Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

गांधीगिरीपूर्वीचा खलनायक

- अभिनय कुलकर्णी

Webdunia
IFM
गा़डीवर उंडारणं, ड्रग्ज घेणं, बेपर्वाई, बेफिकिरी, बेमूर्वतपणा आणि साऱ्या जगाला मी लाथ मारतो असा अविर्भाव....साधारणपणे कुठल्याही श्रीमंती बाळांना लागू होईल, असे हे वर्णन एकेकाळी संजय दत्तलाही लागू होते. संजूबाबा म्हणून ओळखला जाणारा हा मुन्नाभाई त्याच्या पूर्वायुष्यात निरागस मुन्ना असण्यापेक्षा बराचसा भाई (लाक्षणिक अर्थाने) होता. आई-वडिलांच्या प्रतिष्ठेला काळीमा लावण्यासाठी जे काही करता येईल, ते या कुलदीपकाने त्याच्या पूर्वायुष्यात केले. गांधीगिरीपूर्वीची भाईगिरी पहायची असेल तर त्याच्या पूर्वायुष्याची कहाणी माहित करून घ्यावी लागेल. त्याच्या कुठल्याही चित्रपटाची पटकथा शोभावी एवढा मालमसाला त्यातही आहे.....

ही कहाणी घडली मुंबई नावाच्या आटपाट नगरात. माजी खासदार व अभिनेते सुनील दत्त आणि अभिनेत्री नर्गिस या नितांतसुंदर, सोज्जवळ जोडप्याच्या संजय हा द्वाड मुलगा. लहानपणापासूनच वाया गेलेला. आई-वडिलांच्या प्रतिमेच्या बरोबर उलट याचा स्वभाव. हायस्कूलमध्ये असतानाच याला ड्रग्जची सवय लागलेली. आई नर्गिसला कर्करोग झाला होता हे कळल्यानंतर या बाळराजांच्या लीला थांबतील, असे त्या माऊलीला वाटले. पण तसे काही घडले नाही. उलट बिचारी याच धक्क्याने लवकर गेली. संजयला आता ड्रग्जसाठी निमित्त मिळाले. आईच्या मृत्यूचे. ड्रग्ज घेण्याचे त्याचे प्रमाणही वाढले.

IFM
तत्पूर्वी त्याचे चित्रपटसृष्टीत पदार्पण घडविणारा रॉकी हा चित्रपट येऊन गाजूनही गेला होता. त्याच्यात उद्याचा स्टारही दिसत होता. पण त्याचे स्टार मात्र काही तितके चांगले दिसत नव्हते. राजकारणात लोकांसाठी खूप काही करणाऱ्या पिता सुनील दत्त यांनी मुलाला सुधारण्याचे खूप प्रयत्न केले. पण यश येत नव्हते. व्यसन वाढल्यानंतर मात्र त्यांनी संजयला उचलून अमेरिकेतील टेक्सास येथे असलेल्या व्यसनमुक्ती केंद्रात नेले. तेथे संजय सुधारला.

त्याच्या आयुष्यातील हा टर्निग पॉईंट म्हणता येईल. यानंतर संजय पुन्हा चित्रपटात काम करू लागला. याच काळात त्याच्यावरील उपचारात त्याची सेवा करणाऱ्या रिचा शर्मा या मुलीच्या प्रेमात तो पडला. दोघांनी लग्नही केले. त्यांना त्रिशला नावाची मुलगी झाली. पण दोनच महिन्यांनंतर कळले. रिचाला ब्रेन ट्युमर झालाय आणि ती काही महिन्यांचीच सोबती आहे. पुढे रिचाचा मृ्त्यू झाला. त्याच्या आयुष्यात त्रिशला हेच त्याचे सर्वस्व बनली. पण त्याच्या सासू सासऱ्यांनी कायदेशीर लढाई खेळून तिचा ताबा मिळवला. संजय पुन्हा एकटा राहिला.


IFM
याच काळात मुंबईत १२ मार्च १९९३ ला बॉम्बस्फोट झाले. यात सहभागाचा संशय़ घेऊन पोलिसांनी संजयला अटक केली. बेकायदेशीर शस्त्रे बाळगल्याचा आरोप त्याच्यावर ठेवण्यात आला. बाबरी मशिद पाडल्यानंतर उसळलेल्या दंगलीत मुंबई अनेक दिवस जळत होती. त्यावेळी संजयने स्वरंक्षणासाठी शस्त्रे बाळगली. ही शस्त्रे त्याला मिळाली कशी याचा इतिहासही रोचक आहे. संजयचे अंडरवर्ल्डशी संबंध कसे होते, हेच त्यातून दिसून येते.

सीबीआयने टाडा न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेत म्हटले आहे, की अबू सालेम त्याच्या काही साथीदारांसह १६ जानेवारी १९९३ ला संजय दत्तच्या घरी गेला. त्याने त्याला तीन एके-५६ रायफली शिवाय २५ हातगोळे, नऊ एमएम पिस्तूल आणि काही काडतुसे दिली. संजयने त्यातील दोन रायफली मॅग्नम व्हिडीओचे मालक हनीफ कडावाला व समीर हिंगोरा यांना परत केल्या. पण एक स्वतःजवळच ठेवली. बॉम्बस्फोट झाले तेव्हा संजय मॉरीशसमध्ये शूटींगमध्ये होता. तपासात पोलिसांना संजयचा सहभाग आढळल्याने त्यांनी संजयला बोलावणे पाठविले. त्यावेळी संजयने तेथूनच आपल्या घरात असलेली एक रायफल नष्ट करण्याचे युसफ नळवाला, केरसी अडजेनिया, रूसी मुल्ला आणि अजय मारवाह यांना सांगितले. त्यांनी तसे केले. ही रायफल आणि इतर शस्त्रास्त्रे नऊ जानेवारी १९९३ ला दुबईतून आली होती.

मुंबई पोलिसांच्या आरोपांचा संजयने इन्कार केला. पण त्यावेळी त्याचे वडिल सुनील दत्त यांनी त्याला तातडीने मुंबईत परतावे असे सांगितले. त्यानुसार संजय परत आल्यानंतर लगेचच त्याला अटक करण्यात आली. त्यानंतर तो अठरा महिने ऑर्थर रोड कारागृहात होता.

हा काळ संजय टीकेचे लक्ष्य बनला होता. प्रसारमाध्यमांनी त्याचे वाभाडे काढण्यास कमी केले नाही. त्याचा खलनायक हा चित्रपटही नेमका याच काळात आला. त्याच्या वास्तव आयुष्यातही तो खलनायक बनला होता. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंनीही त्याला टीकेचे लक्ष्य केले होते.संजयच्या स्टार प्रोफाईलचा परिणाम सर्व घडामोडींवर होत होता. यावेळी त्याचे वडिल सुनील दत्त यांनी अतिशय धीरोदात्तपणे आपला मुलगा नाठाळ असेल पण दहशतवादी नाही, असे बजावून सांगितले.

संजयला वाचविण्याचे खूप प्रयत्न सुनील दत्त यांनी केले. शिवसेनेकडून होणारा विरोध थांबविण्यासाठी संजयला शिवसेनाप्रमुखांच्या पायावरही घातले. त्यानंतर शिवेसेनेने संजयविरोधातील भूमिका सोडून दिली. त्यानंतर सुनील दत्त यांनी लोकसभेची एक निवडणूक लढवलीच नाही. त्यावेळी त्यांच्या मतदारसंघातून शिवसेनेचे मधुकर सरपोतदार खासदार झाले. सुनील दत्त यांनी शिवसेनेसाठी ही तडजोड केल्याचे बोलले जाते. त्यावेळी मुंबईचे पोलिस आयुक्त असणारे अमरजित सिंह सामरा यांनी संजय, निरागस असल्याचे सांगून वाद ओढवून घेतला होता.

अशी परिस्थिती असतानाही नंतर हे वादळ कमी होत गेले. पुढे संजयला जामीनही मिळाला. त्याची चित्रपट कारकिर्दही जोरात सुरू झाली. त्याच्या चित्रपटांना आधीपेक्षा जास्त यश मिळाले. मुन्नाभाईच्या चित्रपटांनी तर त्याच्या अभिनयावरही शिक्कामोर्तब केले. त्याच्याविरोधात उडालेला जनप्रक्षोभ या काळात खूपच कमी होऊन त्याच्या चाहत्यांची संख्याही वाढली. यानंतर वेळ आली ती बॉम्बस्फोट खटल्याचे निकाल देण्याची. यात २८ नोव्हेंबर २००६ ला संजयचा नंबर लागला.

टाडा कोर्टाचे न्यायाधीश प्रमोद कोदे यांनी संजयला बेकायदा शस्त्रास्त्रे बाळगल्याबद्दल दोषी ठरविले. पण दहशतवादी कटात सहभागी असल्याचा त्याच्याविरूद्धचा आरोप न्यायाधीशांनी फेटाळला. तो दहशतवादी नाही, असे न्यायाधीश कोदे यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले. आणि अखेर त्याने केलेल्या गुन्ह्यासाठी आता त्याला सहा वर्षांची शिक्षा देण्यात आली आहे.

चुकीच्या संगतीचा परिणाम एखाद्याचे आयुष्य कसे बिघडवतो, याचे संजय दत्त हे उत्तम उदाहरण आहे. गुंडांशी असलेली मैत्री त्याला अशी महागात पडली. गांधीगिरीपूर्वीची भाईगिरी त्याला तुरूंगात घेऊन गेली.

.... जसा संजय बिघडला आणि शिक्षेस पात्र ठरला, तसाच तुमच्या आमच्या आजूबाजूला असलेला असा संजय बिघडू नये शिक्षेस पात्र ठरू नये. साठा उत्तराची ही कहाणी पाचा उत्तरी सुफळ संपूर्ण.

वाढदिवसाच्या शुभेच्छा- संजय दत्त (स्लाइड शो)

दीपिका पदुकोण कल्की 2898 एडी भाग 2 च्या शूटिंगसाठी सज्ज

स्त्री 3' मध्ये अक्षय कुमारची एंट्री निश्चित झाली

स्काय फोर्स चित्रपटाचा अप्रतिम ट्रेलर रिलीज, अक्षय कुमार-वीर पहाडियाचा ॲक्शन अवतार दिसला

सोनू निगमची मराठमोळी सुरुवात,आपल्या सुमधुर आवाजाने गायलं २०२५ चं पहिलं गाणं ‘चंद्रिका’

Kangana Ranaut: या दिवशी रिलीज होणार 'इमर्जन्सी'चा ट्रेलर

शाहिद कपूरच्या 'देवा' चित्रपटातील 'भसड़ मचा' या गाण्याचा धमाकेदार टीझर रिलीज

Rajmata Jijau Birthplace Sindkhed Raja राजमाता जिजाऊ जन्मस्थान, सिंदखेड राजा

कुंडली भाग्य' अभिनेत्री लग्नाच्या 5 वर्षांनंतर एका गोंडस मुलीची आई बनली

अभिनेता टिकू तलसानिया यांना हृदयविकाराचा झटका, गंभीर अवस्थेत रुग्णालयात दाखल

येथे स्त्री रुपात हनुमान, जाणून घ्या कुठे आणि का प्रसिद्ध आहे हे मंदिर

Show comments