Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

साईसच्चरित - अध्याय २५

Webdunia
मंगळवार, 26 एप्रिल 2022 (14:01 IST)
॥ श्रीगणेशाय नम: ॥ श्रीसरस्वत्यै नम: ॥ श्रीगुरुभ्यो नम: ॥ श्रीकुलदेवतायै नम: ॥ श्रीसीतारामचंद्राभ्यां नम: ॥ श्रीसद्नुरुसाईनाथाय नम: ॥
साईमहाराज कृपासागर । साक्षात्‌ ईश्वरी अवतार । पूर्णब्रम्हा महान्‌ योगेश्वर । साष्टांग नमस्कार तयांसी ॥१॥
जयजयाजी संतललामा । मंगलधामा आत्मारामा । साईसमर्था भक्तविश्रामा । पूर्णकामा तुज नमो ॥२॥
पूर्वाध्यायीं निरूपण । थट्टाविनोदपरिशीलन । परी हा साई भक्तभावन । भक्तरंजन नित्य करी ॥३॥
साई परम दयामूर्ति । एक पाहिजे अनन्य भक्ति । भक्त श्रद्धाळू आणि भावार्थी । इच्छितार्थीं ना न्यून ॥४॥
‘सद्नुरु तोचि माझी मूर्ति’ । कृष्ण बोले उद्धवाप्रती । ऐसा सद्नुरु भजावा प्रीतीं । अनन्य भक्ति या नांव ॥५॥
अंतरीं उदेला मनोरथ । ल्याहावें श्रीसाईचरित । लीलाश्रवणार्ह अत्यद्भुत । लिहवूनि निश्चित मज केलें ॥६॥
नसतां अधिकार - ज्ञानव्युत्पत्ति । मज पामरा स्फुरविली स्फूर्ति । ग्रंथ लिहविला माझिये हातीं । द्यावया जागृति निजभक्तां ॥७॥
‘दप्तर ठेवीं’ ऐसी अनुज्ञा । जेव्हां जाहली मजसम अज्ञा । तेव्हांच माझी अल्प प्रज्ञा । धैर्यविज्ञानसंपन्न ॥८॥
तेव्हांच मज आला धीर । कीं हा साई गुणगंभीर । ठेवूनि घेणार आपुलें दप्तर । निजभक्तोद्धाराकारणें ॥९॥
नातरी हा वाग्विलास । होतें काय मज हें साहस । संतचरण - प्रसाद पायस । चरितसुधारस हा ऐसा ॥१०॥
ही श्रीसाईचरितरूपा । भक्तार्थ साईकथामृतप्रपा । यथेच्छ सेवा साईकृपा । भवदवतापा निवारा ॥११॥
चरित नव्हे हा सोमकांत । साईकथा चंद्रामृत स्रवत । भक्त चकोर तृषाकुलित । होवोत तृप्त मनसोक्त ॥१२॥
आतां प्रेमळ श्रोतेजन । संकोचरहित एकाग्र मन । परिसोत या कलिमलदहन । कथा पावन साईंच्या ॥१३॥
जड्ली एकदां अनन्य निष्ठा । कीं त्या भक्ताच्या सकळ अनिष्टा । वारूनि अर्पितो तया अभीष्टा । तयाचे कष्टा निवारी ॥१४॥
ये अर्थींची एक वार्ता । दावी ल साईंची भक्तवत्सलता  । श्रोतीं परिसतां ती सादरता । आनंद चित्ता होईल ॥१५॥
तरी लावूनियां जीव । कथा ऐका हे अभिनव । पटेल मनास अनुभव । कैसी दयार्णव गुरुमाय ॥१६॥
कथा जरी ही बहु तोकडी । अर्थावबोधें अति चोखडी । अवधान दीजे एक घडी । सरतील सांकडीं बाजूला ॥१७॥
सहमदनगरचे सुखवस्त । कासार एक धनवंत । दामूअण्णा  नामें भक्त । पदीं जे अनुरक्त साईंच्या ॥१८॥
तया परम भक्ताची कथा । आनंद होइल श्रवण करितां । भक्तरक्षणतत्परता । दिसेल प्रत्यक्षता साईंची ॥१९॥
रामनवमी - वार्षिकोत्सवीं । मोठीं दोन निशाणें नवीं । निघती मिरवीत शिर्डी गांवीं । आहेत ठावीं तत्रस्थां ॥२०॥
त्यांतील एक निमोणकरांचें । दुसरें या दामूअण्णांचें । नेम हे त्यांचे कैक वर्षांचे । भक्तिप्रेमाचे अव्याहत ॥२१॥
दोन स्त्रिया दामूअण्णांस । पुत्रसंतति नव्हती त्यांस । लाधूनि साईंच्या आशीर्वादास । पुत्ररत्नास पावले ॥२२॥
केला निशाणाचा नवस । रामनवमीच्या उत्सवास । आरंभ झाला मिरवणुकीस । निशाण वर्षास तेथून ॥२३॥
कोंडया सुताराच्या घरीं । होते मिरवणुकीची तयारी । तेथूनि मग वाद्यांचे गजरीं । निशाण मिरवीत नेतात ॥२४॥
मशिदीचिया दोनी टोंकां । बांधिती तैं दीर्घ पताका । समारंभेंसी महोत्सव निका । करिती विलोका प्रतिवर्षीं ॥२५॥
तैसेंच तेथें जे फकीर येती । तयांस यथेष्ट जेवॄं घालिती । रामनवमी ऐसिये रीती । प्रतिपाळिती हे शेट ॥२६॥
त्या या दामूअण्णांची कथा । श्रवणार्थियां निवेदितों आतां । श्रवण करितां सावधानता । साईसमर्थता प्रकटेल ॥२७॥
मुंबानगरीचा तयांची स्नेही । मुंबईहूनि पत्र लिही । दो लाख निव्वल नफा होई । ऐसी किफाईत करूं कीं ॥२८॥
तुम्हां आम्हां भागी देख । कमावूं प्रत्येकीं लाख लाक । उत्तर धाडा करा चलाख । धंदाही चोख निर्भय कीं ॥२९॥
खरेदूं कापूस ये वक्तीं । भाव चढेल हातोहातीं । सौदा न साधिती वेळेवरती । मग ते पस्तावती मागाहून ॥३०॥
दवडूं न द्यावी ऐसी वेळ । उडाली अण्णांचे मनाची खळबळ । भरंवसा त्या स्नेह्यावरी सबळ । विचार निश्चळ सुचेना ॥३१॥
धंदा करावा वा न करावा । विचार पडला अण्णांचे जीवा । काय होईल कैसें देवा । गोवा पडला मनाला ॥३२॥
दामूअण्णाही गुरुपुत्र । बाबांस लिहिते झाले पत्र । आम्हां न बुद्धि स्वतंत्र । आपणचि छत्र आमहांतें ॥३३॥
व्यापार हा तों सकृद्दर्शनीं । करावा ऐसें येतें मनीं । परी होईल लाभ कीं हानी । कृपा करोनि सांगा जी ॥३४॥
पत्र लिहिलें माधवरावा । कीं हें बाबांस वाचूनि दावा । आज्ञा होईल तैसें कळवा । उद्यम बरवा वाटतो ॥३५॥
दुसरे दिवशीं तिसरे प्रहरीं । पत्र पडलें माधवरावकरीं । तेणें नेऊनि मशिदीभीतरीं । चरणांवरी घातलें ॥३६॥
“काय शामा काय घाई । कागुद कसला लावितो पायीं” । बाबा तो नगरचा दामूशेट कांहीं । विचारं पाही आपणांतें ॥३७॥
“कां बरें तो काय लिहितो । काय कसले बेत करतो । वाटे आभाळा हात लावितो । देव देतो तें नको ॥३८॥
वाच वाच पत्र त्याचें” । शामा म्हणे जें वदतां वाचे । तेच अर्थाचें पत्र साचें । दामूअण्णांचें अक्षरश: ॥३९॥
देवा, आपण बसतां निश्चळ । उडवितां भक्तांची खळबळ । मग होतां मनाची तळमळ । पायाजवळ आणितां ॥४०॥
कोणास स्वयें ओढून आणितां । कोणालागीं पत्रें लिहवितां । अंत:स्थ आशय आधींच सांगतां । मग वाचवितां किमर्थ ॥४१॥
“अरे शामा वाच वाच । माझे काय मानितो साच । मी तंव आपुला आहें असाच । बोलें उगाच माने तें” ॥४२॥
मग माधवराव पत्र वाचिती । बाबा लक्ष लावूनि ऐकती । कळकळूनि मग बाबा वदती । “चळली मती शेटीची ॥४३॥
सांग कीं तयास प्रत्युत्तरीं । काय उणें तुज असतां घरीं । पुरे आपुली अर्धी भाकरी । लाखाचे भरी पडूं नको” ॥४४॥
प्रत्युत्तराची क्षणक्षणा । वाटचि पाहत दामूअण्णा । उत्तर येतांचि तत्क्षणा । दामूअण्णा वाचिती ॥४५॥
ऐकूनि त्या प्रत्युत्तराला । दामूशेटीचा विरस झाला । मनोरथाचा दुर्गचि ढांसळला । वृक्ष उन्मळला आशेचा ॥४६॥
आतां एक लाख कमावूं । अर्धा लाख व्याजीं लावूं । तात्काळ लाखे सावकार होऊं । आनंदें राहूं नगरांत ॥४७॥
मनोराज्य होतें जें केलें । जागचे जागींच तें विरघळलें । दामूअण्णा अत्यंत हिरमुसले । हें काय केलें बाबांनीं ॥४८॥
पत्र लिहिलें येथेंच फसलें । आपुलें आपण अनहित केलें । देखत देखत वाडिलेलें । ताट लाथाडिलें आपणचि ॥४९॥
असो त्या पत्रांत दामू आण्णांतें । ऐसेंही ध्वनित केलें होतें । कानाडोळ्यांचें अंतर असतें । यावें कीं येथें समक्ष ॥५०॥
ऐसें माधवरावांचें सूचित । समक्ष जावें वाटलें उचित । न जाणों असेल त्यांतही हित । कदाचित अनुमत देतील ॥५१॥
ऐसा विचार करूनि मनीं । अण्णा आले शिर्डीलागूनी । बैसले बाबांचे सन्निधानीं । लोटांगणीं येऊन ॥५२॥
हळू हळू पाय दाबिती । विचारावया नाहीं धृती । अंतर्यामीं उठली वृत्ती । बाबांची पाती ठेवावी ॥५३॥
मनांत म्हणती साईनाथा । कराल जरी या व्यापारा साह्यता । नफ्याचा कांहीं भागमी अर्पिता । पायावरता होईन ॥५४॥
मस्तकीं धरिले साईचरण । दामूअण्णा बैसले क्षण । संकल्प - विकल्प मनाचें लक्षण । व्यापार आंतून चालले ॥५५॥
भक्तीं करावे मनोरथ । ते न जाणती खरा स्वार्थ । गुरु एक जाणे शिष्याचें हित । भावी - भूत - वर्तमान ॥५६॥
निजमनींचें मनोगत । कोणी कितीही ठेवो गुप्त । साई समर्थ सर्वगत । अंतर्वृत्त जाणे तो ॥५७॥
जेव्हां कोणी मनींचें ह्रद्नत । साईचरणीं प्रेमें निवेदित । पूर्ण विश्वासें अनुज्ञा प्रार्थित । दावित सत्पथ साई त्यां ॥५८॥
हें तों तयांचें निजव्रत । जाणती हें भक्त समस्त । जो जो अनन्य शरणागत । आपदा वारीत तयांच्या ॥५९॥
गुरुचि सत्य माता - पिताअ । अनेका जन्मींचा पाता - त्राता । तोचि हरिहर आणि विधाता । कर्ता - करविता तो एक ॥६०॥
बाळ मागतां गोडधडू । माता पाजी बोळकडू । बाळ तडफडू वा रडू । प्रेमनिवाडू हा ऐसा ॥६१॥
बोळाचा तो कडूपणा । योग्य काळें चढणार गुणा । बाळ काय जाणे त्या लक्षणा । मातेच्या खुणा मातेस ॥६२॥
अण्णा जरी ठेविती पाती । बाबा काय तेणें भुलती । लाभेंवीण तयांची प्रीती । निजभक्तहितीं तत्पर ॥६३॥
धन - कनक जयां माती । किंपदार्थ तयांतें पाती । केवळ दीनजनोद्धरणार्थी । जगीं अवतरती हे संत ॥६४॥
यमनियमशमदमसंपन्न । मायामात्सर्यदोषविहीन । केवळ परानुग्रह - प्रयोजन । जयाचें जीवन तो ‘संत’ ॥६५॥
दामूअण्णांची ही पाती । मनींचे मनींचे मनीं गुप्त होती । बाबा प्रकट उत्तर देती । सादरवृत्तीं परिसावें ॥६६॥
जीवमात्राचें मनोगत । बाबांस सकळ अवगत । वर्तमान - भविष्य - भूत । जैसा करतलग - आमलक ॥६७॥
निजभक्ताची भावी स्थिती । समस्त ठावी बाबांप्रती । कैसे वेळेवर सावध करिती । ती स्पष्टोक्ती परिसावी ॥६८॥
“आपण नाहीं रे बापू किसमें” । बाबा देती सूचना प्रेमें । व्यापार बरवा साईस न गमे । अण्णा शरमे मनांत ॥६९॥
ऐकूनि हें बाबांचें वचन । दामूअण्णांस पटली खूण । दिधला मनाचा संकल्प सोडून । बैसले अधोवदन उगा ॥७०॥
पुनश्च मनीं उठला विचार । करूं काय दुसरा व्यापार  । तांदूळ गहूं भुसार । परिसा प्रत्युत्तर बाबांचें ॥७१॥
पांच शेर तूं घेसील । सातशेर ओपिसील । परिसूनि हे बाबांचे बोल । अंतरीं खजील अण्णा तैं ॥७२॥
ऐसें कोठें कांहींही न घडे । जें साईंच्या द्दष्टीस न पडे । खालीं वरती जिकडे तिकडे । सर्वत्र उघडें तयांस ॥७३॥
येरीकडे त्यांचा स्नेही । विचारगहनीं पडला पाहीं । काय करावें सुचेना कांहीं । उत्तरही नाहीं अण्णांचें ॥७४॥
तों ते शेट पत्र लिहीत । वृत्तांत घडलेला कळवीत । वाचूनि स्नेही विस्मित होत । म्हणती कर्मगत विचित्र ॥७५॥
काय सौदा चालूनि आला । स्वयेंच कां ना विचार केला । किमर्थ फकीराचे नादीं लागला । व्यर्थ मुकला लाभाला ॥७६॥
‘देव देतो कर्म नेतें । होणार्‍यासारखी बुद्धि होते’ । ऐसा चोखा धंदा जेथें । फकीर तेथें कां व्हावा ॥७७॥
व्यवहारावर देऊनि पाणी । दारोदार वेडयावाणी । पोट भरिती तुकडे मागुनी । ते काय सांगूनि सांगती ॥७८॥
असो नाहीं तयाचे दैवीं । तेणेंच ऐसी त्या बुद्धि व्हावी । दुसरी कोणी पाती पहावी । ‘यदभावि न तद्‌भावि’ तें ॥७९॥
झालें, अण्णा स्वस्थ बैसले । होतें जयांचें कर्म ओढवलें । तेच त्या स्नेह्याचे पातीदार झाले । आलें तपेलें गळ्य़ांत ॥८०॥
करावया गेले सट्टा । परी तयांचा  दिवस उलटा । ठोकर लागली झाला तोटा । कैसा सोटा फकीराचा ॥८१॥
काय माझा दामूअण्णा । नशीबाचा, मोठा शहाणा । खरा त्याचा साईदाणा । भक्तकरुणा केवढी ॥८२॥
स्नेही म्हणूनि माझे फंदीं । पडतां नागवता स्वच्छंदीं । तरला बिचारा फकीराचे नादीं । काय द्दढबुद्धि तयाची ॥८३॥
थट्टा त्याचे वेडेपणाची । घमंड माझे शहाणपणाची । व्यर्थ व्यर्थ जहाली साची । अनुभव हाचि लाधलों ॥८४॥
उगीच त्या फकीराची निंदा । न करितां लागतों त्याचे नादा । मजलाही तो वेळेवर जागा । करिता न दगा होता हा ॥८५॥
आतां आणीक एक वार्ता । सांगूनि आवरूं अण्णाच्या ग्रंथा । आनंद होईल श्रोतियां चित्ता । वाटेल आश्चर्यता बाबांची ॥८६॥
पहा एकदां ऐसें वर्तलें । गोव्याहूनि पार्सल आलें । आंबे नामांकित कोणी धाडिले । मामलेदार राळे या नांवें ॥८७॥
माधवरावांच्या नांवावर । बाबांच्या पायीं व्हावें सादर । म्हणूनि कोपरगांवीं स्वीकार । होऊनि शिरडीवर तें आलें ॥८८॥
मशिदींत बाबांसमोर । उघडतां आंबे निघाले सुंदर । होते एकंदर तीनशेंवर । फळें तीं मधुर घमघमित ॥८९॥
बाबांनीं तीं अवघीं पाहिलीं । माधवरावांपाशीं दिधलीं । तयांनीं चार कोळंब्यांत टाकिलीं । उरलीं तीं नेलीं बरोबर ॥९०॥
फळें पडतां कोळंब्यांत । बाबा मुखें काय उद्नारत । “फळें तीं दामुअण्णाप्रीत्यर्थ । असूं दे तेथ पडलेलीं” ॥९१॥
यावर जातां दोन तास । आले पूजा करावयास । दामूअण्णा मशिदीस । पुष्पसंभारास घेऊनी ॥९२॥
तयां न पूर्ववृत्त तें कळलें । बाबा मोठयानें बोलूं लागले । आंबे दाम्याचे न ते आपुले । खावया टपले लोक जरी ॥९३॥
ज्याचे आंबे त्यानेंच घ्यावे । किमर्थ आपणां कोणाचे व्हावे । ज्याचे असतील त्यानेंचि खावे । मरूनि जावें खावोनी” ॥९४॥
प्रसादचि हा ऐसिया भावें । अण्णा स्वीकारिती स्वभावें । विपरीतार्थालागीं न भ्यावें । पूर्ण हें ठावें अण्णास ॥९५॥
पूजा सारोनि अण्णा गेले । पुनश्च येऊनि पुसूं लागले । मोठीस कीं धाकटीस हीं फळें । अर्पूं न कळे कोणास ॥९६॥
बाबा वदती धाकटीला । दे आठ मुलें होतील तिजला । चार मुलगे चार मुलींला । ही आमलीला प्रसवेल ॥९७॥
पोटीं नाहीं पुत्रसंतान । म्हणूनि करावे बहु प्रयत्न । साधुसंतांचें करावें भजन । कृपाशीर्वचन मिळवावें ॥९८॥
यदर्थ साधुसंतांचा नाद । मिळवावया ग्रहप्रसाद । ज्योतिर्विद्येचा लागला छंद । जाहले ज्योतिर्विद स्वयमेव ॥९९॥
नशिबीं नाहीं संतान । हेंचि ज्योतिर्विद्येचें निदान । अण्णा होते पूर्ण जाणून । निराश होऊन बसलेले ॥१००॥
तथापि हें आश्वासन । साईसंतमुखींचें वचन । पुनश्च आशा झाली उत्पन्न । समर्थ प्रसन्न होतांचि ॥१०१॥
असो पुढें कालांतरें । सफल झालीं बाबांचीं अक्षरें । संतप्रसादाम्रांकुरें । संतति - फलभरें प्रसवलीं ॥१०२॥
जैसे बोलले तैसेंच घडलें । आपुलें ज्योतिष निष्फल झालें । साईंचे बोल अमोघ ठरले । जाहलीं मुलें वचनोक्त ॥१०३॥
असो ही तों बाबांची वैखरी । बाबा असतां देहधारी । परी पुढेंही देहत्यागानंतरी । स्वयें निर्धारी निजमहिमा ॥१०४॥
“झालों जरी गतप्राण । वाक्य माझें माना प्रमाण । माझीं हाडें तुर्वतीमधून । देतील आश्वासन तुम्हांस ॥१०५॥
मी काय पण माझी तुर्वत । राहील तुम्हांसवें बोलत । जो तीस अनन्य शरणागत । राहील डोलत तयासवें ॥१०६॥
डोळ्याआड होईन ही चिंता । करूं नका तुम्ही मजकरितां । माझीं हाडें ऐकाल बोलतां । हितगुज करितां तुम्हांसवें ॥१०७॥
मात्र माझें करा स्मरण । विश्वासयुक्त अंत:करण । ठेवा करा निष्कामभजन । कृतकल्याण पावाल” ॥१०८॥
हे भक्तकामकल्पतरो । समर्थ साई श्रीसद्नुरो । हेमाड तुझिया चरणा न अंतरो । भाकी परोपरी हे करुणा ॥१०९॥
धांव पाव गा गुरुवरा । भक्तजनकरुणाकरा । उसंत नाहीं या संसारा । येरझारा पुरे आतां ॥११०॥
आम्हां स्वभावप्रवृत्तिपरां । बाम्हाविषयालोचनतत्परां । विषयभोगांपासाव आवरा । वृत्तीसी करा अंतर्मुख ॥१११॥
लाटेसरसे सैरा वाहत । चाललों आम्ही भवसागरांत । देऊनियां प्रसंगीं हात । भवनिर्मुक्त करा कीं ॥११२॥
इंद्रियें वाहती सैरावैरा । प्रवृत्त होती दुराचारा । बांधा उच्छृंखल नदीस बंधारा । फिरवा माघारा इंद्रियगण ॥११३॥
इंद्रियें न जों अंतर्मुख । आत्मा न कदा होई सन्मुख । त्यावीण कैंचें आत्यंतिक सुख । जन्म निरर्थक होईल ॥११४॥
कलत्र - पुत्र - मित्रपंक्ति । कोणीही कामा येती न अंतीं । तूंचि एक अखेरचा साथी । सुख - निर्मुक्तिदायक तूं ॥११५॥
उकलूनि कर्माकर्मांचें जाळें । करीं एकवेळ दु:खावेगळें । उद्धरीं हे दीनदुबळे । कृपाबळें महाराजा ॥११६॥
वादाबादी इतर अवकळा । कृपाबळें समूळ निर्दळा । रसनेस लागो नामाचा चाळा । सुनिर्मळा साईराया ॥११७॥
ऐसें देईं प्रेम मना । घालवीं संकल्पविकल्यांना । विसरवीं देहगेहभाना । माझा मीपणाही दवडीं ॥११८॥
घडो तुझें नामस्मरण । व्हावी न इतर आठवण । यावें मनासी निश्चलपण । चंचलपण नातळो ॥११९॥
त्वां आम्हां धरितां पोटाशीं । मावळेल अज्ञानतमनिशी । सुखें नांदूं तुझिया प्रकाशीं । उणें आम्हांसी कायसें ॥१२०॥
तुवां हें जें आम्हांप्रत । पाजिलें  निजचरितामृत । थापटोनि जें केलें जागृत । हें काय सुकृत सामान्य ॥१२१॥
पुढील अध्याय याहूनि गोड । पुरेल श्रवणार्थियांचें कोड । वाढेल साईचरणीं आवड । श्रद्धाही सुद्दढ केलें ॥१२३॥
तैसेच एक दुसरे गृहस्थ । श्रीमंत परी विपद्‌ग्रस्त । आले पुत्रकलत्रसहित । दर्शनार्थ साईंच्या ॥१२४॥
कैसा तयांचा पुरविला हेत । कैसा पुत्र अपस्मारव्यथित । केला दर्शनें व्याधिनिर्मुक्त । पूर्वदष्टांत स्मरवुनी ॥१२५॥
म्हणोनि हेमाड साईंस शरण । करी श्रोतयां आदरें विनवण । होऊनि साईकथाप्रवण । करा जी श्रवणसार्थक्य ॥१२६॥
सस्ति श्रीसंतसज्जनप्रेरिते । भक्तहेमाडपंतविरचिते । श्रीसाईसमर्थसच्चरिते । भक्ताभीष्टसंपादनं नाम पंचतुर्विंशतितमोऽध्याय: संपूर्ण: ॥
 
 
॥ श्रीसद्गुरुसाईनाथार्पणमस्तु ॥ शुभं भवतु ॥
ALSO READ: साईसच्चरित - अध्याय २६

संबंधित माहिती

सर्व पहा

नवीन

घरात लक्ष्मी पूजन कसे करावे? योग्य पद्धत Diwali Laxmi Puja in Marathi

Lakshmi Pujan 2024 Muhurat दिवाळीतील लक्ष्मी पूजनाचा शुभ मुहूर्त आणि आरती मंत्रांसह संपूर्ण पूजा पद्धत

Narak Chaturdashi 2024: अभ्यंग स्नान मुहूर्त आणि मंत्रांसह पूजा पद्धत

आरती बुधवारची

भारतातील या धार्मिक स्थळी साजरी करा दिवाळी

सर्व पहा

नक्की वाचा

अनेक महिने खराब होणार नाही मिठाई, या सोप्या टिप्स अवलंबवा

Healthcare Tips : दिवाळीच्या काळात दमा रुग्णांनी आरोग्याची काळजी घेण्यासाठी टिप्स

आर्थिक संकटातून सुटका हवी असेल तर दिवाळीत हे नक्की खरेदी करा

दिवाळीचे साप्ताहिक राशिभविष्य, जाणून घ्या या आठवड्यात कोणत्या राशींवर देवी लक्ष्मीची कृपा असेल 28 ऑक्टोबर ते 03 नोव्हेंबर 2024

दिवाळीत या जीवांना पाहणे शुभ मानले जाते, जाणून घ्या काय महत्त्व

पुढील लेख
Show comments