नव्वदच्या दशकात हिंदी चित्रपटसृष्टीवर अधिराज्य गाजविणारी अभिनेत्री. लाखो हृदयांची धडकन. धकधक गर्ल. खळाळतं हास्य. अप्रतिम लावण्य. नृत्यावर हुकूमत. आणि सशक्त अभिनयक्षमता. एवढ्या वर्णनानंतर ही अभिनेत्री कोण असा प्रश्न पडण्याचे काहीही कारण नाही. कारण हे नाव माधुरी दीक्षित असणार हे नक्की.
बडजात्यांच्या राजश्री प्रॉडक्श्नच्या 'अबोध' द्वारे १९८४ मध्ये माधुरीने रूपेरी पडद्यावर पदार्पण केले. त्यावेळी तिला कदाचित वाटतही नसेल की आपल्या अभिनयाच्या जोरावर आपल्याला पुढे पद्मश्री या उपाधीने गौरविण्यात येईल. पद्मश्री पुरस्कार मिळविल्यानंतर तर आता माधुरी नूतन, मधुबाला व मीनाकुमारी यांच्या श्रेणीत दाखल झाली आहे. कारण या अभिनेत्रींनाही पद्मश्रीने गौरविण्यात आले आहे.
१५ मे १९६७ मध्ये मुंबईत जन्मलेल्या माधुरीने सांगितले, की आपण आतापर्यंत या क्षेत्रात केलेल्या कष्टाचे सार्थक झाले आहे. या पुरस्काराने आपला मोठा गौरव झाल्याची भावना मनी असून त्याचे श्रेय आपण ज्या ज्या चित्रपटांत काम केले त्या निर्माता, दिग्दर्शक व सहकारी कलावंतांना जाते.
त्याचवेळी माधुरीच्या मते या गौरवात प्रेक्षकांचाही वाटा आहे. कारण त्यांच्यामुळेच तिला ओळख मिळू शकली. श्रीराम नेने यांच्याशी विवाह केल्यानंतर माधुरी परदेशात स्थायिक झाली. पण तत्पूर्वी झळाळती कारकिर्द मागे ठेवून.
IFM
' अबोध'नंतर सुभाष घईंच्या 'उत्तर दक्षिण' मध्येही माधुरी चमकली. पण माधुरीस वलय प्राप्त झाले ते एन. चंद्रा यांच्या 'तेजाब' या चित्रपटाने. त्याकाळातला हा सुपरहीट चित्रपट होता. त्यातल्या एक दोन तीन या गाण्यावर तरूणाई बेहद्द खूष झाली होती. त्यानंतर मग तिला यशासाठी वाट पहावी लागली नाही.तेच तिच्या पायी चालत आले. नाव, बडे बॅनर आणि पैसा हे सगळं काही तिच्यापर्यंत येऊन पोहोचले. साजन, 'राम लखन' या चित्रपटांनी दणदणीत यश मिळविले.'दिल' चित्रपटही गाजला.
' बेटा' मधील 'धकधक करने लगा' हे गाणे तर विलक्षण गाजले. त्यामुळेच तिला 'धकधक गर्ल' हे बिरूद मिळाले. 'खलनायक' या संजय दत्तच्या गाजले्ल्या चित्रपटातील चोली के पीछे या गाण्यावरून वाद झाला. पण गाणे व चित्रपट दोन्ही गाजले.
तिच्या व्यक्तिमत्वाशी सुसंगत अशी भूमिका असलेला राजश्री प्रॉडक्शनचा 'हम आपके है कौन' हा चित्रपट तिच्या कारकिर्दीतील मैलाचा दगड ठरावा. या चित्रपटातील 'चुलबुली लडकी' छाप भूमिका तिने अतिशय छान केली.
चित्रपट कौटुंबिक असल्याने प्रचंड गाजला. इतका की चित्रपटसृष्टीत आतापर्यंत सर्वाधिक चाललेला चित्रपट असा लौकीक मिळविला. आता केवळ माधुरीच्या नावावर चित्रपट चालू लागले. ती सर्वाधिक मानधन घेणारी अभिनेत्री बनली. श्रीदेवीनंतर सुपरस्टार अभिनेत्रीची रिकामी जागा तिने भरून काढली.
' याराना', 'राजकुमार', 'कोयला' या चित्रपटाच्या अपयशानंतर प्रकाश झा यांचा 'मृत्यूदंड', व यश चोप्रा याच्या 'दिल तो पागलं है' या चित्रपटांनी तिला प्रशंसेसोबतच फिल्मफेअर पुरस्कारही मिळवून दिला. यानंतर 'देवदास' मध्ये तिने आपल्या अभिनयाची दखल घेण्यास भाग पाडले.
IFM
प्रसिद्ध चित्रकार एम. एफ. हुसेन यांनी तिच्या सौंदर्याने प्रेरीत होऊन गजगामिनी या चित्रपटाची निर्मिती केली. माधुरीचे नाव गाजत असतानाच तिने अमेरिकास्थित डॉ. श्रीराम नेने यांच्याशी लग्न करून अचानक एक्झिट घेतली. लग्नानंतर सहा वर्षांनी तिने यशराज फिल्म्सच्या 'आजा नच ले' या चित्रपटाच्या माध्यमातून पुनरागमन केले. चित्रपट चांगला बनला होता. त्याचे व माधुरीच्या अभिनयाचे कौतुकही झाले. पण चित्रपट फ्लॉप ठरला. पण तरीही माधुरी नावाचा ब्रॅंडचे कौतुक बॉलीवूडला आजही आहे.
माधुरीचे चित्रपट- देवदास, गजगामिनी, दिल तो पागल है, मृत्यूदंड, हम आपके है कौन, खलनायक, बेटा, प्रहार, राजा, दिल, परिंदा, राम लखन, तेजाब, साजन, अबोध आदी.
पुरस्कार- उत्कृष्ट अभिनेत्री, फिल्मफेअर ( हम आपके है कौन) उत्कृष्ट अभिनेत्री, फिल्मफेअ र (बेटा) उत्कृष्ट अभिनेत्री, फिल्मफेअ र (दिल तो पागल ह ै)