Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

नौदलाचे महत्त्व जाणणारा राजा

Webdunia
नौदल ही कोणत्याही साम्राज्याची स्वतंत्र ताकद आहे. ज्याच्याकडे नौदल आहे, तो लाटांवर राज्य करतो -रामचंद्रपंत अमात्य, छत्रपती शिवरायांचे मुख्य प्रधान.
 
फेब्रुवारीच्या 19 तारखेला आपण शिवजयंती साजरी करतो. शिवरायांचे नाव घेताच विजापूरच्या आदिलशाहीशी आणि मुघलांशी त्यांनी दिलेल्या लढ्याची आठवण होते. किंबहुना छत्रपतींच्या त्याच संघर्षाकडे संपूर्ण लक्ष केंद्रित केले जाते. छत्रपती शिवरायांनी आणखी अनेक अवघड गोष्टी साध्य करून दाखविल्या; मात्र त्याकडे  फारसे लक्ष जात नाही. शिवरायांनी उभारलेले आधुनिक नौदल आणि जहाजबांधणी उद्योगाचे त्यांनी केलेले पुनरुज्जीवन ही त्यापैकीच एक गोष्ट होय. आग्रेय आशियाशी भारतीयांचे फार पूर्वीपासून व्यापारी संबंध होते आणि व्यापार्‍यांच्या माध्यमातूनच भारतीय संस्कृतीचा दूरवर प्रसार झाला. दक्षिण भारतातील चोला आणि पल्लव वंशाच्या राजांनी पूर्व आणि दक्षिणेकडील समुद्रावर अक्षरशः हुकुमत गाजवली. मध्यपूर्वेशी आणि युरोपशी भारताचा व्यापार मोठ्या प्रमाणावर होता. विशेषतः रोमन साम्राज्याच्या काळात व्यापारविस्तार मोठा होता. 
 
गुजरातमधील लोथल येथे प्राचीन बंदर आणि जहाजबांधणीची जी जागा आढळून आली आहे, ती आपल्याला इसवी सनाच्या एक हजार वर्षे मागे घेऊन जाते. जहाजबांधणीच्या कलेत भारतीय लोक प्राचीन काळापासून निपुण आणि अग्रेसर होते, हे यावरून लक्षात येते. भरुच, कल्याण, चौल आणि सोपोर येथील बंदरे संपूर्ण मध्यपूर्व आशियात त्याकाळी प्रसिद्ध होती. परंतु समुद्रमार्गे होणार्‍या व्यापारातील भारतीयांचे प्रमाण आणि जहाजांची संख्याही चौदाव्या शतकानंतर कमी होत गेली. उत्तरेकडून भारतावर मुस्लीम सुलतानांनी केलेल्या स्वार्‍या हे त्याचे प्रमुख कारण होते. भारतीयांनी भूमी गमावल्यानंतर सागरी व्यापार आणि जहाजांची संख्या कमी झाली आणि ही पोकळी नंतर अरबांनी भरून काढली. अरबस्तानातून येणार्‍या व्यापार्‍यांच्या वसाहती लवकरच भारताच्या पश्चिम तटावरील बहुतांश महत्त्वाच्या बंदरांजवळ उभ्या राहू लागल्या.
 
अशा काळात सागरी शक्तीची जाणीव असलेले जे मोजके राज्यकर्ते त्याकाळी झाले, त्यापैकी शिवाजी महाराज हे एक होत. त्यांनी दौलतखान आणि मयंक भंडारी यांची नौदलाचे संयुक्त प्रमुख म्हणून नियुक्ती केली. लढाऊ नाविक दलाला पाठबळ देण्यासाठी अनेक सागरी किल्ले बांधले. मुंबईपासून 150 किलोमीटर दक्षिणेला महाराजांनी आपला मुख्य नाविक तळ उभारला. ही जागा पोर्तुगीज, ब्रिटिश आणि सिद्दीच्या नौदल तळांपासून सुरक्षित अंतरावर होती. मालवणपासून दोन किलोमीटर पाण्यात असलेल्या खडकावर उभारलेला हाच तो सिंधुदुर्ग किल्ला होय. 10 नोव्हेंबर 1664 रोजी या किल्ल्याच्या कामाला सुरुवात या बेटावर किल्ला बांधण्यास सुरुवात झाली आणि 1667 मध्ये किल्ला बांधून तयार झाला. स्थानिक मच्छीमारांना शिवाजी महाराजांनी नौदलात भरती करून घेतले. त्यांना सढळहस्ते निधी दिला. त्यानंतरच्या काही वर्षांत एकंदर 58 किल्ले शिवरायांनी वापरात आणले. विजयदुर्ग आणि अलिबागजवळील कुलाबा हे त्यातील महत्त्वाचे किल्ले होत. 
 
फेब्रुवारी 1665 मध्ये शिवाजी महाराजांनी आपल्या नाविक दलाच्या ताकदीची चाचणी घेण्याचे ठरविले. दोन मोठ्या जहाजांसह 88 नौकांच्या ताफ्यासह चार हजारांचे सैन्य घेऊन मराठ्यांच्या नौदलाने बसरूर या बंदरावर हल्ला चढविला. हा ताफा बसरूरकडे निघाला असताना गोव्याजवळ पोर्तुगिजांच्या नौदलातील सैनिकांनी पाहिला. परंतु अत्यंत प्रबळ असे मराठा नौदल पाहून पोर्तुगिजांनी शहाणपणाने या ताफ्यापासून दूरच राहणे पसंत केले. 1680पर्यंत मराठा नौदल खूपच शक्तिशाली बनले होते. मराठा नौदलाकडे त्याकाळी 300 टन वहनक्षमता असलेली 45 मोठी जहाजे होती,तर 150 छोट्या नौका आणि सुमारे 1100 गलबते या ताफ्यात होती. ब्रिटिश व्यापार्‍यांचा भारतातील कावा ओळखणार्‍या मोजक्या भारतीय राजांपैकी शिवाजी महाराज हे एक होत. 'ब्रिटिश हे सामान्य व्यापारी वा सावकार नव्हेत. त्यांच्या पाठीशी तेथील राज्यकर्त्यांची प्रचंड ताकद आहे. ते इतके धूर्त आहेत की, तुमच्या जवळपासचे काहीही ते तुमच्या नकळत चोरून नेऊ शकतील. त्यांच्याशी व्यवहार करताना पुरेशी सावधगिरी बाळगा,' असे पत्र शिवरायांनी त्यांच्या एका प्रमुख अधिकार्‍याला लिहिले होते. 
 
मुंबईजवळ जंजिरा येथे ब्रिटिशांनी सिद्दीला दिलेला आश्रय हे ब्रिटिश आणि मराठे यांच्यातील पहिल्या संघर्षाचे कारण ठरले. सिद्दी हा नावालाच विजापूरच्या सुलतानाचा मांडलिक होता. परंतु जेव्हा त्याला मराठ्यांकडून धोका जाणवला, तेव्हा त्याने सुरतच्या मुघल शासकाची मदत मागितली. सुरतमध्ये ब्रिटिशांचे व्यापारी हितसंबंध असल्यामुळे ते मुघलांशी चांगले संबंध ठेवू इच्छित होते. या परिस्थितीचा सिद्दीने पुरेपूर /फायदा घेतला आणि आपल्या सागरी ताकदीचा आधार घेऊन मराठ्यांच्या ताब्यातील अनेक इलाख्यांवर हल्ले केले. जेव्हा मराठ्यांच्या नौदलाशी सिद्दीची गाठ पडली, तेव्हा तो पुरता घाबरला आणि मुंबई बंदराजवळ त्याने आश्रय घेतला. हे ठिकाण तोपर्यंत ब्रिटिशांचे पश्चिम किनारपट्टीवरील मुख्य व्यापारी केंद्र बनले होते. परदेशी ताकदीला आणि सिद्दीला शह द्यायचा असेल, तर मुंबईकडे येणारा त्यांचा मार्ग बंद करायला हवा आणि त्यासाठी तसा एक किल्ला बांधायला हवा, हे शिवरायांनी ओळखले. 1672 मध्ये शिवरायांनी मुंबईच्या दक्षिणेला असलेले खांडेरी हे छोटे बेट ताब्यात घेतले. हे बंदर मुंबईकडे सागरी मार्गाने येणार्‍या शत्रूला थोपविण्यास योग्य होते आणि त्याच्या साह्याने ब्रिटिशांना शह देता येईल, हे शिवाजी महाराजांनी ओळखले. अत्यंत काळजीपूर्वक सर्व जुळवाजुळव करून त्याच वर्षी सप्टेंबरमध्ये शिवरायांनी या बेटावर किल्ला बांधण्यास सुरुवात केली. 
 
दौलतखान आणि मयंक भंडारी या शिवरायांच्या दोन प्रमुख नौदल अधिकार्‍यांनी या बांधकामाची सूत्रे सांभाळली. हे बेट म्हणजे मुंबई द्वीपसमूहाचाच एक भाग आहे आणि त्यामुळे ती आमच्या अखत्यारीत येतात, असा दावा ब्रिटिशांनी केला. ब्रिटिश आणि सिद्दी यांनी मराठा सैन्यावर एकत्रितपणे हल्ला करण्याची धमकी दिली. त्यावेळी शिवाजी महाराज दक्षिणेच्या मोहिमेवर होते आणि त्यामुळे या मुदकडे गांभीर्याने पाहण्यास मराठ्यांना वेळ नव्हता. सातवर्षांनंतर जेव्हा शिवाजी महाराजांना या परिसराकडे लक्ष देण्यास सवड मिळाली, तेव्हा या बेटावरील किल्ल्याच्या बांधणीचे काम 2 सप्टेंबर 1679 रोजी पुन्हा सुरू करण्यात आले. ठाण्याजवळील सष्टी बंदरावर आणि बसीनच्या किल्ल्यावर ताबा मिळविणार्‍या पोर्तुगिजांनी या घटनाक्रमाकडे सोयिस्करपणे दुर्लक्ष केले. ब्रिटिशांवर पुरेसा दबाव आणण्यासाठी शिवाजी महाराजांनी मुंबई बंदराची घेराबंदी जमिनीवरील फौजेच्या साह्याने करण्याचे ठरविले. मुंबईवर हल्ला करण्यासाठी कल्याण परिसरात त्यांनी चार हजार जणांचे प्रबळ सैन्य गोळा केले. परंतु सष्टी बंदर पार करण्यासाठी महाराजांना पोर्तुगिजांच्या परवानगीची गरज होती. पोर्तुगिजांनी ती नाकारली. परंतु सुरतेवर मराठ्यांनी केलेल्या प्रचंड हल्ल्याच्या आठवणी ताज्या असल्यामुळे मुंबईमध्ये घबराट पसरली. अखेर मराठ्यांनी पाचशे जणांचे दल खांडेरी बंदरावर उतरविले आणि किल्ल्याच्या बांधकामास सुरुवात केली. यातील दोनशे लोक बांधकाम मजूर होते तर तीनशे जण सैनिक होते. या तुकडीची रसद तोडून त्यांना शरण येण्यास भाग पाडण्याचे ब्रिटिशांनी ठरविले. याकामी चार मोठी जहाजे मुंबईहून सोडण्यात आली. परंतु या तुकडीला रसद पोहोचविण्याचे काम मराठ्यांनी छोट्या नौकांच्या साह्याने अंधाराचा फायदा घेऊन सुरूच ठेवले. 
 
19 सप्टेंबर रोजी ब्रिटिशांनी या बेटाचा ताबा घेण्याचा प्रयत्न केला; परंतु दक्ष असलेल्या मराठा सैनिकांनी तो हाणून पाडला. अखेर ऑक्टोबरमध्ये ब्रिटिशांनी या तुकडीची रसद रोखण्यासाठी आणखी काही जहाजे समुद्रात पाठविली आणि त्याचा परिणाम मात्र जाणवू लागला. 22 सप्टेंबरला उभय नौदलांमध्ये मोठा संघर्ष झाला आणि आकाराने लहान असलेल्या मराठा नौदलाचे मोठे नुकसान झाले. या सागरी युद्धात मराठ्यांच्या तीन मोठ्या जहाजांना जलसमाधी मिळाली, तर तीनशे सैनिकांचा मृत्यू झाला. रसद तोडण्याचा ब्रिटिशांचा डाव तीन महिने सुरू होता. डिसेंबर 1679 मध्ये ब्रिटिशांनी बेटावरील तुकडीला निरोप पाठविला आणि शरण येण्यास सांगितले. परंतु शिवरायांनी त्यांच्या सैनिकांना अखेरच्या क्षणापर्यंत निकराची झुंज देण्याच्या सूचना दिल्या होत्या. जानेवारी 1680 मध्ये शिवरायांनी ब्रिटिशांच्या राजापूर येथील वखारीवर कारवाई केली आणि तेथील ब्रिटिशांना कैद केले. अखेर 8 जानेवारी 1680 मध्ये ब्रिटिशांना तह करण्यास भाग पडले. या तहांतर्गत ब्रिटिश आणि मराठा यांच्यात 30 जानेवारी रोजी एक करार झाला आणि खांडेरी बेटाची ब्रिटिशांनी केलेली कोंडी अखेर फुटली. खांडेरी बेटावरील मराठ्यांचा किल्ला ही ब्रिटिशांना भविष्यात कायमची डोकेदुखी ठरणार होती. मराठ्यांनी बचावात्मक पद्धतीने मिळविलेला हा मोठा विजय ठरला. या संघर्षानंतर अवघ्या दोन महिन्यांनी शिवाजी महाराजांचे देहावसान झाले. नौदलाच्या माध्यमातून ब्रिटिशांशी दिलेली झुंज ही त्यांनी केलेली अखेरची लढाई ठरली, हे लक्षात घ्यायला हवे. त्यांना आणखी आयुष्य लाभलेअसते, तर त्यांनी नौदल अधिक प्रबळ केले असते आणि किनारपट्टीकडे लक्ष केंद्रित केले असते, हे नक्की.
 
मराठ्यांनी मस्कतबरोबर व्यापार सुरू केला होता. प्रामुख्याने मिठाचा व्यापार ते करीत असत. सुपारीच्या व्यापारातही मराठ्यांची मक्तेदारी प्रस्थापित व्हावी अशी शिवाजी महाराजांची इच्छा होती. अत्यंत किफायतशीर अशा मसाल्यांच्या व्यापारावरही त्यांची नजर होती. दक्षिणेच्या मोहिमेनंतर शिवाजी महाराजांनी पश्चिमेकडील बहुतांश समुद्रकिनार्‍यांवर हुकुमत प्रस्थापित केली होती. शिवरायांचा मृत्यू ही इतिहासाला मोठी कलाटणी देणारी घटना ठरली. कारण अत्यंत महत्त्वाकांक्षी मुघल सम्राट औरंगजेब याला दक्षिणेकडे येऊन मराठ्यांचा पूर्ण पराभव करणे आता शक्य असल्याचे वाटू लागले होते. तोपर्यंतच्या सर्व मुघल सम्राटांनी हे दुःसाहस टाळले होते. मुघल सम्राटांशी सातत्याने जीवन-मृत्यूचा संघर्ष सुरू असल्यामुळे मराठ्यांना ब्रिटिशांच्या धोक्याकडे लक्ष देण्यास पुरेसा वेळही मिळाला नव्हता. परंतु त्यानंतरच्या 70 वर्षांपर्यंत ब्रिटिश आणि मराठ्यांमध्ये तुलनेने शांततामय वातावरण राहिले. मराठ्यांची ताकद क्षीण होत असल्याचा फायदा ब्रिटिशांनी फारसा घेतला नाही. कारण तोपर्यंत कान्होजी आंग्रे या पराक्रमी दर्यावर्दीने मराठा नौदलाची सूत्रे हाती घेतली होती. त्याने मराठा नौदलाची ताकद अशा प्रकारे विकसित केली, की ब्रिटिश कान्होजींना कर देत होते आणि पश्चिमेकडील समुद्रातून मालाची ने-आण करण्यासाठी कान्होजींचा 'पास' गरजेचा ठरला होता. 
 
छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक अरबी समुद्रात उभारण्याचा निर्णय झाला आहे. हा निर्णय अत्यंत योग्य असून, मराठा नौदलाचे स्मरण त्यानिमित्ताने होईल आणि आपल्या नौदल परंपरेलाही उजाळा मिळेल. पश्चिम किनारपट्टीवर नौदलाची फेरउभारणी करण्याचे श्रेय निःसंशय छत्रपती शिवाजी महाराजांचेच! 

- अनिल आठल्ये

संबंधित माहिती

मंगलाष्टक मराठी संपूर्ण Marathi Mangalashtak

शुक्रवारी कोणत्या मंत्राचा जप करावा?

अक्षय्य तृतीयेला तयार होत आहेत सुकर्म योगासह हे 5 शुभ संयोग, या राशीचे जातक ठरतील भाग्यवान

श्री महालक्ष्मी कोल्हापूर

शुक्रवारची आरती.... जयदेव जयदेव जय विघ्नाधीशा ॥

International Labour Day Wishes In Marathi कामगार दिनाच्या शुभेच्छा

International Labour Day 2024 भारतात कामगार दिन कधी सुरू झाला?

रांची मध्ये अपघात शाळेची बस पलटली, 15 मुलं जखमी

एक देखील मुस्लिमला दिले नाही तिकीट, नेत्याने दिला राजीनामा

महाराष्ट्र दिन कोट्स Maharashtra Day Quotes In Marathi

पुढील लेख
Show comments