Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय एकोणीसवा

Webdunia
श्री स्वामी चरित्र सारामृत एकोनविंशोध्याय
॥ श्री गणेशाय नमः ॥ एकाग्रचित्ते करिता श्रवण । तेणे होय दिव्य ज्ञान । त्या ज्ञाने परमार्थसाधन । पंथ सुलभ होतसे ॥१॥ सच्चरित्रे श्रवण करिता । परमानंद होय चित्ता । ओळखू ये सत्यासत्यता । परमार्थ प्रपंचाची ॥२॥ या नरदेहा येवोन । काय करावे आपण । जेणे होईल सुगम । दुस्तर हा भवपंथ ॥३॥ ज्यांसी वानिती भले । सज्जन ज्या मार्गे गेले । सर्व दुःखमुक्त झाले । तो पंथ धरावा ॥४॥ बोलणे असो हे आता । वर्णू पुढे स्वामीचरिता । अत्यादरे श्रवण करिता । सर्वार्थ पाविजे निश्चये ॥५॥ प्रसिद्ध आळंदी क्षेत्री । नामे नृसिंहसरस्वती । जयांची सर्वत्र ख्याती । अजरामर राहिली ॥६॥ कृष्णातटाकी क्षेत्रे पवित्र । ती देखिली त्यांनी समस्त । नाना योगाभ्यासी बहुत । महासाधू देखिले ॥७॥ करावे हठयोगसाधन । ऐसी इच्छा बहुत दिन । नाना स्थाने फिरोन । शोध करिती गुरुचा ॥८॥ जपी तपी संन्यासी । देखिले अनेक तापसी । जे सदा अरण्यवासी । योगाभ्यासी बैसले ॥९॥ एक सूर्यमंडळ विलोकिती । एक पंचाग्निसाधन करिती । एक वायू भक्षिताती । मौन धरिती कितीएक ॥१०॥ एक झाले दिगंबर । एकी केला उर्ध्व कर । एक घालिती नमस्कार । एक ध्यानस्थ बैसले ॥११॥ एक आश्रमी राहोन । शिष्या सांगती गुह्यज्ञान । एक करिती तीर्थाटन । एक पूजनी बैसले ॥१२॥ ऐसे असंख्य देखिले । ज्ञान तयांचे पाहिले । कित्येकांचे चरण धरिले । परि गेले व्यर्थची ॥१३॥ हठयोग परम कठीण । कैसा करावा साध्य आपण । याविषयी पूर्ण ज्ञान । कोणी तयाते सांगेना ॥१४॥ एके समयी अक्कलकोटी । स्वामीदर्शनेच्छा धरूनी पोटी । आले नृसिंहसरस्वती । महिमा श्रींचा ऐकोनी ॥१५॥ नृसिंहसरस्वती दर्शनासी । येती कळले समर्थांसी । जाणिले त्यांच्या हृद़्गता । अंतरामाजी आधीच ॥१६॥ सन्मुख पाहोनी तयांना । आज्ञाचक्र भेदांतला । एक श्लोक सत्वर म्हटला । श्रवणी पडला तयांच्या ॥१७॥ श्लोक ऐकता तेथेचि । समाधी लागली साची । स्मृति न राहिली देहाची । ब्रह्मरंध्री प्राणवायू ॥१८॥ आश्चर्य करिती सकळ । असो झालिया काही वेळ । समाधी उतरता तत्काळ । नृसिंहसरस्वती धावले ॥१९॥ स्वामी पदांबुजांवरी । मस्तक ठेविले झडकरी । सद़्गदित झाले अंतरी । हर्ष पोटी न समावे ॥२०॥ उठोनिया करिती स्तुती । धन्य धन्य हे यतिमूर्ती । केवळ परमेश्वर असती । रुप घेती मानवाचे ॥२१॥ मी आज कित्येक दिवस । हठयोगसाधन करायास । केले बहुत सायास । परी सर्व व्यर्थ गेले ॥२२॥ स्वामीकृपा आज झाली । तेणे माझी इच्छा पुरली । चिंता सकल दुर झाली । कार्यभाग साधला ॥२३॥ असो नृसिंहसरस्वती । आळंदी क्षेत्री परतोनी येती । तेथेचि वास्तव्य करिती । सिद्धी प्रसन्न जयांना ॥२४॥ बहुत धर्मकृत्ये केली । दूरदूर किर्ती गेली । एकेदिवशी काहीवेळी । अक्कलकोटी पातले ॥२५॥ घेतले समर्थांचे दर्शन । उभे राहिले कर जोडोन । झाले बहुत समाधान । गुरुमुर्ति पाहोनिया ॥२६॥ पाहोनी नृसिंहसरस्वतीसी । समर्थ बोलले त्या समयासी । लोकी धन्यता पावलासी । वारयोषिता पाळोनी ॥२७॥ तियेसी द्यावे सोडोनी । तरीच श्रेष्ठत्व पावसी जनी । मग सहजचि सुरभुवनी । अंती जासी सुखाने ॥२८॥ ऐकोनी समर्थांची वाणी । आश्चर्य वाटले सकला मनी । नृसिंहसरस्वती स्वामी असोनी । विपरीत केवी करतील ॥२९॥ परी अंतरीची खूण । यति तत्काळ जाणोन । पाहो लागले अधोवदन । शब्द एक ना बोलवे ॥३०॥ सिद्धी करोनी प्रसन्न । वाढविले आपुले महिमान । तेचि वारयोषितेसमान । अर्थ स्वामीवचनाचा ॥३१॥ असो तेव्हापासोनि । सिद्धी दिधली सोडोनी । येवोनी राहिले स्वस्थानी । धर्मकृत्ये बहु केली ॥३२॥ यशवंतराव भोसेकर । नामे देव मामलेदार । त्यासीही ज्ञान साचार । समर्थ कृपेने जाहले ॥३३॥ ऐसे सच्छिष्य अनेक । श्रीकृपेने ज्ञानी विशेष । ज्यांनी ओळखिले आत्मस्वरुप । महिमा त्यांचा न वर्णवे ॥३४॥ वासुदेव फडके ब्राह्मण थोर । ज्यांची प्रसिद्धी सर्वत्र । इंग्रजी अंमलात अनिवार । होऊनी बंड केले ज्यांनी ॥३५॥ समर्थांची कृपा होता । इच्छित कार्य साधेल तत्त्वता । ऐसे वाटले त्याचे चित्ता । दर्शनाते पातला ॥३६॥ करी नग्न तलवार । घेवोन आला श्रींसमोर । घालोन साष्टांग नमस्कार । मनामाजी प्रार्थीत ॥३७॥ स्वकार्य चिंतोनी अंतरी । खड्ग दिधले श्रींच्या करी । म्हणे मजवरी कृपा जरी । तरी खड्ग हाती देतील ॥३८॥ जावोनी बैसला दूर । श्रींनी जाणिले अंतर । त्यांचे पाहोनि कर्म घोर । राजद्रोह मानसी ॥३९॥ लगबगे उठली स्वारी । सत्वर आली बाहेरी । तरवडाचे झाडावरी । तलवार दिली टाकोनी ॥४०॥ वासुदेवराव पाहोनी । खिन्न झाला अंतःकरणी । समर्थांते आपुली करणी । नावडे सर्वथा म्हणतसे ॥४१॥ कार्य आपण योजिले । ते शेवटा न जाय भले । ऐसे समर्थे दर्शविले । म्हणूनी न दिले खड्ग करी ॥४२॥ परी तो अभिमानी पुरुष । खड्ग घेवोनि तैसेच । आला परत स्वस्थानास । झेंडा उभारिला बंडाचा ॥४३॥ त्यात त्यासी यश न आले । सर्व हेतू निष्फळ झाले । शेवटी पारिपत्य भोगले । कष्ट गेले व्यर्थचि ॥४४॥ असो स्वामींचे भक्त । तात्या भोसले विख्यात । राहती अक्कलकोटात । राजाश्रित सरदार ॥४५॥ काही कारण जहाले । संसारी मन विटले । मग प्रपंचाते सोडिले । भक्त झाले स्वामींचे ॥४६॥ मायापाश तोडोनी । दृढ झाले स्वामीचरणी । भजन पूजन निशीदिनी । करिताती आनंदे ॥४७॥ अकस्मात एके दिवशी । भयभीत झाले मानसी । यमदूत दिसती दृष्टीसी । मृत्यूसमय पातला ॥४८॥ पाहोनिया विपरीत परी । श्रीचरण धरिले झडकरी । उभा राहिला काळ दूरी । नवलपरी जाहले ॥४९॥ दीन वदन होवोनी । दृढ घातली मिठी चरणी । तात्या करिती विनवणी । मरण माझे चुकवावे ॥५०॥ ते पाहोनी श्रीसमर्थ । कृतान्तासी काय सांगत । हा असे माझा भक्त । आयुष्य याचे न सरले ॥५१॥ पैल तो वृषभ दिसत । त्याचा आज असे अंत । त्यासी न्यावे त्वा त्वरित । स्पर्श याते करु नको ॥५२॥ ऐसे समर्थ बोलले । तोची नवल वर्तले । तत्काळ वृषभाचे प्राण गेले । धरणी पडले कलेवर ॥५३॥ जन पाहोनी आश्चर्य करिती । धन्यता थोर वर्णिताती । बैलाप्रती दिधली मुक्ती । मरण चुकले तात्यांचे ॥५४॥ ऐशा लीला असंख्य । वर्णू जाता वाढेल ग्रंथ । हे स्वामीचरित्र सारामृत । चरित्रसारमात्र येथे ॥५५॥ जयाची लीला अगम्य । ध्याती ज्याते निगमागम । सुर-नर वर्णिताती गुण । अनादिसिद्ध परमात्मा ॥५६॥ नानारुपे नटोनी । स्वेच्छे विचरे जो या जनी । भक्ता सन्मार्ग दाखवोनी । भवसागरी तारीत ॥५७॥ त्या परमात्म्याचा अवतार । श्रीस्वामी यति दिगंबर । प्रगट झाले धरणीवर । जगदुद्धाकारणे ॥५८॥ त्यांची पदसेवा निशीदिनी । करोनी तत्पर सदा भजनी । विष्णू शंकराचे मनी । हेचि वसो सदैव ॥५९॥ इति श्री स्वामी चरित्र सारामृत । नाना प्राकृत कथा संमत । सदा परिसोत प्रेमळ भक्त । एकोनविंशोऽध्याय गोड हा ॥६०॥
 
॥ श्रीस्वामीचरणार्पणमस्तु ॥ श्रीमस्तु शुभंभवती ॥
ALSO READ: श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय विसावा

संबंधित माहिती

मंगलाष्टक मराठी संपूर्ण Marathi Mangalashtak

शुक्रवारी कोणत्या मंत्राचा जप करावा?

अक्षय्य तृतीयेला तयार होत आहेत सुकर्म योगासह हे 5 शुभ संयोग, या राशीचे जातक ठरतील भाग्यवान

श्री महालक्ष्मी कोल्हापूर

शुक्रवारची आरती.... जयदेव जयदेव जय विघ्नाधीशा ॥

International Labour Day Wishes In Marathi कामगार दिनाच्या शुभेच्छा

International Labour Day 2024 भारतात कामगार दिन कधी सुरू झाला?

रांची मध्ये अपघात शाळेची बस पलटली, 15 मुलं जखमी

एक देखील मुस्लिमला दिले नाही तिकीट, नेत्याने दिला राजीनामा

महाराष्ट्र दिन कोट्स Maharashtra Day Quotes In Marathi

पुढील लेख
Show comments