Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

कोट्यवधींच्या संपत्तीसाठी सुनेनेच दिली सासऱ्याच्या हत्येची सुपारी, हिट अँड रनचा बनाव- पोलिसांची माहिती

Webdunia
बुधवार, 12 जून 2024 (09:06 IST)
पुण्यात हिट अँड रन प्रकरण ताजं असतानाच नागपुरातही तसाच प्रकार घडला होता. त्याची देखील शहरात चर्चा होती. पण, या हिट अँड रन प्रकरणानं एक वेगळं वळण घेतलं आणि हळूहळू अनेक धक्कादायक गोष्टी समोर आल्या.
 
सूनेनंच सासऱ्याच्या हत्येची सुपारी दिल्याचं समोर आलं. ही सून सरकारी अधिकारी असून तिनं तिच्या माहेरच्या संपत्तीसाठी सासऱ्याला कारनं उडविण्याची सुपारी दिली. यात सासऱ्याचा मृत्यू झाला, असं नागपूर पोलिसांनी पत्रकार परिषद घेऊन सांगितलं आहे.
 
नागपुरातल्या या प्रकरणात आतापर्यंत नेमकं काय काय घडलं?
 
सुरुवातीला हिट अँड रन प्रकरण
नागपूर पोलीस आयुक्त रविंद्र कुमार सिंगल यांनी आज (11 जून) पत्रकार परिषद घेऊन या प्रकरणाची माहिती दिली.
 
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 82 वर्षीय पुरुषोत्तम पुट्टेवार रुग्णालयात उपचार घेत असलेल्या आपल्या पत्नीची भेट घेऊन घरी जात होते.
 
22 मे रोजी सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास मानेवाडा इथल्या बालाजी नगर परिसरात एका कारनं पुरुषोत्तम पुट्टेवार यांना धडक दिली. यानंतर त्यांना मानकापूर येथील अलेक्सिस रुग्णालयात दाखल करण्यात आलं. इथं त्यांचा मृत्यू झाला.
 
मानकापूर पोलिस ठाण्यात अपघाती मृत्यूची नोंद झाली. त्यानंतर पुरुषोत्तम पुट्टेवार यांचा मुलगा आणि आरोपी अर्चना पुट्टेवारचा नवरा मनिष पुट्टेवार यांनी अजनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.
 
त्यानंतर अजनी पोलिसांनी चौकशी केली असता त्यांना सीसीटीव्ही फुटेज मिळालं. त्यावरून त्यांनी हिट अँड रन प्रकरणाची नोंद करून कार चालक निरज निमजेला अटक केली.
 
हे प्रकरण फक्त इथपर्यंतच मर्यादित नाही असा संशय पोलिसांना आला. यात हत्येचा संशय कुटुंबीयांनी व्यक्त केला होता. त्यानंतर पोलीस आयुक्त रविंद्र कुमार सिंगल यांनी या प्रकरणाचा तपास करण्याचे आदेश दिले. त्यानुसार गुन्हे शाखेनं पुन्हा एकदा तपास सुरू केला आणि यात धक्कादायक बाबी समोर आल्या.
 
हे फक्त हिट अँड रनचं प्रकरण नाहीतर सुपारी देऊन केलेली हत्या आहे हे पोलीस तपासांत समोर आलं.
 
सरकारी अधिकारी असलेल्या सुनेनं दिली हत्येची लाखो रुपयांत सुपारी
पोलिस चौकशीत या हत्येची मास्टरमाईंड पुरुषोत्तम पुट्टेवार यांची सून अर्चना पार्लेवार पुट्टेवार असल्याचं समोर आलं. अर्चना पार्लेवार पुट्टेवार या गडचिरोलीतील नगर रचना विभागात सहाय्यक संचालक पदावर कार्यरत आहेत. त्यांनी त्यांचा ड्रायव्हर सार्थक बागडेच्या माध्यमातून सासरे पुरुषोत्तम यांना मारण्याची सुपारी दिली.
 
सार्थक बागडेचे मित्र निरज निमजे आणि सचिन धार्मिकला 17 लाख रुपयांत ही सुपारी दिली होती. याच पैशांत अपघातासाठी एक जुनी कार विकत घेतली. त्यानंतर हीच कार निरज निमजेने पुरुषोत्तम यांच्या अंगावर घालून त्यांची हत्या केली, असं सिंगल यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं.
पोलिसांनी तिन्ही आरोपींना अटक केल्यानंतर पुरुषोत्तम यांची सून अर्चना यांनीच हत्येची सुपारी दिल्याचं समोर आलं. यानंतर पोलिसांनी 6 जूनला अर्चनाला अटक केली.
 
आरोपींकडून 17 लाख रुपये आणि एक दुचाकी, हत्येत वापरलेली कार आणि आणखी दोन कार जप्त करण्यात आल्या आहेत.
 
सध्या आरोपी पाच आरोप अटकेत असून एका आरोपीला अटक करणार असल्याचं पोलीस आयुक्त रविंद्र कुमार सिंगल यांनी सांगितलं.
 
सरकारी अधिकारी असतानाही सासऱ्याची हत्या का केली?
अर्चना पार्लेवार-पुट्टेवार या सरकारी अधिकारी आहेत. तरीही त्यांनी माहेरच्या संपत्तीच्या वादातून वृद्ध सासऱ्याचा खून केला.
 
या कुटुंबाचे दोन्ही बाजूने नाते आहे. अर्चना यांची नणंद योगिता या अर्चना यांचे भाऊ प्रवीण यांच्या पत्नी होत्या. प्रवीण यांचा मृत्यू झाला.
 
अर्चना यांचा भाऊ प्रविण पार्लेवारचा योगिता पुट्टेवारसोबत विवाह झाला होता. मृत पुरुषोत्तम पुट्टेवार हे योगिता यांचे वडील होते.
 
प्रविण पार्लेवार यांचा 2007 मध्ये मृत्यू झाला.
 
त्यानंतर योगिता यांनी पार्लेवार कुटुंबाच्या म्हणजे नवऱ्याच्या संपत्तीवर दावा सांगितला.
 
आपल्या मुलीला सासरची संपत्ती मिळावी यासाठी पुरुषोत्तम पुट्टेवार प्रयत्न करत होते. तर आपल्या माहेरची संपत्ती नणंदेला जाऊ नये यासाठी अर्चना प्रयत्नशील होत्या.
 
संपत्तीचा हा सर्व वाद कोर्टात गेला होता.
'नवऱ्याचा मृत्यू झाल्यानंतर संपत्ती मिळणार नाही,' असं आरोपी अर्चनाने तिच्या भावाची पत्नी योगिता यांना बजावलं.
 
योगिता यांना दोन मुली असल्यानं कोर्टात तिची बाजू वरचढ ठरत होती. योगितांच्या वतीनं त्यांचे वडील मृत पुरुषोत्तम पुट्टेवार हेच पूर्ण प्रकरण हाताळत होते. त्यामुळे पुरुषोत्तम यांचाच काटा काढला तर हे संपत्तीच्या वादाचं प्रकरण आणखी कमकुवत होईल.
 
पुरुषोत्तम गेल्यानंतर योगिताच्या बाजूनं कोणीही लढणारं नसेल असा विचार करत अर्चना यांनी शांतपणे पुरुषोत्तम यांच्या हत्येचा कट रचला असं पोलिसांनी सांगितले.
 
फक्त माहेरच्या संपत्तीसाठी अर्चनानं वृद्ध सासऱ्याचा खून केला. पण, या प्रकरणात सरकारी अधिकारी असलेली अर्चनाच नाहीतर तिच्या सरकारी अधिकारी असलेल्या भावाचाही समावेश आहे.
 
केंद्र सरकारचा अधिकारी आणि बड्या नेत्याचा निकटवर्तीय या प्रकरणात आरोपी
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अर्चनाचा भाऊ प्रशांत पार्लेवार जो केंद्र सरकारचा अधिकारी आहे तो देखील या प्रकरणात आरोपी आहे.
 
पार्लेवार कुटुंबाची संपत्ती फक्त अर्चना आणि प्रशांत दोघांना वाटून घ्यायची होती. यामध्ये त्यांचा मृत भाऊ प्रविण पार्लेवारच्या पत्नी योगिताला हिस्सा द्यायचा नव्हता.
 
त्यामुळे योगिताला या प्रकरणात मदत करणारे तिचे वडील पुरुषोत्तम पुट्टेवार यांचाच काटा काढायचं ठरवलं. अर्चनानं प्लॅन आखला आणि तिला प्रशांत पार्लेवार यांनी मदत केली.
 
या हिट अँड रन अपघातासाठी कार चालक पुरविणे, कार खरेदी करण्यात मदत करणं हे काम प्रशांत पार्लेवार यांनीच केलं. त्यांना अद्याप अटक झालेली नाही.
 
पण, अटक करण्याची प्रक्रिया सुरू असल्याचं पोलीस आयुक्त रविंद्र कुमार सिंगल यांनी सांगितलं. प्रशांत पार्लेवार केंद्र सरकारचे अधिकारी आहेत. तसेच ते नागपुरातील एका बड्या नेत्याच्या जवळचे असल्याची माहिती आहे.
 
पण, ज्या संपत्तीसाठी ही हत्या झाली ती संपत्ती नेमकी किती आहे?
अर्चनाच्या माहेरी कोट्यवधींची रुपयांची संपत्ती आहे. आतापर्यंत पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार, अर्चनाच्या माहेरी पार्लेवार कुटुंबाकडे जवळपास 22 कोटी रुपयांची संपत्ती आहे. या व्यतिरिक्त आणखी काही संपत्ती आहे का याची शहानिशा पोलीस करत आहेत.
 
यात नागपुरातील मध्यवर्ती भागात उंटखाना परिसरात 5500 स्क्वेअर फुटांचा प्लॉट आणि व्यावसायिक दुकानं आहेत. या प्रकरणात तपास सुरूच असून संपत्तीत आणखी काही भर पडते का? याकडेही पोलिसांचं लक्ष आहे.
 
हीच संपत्ती अर्चना आणि प्रशांत पार्लेवार या दोन्ही सरकारी अधिकारी असलेल्या बहिण-भावाला पाहिजे होती. त्यामुळे त्यांनी योगिताच्या वडिलांच्या हत्येची सुपारी दिली, असे पोलिसांनी सांगितले.
 
याआधीही दोनवेळा झाला होता अपघाताचा प्रयत्न
पुरुषोत्तम पुट्टेवार यांच्या हत्येचा प्रयत्न करण्याची ही पहिलीच वेळ नाही. याआधीही दोनवेळा त्यांचा अपघात घडवून हत्या करण्याचा प्रयत्न झाल्याचं पोलीस तपासांत उघड झालं.
 
8 मे रोजी पुरुषोत्तम यांची हत्या करण्याचा पहिला प्रयत्न झाला. यावेळी देखील त्यांच्या अंगावर कार घालण्याचा प्रयत्न झाला. त्यानंतर दुसऱ्यांदा त्यांना दुचाकीनं धडक दिली.
 
दोन्ही वेळा ते किरकोळ जखमी झाल्यानं मुलगा मनिषच्या क्लिनिकमध्ये त्यांनी उपचार घेतले होते. यावेळी कोणी आपल्या हत्येचा प्रयत्न करत आहे हे त्यांच्या आणि कुटुंबाच्या लक्षातही आलं नाही.
 
त्यांचा मुलगा आणि आरोपी अर्चनाचा नवरा मनिष पुट्टेवार डॉक्टर आहेत. पण, स्वतःची पत्नी वडिलांच्या हत्येची प्लॅनिंग करत असल्याची भनक सुद्धा त्याला नव्हती.
 
याआधी दोनवेळा अपघात झाल्यानं वडिलांनी आपल्या क्लिनिकमध्ये उपचार घेतले. पण, असं काही प्रकरण असेल असं वाटलं नव्हतं अशी माहिती त्यांनी पोलिसांना दिली.
 
या प्रकरणात पोलिसांनी घटनेची मास्टरमाईंड अर्चना पार्लेवार-पुट्टेवार, अर्चनाचा ड्रायव्हर सार्थक बागडे, त्याचे मित्र सचिन धार्मिक आणि निरज निमजे, तसेच आरोपींसोबत सुपारीच्या पैशांचा व्यवहार करणारी अर्चनाची सेक्रेटरी पायल नागेश्वर या पाच आरोपींना अटक केली असून केंद्र सरकारचा अधिकारी प्रशांत पार्लेवारला अटक करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
 
या आरोपींवर हत्येचा कट रचणे आणि हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा तपास सुरू असून पुढे आणखी कोणी आरोपी आहेत का? याचाही तपास करणार असल्याचं पोलीस आयुक्त रविंद्र कुमार सिंगल यांनी सांगितलं.

Published By- Priya Dixit
 
 
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Margashirsha Purnima 2024: मार्गशीर्ष पौर्णिमेला लक्ष्मी देवीची कृपा मिळविण्यासाठी कोणते उपाय करावेत?

Annapurna Jayanti 2024: अन्नपूर्णा जयंतीच्या दिवशी स्वयंपाकघरात किती दिवे लावावेत?

वृश्चिक राशीत बुधाचा उदय या राशींसाठी खूप शुभ राहील

बाळासाठी भगवान दत्तात्रेयाच्या नावावरुन सुंदर नावे

दत्त जयंती विशेष रेसिपी : सुंठवडा

सर्व पहा

नवीन

LIVE: अजित पवार एक दिवस मुख्यमंत्री होतील-देवेंद्र फडणवीस

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस विधानसभेत म्हणाले अजित पवार एक दिवस मुख्यमंत्री होतील

40 हजारांची लाच घेतांना महसूल सहाय्यकला रंगेहात पकडले, एफआयआर दाखल

मुंबई बोट दुर्घटनेत शहीद झालेले नौदलाचे कमांडो महेंद्रसिंग राजपूत दोन महिन्यांनी निवृत्त होणार होते

शिवसेना आणि आरएसएस हे हिंदुत्वाच्या एका धाग्याने बांधलेले असले तरी वैचारिकदृष्ट्या वेगळे आहे म्हणाले संजय राऊत

पुढील लेख
Show comments