राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे स्वतः सीरम इन्स्ट्यिट्यूटशी लस पुरवठ्यासंदर्भात बोलणार आहेत. अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी माध्यमांशी बोलताना दिली. तसेच, म्युकरमायोकोसिसच्या औषधाचा तुटवडा कसा दूर करता येईल? यावर देखील राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांच्या बैठकीत चर्चा झाली असल्याचे त्यांनी सांगितले.
तसेच, ”राज्यातील जिल्हा बँका, नागरी सहकारी बँका संपवण्याचा केंद्र सरकारचा डाव आहे, त्या विरोधात लढा देण्यासाठी निश्चित रूपाने महाविकासआघाडी सरकारच्या माध्यमातून पावलं उचलण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे.” असं देखील यावेली नवाब मलिक यांनी यावेळी बोलून दाखवलं.
याचबरोबर, ”न्यायालयाच्या आदेशानंतर ओबीसी आरक्षणाबाबतीत राज्यात जे प्रश्न निर्माण झालेले आहेत. त्याच्या संदर्भात आता मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली तिन्ही पक्षांचे नेते, वकील, तज्ज्ञ या सर्वांची बैठक असताना निश्चितपणे जे आरक्षण इतर मागासवर्गीयांना मंडल आयोगाच्या माध्यमातून २७ टक्के देण्यात आलं होतं. राजकीय आरक्षण कुठंतरी संपतं असं एक चित्र निर्माण झालेलं आहे. सर्वप्रथम शरद पवार यांनी मंडल आयोगाची अंमलबजावणी केली. राष्ट्रवादी काँग्रेसचं स्पष्ट मत आहे. ओबीसी समजाचं जे सर्व आरक्षण आहे, मग ते नोकरी, शिक्षण किंवा राजकीय आरक्षण असेल ते अबाधित राहीलं पाहिजे. त्याबाबतीत बैठकीत स्पष्ट भूमिका घेतली गेली आहे.