Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय चवथा

Webdunia
श्री स्वामी चरित्र सारामृत चतुर्थोध्याय
॥ श्री गणेशाय नमः ॥ मुखे कीर्तन करावे । अथवा श्रवणी ऐकावे । षोडशोपचारे पूजावे । स्वामीचरण भक्तीने ॥१॥ न लगे करणे तीर्थाटन । योग्याभ्यास होमहवन । सांडोनिया अवघा शीण । नामस्मरण करावे ॥२॥ स्वामी नामाचा जप करिता । चारी पुरुषार्थ योती हाता । स्वामीचरित्र गात ऐकता । पुनरावृत्ति चुकेल ॥३॥ गताध्यायाचे अंती । अक्कलकोटी आले यति । नृपराया दर्शन देती । स्वेच्छेने राहती तया पुरी ॥४॥ चोळप्पाचा दृढ भाव । घरी राहिले स्वामीराव । हे तयाचे सुकृत पूर्व । नित्य सेवा घडे त्याते ॥५॥ जे केवळ वैकुंठवासी । अष्टसिद्धी ज्यांच्या दासी । नवविधी तत्पर सेवेसी । ते धरिती मानवरुप ॥६॥ चोळप्पा केवळ निर्धन । परी स्वामीकृपा होता पूर्ण । लक्ष्मी होऊनिया आपण । सहज आली तया घरी ॥७॥ कैसी आहे तयाची भक्ती । नित्य पाहती परीक्षा यति । नाना प्रकारे त्रास देती । परी तो कधी न कंटाळे ॥८॥ चोळप्पाची सद़्गुणी कांता । तीही केवळ पतिव्रता । सदोदित तिच्या चित्ता । आनंद स्वामीसेवेचा ॥९॥ स्वामी नाना खेळ खेळती । विचित्र लीला दाखविती । नगरवासी जनांची भक्ती । दिवसेंदिवस दृढ जडली ॥१०॥ स्वामी केवळ ईश्वरमूर्ती । देशोदेशी झाली ख्याती । बहुत लोक दर्शना येती । कामना चित्ती धरोनी ॥११॥ कोणी संपत्तीकारणे । कोणी मागते संताने । व्हावी म्हणोनिया लग्ने येती दूर देशाहूनी ॥१२॥ शरीरभोगे कष्टले । संसारतापे तप्त झाले । मायामय पसाऱ्याते फसले । ऐसे आले किती एक ॥१३॥ सर्वांशी कल्पद्रुमासमान । होऊनी कामना करिती पूर्ण । भक्तकाजास्तव अवतीर्ण । मानवरूपे जाहले ॥१४॥ भक्त अंतरी जे जे इच्छिती । ते ते यतिराज पुरविती । दृढ चरणी जयांची भक्ति । त्यासी होती कल्पतरू ॥१५॥ जे का निंदक कुटिल । तया शास्ते केवळे । नास्तिकाप्रती तात्काळ । योग्य शासन करिताती ॥१६॥ महिमा वाढला विशेष । कित्येक करू लागले द्वेष । कोणा एका समयास । वर्तमान घडले पै ॥१७॥ कोणी दोन संन्यासी । आले अक्कलकोटासी । हासोनि म्हणती जनांसी । ढोंगियाच्या नादी लागला ॥१८॥ हा स्वामी नव्हे ढोंगी । जो नाना भोग भोगी । साधू लक्षणे याचे अंगी । कोणते ही वसतसे ॥१९॥ काय तुम्हा वेड लागले । वंदिता ढोंग्याची पाऊले । यात स्वार्थ ना परमार्थ मिळे । फसला तुम्ही अवघेही ॥२०॥ ऐसे तयांनी निंदिले । समर्थांनी अंतरी जाणिले । जेव्हा ते भेटीसी आले । तेव्हा केले नवल एक ॥२१॥ पहावया आले लक्षण । समर्थ समजले ती खूण । ज्या घरी बैसले तेथोन । उठोनिया चालिले ॥२२॥ एका भक्ताचिया घरी । पातली समर्थांची स्वारी । तेही दोघे अविचारी । होते बरोबरी संन्यासी ॥२३॥ तेथे या तिन्ही मूर्ती । बैसविल्या भक्ते पाटावरती । श्रीस्वामी आपुले चित्ती । चमत्कार म्हणती करू आता ॥२४॥ दर्शनेच्छू जन असंख्यात । पातले तेथे क्षणार्धात । समाज दाटला बहुत । एकच गर्दी जाहली ॥२५॥ दर्शन घेऊन चरणांचे । मंगल नांव गर्जतीवाचे । हेतू पुरवावे मनीचे । म्हणोनिया विनविती ॥२६॥ कोणी द्रव्य पुढे ठेविती । कोणी फळे समर्पिती । नाना वस्तू अर्पण करिती । नाही मिती तयांचे ॥२७॥ कोणी नवसाते करिती । कोणी आणोनिया देती । कोणी काही संकल्प करिती । चरण पूजिती आनंदे ॥२८॥ संन्यासी कौतुक पाहती । मनामाजी आश्चर्य करिती । क्षण एक तटस्थ होती । वैरभाव विसरोनी ॥२९॥ क्षण एक घडता सत्संगती । तत्काळ पालटे की कुमति । म्हणोनी कवि वर्णिताती । संतमहिमा विशेष ॥३०॥ स्वामीपुढे जे जे पदार्थ । पडले होते असंख्यात । ते निजहस्ते समर्थ । संन्याशांपुढे लोटिती ॥३१॥ पाणी सुटले त्यांच्या मुखासी । म्हणती यथेच्छ मिळेल खावयासी । आजसारा दिवस उपवासी । जीव आमुचा कळवळला ॥३२॥ मोडली जनांची गर्दी । तो येवोनी सेवेकरी । संन्याशांपुढल्या नानापरी । वस्तू नेऊ लागले ॥३३॥ तेव्हा एक क्षणार्धात । द्रव्यादिक सारे नेत । संन्यासी मनी झुरत । व्याकुळ होत भुकेने ॥३४॥ समर्थांनी त्या दिवशी । स्पर्श न केला अन्नोदकासी । सूर्य जाता अस्ताचलासी । तेथोनिया उठले ॥३५॥ दोघे संन्यासी त्या दिवशी । राहिले केवळ उपवासी । रात्र होता तयांसी अन्नोदक वर्ज्य असे ॥३६॥ जे पातले करू छळणा । त्यांची जाहली विटंबना । दंडावया कुत्सित जना । अवतरले यतिवर्य ॥३७॥ त्यांच्या चरणी ज्यांची भक्ति । त्यांचे मनोरथ पुरविती । पसरली जगी ऐशी ख्याती । लीला ज्यांची विचित्र ॥३८॥ श्रीपादवल्लभ भक्ति । कलियुगी वाढेल निश्चिती । त्यांचा अवतार स्वामी यति । वर्णी कीर्ती विष्णुदास ॥३९॥ इति श्री स्वामी चरित्र सारामृत । नाना प्राकृत कथा संमत सदा परिसोत प्रेमळ भक्त । चतुर्थोध्याय गोड हा ॥४०॥
 
॥ श्रीस्वामीचरणार्पणमस्तु ॥ श्रीमस्तु शुभंभवती ॥
ALSO READ: श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय पाचवा

संबंधित माहिती

मंगलाष्टक मराठी संपूर्ण Marathi Mangalashtak

शुक्रवारी कोणत्या मंत्राचा जप करावा?

अक्षय्य तृतीयेला तयार होत आहेत सुकर्म योगासह हे 5 शुभ संयोग, या राशीचे जातक ठरतील भाग्यवान

श्री महालक्ष्मी कोल्हापूर

शुक्रवारची आरती.... जयदेव जयदेव जय विघ्नाधीशा ॥

International Labour Day Wishes In Marathi कामगार दिनाच्या शुभेच्छा

International Labour Day 2024 भारतात कामगार दिन कधी सुरू झाला?

रांची मध्ये अपघात शाळेची बस पलटली, 15 मुलं जखमी

एक देखील मुस्लिमला दिले नाही तिकीट, नेत्याने दिला राजीनामा

महाराष्ट्र दिन कोट्स Maharashtra Day Quotes In Marathi

पुढील लेख
Show comments