Festival Posters

कहाणी शुक्रवारची जिवतीची Khanai Shukravarchi Jivatichi

Webdunia
शुक्रवार, 3 सप्टेंबर 2021 (11:51 IST)
ऐका, शुक्रवारा, तुमची कहाणी. आपटपाट नगर होतं. तिथे एक राजा होता. त्या राजला मुलगा नव्हता. तेव्हा राणीनं एका सुईणीला बोलावून आणलं. अगं अगं सुईणी, मला नाळवारीसुद्धा एक मुलगा गुपचुप आणून दे मी तुला पुष्कळ द्रव्य देईन! सुईणीनं गोष्ट कबूल केली. ती त्या तपासावर राहिली. गावात एक गरीब ब्राह्मणाची बाई गर्भार राहिली, तेव्हा ती सुईण तिच्या घरी गेली आणि तिला सांगू लागली की, बाई बाई, तू गरीब आहेस, तुझं बाळंतपणाचं पोट दुखू लागेल तेव्हा मला कळव, मी तुझं बाळंतपण फुकट करीन! तिनं होय म्हणून सांगितलं. नंतर ती सुईण राणीकडे आली. बाईसाहेब, बाईसाहेब, आपल्या नगरात अमुक अमुक गरीब ब्राह्मणाची बाई गरोदर आहे, तिला नुकताच दुसरा महिना लागला आहे, लक्षणं सर्व मुलाचीच दिसताहेत. तेव्हा आपल्या घरापासून तो तेथपर्यंत काही कळणार नाही असं एक गुप्त भुयार तयार करावं. आपल्याला काही दिवस गेल्याची अफवा उठवावी. मी तुम्हाला नाळवारीचा मुलगा आणून देईन. असं ऐकल्याबरोबर राणीला मोठा आनंद झाला आणि जसेजसे दिवस होत गेले, त्याप्रमाणे डोहळ्याचं डंभ केलं. पोट मोठं दिसण्याकरिता त्याच्यावर लुगड्याच्या घड्या बांधल्या भुयार तयार केलं. नऊ मास भरताच बाळंतपणाची तयारी केली.
 
इकडे ब्राह्मणीणबाईचं पोट दुखू लागलं. सुईणीला बोलावू आलं. त्याबरोबर तुम्ही पुढं व्हा, मी येते म्हणून सांगितलं. धावत धावत राणीकडे आली. पोट दुखण्याचं ढोंग करायला सांगितलं. नंतर ब्राह्मणाच्या घरी आली. बाई बाई, तुझी आहे पहिली खेप. डोळे बांधलेस तर भिणार नाहीस. नाही बांधलेस तर भय वाटेल. असं सांगून तिचे डोळे बांधले. ती बाळंत झाली, मुलगा झाला. सुइणीनं एका दासीकडून भुयाराच्या वाटेनं मुलगा राणीकडे पाठविला व तिनं एक वरवंटा घेऊन त्यास एक कुंचा बांधला आणि तिच्यापुढं ठेवला. मग बाईचे डोळे सोडले. तुला वरवंटाच झाला असं सांगू लागली. तिनं नशिबाला बोल लावले, मनामध्ये दु:खी झाली. सुईण निघून राजवाड्यात गेली. राणीसाहेब बाळंतीण झाल्याची बातमी पसरली. मुलाचं कोडकौतुक होऊ लागलं.
 
इकडे ब्राह्मणबाईनं नेम धरला. श्रावणमासी दर शुक्रवारी जिवतीची पूजा करावी आणि नमस्कार करून म्हणावं, जय जिवती आई माते, जिथं माझं बाळ असेल,तिथं खुशाल असो. असं म्हणून तिनं तांदूळ उडवावे, ते ह्या मुलाच्या डोक्यावर पडावे. हिरवं लुगडं नेसणं, हिरव्या बांगड्या लेणं वर्ज्य. कारलीच्या मांडवाखालून जाणं वर्ज्य केलं. तांदुळाचं धूण वलांडणं बंद केलं. याप्रमाणं ती नेहमी वागू लागली.
 
इकडे ब्राह्मणबाईनं नेम धरला. श्रावणमासी दर शुक्रवारी जिवतीची पूजा करावी आणि नमस्कार करून म्हणावं, जय जिवती आई माते, जिथं माझं बाळ असेल,तिथं खुशाल असो. असं म्हणून तिनं तांदूळ उडवावे, ते ह्या मुलाच्या डोक्यावर पडावे. हिरवं लुगडं नेसणं, हिरव्या बांगड्या लेणं वर्ज्य. कारलीच्या मांडवाखालून जाणं वर्ज्य केलं. तांदुळाचं धूण वलांडणं बंद केलं. याप्रमाणं ती नेहमी वागू लागली.
 
इकडे राजपुत्र मोठा झाला. एके दिवशी बाहेर फिरायला निघाला. त्या दिवशी ती न्हाऊन आपल्या अंगणात राळे राखीत बसली होती, तेव्हा ह्याची नजर तिजवर गेली. हा ‍मोहित झाला व रात्री तिची भेट घ्यायचीम्हणून निश्चय केला. रात्री तिच्या घरी आला. दारात गाय वासरू बांधली होती. चालता चालता राजाचा पाय वासराच्या शेपटावर पडला. वासराला वाचा फुटली. ते आपल्या आईला म्हणालं, कोण्या पाप्यानं माझ्या शेपटावर पाय दिला! तेव्हाती म्हणाली, जो आपल्या आईकडे जावयास भीत नाही, तो तुझ्या शेपटावर पाय द्यायला निर्भल काय? हे ऐकून राजा मागे परतला आणि घरी येऊन आपल्या आईपासनू काशीस जाण्याची परवानगी घेतली. कांशीस जाऊ लागला. जाता जाता एका ब्राह्मणाच्या इथे उतरला. त्या ब्राह्मणाला पुष्कळ मुलं होत होती, पण ती पाचवी सहावीच्या दिवशी जात असत. राजा आला त्या दिवशी चमत्कार झाला. पाचवीचा दिवस होता. राजा दारात निजला होता. सटवी रात्री आली आणि म्हणू लागली, कोण गं मेलं वाटेत पसरलं आहे? जिवती उत्तर करिते, अगं, अगं, माझं ते नवसाचं बाळ निजलं आहे, मी काही त्याला वलांडू देणार नाही. मुलगा आज जाणार म्हणून त्या मुलाचे आईबाप चिंता करीत बसले होते, त्यांनी हा संवाद ऐकला. इतक्यात उत्तर रात्र झाल्यावर ब्राह्मणानं येऊन राजाचे पाय धरले. तुमच्यामुळे आमचा मुलगा जगला, आजचे दिवस मुक्काम करा, अशी विनंती केली. राजानं ती मान्य केली. त्याही रात्री याप्रमाणं प्रकार झाला. दुसरे दिवशी राजा चालता झाला। इकडे ह्यांचा मुलगा वाढता झाला.
 
पुढे काशीत गेल्यावर यात्रा केली. गयावर्जनाची वेळ आली, पिंड देतेवेळी ते घ्यायला दोन हात वर आले. असं होण्याचं कारण त्यानं ब्राह्मणांना विचारलं. ते म्हणाले,घरी जा, सार्‍या गावातल्या बायकापुरुषांना जेवायला बोलाव, म्हणजे याचं कारण समजेल. मनाला मोठी चुटपूट लागली. घरी आला मोठ्या थाटाचं मावंद केलं, त्या दिवशी शुक्रवार होता. गावात ताकीद दिली, घरी कोणी चूल पेटवू नये, सगळ्यांनी जेवायला यावं. ब्राह्मणीला मोठं संकट पडलं. राजाला निरोप धाडला, मला जिवतीचं व्रत आहे. माझे नेम पुष्कळ आहेत. ते पाळले तर जेवायला येईन! राजानं कबूल केलं. जिथं तांदुळाचं धूण होतं ते काढून तिथं सारवूऩ त्यावरून ती आली. हिरव्या बांगड्या भरल्या नाहीत, कारल्याच्या मांडवाखालून गेली नाही. दर वेळेस जिथं बाळ असेल तिथं खुशाल असो, असं म्हणे.
 
पुढे पानं वाढली. मोठा थाट जमला. राजाने तूप वाढायला घेतलं. वाढता वाढता ही ज्या पंक्तीत बसली होती तिथं आला. तूप वाढू लागला. ईश्वरी चमत्कार झाला. बाईला प्रेम सुटून पान्हा फुटला. तिच्या स्तनांतून दुधाच्या धारा फुटल्या, त्या ह्याच्या तोंडात उडाल्या. तो हातची तपेली ठेवून रूसून निजला. काही केल्या उठेना. तेव्हा आई गेली, त्याची समजूत करू लागली. तो म्हणाला असं होण्याचं कारण काय? तिनं सांगितलं, ती तुझी खरी आई, मी तुझी मानलेली आई- असं सांगून सर्व हकीकत सांगितली. नंतर भोजनाचा समारंभ झाला. पुढं त्यानं आपल्या आई-बापास राजवाड्यानजीक मोठा वाडा बांधून देऊन त्यासुद्धा आपण राज्य करू लागला. तर जशी जिवती तिला प्रसन्न झाली, तशी तुम्हा आम्हा होवो. ही साठा उत्तराची कहाणी पाचा उत्तरी सुफळ संपूर्ण.

संबंधित माहिती

सर्व पहा

नवीन

Shani Jayanti 2026 Wishes in Marathi शनी जयंती २०२६ शुभेच्छा संदेश

Shani Jayanti 2026 शनी जयंतीच्या दिवशी चुकूनही या ५ वस्तू घरी आणू नका; शनिदेव होतील रुष्ट, वाट्याला येईल दारिद्र्य!

शनी जयंती २०२६: पूजेचा शुभ मुहूर्त, विधी आणि चुकूनही करू नका 'या' चुका!

Shani Dev Aarti Marathi शनि आरती मराठी

आरती शनिवारची

सर्व पहा

नक्की वाचा

Chhatrapati Sambhaji Maharaj Jayanti 2026 Speech in Marathi धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज जयंती भाषण

शरीराला उर्जावान ठेवण्यासाठी, दररोज या योगांचा सराव करा

पंचतंत्र : मूर्खांचा समूह

घरात भाजी नसेल तर पटकन बनवा साधी सोपी व झटपट होणारी कुरडईची भाजी : मराठमोळी चव!

Vastu Tips झोपण्याची योग्य दिशा तुमचे नशीब बदलू शकते

पुढील लेख
Show comments