सोमवारी येथे सुरू झालेल्या सात दिवसीय मूल्यमापन शिबिरात गोलरक्षक सविता पुनिया आणि फॉरवर्ड वंदना कटारिया या अनुभवी खेळाडूंसह 60 खेळाडू सहभागी होत आहेत. या शिबिरानंतर चाचण्या होणार असून त्याआधारे 33 संभाव्य खेळाडूंची राष्ट्रीय संघासाठी निवड केली जाणार आहे. भारतीय क्रीडा प्राधिकरण (SAI) कॅम्पसमध्ये हे मूल्यमापन शिबिर आयोजित करण्यात आले आहे.
भविष्यातील कोचिंग कॅम्प आणि आंतरराष्ट्रीय दौऱ्यांसाठी संभाव्य खेळाडूंची संख्या 33 पर्यंत कमी करण्यासाठी 6 आणि 7 एप्रिल रोजी चाचण्या घेतल्या जातील. "पुणे येथे नुकत्याच पार पडलेल्या वरिष्ठ महिला राष्ट्रीय स्पर्धेतील कामगिरीच्या आधारे 60 खेळाडूंची निवड करण्यात आली आहे," असे हॉकी इंडियाने एका निवेदनात म्हटले आहे.शिबिरासाठी निवडण्यात आलेल्या खेळाडूंमध्ये अनेक नवीन चेहऱ्यांचाही समावेश आहे.