Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

रेवंत रेड्डी : झेडपीचं तिकीट नाकारलं, पोलिसांनी उचलून नेलं, आता तेलंगणाच्या मुख्यमंत्रिपदाचे दावेदार

Webdunia
रविवार, 3 डिसेंबर 2023 (15:02 IST)
तेलंगणाच्या निवडणुकीत विद्यमान मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांचा विजयरथ रोखणाऱ्या रेवंत रेड्डींना आता काँग्रेसकडून तेलंगणाच्या मुख्यमंत्रिपदाचे दावेदार म्हणून पाहिलं जातंय.
एकेकाळी जिल्हा परिषदेच्या तिकिटासाठी झगडलेले रेवंत रेड्डी मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीपर्यंत कसे पोहोचले, याची कहाणी रंजक आहे.
 
कधीकाळी माजी मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांच्या तेलगू देसम पक्षाने जिल्हा परिषदेचं तिकीट न दिल्यामुळे अपक्ष निवडणूक लढवलेल्या रेवंत रेड्डींनी काँग्रेसला तेलंगणात लक्षणीय जागा मिळवून दिल्या आहेत.
 
2014 नंतर पहिल्यांदाच काँग्रेस दक्षिणेकडील आणखीन एका राज्यात सत्तेच्या जवळ जाताना दिसत आहे. काही महिन्यांपूर्वीच कर्नाटकात काँग्रेसनं एकहाती विजय मिळवला.
 
54 वर्षांच्या रेवंत रेड्डींचा तेलंगणाच्या राजकारणातला हा करिष्मा येणाऱ्या काळात चर्चेत राहील हे मात्र नक्की.
 
कारण दोन वर्षांपूर्वी तेलंगणामध्ये काँग्रेसची परिस्थिती अत्यंत बिकट असल्याचं राजकीय निरीक्षकांचं मत होतं.
 
2021 मध्ये काँग्रेसच्या प्रदेश कमिटीचे अध्यक्ष झालेल्या रेवंत रेड्डींनी केवळ दोनच वर्षात काँग्रेसला मिळवून दिलेला हा विजय काँग्रेससाठी खूप महत्वाचा आहे.
 
तेलंगणाच्या निवडणूक प्रचारात काँग्रेसच्या सभांना मिळणारा उदंड प्रतिसाद, रेवंत रेड्डींचा आक्रमक पवित्रा आणि मुख्यमंत्री केसीआर यांच्या कार्यपद्धतीबाबत मतदारांमध्ये दिसणारी नाराजी या सगळ्यांचा परिणाम म्हणून एक्झिट पोलमध्येही तेलंगणात काँग्रेस विजय मिळवेल, असा अंदाज वर्तवला गेला होता.
 
तेलंगणामध्ये काँग्रेसचा चेहरा
निवडणूक निकालाच्या एक दिवस आधी रेवंत रेड्डी काँग्रेसच्या कार्यालयात पोहोचले, तेव्हा त्यांच्या समर्थकांनी "सीएम, सीएम" अशा घोषणा दिल्या होत्या.
 
तेलंगणा विधानसभा निवडणुकांमध्ये काँग्रेसचं एकहाती नेतृत्व केलेल्या रेवंत रेड्डी यांना बघून आलेल्या उत्साहातून या घोषणा दिल्या जात होत्या.
 
राहुल गांधी आणि प्रियांका गांधी यांच्यासोबत खांद्याला खांदा लावून तेलंगणात प्रचार केलेल्या रेवंत रेड्डींनी फक्त सहा वर्षांपूर्वीच या पक्षात प्रवेश केला होता.
 
तेलंगणाच्या स्थापनेपासून या राज्याने केसीआर यांच्याव्यतिरिक्त एकाही व्यक्तीला मुख्यमंत्रिपदावर पाहिलेलं नाही. त्यामुळे रेवंत रेड्डी हे तेलंगणाचे दुसरे मुख्यमंत्री असतील का? हा प्रश्न आहे.
याबाबत बोलताना स्वतः रेवंत रेड्डींनी सांगितलं होतं की, "काँग्रेसला या राज्यात एकूण ऐंशी जागा मिळतील आणि जर असं झालं तर निवडून आलेले ऐंशी उमेदवार हे मुख्यमंत्री पदावर दावा करू शकतील."
 
कोण आहेत रेवंत रेड्डी?
अविभाजित आंध्र प्रदेशातील महबूबनगर जिल्ह्यात 1969 मध्ये जन्मलेल्या अनुमुला रेवंत रेड्डी यांनी विद्यार्थीदशेपासूनच राजकारणाला सुरुवात केली.
 
उस्मानिया विद्यापीठातून पदवी घेतलेले रेड्डी सुरुवातीला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संबंधित असलेल्या अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेमध्ये होते. नंतर त्यांनी चंद्राबाबू नायडू यांच्या तेलगू देसम पक्षात प्रवेश केला.
 
पण 2006 मध्ये तेलगू देसम पक्षाने जिल्हा परिषदेचं तिकीट नाकारल्यानंतर त्यांनी त्यांची पहिली निवडणूक अपक्ष उमेदवार म्हणून लढली होती. मेहबूबनगर जिल्ह्यातल्या मिडजील गटाची ती निवडणूक होती.
त्यानंतर 2008 मध्ये अपक्ष उमेदवार म्हणूनच त्यांची विधानपरिषदेवर नियुक्ती करण्यात आली आणि पुढे त्यांनी पुन्हा एकदा तेलगू देसम पक्षाचं काम सुरु केलं.
 
तेलगू देसम पक्षाचे अधिकृत उमेदवार म्हणून त्यांनी 2009 साली आंध्र प्रदेशच्या कोडंगल विधानसभा मतदारसंघातून निवडणूक जिंकली.
 
2014 मध्ये ते तेलंगणा विधानसभेत टीडीपीचे सभागृह नेते म्हणून निवडले गेले. 2017 मध्ये त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. पण, 2018 च्या तेलंगणा विधानसभा निवडणुकीत ते टीआरएसच्या उमेदवाराकडून पराभूत झाल्यामुळे काँग्रेसमध्ये त्यांची सुरुवात चांगली झाली नाही.
 
केसीआर यांनी निवडणुकीच्या वर्षभर आधीच विधानसभा बरखास्त करून निवडणुका घेतल्या होत्या.
 
विधानसभा निवडणुकीत पराभूत झाल्यानंतर, काँग्रेसने त्यांना 2019 च्या लोकसभा निवडणुकीत मलकाजगिरी येथून तिकीट दिले ज्यामध्ये ते केवळ 10,919 मतांनी विजयी झाले.
 
2021 मध्ये काँग्रेसने त्यांची प्रदेशाध्यक्षपदी निवड करून त्यांना मोठी जबाबदारी दिली होती.
 
केसीआर यांच्यावर आरोपांच्या फैरी
दोन तीन वर्षांपूर्वी भाजप तेलंगणामध्ये हातपाय पसरण्याचा प्रयत्न करत होतं.
 
भाजपचे तत्कालीन प्रदेशाध्यक्ष बंडी संजय कुमार यांनी बीआरएस आणि केसीआर यांच्या घराणेशाही आणि राजकारणावर सडकून टीका करून भाजपकडे मतदारांना आकर्षित केलेलं होतं.
 
तेलंगणात भाजप काँग्रेसच्या पुढे दिसत असतानाच भाजपने त्यांचे प्रदेशाध्यक्ष बदलले आणि रेड्डी समुदायाच्या जी. किशन रेड्डी यांना प्रदेशाध्यक्ष केलं. त्यामुळे केसीआर यांच्या विरोधातला मतदार भाजपवर नाराज झाला.
 
केसीआर यांनी एकीकडे राष्ट्रीय राजकारणात प्रवेशाची तयारी सुरु केली आणि दुसरीकडे रेवंत रेड्डी यांना काँग्रेसचा प्रदेशाध्यक्ष बनवण्यात आलं.
 
बंडी संजय यांच्या जाण्याने बोथट झालेल्या केसीआर विरोधाची धुरा रेवंत रेड्डींनी त्यांच्या खांद्यावर घेतली आणि भाजपकडे वळलेला मतदार पुन्हा एकदा काँग्रेसकडे वळू लागला.
 
बीबीसी प्रतिनिधी सर्वप्रिया संगवान यांनी नुकतीच रेवंत रेड्डी यांची मुलाखत घेतली होती आणि विचारले होते की इतक्या कमी कालावधीत ते काँग्रेसचे 'पोस्टर बॉय' कसे बनले?
 
या प्रश्नावर रेड्डी म्हणाले की, ते 20 वर्षांपासून राजकारण करत आहेत आणि गेल्या 15 वर्षांपासून ते विरोधी पक्षात आहेत आणि यामुळे ते जनतेशी जोडले गेले आहेत आणि त्यांना एक ओळख मिळाली आहे.
 
तेलंगणात काँग्रेसचे फक्त 8 आमदार होते आणि बहुमताचा आकडा 60 आहे. दरम्यान, तेलंगणात भाजपही चांगलाच मजबूत झाला असून एआयएमआयएमनेही काँग्रेसवर हल्लाबोल केला आहे.
 
रेड्डी म्हणतात की तेलंगणातील लोकांना माहित आहे की केसीआर आणि भाजपची मिलीभगत आहे तर एआयएमआयएमचे असदुद्दीन ओवेसी हे दोघांमध्ये समन्वयक म्हणून काम करतात.
 
"बीआरएस भाजपला प्रोटेक्शन मनी देत आहे आणि जेव्हा जेव्हा समन्वयाची गरज असते तेव्हा ओवेसीजी येतात आणि दोन पक्षांमध्ये ही भूमिका बजावतात."
 
आमदारांना लाच दिल्याप्रकरणी अटक
2015 च्या विधानपरिषद निवडणुकीमध्ये रेवंत रेड्डी यांना अटक करण्यात आली होती.
 
त्यावर्षी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने विधानपरिषद निवडणुकीत आमदार एल्विस स्टीफन्सन यांना लाच दिल्याप्रकरणी त्यांना अटक करण्यात आलेली होती. तेलगू देसम पक्षाच्या उमेदवाराला मतदान करण्यासाठी ही लाच दिल्याचा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आलेला होता.
 
तेलंगणा उच्च न्यायालयाने सशर्त जामीन मंजूर केल्यानंतर रेवंत रेड्डी यांची 1 जुलै 2015 रोजी सुटका करण्यात आली.
 
काँग्रेसने हा विजय कसा मिळवला?
तेलंगणात सरकार आल्यास प्रत्येक बेरोजगार तरुणाला दरमहा 4000 रुपये, महिलांना 2500 रुपये, वृद्धांना 4000 रुपये दरमहा पेन्शन आणि शेतकऱ्यांना 15000 रुपये देऊ, असे आश्वासन काँग्रेसने दिले आहे.
 
रेवंत रेड्डी म्हणतात की, 'कल्याण मॉडेल आणि विकास मॉडेल या दोन गोष्टी काँग्रेससाठी महत्वाच्या आहेत.
 
सक्षम लोकांना संधी देण्याचा आमचा प्रयत्न असेल, जे लोक इतरांवर अवलंबून आहेत त्यांना आधार देणेही सरकारची जबाबदारी आहे.'
 
तेलंगणात केसीआर सरकारने अनेक कल्याणकारी योजना सुरु केल्या आणि त्याच योजनांमध्ये पैसा वाढवण्याचं आश्वासन काँग्रेसने दिल्याचा आरोप काँग्रेसवर केला गेला.
 
या प्रश्नावर रेड्डी म्हणाले, “आम्ही 2004 ते 2014 पर्यंत दिलेली पेन्शन ही आमची योजना होती. कर्जमाफी, इंदिरा आवास योजना, बेरोजगारांना पैसे देण्याची योजना आमची होती. आम्ही एका वर्षात 2 लाख नोकऱ्या देण्याचे आश्वासन दिले आहे."
 
रेवंत रेड्डी यांनी संपूर्ण निवडणूक प्रचारात काँग्रेसच्या या आश्वासनांचा प्रचार केला. यासोबतच तेलंगणाची स्थापना काँग्रेसनेच केली, हेही मतदारांना पटवून देण्याचा प्रयत्न त्यांनी केला.
 
रेवंत रेड्डी कोडंगल आणि कामारेड्डी या दोन जागांवर निवडणूक लढवत आहेत. कोडंगल ही त्यांची पारंपारिक जागा आहे तर कामारेड्डीमध्ये त्यांची थेट मुख्यमंत्री केसीआर यांच्याशी लढत आहे.
 
कमरेड्डीमध्ये उमेदवारी देऊन काँग्रेसने त्यांना अडकवलं आहे का? या प्रश्नाचं उत्तर देताना ते बीबीसी हिंदीला म्हणाले, "इंदिराजींचा पराभव झाला, एनटीआर हरले, आणि आता केसीआर यांचा नंबर आहे."
 
Published By- Priya Dixit
 
 
 
 
 
 
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

22 डिसेंबर रोजी कालाष्टमी व्रत, या दिवशी 4 शुभ योग तयार होत आहेत, तिप्पट फळ मिळणार

जुन्या कपड्यांचा पोछा वापरल्याने दुर्दैव येते का?

चांगल्या झोपेसाठी या गोष्टी करा, तुमचे आरोग्यही चांगले राहील

Christmas special : या रेसिपी नक्की बनवा

रावणाचा भाऊ कुंभकरण खरोखरच इंजिनिअर होता का?

सर्व पहा

नवीन

LIVE: महाराष्ट्रात ईव्हीएमचा मुद्दा पुन्हा तापणार

मिनी मॅरेथॉन दरम्यान अचानक गोळीबार, एक जण जखमी

संसदेत धक्काबुक्कीत जखमी झालेल्या खासदारांची आज होणार चौकशी

‘अपूर्ण ज्ञान अधर्माला जन्म देते’, म्हणाले आरएसएस प्रमुख मोहन भागवत

अल्लू-अर्जुनच्या घरावर झालेल्या हल्ल्याबाबत सीएम रेवंत रेड्डी यांचे वक्तव्य आले समोर

पुढील लेख
Show comments