Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

महाराष्ट्रातील ‘या’ नेत्यांवर आजवर दाऊद इब्राहिमसोबत संबंधांचे आरोप झालेत

Webdunia
शुक्रवार, 15 डिसेंबर 2023 (22:00 IST)
अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचं नाव पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात चर्चेला आलंय. यावेळी उद्धव बाळासाहेब ठाकरे-शिवसेना पक्षाचे नाशिकमधील नेते सुधाकर बडगुजर यांच्याशी संबंध जोडण्यात आलाय आणि तोही विधिमंडळ अधिवेशनादरम्यान.
 
झालं असं की, भाजपचे आमदार नितेश राणे यांनी विधानभवन सभागृहात आरोप केला की, दाऊद इब्राहिमचा साथीदार सलीम कुत्ता याच्यासोबत ठाकरे गटाचे नेते सुधाकर बडगुजर हे पार्टीत सहभागी झाले होते.
 
सलीम कुत्ता हा दाऊद इब्राहिमचा साथीदार असून, 1993 च्या मुंबई स्फोटातील मुख्य आरोपी आहे. जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेला सलीम कुत्ता पॅरोलवर बाहेर होता. त्याचवेळी एका पार्टीत सलीम कुत्ता आणि सुधाकर बडगुजर एकत्र आल होते, असा आरोप नितेश राणेंचा आहे.
 
या पार्टीचे फोटो आणि व्हीडिओ असलेला पेनड्राईव्ह नितेश राणेंनी विधानसभेत दाखवत कारवाईची मागणी केली. त्यानंतर महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांनी एसआयटीची घोषणा केली.
 
देवेंद्र फडणवीस म्हणाले, “सलीम कुत्ता बॉम्ब स्फोटातील मुख्य आरोपी आहे⁠. दाऊदच्या जवळचा सहकारी आहे. या घटनेची वेळेत एसआयटी चौकशी करून कारवाई करू.”
 
दुसरीकडे, सुधाकर बडगुजर यांनी पत्रकार परिषद घेत, या आरोपांवर स्पष्टीकरण दिलं.
 
बडगुजर म्हणाले की, “एखाद्या सार्वजनिक ठिकाणी त्याच्यासोबत (सलीम कुत्तासोबत) भेट झाली असल्यास मला माहित नाही. मात्र, सलीम कुत्तासोबत माझे कधीच संबंध नव्हते, आताही नाहीत आणि पुढेही नसतील. तरीही कुठल्याही चौकशीसाठी पोलिसांना सहकार्य करण्यास मी तयार आहे.”
 
मात्र, या निमित्तानं ‘दाऊद इब्राहिम आणि महाराष्ट्रातील राजकीय नेत्यांचे संबंध’ हा विषय पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आला आहे. याचं कारण यापूर्वीही अनेकदा महाराष्ट्रातील अनेक नेत्यांचे दाऊदशी संबंध जोडण्यात आले. यात कधी नुसतेच आरोप होते, कधी हे आरोप एखाद्या यंत्रणेद्वारे तपासापर्यंत पोहोचले.
 
आजवर कुठल्या कुठल्या राजकीय नेत्यावर दाऊदशी संबंधांचे आरोप झाले, हे आपण या बातमीतून जाणून घेणार आहोत.
 
शरद पवार
दाऊद इब्राहिमशी संबंध असल्याचे आरोप झालेले महाराष्ट्रातील सर्वांत मोठे राजकीय नेते म्हणजे शरद पवार होय.
 
1993 च्या मुंबई स्फोटानंतर शरद पवारांवर असे आरोप झाले. या आरोपांबाबत शरद पवारांनी त्यांच्या ‘लोक माझे सांगाती’ या राजकीय आत्मचरित्रात सविस्तरपणे भूमिका मांडलीय.
 
शरद पवारांच्या म्हणण्यानुसार, जनसत्ता या हिंदी दैनिकाच्या प्रतिनिधीने दुबईला जाऊन दाऊदचा भाऊ नुरा याची मुलाखत घेतली. त्यावेळी या प्रतिनिधीने नुराला विचारलं की, “तुम्ही शरद पवार यांना ओळखता का?” दाऊदच्या भावानं म्हणजे नुरानं उत्तर दिलं की, “आमचा जन्म मुंबईतला. शरद पवार महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. त्यांना कोण नाही ओळखत?”
 
पवारांच्या दाव्यानुसार, विरोधकांनी याच वाक्याचा आधार घेत सूतावरून स्वर्ग गाठला.
 
भाजपच्या मुंबईतील एका खासदाराने याच मुलाखतीचा आधार घेत लोकसभेत मुद्दा उपस्थित केला की, “दाऊदचा भाऊही म्हणतो, शरद पवार यांना कोण नाही ओळखत.”
 
नंतरही अनेकदा अनेकांनी शरद पवारांवर दाऊद इब्राहिमशी संबंध असल्याचे आरोप केले. मात्र, यातले कुठलेही आरोप कायद्याच्या कसोटीवर टिकले नाहीत किंवा तिथवर पोहोचलेच नाहीत.
 
नवाब मलिक
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी मंत्री नवाब मलिक यांच्यावर करण्यात आलेले दाऊद इब्राहिमशी संबंधाचे आरोप अगदी ताजे आहेत. नवाब मलिक यांना याच मुद्द्यावरून भारतीय जनता पक्षाने ‘देशद्रोही’ म्हटलं होतं.
 
आर्यन खान प्रकरणात अंमली पदार्थ नियंत्रण कक्षाचे (NCB) तत्कीलन मुंबई विभागीय संचालक समीर वानखेडे यांना नवाब मलिक यांनी लक्ष्य केलं होतं. त्यावेळी वानखेडे हे भाजपच्या इशाऱ्यावर काम करत असल्याचा आरोपही मलिक यांनी केला होता.
 
मलिक यांच्या आरोपांना उत्तर देताना तत्कालीन विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी नवाब मलिक यांचा दाऊद इब्राहिमशी संबंध असल्याचा आरोप केला होता.
 
नवाब मलिक हे पूर्वीच्या आघाडी सरकारच्या काळात मंत्री असताना (2005-06) त्यांनी दाऊद इब्राहिमच्या साथीदारांची मालमत्ता कवडीमोल भावाने विकत घेतली, असा आरोप फडणवीसांनी केला होता.
 
देवेंद्र फडणवीस यांनी आरोप केले होते की, “नवाब मलिक यांनी मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपी सरदार शाहवली, सलीम पटेल यांच्याकडून जमीन विकत घेतली. मलिकांनी कोट्यवधी रुपयांची जमीन केवळ 30 लाख रुपयांना विकत घेतली."
“1993 बॉम्बस्फोटातील दोषी असलेला सरदार शाह वली खान या व्यक्तीकडून एका कंपनीच्या मार्फत नवाब मलिकांनी LBS रोडवर जागा विकत घेतली,” असंही फडणवीस म्हणाले होते.
 
सलीम पटेल हा दाऊदची बहीण हसीना पारकर यांचा ड्रायव्हर होता. त्याच्या नावावरच पॉवर ऑफ अॅटर्नी देण्यात आलेली होती.
 
“एक लाख 23 हजार स्क्वेअर फुटांची गोवावाला कंपाऊंड येथे एलबीएस मार्गावर मोक्याच्या ठिकाणी ही जमीन आहे. या जमिनीची एक नोंदणी सॉलिडस नावाच्या कंपनीच्या नावावर आहे. ही कोट्यवधी रुपये किंमत असलेली जमीन केवळ 30 लाख रुपयांना विकण्यात आली. हा व्यवहार खरा झाला की केवळ अंडरवर्ल्डची जमीन सरकारकडे जाऊ नये म्हणून हा व्यवहार करण्यात आला होता, याचा तपास होणे आवश्यक आहे,” असं फडणवीसांनी त्यावेळी म्हटलं होतं.
 
फडणवीसांनी सांगितलं की, “मरिअम बाई ऑफ गोवावाला, प्लंबर यांच्या वतीने सलीम पटेल यांना पॉवर ऑफ अटर्नी देण्यात आली. त्यांना वली खान यांच्याकडून जमीन मिळाली होती. ही जमीन त्यांनी सॉलिडस नावाच्या कंपनीला विकली.
 
“नवाब मलिक यांच्या कुटुंबीयांच्या मालकीची ही कंपनी आहे. सॉलिडसमध्ये नवाब मलिक होते. मंत्री झाल्यावर त्यांनी सॉलिडस कंपनी सोडली. फरहान मलिक यांच्याकडे कंपनीची मालकी गेली.”
 
याच प्रकरणात नवाब मलिक यांनी अटक झाली. काही महिने तुरुंगात राहिल्यानंतर ते आता जामिनावर बाहेर आहेत. मात्र, त्यांच्यावरील आरोप अद्याप निश्चित झाले नाहीत.
 
प्रफुल्ल पटेल
राष्ट्रवादीचे नेते आणि माजी केंद्रीय मंत्री प्रफुल्ल पटेल यांच्यावर स्मगलर इकबाल मिर्ची याच्याशी संबंध असल्याचाही आरोप झाला होता. इकबाल मिर्ची हा कुख्यात अंडरवर्ल्ड डॉन दाऊन इब्राहिम याचा हस्तक मानला जायचा. 2013 साली मिर्चीचा मृत्यू झाला
 
हे प्रकरण काय आहे, ते आपण जाणून घेऊ.
 
2019 च्या ऑक्टोबर महिन्यात ED ने मुंबई आणि बेंगळुरूमध्ये 11 ठिकाणी धाडी टाकल्या होत्या. त्यात मिळालेल्या काही कागदपत्रांच्या आधारे पुढील तपास केला जात आहे. यातील एक प्रकरण इकबाल मिर्चीची पत्नी हजरा मेमन आणि मिलेनिअम डेव्हलपर्स यांच्यातील व्यवहाराचं आहे.
 
मिलेनिअम डेव्हलपर्स ही पटेल कुटुंबीयांनी स्थापन केलेली बांधकाम कंपनी आहे. प्रफुल्ल पटेल आणि त्यांची पत्नी या कंपनीत प्रवर्तक आहेत.
 
हजरा मेमन यांच्या नावावरील एका मालमत्तेवर मिलेनिअम डेव्हलपर्सने सन 2006-07 मध्ये वरळीत 15 मजली सीजे हाऊस ही इमारत उभारली. या इमारतीतील एकूण 14 हजार फूट क्षेत्रफळाचा तिसरा व चौथा मजला मिर्चीच्या पत्नीला जमिनीचा मोबदला म्हणून देण्यात आला.
 
पटेल कुटुंबाच्या मिलेनियम डेव्हलपर्स प्रा. लि. कंपनीकडून इकबाल मेमन (म्हणजेच इकबाल मिर्ची) नावाच्या एका व्यक्तीसोबत आर्थिक व्यवहार करण्यात आल्याचं आरोपात म्हटलं आहे.
 
प्रफुल्ल पटेल यांनी 16 ऑक्टोबर 2023 रोजी मुंबईत पत्रकार परिषद घेऊन त्यांची बाजू मांडली होती.
 
पटेल म्हणाले होते की, “मुंबईतील वरळीस्थित असलेल्या सीजे हाउससंदर्भात हजरा मेमन यांच्याशी कोणताही व्यवहार झाला नाही. तसेच प्रकरण चौकशीअधीन असल्याने त्यावर अधिक भाष्य करणे योग्य होणार नाही.”
 
तसंच, पटेल पुढे म्हणाले, “संबंधित जागा ही पटेल कुटुंबीय आणि इतर सहमालकांनी 1963 साली ग्वाल्हेरच्या राजघराण्याकडून विकत घेतली. यातल्या भूभागावर काही अनधिकृत कब्जेदारही होते. कालांतराने येथे श्रीनिकेतन ही इमारत उभी राहिली. पुढे पटेल कुटुंब व इतरांमधील अंतर्गत वादामुळे या जागेच्या मालकीहक्कासंदर्भात प्रकरण न्यायप्रविष्ट झालं.
 
“1978 मध्ये उच्च न्यायालयाने या प्रॉपर्टीचा ताबा घेतला. मूळ परिसरात सुरुवातीपासून अवैधरीत्या कब्जेदारांचा रहिवास तसेच गुरुकृपा आणि ललित ही हॉटेल्स होती. 1988 मध्ये कोर्ट रिसिव्हर यांच्याबरोबर कन्सेण्ट पास झाला आणि एम. के. मोहम्मद या अवैध कब्जेदारांना ताबाधारक म्हणून मान्यता प्राप्त झाली.
 
“1997 मध्ये कोर्टाने तसेच बृहन्मुंबई महानगरपालिकेने इमारत असुरक्षित होती म्हणून पुनर्बांधणीचे आदेश दिले. मिलेनिअम डेव्हलपर या पटेल कुटुंबाने स्थापन केलेल्या कंपनीने या इमारतीची पुनर्बांधणी केली.”
 
हे प्रकरणही अद्याप न्यायप्रविष्ट असून त्यात अंतिम निर्णय समोर आला नाहीय. त्यामुळे प्रफुल्ल पटेल यांच्यावर इकबाल मिर्ची आणि दाऊद इब्राहिम संबंधांचे आरोप हे केवळ आरोपच आहेत.
 
एकनाथ खडसे
पूर्वी भाजपमध्ये असलेले आणि आता राष्ट्रवादीत प्रवेश केलेले ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांच्यावरही दाऊद इब्राहिमशी संबंधाचे आरोप झाले होते.
 
भोसरी जमीन गैरव्यवहार प्रकरण गाजत असतानाच एकनाथ खडसेंसंबंधी आणखी एका माहितीनं आम आदमी पक्षानं पत्रकार परिषदेतून खळबळ उडवून दिली होती.
 
झालं असं होतं की, दाऊदच्या कॉल लिस्टमध्ये 10 भारतीय नंबर होते, त्यापैकी एक नंबर एकनाथ खडसेंचा असल्याचा दावा आप नेत्या प्रीती मेनन यांनी केला.
 
प्रीती मेनन यांनी त्यांच्या आरोपांना आधार घेतला होता हॅकर मनिष भंगाळेंच्या माहितीचा.
 
मनिष भंगाळे यांनी 2014 ते 2015 दरम्यान हॅकिंग करुन दाऊदनं कुणा-कुणाला कॉल केले होते, याची माहिती बाहेर आणली होती. त्यात आढळलेल्या 4 क्रमांकात एक नंबर खडसेंचा आहे, असंही त्यानं म्हटलं होतं.
मनिष भंगाळेने पत्रकार परिषद घेऊन माजी महसूल मंत्री एकनाथ खडसे आणि दाऊद यांच्या कथित कॉलप्रकरणी माहिती दिली. मनीष भंगाळेने दाऊदच्या संपर्कात असलेल्या पाच नंबरची माहिती सायबर सेलला दिली होती. त्यापैकी एक नंबर खडसेंचा असल्याचा आरोप केला होता. पोलिस यंत्रणा इतर चार नंबरची माहिती काढत नाहीत. ही माहिती काढण्यास किंवा जाहीर करण्यास पोलिस यंत्रणा घाबरते का, सायबर सेल दबावाखाली आहे का?, असे प्रश्नही मनिष भंगाळेने केले होते.
 
एकनाथ खडसे यांनी मात्र हा आरोप फेटाळून या प्रकरणाची चौकशी करावी, अशी मागणी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली होती.
 
खडसे म्हणाले होते की, “दाऊदच्या घरातून ज्या मोबाइल क्रमांकावरून दूरध्वनी आल्याचा मेनन यांचा आरोप आहे, तो आपला नंबर गेल्या वर्षभरापासून बंद आहे. शिवाय, या कालावधीत या क्रमांकावरून एकही दूरध्वनी परदेशात केलेला नाही किंवा परदेशातून आलेला नाही. कदाचित आपला नंबर क्लोन करून त्याचा गैरवापर करण्यात आला असावा. माझा मोबाइल नंबर कुणी वापरत आहे का, याची चौकशी करावी.”
 
पुढे मुंबई पोलिसांच्या गुन्हे अन्वेशन शाखेने मनिष भंगाळेने केलेल्या आरोपांमध्ये खडसेंना क्लीन चीट दिली होती. या काळात खडसेंना कुठल्याही प्रकारचे दावा करण्यात आलेले कॉल आले नसल्याचं स्पष्ट केलं होतं.
 
Published By- Priya Dixit
 
 
 
 
 
 
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Paush Month लक्ष्मीचा वास हवा असल्यास पौष महिन्यात घरामध्ये हा शंख स्थापित करावा

कातरवेळ म्हणजे नेमकी कोणती? या दरम्यान काय करावे?

गुरु ग्रहाचे रत्न कोणते? राशीनुसार जाणून घ्या कोणासाठी शुभ

हिवाळ्यात गुळासोबत ही एक गोष्ट खा, आरोग्याला खूप फायदा होईल

Beauty Tips : घरी बनवलेल्या नारळाच्या क्रीमचा उपयोग, त्वचा होईल मऊ

सर्व पहा

नवीन

LIVE: गरीब कामगारांना घरे देण्याच्या योजनेबाबत उपमुख्यमंत्री शिंदेनी अधिकाऱ्यांशी चर्चा केली

सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणी उद्धव ठाकरे गटाकडून नवी मागणी

महाराष्ट्रात गिरणी कामगारांसाठी 1 लाख घरे बांधली जातील, उपमुख्यमंत्री शिंदेंची घोषणा

दिल्लीच्या प्राणिसंग्रहालयात एक शिंगे गेंडा धर्मेंद्रचा मृत्यू

नवी मुंबईत हेडकॉन्स्टेबलची गळा आवळून हत्या

पुढील लेख
Show comments