Festival Posters

कहाणी मंगळागौरीची

Webdunia
एक नगर होतं. तिथं एक वाणी होता. त्याला काही मुलगा नव्हता. त्याच्या घरी एक गोसावी येई, अल्लख म्हणून पुकारा करी. वाण्याची बायको भिक्षा आणी. निपुत्रिकाच्या हातची भिक्षा घेत नाही म्हणून चालता होई. ही गोष्ट तिनं नवर्‍याला सांगितली. त्यानं तिला एक युक्ति सांगि‍तली. दाराच्या आड लपून बस. अल्लख म्हणताच सुवर्णाची भिक्षा घाल. 

अशी भिक्षा झोळीत घातली. बोवांचा नेम मोडला. बाईवर फार रागावला. मूलबाळ होणार नाही. असा शाप दिला. तिनं त्याचे पाय धरले. बोवांनी उ:शाप दिला. बोवा म्हणाले, आपल्या नवर्‍याला सांग, निळ्या घोड्यावर बस, निळी वस्त्र परिधान कर, रानात जा, जिथं घोडा अडेल तिथं खण. देवीचं देऊळ लागेल, तिची प्रार्थना कर. ती तुला पुत्र देईल, असं बोलून बोवा चालता झाला.

तिनं आपल्या पतीस सांगितलं. वाणी रानांत गेला. घोडा अडला, तिथं खणलं. देवीचं देऊळ लागलं. सुवर्णाचं देऊळ आहे, हिरेजडिताचे खांब आहेत, माणकांचे कळस आहेत, आत देवीची मूर्ती आहे. त्याने मनोभावे पूजा केली. त्याला देवी प्रसन्न झाली. वर माग म्हणाली, घरदारं आहेत, गुरंढोरं आहेत, धनद्रव्य आहे, पोटी पुत्र नाही म्हणून दुखी आहे. देवी म्हणाली, तुला संततीचं सुख नाही. मी प्रसन्न झाले आहे. तुला पुत्र देते. अल्पायुषी पुत्र घेतलास तर गुणी मिळेल, दीर्घायुषी घेतलास तर जन्मांध होईल. कन्या घेतलीस तर बालविधवा होईल, इच्छा असेल ते मागून घे! त्यानं अल्पायुषी पुत्र मागितला. देवीनं सांगितलं. माझ्या मागल्या बाजूला जा, तिथं एक गणपती आहे, त्याच्या मांगे आंब्याचं झाड आहे. गणपतीच्या दोंदावर पाय दे, एक फळ घे, घरी जाऊन बायकोला खाऊ घाल, म्हणजे तुझा कार्यभाग होईल. देवी अदृश्य झाली.

वाणी देवळामागं गेला, गणपतीच्या दोंदावर पाय दिला, झाडावर चढला, पोटभर आंबे खाल्ले, घरी नेण्याकरीता घेतले. खाली उतरून पाहू लागला. तो मोटेत आंबा एकच आहे. असं चारपाच वेळा झालं. गणपतीला त्रास झाला. त्यानं सांगितलं, तुझ्या नशिबी एकच फळ आहे. फळ घेऊन घरी आला. बायकोला खाऊ घातलं. ती गरोदर राहिली. दिवसामासा गर्भ वाढू लागला. नवमास पूर्ण झाले. वाण्याची बायको बाळंतीण झाली. मुलगा झाला. उभयतांना मोठा आनंद झाला. दिवसामासी वाढू लागला. आठव्या वर्षी मुंज केली. दहाव्या वर्षी लग्न करा म्हणाली. काशीयात्रेशिवाय लग्न करणार नाही असा माझा नवस आहे, असा जबाब दिला.

काही दिवसांनी मामाबरोबर यात्रेस पाठविले. मामाभाचे काशीस जाऊ लागले. जाता जाता काय झालं? वाटेत एक नगर लागलं, तिथं काही मुली खेळत होत्या, त्यात एकमेकीचं भांडण लागलं, एक गोरी भुरकी मुलगी होती, तिला दुसरी मुलगी म्हणू लागली, काय द्वाड आहे, काय द्वाड आहे! तेव्हा ती मुलगी म्हणाली, माझी आई मंगळागौरीचं व्रत करते. आमच्या कुळावंशामध्ये कोणी द्वाड नाही. मग मी तर तिची मुलगी आहे! हे भाषण मामांनी ऐकलं. त्यांच्या मनात आलं. हिच्याशी आपल्या भाच्याचं लगीन करावं म्हणजे हा दीर्घायुषी होईल. परंतु हे घडतं कसं? त्या दिवशी तिथं त्यांनी मुक्काम केला. इकडे काय झालं? त्याच दिवशी त्या मुलीचं लग्न होतं. लग्नाचे वेळेस नवरा मुलगा मांदा झाला. मुलीचे आईबापांना पंचाईत पडली.


पुढं कोणीतरी प्रवासी मिळेल तर बरं होईल. त्याला पुढं करून वेळ साजरी करू म्हणून धर्मशाळा पाहू लागले. मामाभाचे दृष्टीस पडले. मामापासून भाच्याला नेलं, गोरज लग्न लाविलं. उभयतांना गौरीहरापाशी निजविलं. दोघं झोपी गेली. मुलीला देवीनं दृष्टांत दिला, अगं अगं मुली, तुझ्या नवर्‍याला दंश करायला सर्प येईल, त्याला पिण्याकरिता दूध ठेव. एक कोरा करा जवळ ठेव. दूध पिऊन सर्प कर्‍यात ‍िशरेल. अंगच्या चोळीन तोंड बांधून टाक. सकाळी उठून आईला ते वाण दे. तिने सर्व तयारी केली. दृष्टांताप्रमाणं घडून आलं. काही वेळानं तिचा नवरा उठला, भूक लागली म्हणू लागला. लाडू खायला दिले. फराळ झाल्यावर त्यानं तिला आपली अंगठी दिली. पहाटेस उठून ताट घेऊन बिर्‍हाडी गेला. मामाभाचे मार्गस्थ झाले.

दुसरे दिवशी काय झालं? हिनं सकाळी उठून स्नान केलं, आपल्या आईला वाण दिलं. आई उघडून पाहू लागली, तो आत हार निघाला. आईनं कन्येच्या गळ्यात हार घातला. पुढं पहिला वर मांडवात आला. मुलीला खेळायला आणली. ती म्हणाली, हा माझा नवरा नाही, मी यांजबरोबर खेळत नाही. रात्रीची लाडवांची आंगठीची खूण काही पटेना. आईबापांना पंचाईत पडली. हिचा नवरा कसा सापडतो? नंतर त्यांनी अन्नछत्र चालू केलं. जो ब्राह्मण येईल त्याचे पाय अंगठी घालून मुलीनं धुवावे, आईने पाणी घालावं, भावांनी गंध लावावं आणि बापानं विडा द्यावा, असा क्रम चालू केला. शेकडो लोक येऊन जेवू लागले.

इकडे मामाभाचे काशीस गेले. पुष्कळ दानधर्म केले, तीर्थयात्रा केल्या, ब्राह्मणांचे आर्शीवाद घेतले. एके दिवशी भाच्यास मूर्च्छा आली. यमदूत प्राण न्यायला आले. मंगळागौर आडवी आली. त्या दोघांचं युद्ध झालं, यमदूत पळून गेले, गौर तेथे अदृश्य झाली. भाचा जागा झाला, तसा आपल्या मामास सांगू लागला, मला असं स्वप्न पडलं. मामा म्हणाला, ठीक झालं, तुझ्यावरचं विघ्न टळलं. उद्या आपण घरी जाऊ. परत येऊ लागले. लग्नाच्या गावी आले. तळ्यावर स्वयंपाक करू लागले. दासींनी येऊन सांगितलं, इथं अन्नछत्र आहे, तिथं जेवायला जा! तो म्हणाले, आम्ही परान्न घेत नाही. दासींनी यजमानणीस सांगितलं. यांनी पालखी पाठविली. आदरातिथ्यानं घरी नेलं. पाय धुतांना मुलीनं नवर्‍याला ओळखलं. नवर्‍यानं आंगठी ओळखली. आईबापांनी विचारलं, तुझ्याजवळ खूण काय आहे? त्यानं लाडवाचं ताट दाखविलं. सर्वांना आनंद झाला.

भोजनसमारंभ झाला. मामाभाचे सून घेऊन घरी आले. सासूनं सुनेचे पाय धरले. तुझ्यामुळं माझा मुलगा वाचला, असं म्हणाली. तिनं सांगितलं, मला मंगळागौरीचं व्रत असतं, ही सगळी तिची कृपा! सासरमाहेरची घरचीदारची माणसं सर्व एकत्र जाली आणि त्या व्रताचं उद्यापन केलं, मंगळागौर तिला प्रसन्न झाली, तशी तुम्हां आम्हां होवो, आणि आपलं सौभाग्य अखंड राहो, इतकीच देवाची प्रार्थना करा. ही धर्मराजाला कृष्णानं सांगितलेली साठा उत्तरांची कहाणी पाचा उत्तरी सुफळ संपूर्ण.

संबंधित माहिती

सर्व पहा

नवीन

२३ वर्षांनंतर मकर संक्रांतीला एक दुर्मिळ योगायोग: भूत जमात वाघावर स्वार; जूनपर्यंत सावधगिरी बाळगावी लागेल

मकर संक्रातीला झटपट घरी बनवा तिळाच्या मऊ वड्या TilGul Vadi Recipe

Budhwar Upay बुधवारी गणपतीला प्रसन्न करण्यासाठी हे उपाय करा

Makar Sankranti 2026 Wishes in Marathi मकर संक्रांतीच्या शुभेच्छा मराठी

आरती बुधवारची

सर्व पहा

नक्की वाचा

Morning Mantras सकाळी उठल्यावर या 4 मंत्रांचा उच्चार करा, सर्व अडचणी दूर होतील

उत्तम करिअर घडवण्यासाठी या गोष्टी लक्षात ठेवा

तुळशीचे झाड काळे पडत आहे का? हे कारण असू शकते का? प्रतिबंधात्मक टिप्स जाणून घ्या

साप्ताहिक राशिफल 04 ते 10 जानेवारी 2026

मकरसंक्रांती रेसिपी : सोपी तीळ-गुळाची बर्फी

पुढील लेख
Show comments