Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

अभिजात संगीतकारः सुधीर फडके

विकास शिरपूरकर
मराठी घराघरात आणि मनामनात सुधीर विनायक फडके हे नाव अजरामर आहे. गीत रामायणातील गोडव्यापासून ते भावविभोर करून सोडणा-या गीतांतून मराठी मनामनावर बाबुजींनी राज्य केले आहे. मराठी-हिंदी गीतांचे गायक व संगीतकार म्हणून त्यांनी ठसा उमटवला आहे. सलग पाच दशकांहून अधिककाळ त्यांच्या गीत आणि संगीताने कानसेनांना तृप्त केले आहे.

बाबूजींचा जन्म 25 जुलै 1919 रोजी कोल्हापूर शहरातील एका वकिली व्यवसाय करणा-या कुटुंबात झाला. गायन आणि वादनाचे सुरुवातीचे शिक्षण त्यांनी पं. वामनराव पाध्ये यांच्याकडून घेतले. त्यांच्या वडिलांच्या अचानक निधनाने त्यांना संगीताचे शिक्षण मध्येच सोडून पोटापाण्याच्या व्यवसायात लक्ष घालावे लागले.

कोल्हापूर सोडून मुंबईत आणि नंतर उत्तर भारतात दोन वर्षे दौरा करून त्यांनी मैफलींमध्ये सादरीकरण केले. यामुळे त्यांना वेगवेगळ्या प्रांतातील लोकसंगीताचा व कलांचा जवळून अभ्यास करता आला. त्याचा वापर बाबूजींनी आपले संगीत खुलविण्यासाठी केला. त्यामुळे अल्पावधीतच त्यांची एक नावाजलेला गायक व संगीतकार म्हणून ओळख झाली.

सुधीर फडके यांनी सुमारे 110 चित्रपटांना संगीत दिले आहे. मराठी चित्रपटसृष्टीच्या जडण-घडणीत बाबूजींचे योगदान मोठे आहे. त्यांच्या काळातच मराठीने आपला सुवर्णकाळ अनुभवला. त्यांनी अनेक मराठी चित्रपटांना तर सुमारे 20 हिंदी चित्रपटांना संगीत दिले. याशिवाय अनेक भावगीते, भक्तिगीते आणि मराठी लावण्यांना त्यांनी आपल्या मधुर संगीताने सजविले आहे. अनेक दिग्गज गायकांच्या स्वरांना त्यांनी आपल्या संगीताच्या कोंदणात बसविले आहे. बाल गंधर्व, पं. भीमसेन जोशी, हिराबाई बडोदेकर, माणिक वर्मा, लता मंगेशकर, आशा भोसले, मोहम्मद रफी आणि मन्नाडे ही त्यातील काही नावे.

एचएमव्ही सोबत 1941 मध्ये त्यांनी आपल्या चित्रपट कारकीर्दीची सुरुवात केली. त्यानंतर तब्‍ब्‍ाल पाच वर्षांनी प्रभात फिल्म कंपनीच्या व्ही. शांताराम यांनी त्यांना आपल्या चित्रपटांतून ब्रेक दिला. नंतर ही जोडी अनेक चित्रपटांतून दिसली. त्यांच्या काळातील संगीतकार-वसंत देसाई, वसंत पवार, स्नेहल भाटकर, दत्ता डावजेकर यांच्यात आपल्या सुमधुर संगीतामुळे बाबूजींनी वेगळे स्थान संपादन केले.

गायक-संगीतकार असलेले सुधीर फडके यांच्यात एक चांगला अभिनेताही दडलेला होता. त्यांनी अभिनय केलेले अनेक चित्रपट म्हणूनच आजही रसिकमनाचा ठाव घेतात. त्यांचे सुहासिनी, आम्ही जातो आमच्या गावा, लाखाची गोष्ट, जगाच्या पाठीवर हे चित्रपट प्रचंड यशस्‍वी ठरले होते.

मराठी शिवाय हिंदी चित्रपटातील भाभी की चूडिया या चित्रपटाचे 'ज्योती कलश छलके' हे पहाटगाणं आजही रसिकमनाचा ठाव घेते. पहली तारीख’ या चित्रपटातील किशोरकुमार यांनी गायलेले 'खुश है जमाना आज पहली तारीख है' हे गीत रेडियो सिलोनवरून पहिल्या तारखेला वाजत आलं आहे.

महाराष्ट्राच्या घराघरात बाबूजी जाऊन पोचले ते 'गदिमां'च्या गीत रामायणामुळे. या रामायणातील 56 गीतांसाठी त्यांनी दिलेले संगीत आणि केलेले गायन एक वेगळाच प्रयोग आहे. त्यांनी गीत-रामायणाचे देश-विदेशात 1800 कार्यक्रम केले. आकाशवाणीवर सर्वाधिक लोकप्रियता मिळविलेला हा एक वैशिष्ट्यपूर्ण कार्यक्रम ठरला आहे.

चित्रपट निर्मितीच्या क्षेत्रातही त्यांनी योगदान दिले आहे. स्वातंत्र्यलढ्यातील थोर सेनानी तात्याराव तथा विनायक दामोदर सावरकर यांच्यावरचा ‘वीर सावरकर’ चित्रपट बनविण्यासाठी त्यांनी कूपन्स विकून आणि कार्यक्रम करून निधी गोळा केला होता.

त्यांनी दिलेल्या संगीत सेवांसाठी त्यांना अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. त्यात स्वामी हरिदास सन्मान, सूरसिंगार सांसद पुरस्कार, जीवनगौरव पुरस्कार, लता मंगेशकर पुरस्कारांचा समावेश आहे. 1991 मध्ये संगीत नाटक अकादमी पुरस्कारानेही त्यांना गौरविण्यात आले आहे. महाराष्ट्र शासनातर्फे मुंबईच्या फिल्मसिटीला दादासाहेब फाळके चित्रनगरी नामकरण सोहळ्यात त्यांना विशेष सन्मानित करण्यात आले होते.

संगीतकार खय्यामही त्यांच्या संगीताच्या मधुरतेने प्रभावित झाले आहेत. 29 जुलै 2002 रोजी त्यांचे निधन झाले. त्यांनी संगीत क्षेत्रासाठी दिलेले योगदान निश्चितच उल्लेखनीय आहे.

बाबूजींचे उल्लेखनीय चित्रपटः
*गोकूळ *रुक्मिणी स्वयंवर (1947) *आगे बढो (1947) *सीता स्वयंवर *जीवाचा सखा *वंदेमातरम् (1948) *अपराधी *जय भीम *माया बाजार *रामप्रतिज्ञा *संत जनाबाई (1949) *श्रीकृष्ण दर्शन *जौहर मायबाप (1950) *पुढचे पाऊल (1950) *मालती माधव *मुरलीवाला *जशास तसे (1951) *लाखाची गोष्ट *नरवीर तानाजी (1952) *सौभाग्य *वाहिनीच्या बांगड्या (1953) *पहली तारीख *इन-मीन-साडे-तीन *ऊन पाऊस (1954) *गंगेत घोडा न्हाला *शेवग्याच्या शेंगा (1955) *सजनी *आंधळा मागतो एक डोळा *देवधर, *माझे घर माझी माणसं (1956) *गणगौरी (1958) *जगाच्या पाठीवर (1960) *भाभी की चूडियाँ (1961) *गुरू किल्ली (1966) आम्ही जातो आमच्या गावा (1968) *दरार (1972) *आराम हराम आहे (1976) *आपलेच दात आपलेच ओठ (1982) *माहेरची माणसं (1984) *धाकटी सून *शूर शिवाजी (1987).

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

मुंज्याच्या यशाबद्दल शर्वरीने व्यक्त केला आनंद, म्हणाली - हे स्वप्न पूर्ण होण्यासारखे

प्रसिद्ध कोरिओग्राफर जानी मास्टरवर लैंगिक छळाचा आरोप

'द साबरमती रिपोर्ट' या दिवशी रिलीज होणार, नवीन पोस्टरसह तारीख जाहीर

Border 2: बॉर्डर 2'चं शूटिंग या दिवसा पासून सुरू होणार!

कल्ट क्लासिक पडोसन थिएटरमध्ये पुन्हा प्रदर्शित झाला, सायराबानोने शेअर केली पोस्ट

सर्व पहा

नवीन

अभिनेत्री प्रीती झांगियानीच्या पतीचा रस्ता अपघात, आयसीयूमध्ये दाखल

Navratrotsav 2024 : वज्रेश्वरी देवी माहिती आणि इतिहास जाणून घ्या

Shardiya Navratri 2024: प्रसिद्ध दुर्गा मंदिरे, या शारदीय नवरात्रीला भेट द्या

'द साबरमती रिपोर्ट' या दिवशी रिलीज होणार, नवीन पोस्टरसह तारीख जाहीर

सफर निसर्गरम्य बूंदीची

पुढील लेख
Show comments