असू शकतात

Amla Navami 2024: आवळा नवमीला पूजा विधी

वामनस्तोत्रम्

नारायणस्तोत्रम् आणि नारायणाथर्वशीर्षोपनिषत्

Tulsi vivah 2024: शालिग्रामचा विवाह तुळशीशी का करतात?

सर्व पहा

नवीन

महिलां विरोधातील टिप्पणी महागात पडणार!

महाराष्ट्र सरकारने तरुणांसाठी लाडला भाऊ योजना सुरू केली, माहिती जाणून घ्या

माजी गृहमंत्री लालकृष्ण अडवाणी आज 97वर्षांचे झाले.पंतप्रधान मोदी माजी राष्ट्रपती कोविंद यांनी दिल्या शुभेच्छा

भाजपच्या पोस्टरवरून एकनाथ शिंदे गायब, कांग्रेसने लगावला टोला

20 नोव्हेंबर रोजी मतदानाच्या दिवशी शेअर मार्केट बंद राहील

पुढील लेख
Show comments