Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

देशातील सर्वाधिक प्रिय 'सवाई गंधर्व भीमसेन महोत्सव’ संगीत प्रेमीना सर्वात मोठी पर्वणी

Webdunia
गुरूवार, 17 नोव्हेंबर 2016 (10:10 IST)
आर्य संगीत प्रसारक मंडळातर्फे आयोजित करण्यात येणारा 'सवाई गंधर्व भीमसेन महोत्सव’ या वर्षी बुधवार, ७ ते रविवार, ११ डिसेंबर दरम्यान न्यू इंग्लिश स्कूल, रमणबाग शाळेच्या मैदानावर होणार आहे. जगभरात प्रतिष्ठेच्या ठरलेल्या या महोत्सवाचे हे ६४ वे वर्ष असून यामध्ये सहभागी होणा-या कलाकारांची नावे आणि महोत्सवाचे वेळापत्रक आर्य संगीत प्रसारक मंडळाचे कार्याध्यक्ष श्रीनिवास जोशी यांनी  जाहीर केले. याबरोबरच जागतिक कीर्तीचे सुलेखनकार अच्युत पालव यांनी साकारलेल्या महोत्सवाच्या नवीन बोधचिन्हाचे अनावरण करण्यात आले.

यंदाच्या 'सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवा’स युनियन बँक ऑफ इंडिया, पु. ना. गाडगीळ अॅण्ड सन्स, श्री धूतपापेश्वर लिमिटेड आणि नांदेड सिटी यांचे शीर्षक प्रायोजकत्व लाभले असून वास्तुशोध प्रोजेक्ट्स, सीड इन्फोटेक लिमिटेड व भारती विद्यापीठ हे या महोत्सवाचे मुख्य प्रायोजक असतील. याशिवाय अमित एन्टरप्रायजेस हाउसिंग लिमिटेड यांनी लाईव्ह स्ट्रीमिंग, तर बँक ऑफ इंडिया यांनी प्रदर्शनाचे प्रायोजकत्व स्वीकारले आहे. याबरोबरच 'सिक्स्थ इलिमेंट' हे आऊटडोअर पार्टनर तर 'इंडियन मॅजिक आय' ही संस्था महोत्सवाचे ब्रॅण्डिंग व कम्युनिकेशन पार्टनर असणार आहेत.
 
यंदाच्या 'सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवा'मध्ये तब्बल २१ कलाकार आपला कलाविष्कार सादर करतील. यामध्ये नामवंत कलाकारांबरोबरच युवा पिढीतील कलाकारांचा सहभाग मोठ्या प्रमाणात असणार आहे. या कलाकारांमध्ये देशाच्या विविध भागातील आंतरराष्ट्रीय ख्यातीचे कलाकार तसेच अनेक प्रतिभावंत कलाकार आपली कला रसिकांसमोर सादर करणार आहेत, असे श्रीनिवास जोशी यांनी सांगितले.
 
यंदाचा महोत्सव पाच दिवसीय असून, बुधवार, दिनांक ७ डिसेंबर ते रविवार, दिनांक ११ डिसेंबर असा रंगणार आहे. महोत्सवाच्या पहिली तीन व शेवटच्या सत्रांची वेळ ४ ते रात्रौ १० अशी असेल तर शनिवारचे सत्र परवानगी मिळाल्यास सायंकाळी ४ ते रात्री १२ पर्यंत चालेल.     
 
महोत्सवातील कार्यक्रमांचा तपशील -
'सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवा’च्या पहिल्या दिवसाची (बुधवार, दि. ७ डिसेंबर) सुरवात भारतरत्न उस्ताद बिस्मिल्ला खान यांचे शिष्य एस. बल्लेश आणि त्यांचे चिरंजीव कृष्णा बल्लेश यांच्या सनई वादनाने होईल. २०१६ हे वर्ष भारतरत्न उस्ताद बिस्मिल्ला खान यांचे जन्म शताब्दी वर्ष असून, महोत्सवाचा पहिला दिवस त्यांना समर्पित करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाद्वारे त्यांना समस्त गान रसिकांतर्फे आदरांजली वाहण्यात येईल. यानंतर श्रीमती पद्मा तळवलकर, पं. जितेंद्र अभिषेकी यांसारख्या दिग्गजांचे शिष्यत्व लाभलेल्या श्रीमती गौरी पाठारे यांचे गायन होईल. तसेच इमदादखानी घराण्याचे उस्ताद इमरात खान यांचे चिरंजीव आणि शिष्य इर्शाद खान यांचे ‘सूरबहार’ वादन होईल. पहिल्या दिवसाची सांगता किराणा घराण्याचे ख्यातनाम गायक पं. गणपती भट यांच्या सुरेल गायनाने होईल.

दुस-या दिवशी (गुरुवार, दि. ८ डिसेंबर) रोजी रसिकांना बनारस घराण्याचे रितेश व रजनीश मिश्रा यांचे गायन ऐकण्याची संधी मिळेल. रितेश व रजनीश हे ज्येष्ठ गानबंधू पं. राजन – साजन मिश्रा यांचे चिरंजीव आणि शिष्य असून ते या वर्षी प्रथमच आपली कला महोत्सवात पेश करतील. नंतर पं. हरिप्रसाद चौरासिया यांच्या शिष्या देबोप्रिया आणि सुचिस्मिता या भगिनी आपल्या बासरी वादनाने रसिकांना मंत्रमुग्ध करतील. यानंतर जयपूर-अत्रौली घराण्याच्या श्रीमती मंजिरी असनारे-केळकर यांचे गायन होईल. त्यांना पं. मधुसूदन कानेटकर यांच्याकडून तालीम मिळाली आहे. दुसऱ्या दिवसाची सांगता मेवाती घराण्याचे ज्येष्ठ गायक पं. जसराज यांच्या गायनाने होईल.

महोत्सवाच्या तिस-या दिवशी (शुक्रवार, दि. ९ डिसेंबर) पतियाळा घराण्याचे सुप्रसिद्ध गायक पं. अजय चक्रवर्तीं यांचे शिष्य ब्रजेश्वर मुखर्जी यांचे गायन होईल तसेच म्हैसूर मंजुनाथ व म्हैसूर नागनाथ हे बंधू कर्नाटकी अंगाच्या व्हायोलीनची जुगलबंदी सादर करतील. यानंतर हैदराबादच्या भरतनाट्यम पारंगत श्रीमती पूर्वाधनश्री यांचे नृत्य होईल. या दिवसाचा शेवट ग्वाल्हेर, जयपूर आणि आग्रा या तीनही घराण्यांचे प्रतिनिधित्व करणारे व गजानन बुवा जोशी यांचे शिष्य पं. उल्हास कशाळकर यांच्या शास्त्रीय गायनाने होईल.

चौथ्या दिवशी (शनिवार, दि. १० डिसेंबर) श्रीमती अश्विनी भिडे-देशपांडे यांची शिष्या धनाश्री घैसास प्रथमच आपली गायन कला रसिकांसमोर सादर करेल. जयपूर घराण्याची ही पारंगत शिष्या सवाई गंधर्व शिष्यवृत्तीची मानकरी आहे. नंतर डागर घराण्याचे सुप्रसिद्ध पं. उदय भवाळकर यांचे धृपद गायन होईल. तसेच भारतरत्न पं. भीमसेन जोशी यांचे शिष्य आणि सुपुत्र श्रीनिवास जोशी यांचे गायन होणार आहे. नंतर दिल्लीस्थित लक्ष्य मोहन गुप्ता आणि आयुष मोहन गुप्ता या बंधूचे सतार आणि सरोद वादन होईल. या सत्राची सांगता कर्नाटक संगीतातील ख्यातनाम वहायोलीनवादक डॉ. एल. सुब्रमण्यम आणि त्यांचे पुत्र अंबी यांच्या सहवादनाने होणार आहे. 
 
महोत्सवाच्या शेवटच्या दिवशी (रविवार, दि, ११ डिसेंबर) जगप्रसिद्ध संतूर वादक पं. शिवकुमार शर्मा यांचे जपानी शिष्य ताकाहीरो अराई यांचे संतूर वादन सादर करतील. तसेच किराणा घराण्याचे गायक आणि पं. संगमेश्वर गुरव यांचे शिष्य आणि सुपुत्र कैवल्यकुमार यांचे देखील गायन होणार आहे. यानंतर सुप्रसिद्ध सरोदवादक उस्ताद अमजद अली खान आपले शिष्य आणि सुपुत्र अमान अली बंगश आणि अयान अली बंगश यांच्याबरोबर सहवादन करतील. परंपरेप्रमाणे महोत्सवाचा समारोप किराणा घराण्याच्या ज्येष्ठ गायिका डॉ. श्रीमती प्रभा अत्रे यांच्या गायनाने होणार आहे. एकूणच यंदाचा महोत्सव हा संगीतरसिकांसाठी सांस्कृतिक मेजवानी ठरेल यात शंका नाही.
 
यावर्षीच्या सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवात आपली कला प्रथमच सादर करणारे कलाकार पुढील प्रमाणे -  एस. बल्लेश व कृष्णा बल्लेश, रितेश व रजनीश मिश्रा, देबोप्रिया व सुचिस्मिता चॅटर्जी, ब्रजेश्वर मुखर्जी, मंजुनाथ व नागनाथ मैसूर, श्रीमती पूर्वाधनश्री, धनाश्री घैसास, लक्ष्य व आयुष मोहन गुप्ता, ताकाहीरो अराई.
 
महोत्सवाची तिकीटविक्री -
या संपूर्ण महोत्सवासाठी सीझन तिकिटे उपलब्ध करून दिली जाणार असून, खुर्चीसाठी संपूर्ण सत्रासाठी तिकीट दर रु. ३००० इतका असेल. चलनी नोटांची बाजारातील कमतरता लक्षात घेत यंदाच्या वर्षी भारतीय बैठकीसाठी गेली तेरा वर्षे असलेली संपूर्ण सत्राच्या तिकिटाची मूळ ३५० रुपये ही रक्कम कमी करण्यात आली असून रु. ३०० इतकी करण्यात आली आहे. याशिवाय भारतीय बैठकीसाठी दर दिवसाची तिकीटेदेखील उपलब्ध करून दिली जाणार असून, पाचही दिवसांसाठी प्रतिदिवस रु. १०० असा तिकीटदर असेल.
 
नोटांच्या अडचणींमुळे रिसकांना तिकिट खरेदीसाठी विविध पर्याय उपलब्ध करून देण्यात येणार असून तिकीट विक्रीविषयी अधिक माहिती देणारे निवेदन पुढील आठवड्यात मंडळातर्फे प्रसारित करण्यात येईल.

International Labour Day Wishes In Marathi कामगार दिनाच्या शुभेच्छा

International Labour Day 2024 भारतात कामगार दिन कधी सुरू झाला?

रांची मध्ये अपघात शाळेची बस पलटली, 15 मुलं जखमी

एक देखील मुस्लिमला दिले नाही तिकीट, नेत्याने दिला राजीनामा

महाराष्ट्र दिन कोट्स Maharashtra Day Quotes In Marathi

खेळता- खेळता बेवारस कारमध्ये दोन मुलांचा मृत्यू

जय महाराष्ट्र!

नैनितालच्या जंगलामध्ये लागली भीषण आग

Maharashtra Din 2024 महाराष्ट्र दिनाचे महत्त्व

Labour day : कामगार नव्हे तो तर किमयागार आहे

पुढील लेख
Show comments