भारतात इंग्रज अंमल प्रस्थापित झाल्यानंतर मराठ्यांच्या शौर्याचा इतिहास, गड, किल्ले, समाध्या आणि पुतळे उपेक्षेच्या गर्तेत कोसळले. संस्थानिक, जमीनदार, वतनदार आणि मनसबदारांनी इंग्रजांची तळी उचलून धरायला सुरवात केली आणि महाराष्ट्राला स्वाभिमानाचा म्हणून काही इतिहास उरलाच नाही. उलट लाचारीचा वर्तमान काय तो समोर राहीला. ज्याने मराठ्यांचा स्वाभीमान जागविला, उत्थानाची प्रेरणा दिली त्या शिवाजी महाराजांची समाधी तर रायगडावरील भग्नावशेषांत उन, पाऊस आणि वारा खात एकाकी पडली होती.
जेम्स डग्लस या इंग्रज अधिकार्याने शिवरायांच्या समाधीच्या उपेक्षेकडे लक्ष वेधले. १८८३ मध्ये त्याने रायगडाला भेट दिली. औरंगाजाबेच्या मोगली सत्तेशी टक्कर देऊन रयतेचे हिंदवी स्वराज्य उभारणार्या या मराठी राजाच्या समाधीच्या दुरवस्थेने तो इंग्रज अधिकारीही हेलावला. त्यावेळी रायगडावरील मंदिर भग्न झाले होते. महाराजांची मूर्तीची अवस्थाही चांगली नव्हती. त्याने आपल्या 'अ बुक ऑफ बॉम्बे' या पुस्तकांत ही अवस्था लिहिली. एक मोठे साम्राज्य उभारणार्या या राजाच्या समाधीसाठी आज साधा रूपयाही खर्च होत नाही. कुणी त्याकडे ढुंकूनही बघत नाही, अशा शब्दांत त्याने तत्कालीन मराठी समाजाची लक्तरे काढली. एवढे करून डग्लस थांबला नाही. त्याने ब्रिटीश सरकारलाही या समाधीकडे लक्ष द्यायला सांगितले. भलेही शिवाजी महाराजांचे राज्य आज ब्रिटिशांच्या ताब्यात आले असले तरी तो एक मोठा राजा होता, याकडे त्याने लक्ष वेधले.
डग्लसचे प्रयत्न अगदीच वाया गेले नाहीत. समाधीची अवस्था कळाल्यानंतर तत्कालीन समाजातही संतापाची भावना उसळली. त्याचबरोबर राजांच्या देदिप्यमान पराक्रमानंतर वतनदारी, जमीनदारी उबवणार्या सरदार-दरकदारांवर ही चीड व्यक्त झाली. एकूणच प्रजेचा दबाव वाढू लागल्याने ब्रिटिश सरकारने पुरातत्व खात्याकडे या समाधीची व्यवस्था सोपवली.
पहिली सार्वजनिक शिवजयंती दणक्यात साजरी झाली. २१ एप्रिल १८९६ च्या केसरीत छापलेल्या वृत्तानुसार या कार्यक्रमाला महाराष्ट्रभरातून आलेले तब्बल सहा हजार लोक उपस्थित होते. शिवाजी महाराजांच्या राज्यभिषेकानंतर रायगडावर झालेला सर्वांत मोठा कार्यक्रम हाच ठरला.
पण हे केले ते ब्रिटिश सरकारने. शिवाजी महाराजा आपले राजे होते, त्यांच्यासाठी आपण काय केले ही भावना उरतेच. मग त्यावेळी महाराष्ट्रातील बुद्धिजीही एकत्र आले. न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे यांच्या अध्यक्षतेखाली पुण्यात हिराबागेत १८८६ मध्ये एक बैठक झाली. तीत अनेक मराठा सरदार, वतनदार आणि कोल्हापूर संस्थानचे प्रतिनिधीही उपस्थित होते. पण बैठका होऊनही काहीही ठोस असे झाले नाही. हे सगळे होत असताना इतर व्यापात गुंतलेले लोकमान्य टिळक काहीसे दूरच होते. मग काही वर्षांनी व्ही. एन. मंडलिक या गृहस्थांनी १८९५ मध्ये पुन्हा रायगडला भेट दिली, त्यावेळी समाधीची अवस्था फारशी बदलली नसल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यांनी मग नेटिव्ह ओपिनियनमध्ये यासंदर्भात एक लेख लिहिला. त्यात डग्लसच्याच म्हणण्याची री ओढली.
त्याचवेळी डग्लसने आणखी भर घालून काढलेल्या त्याच्या बॉम्बे अँड वेस्टर्न इंडिया या पुस्तकात पुन्हा तोच लेख छापला. या एकूणच प्रयत्नांनी वातावरण चांगलेच तापले. मग टिळकांनी हा विषय हातात घेतला. त्यांनी केसरीत २३ एप्रिल १८९५ मध्ये एक सणसणीत लेख लिहिला. त्यात मराठी माणसाच्या निष्क्रियतेवर टीका करताना शिवाजी महाराजांच्या कर्तृत्वाचे लाभ उचलणार्या त्या पिढीतील सरदार, वतनदारांवरही चांगलीच झोड उठवली.
टिळकांच्या या लेखाने योग्य तो परिणाम साधला. आता लोकभावना चांगल्याच तापल्या होत्या. महाराजांच्या समाधीसाठी आता काही तरी ठोस केले पाहिजे ही भावना तयार झाली. मग त्यातून निधी उभारण्याची संकल्पना पुढे आली. त्यातून रायगडावरील शिवकालीन साधनांची दुरूस्ती करून तेथे दरवर्षी महाराजांची जयंती साजरी करण्याचे ठरले. हा मुद्दा त्यावेळी एवढा पेटला की तो केवळ महाराष्ट्राचा राहिला नाही. एक तर आधीच ब्रिटिश अंमल असल्यामुळे छत्रपती शिवाजी हे आपोआपच राष्ट्रभक्तीचे प्रतीक बनले. मग काय पश्चिम बंगाल, आसाम संयुक्त प्रांत इकडेही शिवाजी महाराजांचे वारे पसरले. जणू एक राजकीय चळवळच तयार झाली.
टिळकांनी आता सर्व सूत्रे हाती घेतली. त्यांनी रानडेंप्रमाणेच ३० मे १८९५ मध्ये हिराबागेत बैठक घेतली. तीत एक स्मारक समिती स्थापन करण्यात आली. पन्नास सदस्यांच्या या समितीत स्वतः टिळकही होते. वास्तविक त्यावेळी सरकारही समाधीच्या दुरूस्तीसाठी पैसे देत होते. पण ती रक्कम होती वर्षाला पाच रूपये. मराठा साम्राज्याची निर्मिती करणार्या छत्रपतीच्या वाट्याला ही अवस्था यावी? टिळकांनी या बैठकीत सगळ्यांनाच चांगले खड़सावले. ही बाब आपल्याला शोभनीय नाही, हे त्यांनी लक्षात आणून दिले आणि ब्रिटिशांच्या नाकावर टिच्चून निधी उभारण्याचे ठरले. अगदी एका विद्यार्थ्याकडून मिळालेले दोन आणे ते बडोद्याचे महाराज सयाजीराव गायकवाड यांच्याकडून मिळालेले एक हजार रूपये अशा प्रकारे निधीची उभारणी सुरू झाली. अवघ्या सहा मिहन्यात नऊ हजार रूपये जमले.
MH Govt
MH GOVT
लोकांच्या या प्रतिसादाने सर्वच जण भारावून गेले. एवढा प्रतिसाद सर्वस्वी अनपेक्षित होता. मग त्याचवेळी हाही निर्णय घेण्यात आला की शिवजयंती आता उत्साहात आणि दणक्यात साजरी करण्यात यावी. पूर्वी ती रायगडाखाली महाडला साजरी व्हायची. यानंतर मात्र, ती रायगडावरच साजरी करण्याचे ठरले. त्यासाठी नियमावलीही करण्यात आली.
अर्थात शिवजयंती उत्सव साजरी करण्यासाठी ब्रिटिशांनी सहजासहजी परवानगी दिली नाही. सुरवातीला मागणीच फेटाळण्यात आली. कारण काय तर रायगड हा जंगल भाग आहे, म्हणून. दुसर्या वेळेला यात्रा असा उल्लेख होता, म्हणून. मग उत्सव असा शब्द टाकल्यानंतर एकदाची परवानगी मिळाली. त्यासाठी टिळकांना फार यातायात करावी लागली. महाबळेश्वरमध्ये सुटीवर असलेल्या ब्रिटिश गव्हर्नरला जाऊन ते भेटले. उत्सवावेळी कोणताही अनुचित प्रकार घडणार नाही, याची हमी त्यांना दिली. त्यानंतर मग ही परवानगी मिळाली.
एवडे सव्यापसव्य करूनही पहिली सार्वजनिक शिवजयंती दणक्यात साजरी झाली. २१ एप्रिल १८९६ च्या केसरीत छापलेल्या वृत्तानुसार या कार्यक्रमाला महाराष्ट्रभरातून आलेले तब्बल सहा हजार लोक उपस्थित होते. शिवाजी महाराजांच्या राज्यभिषेकानंतर रायगडावर झालेला सर्वांत मोठा कार्यक्रम हाच ठरला. कारण मधल्या काळात कोणताही एवढा मोठा कार्यक्रम रायगडावर झाला नव्हता. टिळकांच्या या प्रयत्नाने 'रायगडाला पुन्हा एकदा जाग आली'. हिंदवी स्वराज्य उभारणार्या छत्रपतींचा तेजस्वी इतिहास रायगड पुन्हा एकदा दिमाखात सांगू लागला....