Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

शिवसेना : गोळीबार, चोरी आणि शिवीगाळ, शिंदे आणि ठाकरे गटांसाठी 'दादरची लढाई' इतकी प्रतिष्ठेची का?

Webdunia
सोमवार, 12 सप्टेंबर 2022 (22:20 IST)
'बंदुकीच्या गोळ्या, चोरीचं प्रकरण आणि सोशल मीडियावर कार्यकर्त्यांची आई-बहिणीवरून शिवीगाळ'
गेल्या दोन दिवसांपासून शिवसेनेचा बालेकिल्ला असलेल्या मुंबईतल्या दादरमध्ये दोन गटात तणावाचं वातावरण आहे.
 
शिवसेना कुणाची? या प्रश्नाचं उत्तर मिळवण्यासाठी एकीकडे कायदेशीर लढाई सुरू आहे, तर दुसरीकडे मुंबईत दादरमध्ये उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे गटात संघर्ष टोकाला गेला.
 
दादरच्या प्रभादेवी भागात असं नेमकं काय झालं की, अगदी काही महिन्यांपूर्वीपर्यंत एकत्र असलेले कार्यकर्ते रातोरात एकमेकांना भिडले? शिंदे गटाचं दादरकडे विशेष लक्ष का आहे? उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्यासाठी दादर का महत्त्वाचं आहे?
 
मुंबई, ठाणे, नवी मुंबई या महानगरपालिकेच्या निवडणुका कधीही जाहीर होऊ शकतात. या निवडणुका तोंडावर असताना शिवसेनेत उभी फूट पडली, पक्षात दोन गट झाले आणि आता शिवसेना पक्ष नेमका कुणाचा? असा कायदेशीर प्रश्न निर्माण झाला.
 
सर्वोच्च न्यायालयात या प्रकरणी सुनावणी सुरू आहे. पण आम्हीच खरी शिवसेना हे सिद्ध करण्याच्यादृष्टीने ठाकरे आणि शिंदे गटात स्पर्धा सुरू आहे.
 
यातलाच महत्त्वाचा भाग म्हणजे मुंबईतला दादर परिसर. याचं कारण म्हणजे शिवसेनेच्या स्थापनेपासून दादर, शिवसेना भवन आणि त्याच्यासमोरच असलेलं शिवाजी पार्क याच्याशी पक्षाचं घट्ट नातं आहे.
 
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांच्यासोबत शिवसेनेच्या 39 आमदारांनी बंड केल्यानंतर दादरमध्येच घडामोडी वेगाने वाढल्या.
 
ताजी उदाहरणं द्यायची झाल्यास तीन मुद्दे आहेत, ज्यावरून एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे या दोन्ही गटासाठी दादर किती महत्त्वाचं आहे हे स्पष्ट होतं.
 
1. 'कट्टर' कार्यकर्त्यांचे आता दोन गट
शिवसेनेची स्थापना 19 जून 1966 रोजी झाली. दादरमध्येच बाळासाहेब ठाकरे यांच्या जुन्या घरात शिवसेनेच जन्म झाला.
 
सुरुवातीपासूनच मुंबईवर शिवसेनेचं वर्चस्व आहे. पण दादर, प्रभादेवी, परळ, वरळी या भागात शिवसेनेचे कट्टर कार्यकर्ते आहेत असं जाणकार सांगतात.
 
त्याचं कारण म्हणजे स्थापनेनंतर 8 वर्षांनी 1974 साली दादर येथे शिवसेनेचं मुख्यालय शिवसेनाभवन झाले. पक्षाचे प्रमुख बाळासाहेब ठाकरे याच कार्यालयात पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना भेटत असत. त्यामुळे इथल्या आताच्या कार्यकर्त्यांनी आणि त्यांच्या आधीच्या पिढीनेही बाळासाहेब ठाकरे यांच्यासोबत जवळून काम केलंय.
 
या भागातल्या शिवसैनिकाचं म्हणूनच शिवसेनेसोबत भावनिक नातं आहे. पक्षात फूट पडल्यानंतर शिवसेनाभवनाबाहेर अनेक महिला कार्यकर्त्या संतापल्याचं तर काही भावनिक झाल्याचंही पाहायला मिळालं होतं.
 
आता दादर-माहीम मतदारसंघाचे आमदार सदा सरवणकर शिंदे गटात सामील झालेत. त्यांचे पुत्र समाधान सरवणकर याच भागात शिवसेनेचे नगरसेवक आहेत. त्यामुळे इथल्या कार्यकर्त्यांमध्येही आता दोन गट तयार झाले आहेत.
 
आमदारांच्या कार्यकर्त्यांचा एक गट आणि शिवसेनेचे पदाधिकारी मिलिंद वैद्य, विभाग प्रमुख हेमंत सावंत, माजी महापौर हेमांगी वरळीकर आणि कार्यकर्त्यांचा दुसरा गट.
 
शिवाय, हा सर्व मराठीबहुल पट्टा असल्याने शिवसेनेचे इथं एकगठ्ठा मतदार आहेत. मनसे अध्यक्ष राज ठाकरे ह्यांनी मराठीच्या मुद्यावर मनसेची स्थापना केल्यानंतर त्यांनाही दादरमधून जोरदार प्रतिसाद मिळाला होता.
 
आता शिंदे गटाला आपण खरी शिवसेना आहोत हे सिद्ध करायचं असल्यास किंवा तशी प्रतिमा जनतेतही यशस्वीरित्या उभी करायची असल्यास दादरकडे विशेष लक्ष द्यावं लागणार आणि म्हणूनच आता शिंदे गटासाठीही दादर तितकच महत्त्वाचं बनलंय.
 
ही पार्श्वभूमी असल्यानेच प्रभादेवी येथे गेल्या दोन दिवसांपासून ठाकरे आणि शिंदे गटात संघर्ष पेटला आहे. दोन गटात बाचाबाची आणि नंतर हाणामारी झाल्याने दोन्ही गटाच्या कार्यकर्त्यांवर दादर पोलिसांनी गुन्हे दाखल केलेत.
 
परंतु हे कार्यकर्ते जेव्हा पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांना भेटण्यासाठी गेले तेव्हा उद्धव ठाकरे यांनी त्यांचं कौतुक केलं.
 
शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत यांनी शिंदे गटाला आव्हान देत म्हटलं की, "तुम्ही रस्त्यावर उतरणार असाल तर मग आम्हीही मागे राहणार नाही. राज्यात कायदा सुव्यवस्था आहे का? त्यांच्या आमदारांच्या पिस्तुलातून गोळीबार झाला आणि कारवाई मात्र आमच्यावर कार्यकर्त्यांवर होते."
 
दुसरीकडे, "दादर शिवसेनेचा बालेकिल्ला आहे. पण ज्यांच्यामुळे बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो ते लोकप्रतिनिधी आणि कार्यकर्ते आता शिंदे गटात आहेत. त्यामुळे बालेकिल्ला कोणाचा हे तुम्हीच सांगा," अशी प्रतिक्रिया शिवसेना शिंदे गटाच्या प्रवक्त्या शीतल म्हात्रे यांनी बीबीसी मराठीशी बोलताना दिली.
 
2. शिवाजी पार्कात दसरा मेळावा कुणाचा होणार, ठाकरे की शिंदेंचा?
शिवसेनेची स्थापना झाल्यानंतर काही महिन्यांनी 30 ऑक्टोबर 1966 रोजी पहिला दसरा मेळावा दादर येथील शिवाजी पार्कात पार पडला होता. तेव्हापासून शिवसेनेची ही दसरा मेळाव्याची परंपरा कायम आहे.
 
दसरा मेळाव्यात बाळासाहेब ठाकरे भाषणात काय बोलतात याकडे तमाम शिवसैनिकाचं लक्ष असायचं. त्यानंतर ही परंपरा उद्धव ठाकरे यांनीही सुरू ठेवली.
 
आता शिंदे गटाच्या बंडानंतर यंदाचा पहिला दसरा मेळावा होणार आहे. परंतु यावरूनही दोन्ही गटातलं वातावरण तापलं आहे. कारण उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे अशा दोन्ही गटांकडून शिवाजी पार्कवर दसरा मेळावा घेण्याची तयारी सुरू आहे.
 
दोन्ही गटाने पोलिसांकडे आणि स्थानिक प्रशासनाकडे दसरा मेळावा घेण्यासाठी परवानगी मागितली आहे.
 
शिवाजी पार्क शिवसेनेच्या सर्व महत्त्वाच्या घटनांचा साक्षीदार राहिलाय. अनेक मोठ्या घोषणा शिवसेनेने शिवाजी पार्कवर केल्या आहेत. त्यामुळे शिवसेनेची आणि बाळासाहेबांची ही परंपरा पुढे नेण्यास आम्ही सक्षम आहोत हे दाखवण्याची संधी निमित्ताने शिंदे गटाला मिळालीय आणि म्हणूनच ते दसरा मेळाव्यासाठी आग्रही आहेत असं राजकीय विश्लेषक सांगतात.
 
शीतल म्हात्रे सांगतात, "आम्ही शिवसेना आहोत त्यामुळे आमची परंपरा आम्ही का सोडायची? त्यामुळे आम्हीही दसरा मेळावा घेणार आहोत. शिवाजी पार्क येथे मेळावा आयोजित करण्यासाठी आम्ही परवानगी मागितली आहे. आम्हाला संध्याकाळीच हा कार्यक्रम करायचा आहे."
 
3. शिवसेना भवन आणि शिंदे गटाचं मुख्यालय
शिवसेनेचे मुख्य कार्यालय शिवसेनभवन दादर पश्चिम येथे आहे. आता शिंदे गटाचे कार्यालय सुद्धा इथेच जवळपास असणार आहे.
 
शिंदे गटाकडून 2-3 जागांची पाहणी यासाठी करण्यात आली आहे.
 
मुंबई महानगरपालिकेच्य जी नॉर्थ कार्यालयाजवळ एका खासगी इमारतीत शिंदे गटाचं मुख्यालय असणार आहे अशी माहिती मिळत आहे.
 
शिंदे गटातील माहीमचे आमदार सदा सरवणकर यांनी नवीन शिवसेना भवन दादर येथे उभारलं जाईल असं वक्तव्य केलं होतं.
 
दादर येथे स्वतंत्र शिवसेना भवन स्थापन करणार असं ते म्हणाले होते. सदा सरवणकर याबाबत म्हणाले होते की, "दादर येथे येत्या 15-20 दिवसांत शिंदे गटाचं हे कार्यालय सुरू करण्यात येईल. तसंच एकनाथ शिंदे प्रत्येक जिल्ह्यात कार्यालय सुरू करणार असून, त्यापैकी मुंबईचं कार्यालय दादर परिसरात असेल."
 
राजकीय विश्लेषक संदीप प्रधान सांगतात," सध्या हे चित्र फक्त दादरमध्ये दिसत असलं तरी आगामी काळात इतर भागांतही दोन्ही गटात संघर्ष होण्याची शक्यता आहे. दादर या ठिकाणी हा वाद अधिक आक्रमक झाला कारण दोन्ही गटाला 'दादर आमचं आहे' हे दाखवायचं आहे. शिंदे गटाकडूनही यासाठी वेगवेगळे प्रयत्न होतायत आणि ठाकरे गटही मागे हटायला तयार नाही कारण त्यांनाही आपली शिवसेना म्हणून प्रतिमा कायम ठेवायची आहे."
 
"दादर परिसरात दोन गटातील कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी होणं, दादरमध्ये शिंदे गटाने मुख्यालय सुरू करण्याची प्रक्रिया सुरू करणं, दसरा मेळाव्यावर आमचा अधिकार हे सांगणं या सर्व हालचली म्हणजे 'आम्ही शिवसेना आहोत' ही प्रतिमा जनतेच्या मनात रुजवण्यासाठी सुरू असलेले प्रयत्न आहेत. दोन्ही गटाकडून तसे प्रयत्न सुरू आहेत," असंही ते सांगतात.
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

22 डिसेंबर रोजी कालाष्टमी व्रत, या दिवशी 4 शुभ योग तयार होत आहेत, तिप्पट फळ मिळणार

जुन्या कपड्यांचा पोछा वापरल्याने दुर्दैव येते का?

चांगल्या झोपेसाठी या गोष्टी करा, तुमचे आरोग्यही चांगले राहील

Christmas special : या रेसिपी नक्की बनवा

रावणाचा भाऊ कुंभकरण खरोखरच इंजिनिअर होता का?

सर्व पहा

नवीन

भाजपच्या विजयानंतर मराठ्यांवर हल्ले वाढले संजय राऊतांचा दावा

LIVE: भाजपच्या विजयानंतर मराठी भाषिकांवर हल्ले वाढले संजय राऊत

भारत जोडो यात्रेबाबत फडणवीसांचे आरोप केंद्र सरकारचे अपयश दर्शवणारे आहे आदित्य ठाकरे यांचे विधान

विराट कोहली आणि अनुष्का देश सोडणार!

IND W vs WI W: भारताने निर्णायक सामन्यात 60 धावांनी विजय मिळवला

पुढील लेख
Show comments