Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय चौदावा

Webdunia
॥ श्री गणेशाय नमः ॥ जयजयाजी करुणाघना । जयजयाजी अघशमना । जयजयाजी परमपावना । दीनबंधा जगद़्गुरु ॥१॥ आपुल्या कृपे करोन । त्रयोदश अध्यायपर्यंत । वर्णिले स्वामी चरित्रामृत । आता पुढे वदवावे ॥२॥ आपुल्या कथा वदावया । बुद्धी देई स्वामीराया । चरित्र ऐकोनी श्रोतया । संतोष होवो बहुसाळ ॥३॥ कैसी करावी आपुली भक्ती । हे नेणे मी मंदमती । परी प्रश्न करिता श्रोती । अल्पमती सांगतसे ॥४॥ प्रातःकाळी उठोन । आधी करावे नामस्मरण । अंतरी ध्यावे स्वामीचरण । शुद्ध मन करोनी ॥५॥ प्रातःकर्मे आटपोनी । मग बैसावे आसनी । भक्ती धरोनी स्वामीचरणी । पूजन करावे विधियुक्त ॥६॥ एकाग्र करोनी मन । घालावे शुद्धोदक स्नान । सुगंध चंदन लावोन । सुवासिक कुसुमे अर्पावी ॥७॥ धूप-दीप-नैवेद्य । फल तांबूल दक्षिणा शुद्ध । अर्पावे नाना खाद्य । नैवेद्याकारणे स्वामींच्या ॥८॥ षोडशोपचारे पूजन । करावे सद़्भावे करुन । धूप-दीपार्ती अर्पून । नमस्कार करावा ॥९॥ जोडोनिया दोन्ही कर । उभे रहावे समोर । मुखे म्हणावे प्रार्थना स्तोत्र । नाममंत्र श्रेष्ठ पै ॥१०॥ आजानुबाहु सुहास्यवदन । काषायवस्त्र परिधान । भव्य आणि मनोरम । मूर्ती दिसे साजिरी ॥११॥ मग करावी प्रार्थना । जयजयाजी अघहरणा । परात्परा कैवल्यसदना । ब्रह्मानंदा यतिवर्या ॥१२॥ जयजयाजी पुराणपुरुषा । लोकपाला सर्वेशा । अनंत ब्रह्मांडधीशा । वेदवंद्या जगद़्गुरु ॥१३॥ सुखधामनिवासिया । सर्वसाक्षी करुणालया । भक्तजन ताराया । अनंतरुपे नटलासी ॥१४॥ तू अग्नि तू पवन । तू आकाश तू जीवन । तूची वसुंधरा पूर्ण । चंद्र सूर्य तूच पै ॥१५॥ तू विष्णू आणि शंकर । तू विधाता तू इंद्र । अष्टदिक्पालादि समग्र । तूच रुपे नटलासी ॥१६॥ कर्ता आणि करविता । तूच हवी आणि होता । दाता आणि देवविता । तूच समर्था निश्चये ॥१७॥ जंगम आणि स्थिर । तूच व्यापिले समग्र । तुजलागी आदिमध्याग्र । कोठे नसे पाहता ॥१८॥ असोनिया निर्गुण । रुपे नटलासी सगुण । ज्ञाता आणि ज्ञान । तूच एक विश्वेशा ॥१९॥ वेदांचाही तर्क चाचरे । शास्त्रांतेहि नावरे । विष्णू शंकर एकसरे । कुंठित झाले सर्वहि ॥२०॥ मी केवळ अल्पमती । करु केवी आपुली स्तुती । सहस्त्रमुखही निश्चिती । शिणला ख्याती वर्णिता ॥२१॥ दृढ ठेविला चरणी माथा । रक्षावे मजसी समर्था । कृपाकटाक्षे दीनानाथा । दासाकडे पहावे ॥२२॥ आता इतुकी प्रार्थना । आणावी जी आपुल्या मना । कृपासमुद्री या मीना । आश्रय देईजे सदैव ॥२३॥ पाप ताप आणि दैन्य । सर्व जावो निरसोन । इहलोकी सौख्य देवोन । परलोकसाधन करवावे ॥२४॥ दुस्तर हा भवसागर । याचे पावावया पैलतीर । त्वन्नाम तरणी साचार । प्राप्त होवो मजला ते ॥२५॥ आशा मनीषा तृष्णा । कल्पना आणि वासना । भ्रांती भुली नाना । न बाधोत तुझ्या कृपे ॥२६॥ किती वर्णू आपुले गुण । द्यावे मज सुख साधन । अज्ञान तिमिर निरसोन । ज्ञानार्क हृदयी प्रगटो पै ॥२७॥ शांती मनी सदा वसो । वृथाभिमान नसो । सदा समाधान वसो । तुझ्या कृपेने अंतरी ॥२८॥ भवदुःख हे निरसो । तुझ्या भजनी चित्त वसो । वृथा विषयांची नसो । वासना या मनाते ॥२९॥ सदा साधु-समागम । तुझे भजन उत्तम । तेणे होवो हा सुगम । दुर्गम जो भवपंथ ॥३०॥ व्यवहारी वर्तता । न पडो भ्रांती चित्ता । अंगी न यावी असत्यता । सत्ये विजयी सर्वदा ॥३१॥ आप्तवर्गाचे पोषण । न्याय मार्गावलंबन । इतुके द्यावे वरदान । कृपा करुनी समर्था ॥३२॥ असोनिया संसारात । प्राशीन तव ज्ञानामृत । प्रपंच आणि परमार्थ । तेणे सुगम मजलागी ॥३३॥ ऐशी प्रार्थना करिता । आनंद होय समर्था । संतोषोनि तत्त्वता । वरप्रसाद देतील ॥३४॥ गुरुवार उपोषण । विधियुक्त करावे स्वामीपूजन । प्रदोषसमय होता जाण । उपोषण सोडावे ॥३५॥ तेणे वाढेल बुद्धी । सत्यसत्य हे त्रिशुद्धी । अनुभवाची प्रसिद्धि । करिताती स्वामीभक्त ॥३६॥ श्री स्वामी समर्थ । ऐसा षडाक्षरी मंत्र । प्रीतीने जपावा अहोरात्र । तेणे सर्वार्थ पाविजे ॥३७॥ ब्राह्मणा क्षत्रियांदिका लागोनी । मुख्य जप हा चहूवर्णी । स्त्रियांनीही निशिदिनी । जप याचा करावा ॥३८॥ प्रसंगी मानसपूजा करिता । तेहि प्रिय होय समर्था । स्वामीचरित्र वाचिता ऐकता । सकल दोष जातील ॥३९॥ कैसी करावी स्वामीभक्ती । हे नेणे मी मंदगती । परी असता शुद्धचित्ती । तेची भक्ती श्रेष्ठ पै ॥४०॥ आम्ही आहो स्वामीभक्त । मिरवू नये लोकांत । जयासी भक्तीचा दंभ व्यर्थ । निष्फळ भक्ती तयाची ॥४१॥ दंभे षोडशोपचारे । ते प्रिय नव्हेचि समर्था । बावे पत्र-पुष्प अर्पिता । समाधान स्वामीते ॥४२॥ जयजयाजी आनंदकंदा । जयजयाजी करुणासमुद्रा । विष्णू शंकराचिया छंदा । कृपा करोनी पुरवावे ॥४३॥ इति श्री स्वामी चरित्र सारामृत । नाना प्राकृत कथा संमत । सदा ऐकोत भाविक भक्त । चतुर्दशोऽध्याय गोड हा ॥४४॥
 
॥ श्रीस्वामीचरणार्पणमस्तु ॥ श्रीमस्तु शुभंभवती ॥
ALSO READ: श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय पंधरावा

संबंधित माहिती

श्री आनंदनाथ महाराज कृत श्रीगुरुस्तवन स्तोत्र

पती-पत्नीच्या वयात किती फरक असावा?

आरती मंगळवारची

श्री स्वामी समर्थ आरती Swami Samarth 3 Aartis

श्री स्वामी समर्थ काकड आरती

हैदराबाद विरुद्ध लखनौ सामना हा आयपीएल प्लेऑफ क्वालिफायरसारखा असेल

धाराशिवमध्ये मतदान केंद्राजवळ चाकूने हल्ला करून एकाची हत्या

रुपाली चाकणकर यांच्या विरोधात पुण्यात गुन्हा दाखल

कोल्हापूर मतदान केंद्रावर वृद्धाचा हृदय विकाराच्या धक्क्याने मृत्यू

भारतीय महिलां आणि पुरुष संघ 4x400 मीटर रिले संघ पॅरिस ऑलिम्पिकसाठी पात्र ठरला

पुढील लेख
Show comments