बॉलीवूडा बादशाह शाहरूख खानचा वाढदिवस त्याच्यासोबत त्याचे हजारो चाहतेही दणक्यात साजरा करतात.या वलयाने किंग खानही सुखावतो. मुंबईतील संघर्षकाळातील त्याची स्वप्ने त्याला यावेळी दिसत असावीत. कारण ती आता खरी झाल्याचे पाहण्याचे भाग्यही त्याला लाभले आहे. म्हणूनच की काय थोडीशी आत्मप्रौढी त्याच्या वक्तव्यातूनही नेहमीच जाणवते. मीच सर्वश्रेष्ठ किंवा किंग खानची बरोबरी कुणी करू शकत नाही यातून ती अधोरेखितही होते.
IFM
IFM
शाहरूखच्या या बाजूकडे लक्ष देताना त्याच्या संघर्षाकडे, त्याने स्वतःच्या व्यक्तिमत्वात केलेल्या बदलांकडेही लक्ष द्यायला हवे. चोप्रा कॅम्पातल्या ‘गुडी गुडी’ चित्रपटांनंतर आता शाहरूख जाणीवपूर्वक वेगळे चित्रपट करतो आहे. त्यासाठी व्यक्तिमत्वातही बदल करतो आहे. आशुतोष गोवारीकरचा ‘स्वदेस’, ‘चक दे इंडिया’तील कबीर खान या त्याच्या वेगळ्या व्यक्तिरेखा. आता तो अशा व्यक्तिरेखा करण्याचेही धाडस करू लागला आहे.
IFM
IFM
आतापर्यंत सडपातळ बांध्याचा शाहरूख पडद्यावर अंगातील शर्ट भिरकावण्यास संकोचायचा. आता त्याने व्यायामशाळेत जाऊन पीळदार शरीरयष्टी बनवली आहे. आगाम ी 'ओम शांती ओम' मधून ती दिसेल. सलमानसारखा अंगातून शर्ट भिरकावून तो हा बदल दाखवून देईल.
त्याच्या विचारांतही आता बराच बदल झाला आहे. विशेषतः देवदासची भूमिका करताना तो देवदास वाटत नसून शाहरूखच वाटतो, अशी टीका त्याच्यावर झाली. त्यावर तो चिडायचाही. पण आता तो त्यावर विचार करतो. अगदी आत्मचिंतनही करतो. 'चक दे इंडिया' मधून त्याने प्रतिमेतून बाहेर पडत कबीर खान उभा केला हे या आत्मचिंतनाचेच उदाहरण. समीक्षक व टीकाकारांना चोख उत्तर देणारा हा त्याचा चित्रपट आहे.
IFM
IFM
ग्लॅमरच्या चकचकाटी दुनियेपासून दूर जात, ज्यात अर्थ आहे, अशा गंभीर भूमिका करण्याचे धाडस तो आता करतो आहे. त्याचा निश्चय चित्रपट व भूमिकांच्या निवडीतून जाणवतो. दिवाळीत येणार्या ओम शांती ओम नंतर त्याचा करण जोहर दिग्दर्शित 'माय नेम इज खान' हा चित्रपट येणार आहे. अमेरिकन वर्ल्ड ट्रेड सेंटरवरील हल्ल्यानंतर मुस्लिमांच्या आयुष्यातील बदल टिपण्याचा प्रयत्न या चित्रपटात करण्यात आला आहे.
शाहरूखने वयाची बेचाळीशी पूर्ण केली तरी तिकिट खिडकीवर तो आजही निर्विवाद बादशाह आहे. जाहिरात जगतात त्याची ब्रँड व्हॅल्यू इतर कोणत्याही अभिनेत्यापेक्षा जास्त आहे. ओम शांती ओम' च्या निर्मितीचा पस्तीस कोटींचा खर्च त्याने वितरण हक्क बावन्न कोटी रूपयांना विकून प्रदर्शनापूर्वीच वसुल केला आहे. शिवाय व्हिडिओ, सॅटेलाईट हक्कांच्या माध्यमातून ही किंमत सत्तर कोटी रूपयांपर्यंत पोहचते. हे घडले ते केवळ तो शाहरूख आहे म्हणून. आणि म्हणूनच तो बॉलीवूडचा निर्विवाद किंग आहे. बॉलीवूडच्या या बादशाहला वाढदिवसाच्या शुभेच्छा.