“मी दहाव्या वर्गात शिकते. चांगले गुण मिळावे म्हणून मी अभ्यास करत होते. आता माझी शिकायची अजिबात इच्छा नाही. बहुतेक मी पुढे अजिबात शिकणार नाही. मी केवळ मैत्री केली म्हणून मला माझ्या वडिलांना गमवावं लागलं. हे मी आयुष्यभर विसरू शकणार नाही.” अल्पवयीन पीडित मुलगी बीबीसीशी बोलत होती.
याच अल्पवयीन मुलीची सोशल मीडियाच्या माध्यमातून एका मुलाशी ओळख झाली होती. या युवकाने कथितरित्या तिचा अश्लील व्हीडिओ व्हायरल केला.
याच मुलाला समजावण्यासाठी गेलेल्या मुलीच्या वडिलांची लोकांनी हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली. पीडितेचा छोटा भाऊ मरणाशी झुंज देत आहे. या प्रकरणातील सर्व आरोपींना अटक करण्यात आल्याची माहिती स्थानिक पोलिसांनी दिली आहे.
गुजरातच्या खेडा गावातील ही घटना आहे. अल्पवयीन मुलीसाठी हा मोठा धक्का आहे.
ती स्वत:ला विचारत आहे, “मी फक्त मैत्री केली आहे. मी अशी काय चूक केली की माझ्या वडिलांना गमावलं, माझ्याबरोबर असं का झालं?
घटनाक्रम
ही घटना 24 डिसेंबर ला 10 वाजता अहमदाबाद शहरातील खेडा जिल्ह्यातील नाडियाड तालुक्यातील चकलासी गावात झाली.
बीएसएफमध्ये गेल्या 28 वर्षांपासून सेवेत असलेल्या मेघाजी वाघेला यांची बदली राजस्थानातील बाडमेरमध्ये झाली. ते 15 दिवसांच्या सुटीवर आपल्या गावात आले.
त्या दरम्यान कळलं की 10 व्या वर्गात शिकणाऱ्या त्यांच्या मुलीचा व्हीडिओ व्हायरल झाला आहे.
हा व्हीडिओ व्हायरल करणाऱ्या युवकाची खरडपट्टी काढण्यासाठी ते त्या मुलाकडे गेले.
जेव्हा ते त्या मुलाच्या घरी गेले तेव्हा तो मुलगा तिथे नव्हता. मात्र त्याच्या कुटुंबियांनी हे सगळं ऐकल्यावर मेलाजी वाघेला यांच्यावर हल्ला केला. त्यात वाघेला यांचा मृत्यू झाला आणि मुलगा गंभीररित्या जखमी झाला. त्याच्यावर रुग्णालयात उपचार चालू आहे.
25 डिसेंबर त्यांची पत्नी मंजुलाबेन वाघेला यांची घटनेची माहिती चकलासी ठाण्यात दिली.
तक्रारीनुसार “त्यांचे पती मेलाजी वाघेला, दोन मुलं नवदीप आणि हनुमंता आणि भाचा चिराग बरोबर नाडियाडच्या वाणीपुरा गावात दिनेश जाधवच्या घरी त्यांचा मुलगा शैलेश उर्फ सुनील यांच्या घरी त्याला जाब विचारायला गेले होते.”
तक्रारीनुसार दिनेश जाधव आणि त्याच्या कुटुंबियांनी मेलाजी यांच्या कुटुंबियांवर हल्ला केला. दिनेश जाधव यांनी दंडुक्यांनी मेलाजी यांच्या डोक्यावर वार केला आणि भावेश जाधव यांनी नवदीप यांच्यावर चाकू ने वार केला.
या प्रकरणात पोलिसांनी दिनेश जाधव, वाणीपूरचे अरविंद जाधव, दिनेश यांचे वडील छाबाभाई जाधव, सचिन अरविंदभाई जाधव, यांच्यासकट सात लोकांच्या विरुद्ध आयपीसीच्या 302, 307, 323,504,143,147 या कलमा अंतर्गत कारवाई केली आहे.
या सर्व आरोपींना अटक करण्यात आली आणि कोर्टात हजर केलं आणि न्यायालयीन कोठडीत पाठवण्यात आलं.
त्याचप्रमाणे कथितरित्या तिचा व्हीडिओ व्हायरल करणाऱ्या शैलेश उर्फ सुनील जाधव याच्याविरोधात वेगळी तक्रार दाखल करण्यात आली आहे.
मुलीच्या आईचं काय म्हणणं आहे?
मेलाजी वाघेला यांची बायको मंजुलाबेन बीबीसी गुजरातीशी बोलताना म्हणाल्या, “माझी मुलगी 10 वीत शिकते. माझा मुलगा अहमदाबादमध्ये जिल्हा रुग्णालयात काम करतो. वाणीपूरमध्ये राहणाऱ्या शैलेश जाधव नावाच्या एका युवकाने तिचा व्हीडिओ व्हायरल केला. हा व्हायरल व्हीडिओ मुलाच्या मोबाईलवर पाठवला होता. आमच्या मुलाने आम्हाला त्याविषयी सांगितलं.”
त्या म्हणाल्या, “आम्ही पडताळणी करण्यासाठी शैलेश जाधवच्या घरी गेलो आणि त्याला समजावू लागलो, जेणेकरून आपल्या मुलीचं आयुष्य वाया जाऊ नये. हा व्हीडिओ का व्हायरल झाला आणि व्हीडिओ डिलिट करण्याची विनंती करायला गेलो होतो.”
हल्ल्याच्या बाबतीत बोलताना त्या पुढे म्हणाल्या, “आम्ही जेव्हा त्यांच्या घरी गेलो तेव्हा आमचं बोलणं ऐकून त्यांनी आमच्यावर हल्ला केला. माझ्या नवऱ्यावर चाकूने हल्ला करण्यात आला आणि त्याला मारण्याचा प्रयत्न झाला.”
“मी माझ्या कुटुंबियांना फोन केला. त्यांनी अँम्ब्युलन्स बोलावली आणि आम्ही रुग्णालयात गेलो. उपचारांच्यावेळी माझ्या नवऱ्याला मृत घोषित करण्यात आलं. माझं विश्व माझ्यापासून हिरावलं गेलं आहे.”
“माझा नवरा मेहसाणामध्ये होता. त्याची राजस्थानमध्ये बाडमेर मध्ये बदली झाली होती. म्हणून ते पंधरा दिवसांच्या सुटीवर आले होते.”
“या सुटीदरम्यान आम्ही आमच्या घरातला कर्ता माणूस गमावला आहे. माझा मुलगा गंभीर जखमी झाला आहे. आमच्या कुटुंबाची खूप बदनामी झाली. आरोपींना कडक शिक्षा व्हायला हवी.”
मुलगी काय म्हणाली?
पीडित अल्पवयीन मुलगी म्हणाली, “माझी आणि त्या मुलाची सोशल मीडियावर ओळख झाली होती. त्याने माझ्या इन्स्टाग्राम अकाऊंटचा पासवर्ड घेतला होता. तो माझ्याच अकाऊंट वरून मेसेज करायचा आणि स्वत:च रिप्लाय करायचा”
“त्यानंतर तो मला ब्लॅकमेल करायला लागला, जर तू मला भेटायला आली नाहीस तर आपले चॅट व्हायरल करेन अशी धमकी त्याने मला दिली. त्यानंतर मी त्याला भेटायला गेले होते. मी साधारण महिन्याभरापूर्वी त्याला भेटायला गेले होते.”
“त्यावेळी त्याने बळजबरीने माझा फोटो काढला आणि माझा व्हीडिओ तयार केला आणि हाच व्हीडिओ व्हायरल झाला.”
पोलिसांचं काय म्हणणं आहे?
या घटनेविषयी बोलताना नाडियाडचे पोलिस उपायुक्त वी. आर. वाजपेयी म्हणाले, “शैलेश जाधवने व्हीडिओ व्हायरल केला. मुलीची आई, वडील, भाऊ त्याला जाब विचारण्यासाठी गेले. त्याचवेळी आरोपींनी चाकू, दंडुके, फावड्यांनी त्यांच्यावर हल्ला केला.”
या हल्ल्यात मुलीच्या वडिलांचा मृत्यू झाला. छोटा भाऊ नवदीप गंभीर जखमी झाला. सर्व आरोपींना अटक करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे.
दिल्ली महिला आयोगाच्या प्रमुख स्वाती मालीवाल यांनी या घटनेवर ट्विट केलं, त्या लिहितात, “एका बीएसएफ जवानाची हत्या झाली आणि त्याची काहीच चर्चा झाली नाही. गुंडांमध्ये हे सगळं कुठून येतं?”