अमिताभची प्रसिद्धी त्याची लोकप्रियता आज आपल्यासमोर आहे. पण त्याआड दडलेला त्याचा तीव्र संघर्ष मात्र फारसा लोकांसमोर येत नाही. आजच्या पिढीला तर त्याचे 'अँग्री यंग मॅन' ते 'स्वीट अँड रोमॅंटिक ओल्ड मॅन' हेच रूप डोळ्यासमोर आहे. पण त्याला जे मिळालेय ते सहजासहजी नाही.
सुरवातीचे त्याचे सर्व चित्रपट अगदी जोरदार आपटले. तो काम करेल तो चित्रपट अपयशी ठरायचा. अशा परिस्थितीत अनेकांनी घरी परत जाण्याचा सल्ला त्याला दिला. पण तरीही हा मुकद्दर का सिकंदर टिकून राहिला आणि सिनेसृष्टीचा शहेनशाह बनला. नजर टाकूया त्याच्या संघर्षावर
सातमधील एक हिंदुस्थानी. अमिताभचे अभिनेता बनण्याचे खूळ त्याचा भाऊ अजिताभनेही जोपासले होते. म्हणूनच त्याने या लंबुटांग्या भावाचे चांगले फोटो काढून ख्वाजा अहमद अब्बास यांना पाठवले होते. त्यावेळी अब्बास सात हिंदूस्तानीची तयारी करत होते. या सातापैकी एका मुस्लिम युवकाची भूमिका अमिताभला देण्यात आली होती. त्यावेळी अमिताभ हरिवंशराय बच्चन यांचा मुलगा आहे, हे अब्बास यांना माहित नव्हते. या चित्रपटातील भूमिकेसाठी पाच हजारापेक्षा जास्त पैसे देणार नाही, असे अब्बास यांनी आधीच त्याला सांगितले होते.
नंतर करार करण्याची वेळ आली तेव्हा अब्बास यांना अमिताभ हरिवंशराय बच्चन यांचे चिरंजीव असल्याचे समजले. मग त्यांनी वडिलांच्या संमतीशिवाय ही भूमिका देण्यास नकार दिला. शेवटी अमिताभने वडिलांची परवानगी मिळवून आणली तेव्हा कुठे त्याला काम मिळाले.
१९६९ मध्ये हा चित्रपट दिल्लीच्या शीला चित्रपटगृहात प्रदर्शित झाला. हा चित्रपट अमिताभने आपल्या आई-वडिलांसह बघितला. त्यावेळी अमिताभ जैसलमेरमध्ये सुनील दत्तच्या रेश्मा और शेराच्या शूटींगमध्ये व्यस्त होता. पण खास आई-वड़िलांना चित्रपट दाखविण्यसाठी तो सुटी घेऊन आला होता. त्यावेळी त्यांच्याकडे कपडेही नव्हते.
तेव्हा वडिलांचा कुर्ता पायजमा घालून तो हा चित्रपट बघायला आला होता. याच शीला चित्रपटगृहात क़ॉलेजला दांड्या मारून अमिताभने अनेक चित्रपट बघितले होते. तेथेच तो आता स्वतःचा चित्रपट पहात होता.
मीनाकुमारीकडून कौतुक अब्बास यांनी कायमच वेगळ्या प्रकारचे चित्रपट बनविले. व्यावसायिक सिनेमाचे पाणी त्यांना कधी लागले नाही. संदेशप्रधान चित्रपट देणारा दिग्दर्शक अशी त्यांची ओळख. त्यांचा हा चित्रपट चालला नाही. पण प्रदर्शित झाला हेच भाग्य. प्रदर्शित होण्यापूर्वी मीनाकुमारीने हा चित्रपट बघितला होता. तिने अमिताभचे कौतुकही केले होते. त्यावेळी हा लंबुटांग्या हिरो चक्क लाजला होता.
तरीही संघर्ष सुरूच... व्यावसायिक यश मिळत नसल्याच्या या संघर्षाच्या काळात अमिताभला मॉडेलिंगच्या ऑफरही मिळत होत्या. पण त्यात त्यांना अजिबात रस नव्हता. जलाल आगा यांची एक जाहिरात कंपनी होती. विविध भारतीसाठी जाहिराती बनविण्याचे काम या कंपनीकडे होते. जलाल आगा अमिताभला आकाशवाणीच्या वरळीतील स्टुडीओमध्ये घेऊन जात एक दोन मिनिटांच्या जाहिरातींसाठी त्याचा आवाज वापरत असत.
त्याचे अमिताभला प्रती कार्यक्रमसाठी पंचवीस रूपये मिळत. एवढी 'मोठी' रक्कम अमिताभलाही त्या काळात पुरेशी होती. कारण स्वस्ताईसुद्धा तेवढीच ोहती. वरळीच्या सिटी बेकरीत त्यावेळी रात्री गेल्यास तुटलेली बिस्कीटं अर्ध्या किमतीत मिळत. अमिताभने अशा रात्रभर उघड्या रहाणार्या दुकानांमधून अनेकदा टोस्ट खाऊन दिवस घालवला आहे. सकाळी उठलं की कामाचा शोध सुरू....
IFM
IFM
' रेश्मा और शेरा'मध्ये मुका अमिताभ सुनील दत्तच्या रेश्मा और शेरा या डाकूपटात अमिताभने मुक्याचे काम केले होते. म्हणजे ज्याच्या आवाजासाठी सारे जग आज तडफडते त्याला मुका करण्यात आले होते. म्हणजे संधी फक्त भावाभिनयाला. असे म्हणतात, की पूर्वी अमिताभच्या या भूमिकेत संवाद होते. पण नंतर ते विनोद खन्नाला देण्यात आले. आणि हे संवाद अमिताभने म्हटले असते, तर सुनील दत्त यांचे संवादही निष्प्रभ ठरले असते, असे म्हणतात.
अमिताभची आवडती नायिका वहिदा रेहमान आणि हिरो दिलीपकुमार आहे. रेश्मा और शेरामध्ये अमिताभची बायको वहिदा रेहमान होती. अमिताभचा ही पहिली फिल्मी बायको.
अन्वर अलीची मेहेरबानी कोलकत्यात असताना दोघं भाऊ मिळणारा पगार स्वतःवर खर्च करायचे. त्यामुळे कधी कधी तर आईवडिलांकडून पैसे मागण्याची नौबत यायची. पण यावेळी मात्र, घरून कोणतीही मदत घ्यायची नाही, हे ठरवूनच अमिताभ मुंबईत आला होता. त्याचवेळी अजिताभही मद्रासमार्गे मुंबईत येऊन डेरेदाखल झाला होता. अमिताभ काही दिवस त्याच्याबरोबर राहिला. पण अजिताभला पुन्हा शॉ वॉलेस कंपनीत नोकरीसाठी मद्रासला जावे लागले.
तोपर्यंत अमिताभची कमाई होती पहिल्या दोन चित्रपटांचे मानधन. ते किती दिवस पुरणार? अजिताभ गेल्यानंतर तर रहायचीही बोंब झाली. आई-वडिलांच्या ओळखीच्या शंकरीबाई खेतान यांच्या मरीन ड्राईव्ह येथील घरात तो रहायला लागला. पण तेथून कामाची जागा दूर होती. अशावेळी धावून आला विनोदी अभिनेता मेहमूदचा भाऊ अन्वर अली. सात हिंदूस्तानीत अमिताभबरोबर त्यानेही काम केले होते.
अंधेरीत मेहमूदच्या एका फ्लॅटमध्ये अन्वर रहात होता. त्याने अमिताभला आपल्याबरोबर रहाण्यासाठी बोलावून घेतले. दोघेही काम शोधण्यासाठी कधी या तर कधी त्या स्टुडीओत जात असत.
ह्रषिकेश मुखर्जींशी ओळख ह्रषिकेश मुखर्जींची अमिताभशी ओळख अब्बास यांनीच करवून दिली होती. सात हिंदूस्तानीचा संदर्भ देऊन चांगला मुलगा आहे. कामही चांगलं करतो, अशी शिफारसही केली होती. त्याला कोणत्या तरी चित्रपटात घ्या, असा शब्दही त्यांनी टाकला होता.
त्यावेळी ह्रषिदा आनंदचा विचार करत होते. ही कथा त्यांनी राजेंद्रकुमारपासून जेमिनीपासून एस. एस. वासन यांना ऐकवली होती. पण यात प्रणयाला काहीही स्थान नाही, असे सांगून नकार दिला होता. नायकाला नायिका नाही. किशोरकुमार, शशीकपूर यांनीही याला नकार दिला होता.
त्यावेळी राजेश खन्ना यात काम करण्यास अचानक तयार झाला. डॉक्टरच्या भूमिकेसाठी त्यांना अभिनेत्याची गरज होती. त्यावेळी त्यांना अमिताभची आठवण आली आणि ही भूमिका त्याला मिळाली. त्याचा बाबू मोशाय अमर झाला. अमिताभच्या कारकिर्दीलाही नवसंजीवनी मिळाली.
आनंदचे यश आनंद व परवाना या चित्रपटात काम करण्याचा मोबदला अमिताभला तीस हजार रूपयांच्या रूपाने मिळाला. म्हणून अमिताभने अन्वर अलीचा फ्लॅट सोडून जुहू- पार्ल्यात रहायला गेला. आनंद यशस्वी झाला आणि अमिताभचा पुढचा रस्ता काहीसा सोपा झाला. या चित्रपटाचा राजेश खन्नालाही फायदा झाला.
पण अर्थात यश खूप दूर होते. त्याचवेळी अमिताभला साईड रोल मिळू लागले. जवळपास डझनभर चित्रपट होऊनही अमिताभची कारकिर्दी फारशी पुढे सरकलेली नव्हती. आनंदव्यतिरिक्त केवळ बॉम्ब टू गोवा या एकमेव चित्रपटात अमिताभ काहीशा वेगळ्या भूमिकेत होता. त्याला प्रतिसादही चांगला मिळाला. मेहमूद व एन. सी. सिप्पी त्याचे निर्माते होते. अन्वर अलीच्या सांगण्यावरून या भूमिकेसाठी अमिताभ मेहमूदला भेटला होता.
त्यावेळी मेहमूदने त्याला नाचता येते का हा एकच प्रश्न विचारला होता. त्यावेळी अमिताभने 'थो़डं थोडं येतं. पण शिकेन' असं उत्तर दिलं. मग मेहमूदने अमिताभला ताजमहल हॉटेलच्या डान्सिंग फ्लोअरवर बॅंड़च्या तालावर नायायला लावले. १९७२ मध्ये प्रदर्शित झालेला हा चित्रपट फर्स्ट रनमध्ये तर चालला नाही. पण एकदा अमिताभचे नाव झाल्यानंतर हा चित्रपट पुढे तुफान चालला.
IFM
IFM
जंजीर (१९७३) सुपरहिट होईपर्यंत अमिताभच्या नावावर डझनभर चित्रपट होते. त्यातल्या त्यात बॉम्बे टू गोवा, परवाना, आनंद, रेश्मा और शेरा, सात हिंदूस्तानी हे बरे चालले. पण प्यार की कहानी, बन्सी बिरजू, एक नजर, संजोग, रास्ते का पत्थर, गहरी चाल आणि बंधे हात या चित्रपटांची नावे तरी लोकांना माहित आहे का असा प्रश्न पडावा.
अमिताभला तोपर्यंत इंडस्ट्रीतले लोक अपशकुनी मानायला लागले होते. दीड- दोन वर्षांचा हा काळ अमिताभच्या आयुष्यातील सर्वांत वाईट काळ होता. पण त्यातच त्याच्या यशस्वीतेची बिजेही होती. बॉम्बे टू गोवामधील काम पाहूनच प्रकाश मेहरा व सलीम जावेद यांनी त्याला जंजीरसाठी निवडले होते. त्यावेळी अजिताभ मुंबईत येऊन अमिताभचा सेक्रेटरी कम बिझनेस मॅनेजरचे काम पहायला लागला होता.
१९७२ मध्ये जंजीरचे शुटींग सुरू झाले. प्रकाश मेहरा एकाचवेळी दिग्दर्शक आणि निर्मात्याच्याही भूमिकेत होते. जंजीरसाठी त्यांनी धर्मेंद्रसमोर भागिदारीचा प्रस्ताव ठेवला होता. पण त्याने नकार दिला. मग अमिताभचा मित्र असेलला प्राण यांचा मुलगा रोनी याने अमिताभच्या नावाची सूचना केली. त्यावेळी प्रकाश मेहरांची अमिताभशी ओळख हॅलो हाय पुरतीच होती.
रोनीचा प्रस्ताव मेहरा यांनी जावेदना सांगितला त्यावेळी त्यांनी हे आपल्या मनातच होते असे सांगितले. बॉम्बे टू गोवा पाहिल्यानंतर मेहरा म्हणाले, 'मला हवा तसा हिरो मिळाला'.
जंजीरमधील इन्सपेक्टर विजयच्या भूमिकेसाठी प्रकाश मेहरा यांनी देव आनंद व राजकुमार यांच्याशीही बोलणी केली होती. पण दोघांनीही या प्रस्तावाला केराची टोपली दाखवली. पण त्यांचा नकार अमिताभच्या कारकिर्दीला हिरवा झेंडा दाखविणारा ठरला. या चित्रपटात त्यांची नायिका होती, जया भादुरी. यापूर्वी बन्सी बिरजू व एक नजर हे दोन चित्रपट अमिताभने तिच्याबरोबर केले होते. दोघांमध्ये याच काळात प्रेम फुलू लागले होते.
जंजीरमधील इन्स्पेक्टर विजयच्या भूमिकेत अमिताभ शोभेल का याबाबत मेहरा थोडे साशंक होते. पण सलीम जावेदने त्यांना सांगितले, की अमिताभशिवाय इतर कुणीही या भूमिकेत फिट बसू शकणार नाही. शूटींगच्या पहिल्याच दिवशी मेहरांची ही शंका दूर झाली.
प्रसंग असा होता, की पोलिस स्टेशनमध्ये प्राण येतात आणि इन्स्पेक्टर असलेल्या अमिताभच्या समोर ठेवलेल्या खुर्चीच बसू पहातात. त्यावेळी प्राणला बसायचीही संधी न देता अमिताभ खुर्ची पायानेच ढकलून देत म्हणतो, 'ये पुलिस स्टेशन है, तुम्हारे बाप का घर नहीं'
हा शॉट झाला आणि प्राण प्रकाश मेहरा यांचा हात पकडून म्हणाले, प्रकाश मी अभिनय गेल्या अनेक वर्षांपासून करतोय. पण आजच्यासारखा जबरदस्त अनुभव मला कधीही आला नाही. मी तुम्हाला सांगतोय, हिंदी चित्रपटसृष्टीला एक बडा अभिनेतामिळाला आहे. उद्याच्या भविष्यातील ही बाब मला आजच दिसतेय. हा 'ग्रेटेस्ट' स्टार होईल.'
प्राण यांचे शब्द तंतोतंत खरे झाले. जंजीर यशस्वी झाल्यानंतर प्राण, सलीम जावेद आणि प्रकाश मेहरा यांना तर अमिताभला कुठे ठेवू कुठे नको असे झाले होते. या काळातच अमिताभ आई-वड़िलांना घेऊन मुंबईत आले. राज्यसभेत खासदार असलेल्या बच्चन यांचा कार्यकाळ पूर्ण झाला होता. अजिताभही शॉ वॉलेसच्या कामासाठी जर्मनीत गेला होता.
जंजीर हिट झाल्यानंतर परदेशात फिरायला जायचे, हे अमिताभने जयाला सांगून ठेवले होते. पण हरिवंशराय बच्चन यांनी सांगितले, की परदेशात जायचे तर आधी लग्न करा. जून १९७३ ची ही घटना. त्यावेळी अमिताभ तीस वर्षांचा होता. अखेर दोन दिवसांची नोटीस देऊन लग्न उरकरण्यात आले. लग्नाच्या दुसर्याच दिवशी अमिताभ तीन आठवड्यांसाठी लंडनला गेला. यानंतर जे घडले तो इतिहास आहे आणि तो सर्वांना माहिती आहे.