Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

पीक विमा योजनेसाठी 1 रुपयात अर्ज कसा करायचा? जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया

Webdunia
सोमवार, 17 जुलै 2023 (07:23 IST)
महाराष्ट्रात 2016 च्या खरिप हंगामापासून प्रधानमंत्री पीक विमा योजना राबवण्यात येत आहे. आता महाराष्ट्र सरकारनं या योजनेत मोठा बदल करण्याचा निर्णय घेतला आहे.
नवीन बदलांनुसार, 'सर्वसमावेशक पीक विमा योजना' पुढच्या 3 वर्षांसाठी राज्यात राबवण्याचा महाराष्ट्र सरकारनं निर्णय घेतला आहे.
 
त्यानुसार, शेतकऱ्यांना आता केवळ 1 रुपयात पीक विम्यासाठी अर्ज करता येणार आहे.
 
याशिवाय सर्वसमावेशक पीक विमा योजना काय आहे, या योजनेत तुम्ही सहभागी कसे होऊ शकता, योजनेसाठीचे पात्रतेचे निकष काय आहेत, जाणून घेऊया.
नेमके काय बदल झालेत?
याआधी प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना खरिप हंगामासाठी विमा संरक्षित रकमेच्या 2 %, रबी हंगामासाठी 1.5% आणि दोन्ही हंगामातील नगदी पिकांसाठी विमा संरक्षित रकमेच्या 5 % एवढा हप्ता भरावा लागायचा.
 
ही रक्कम, 700, 1000, 2000 पर्यंत प्रतिहेक्टरी जायची. आता शेतकरी 1 रुपया भरुन योजनेत सहभागी होऊ शकणार आहेत. शेतकरी हप्त्याची उर्वरित रक्कम राज्य सरकार भरणार आहे.
 
कर्जदार, बिगर कर्जदार शेतकऱ्यांसाठी ही योजना ऐच्छिक करण्यात आली आहे. याशिवाय भाडेतत्त्वार शेती करणारे शेतकरीही या योजनेसाठी अर्ज करू शकणार आहेत.
 
खरिप हंगामातील भात (धान), खरिप ज्वारी, बाजरी, नाचणी, मूग, उडीद, तूर, मका, भूईमूग, कारळे, तीळ, सूर्यफूल, सोयाबीन, कापूस, खरिप कांदा या पिकांसाठी विमा संरक्षण लागू असेल.
 
तर रबी हंगामातील गहू, रबी ज्वारी, हरभरा, उन्हाळी भात, उन्हाळी भूईमूग, रबी कांदा या पिकांसाठी विमा संरक्षण लागू असेल.
 
तुम्ही स्वत: पीक विमा योजनेच्या वेबसाईटवर जाऊन अर्ज करू शकता किंवा CSC सेंटरवर जाऊन अर्ज करू शकता.
 
आता स्वत: ऑनलाईन अर्ज कसा करायचा ते आता पाहूया.
 
ऑनलाईन अर्ज कसा करायचा?
पीक विमा योजनेत तुम्ही स्वत: ऑनलाईन अर्ज करू शकता. त्यासाठी सगळ्यात आधी pmfby.gov.in असं सर्च करायचं आहे. त्यानंतर प्रधानमंत्री पीक विमा योजनेची वेबसाईट ओपन होईल.
 
इथल्या Farmer Application या पर्यायावर क्लिक करायचं आहे. त्यानंतर Guest Farmer या पर्यायावर क्लिक करायचं आहे.
 
आता नवीन शेतकरी म्हणून नोंदणी करायची आहे.
 
इथं सुरुवातीला शेतकऱ्याची माहिती टाकायची आहे. यात शेतकऱ्याचं पूर्ण नाव, रिलेशनशिपमध्ये अर्जदार कुणाचा मुलगा, मुलगी, पत्नी आहे ते निवडायचं आहे. मग पती किंवा वडिलांचं नाव टाकायचं आहे.
 
मोबाईल नंबर टाकून verify वर क्लिक करायचं आहे. त्यानंतर स्क्रीनवर एक captcha कोड दाखवला जाईल. तो टाकून Get OTP क्लिक करायचं आहे.
 
मोबाईलवर आलेला ओटीपी टाकून Submit वर क्लिक करायचं आहे.
मग व्हेरिफिरेशन success झाल्याचं तुम्हाला तिथं दिसेल. यानंतर वय, जात किंवा प्रवर्ग, लिंग निवडायचं आहे.
 
पुढे Farmer type मध्ये शेतकऱ्याचा प्रकार अल्पभूधारक, अत्यल्पभूधारक आहे का ते निवडायचं आहे. मग Farmer category मध्ये अर्जदार जमिनीचा मालक आहे की भाडेपट्टा करार आहे, ते निवडायचं आहे.
 
यानंतर पत्त्याविषयीची माहिती भऱायची आहे.
 
आत राज्य, जिल्हा, तालुका, गाव निवडायचं आहे. पुढे सविस्तर पत्ता टाकून, पिन कोड टाकायचा आहे.
 
पुढे Farmer ID मध्ये UID निवडायचं आहे. मग आधार नंबर अचूकपणे टाकायचा आहे आणि Verify वर क्लिक करायचं आहे.
 
त्यानंतर स्क्रीनवर व्हेरिफिकेशन success झाल्याचा मेसेज दिसेल.
 
पुढे बँक खात्याचा तपशील भरायचा आहे. बँकेचा IFSC कोड माहिती असेल तर yes आणि नसेल तर no या पर्यायावर क्लिक करायचं आहे.
 
मग राज्य, जिल्हा, बँकेचं नाव, शाखा निवडायची आहे. शाखा निवडली की त्यासमोर IFSC कोड आपोआप आलेला दिसेल.
 
पुढे बँक खात्याचा नंबर टाकायचा आहे. तो पुन्हा एकदा टाकून कन्फम करायचा आहे.
 
खाली दिलेला captcha कोड टाकून Create User पर्यायावर क्लिक करायचं आहे.
 
यानंतर तुम्ही भरलेली माहिती तुम्हाला दाखवली जाईल, ती व्यवस्थित वाचून Next वर क्लिक करायचं आहे.
 
पुढे तुम्हाला तुमच्या बँक खात्यांचा तपशील दिलेला दिसेल. त्यापैकी एक खाते तुम्हाला निवडायचे आहे आणि Next वरती क्लिक करायचं आहे.
 
आता पीक विमा योजना आणि क्षेत्रासंबंधीची माहिती भरायची आहे.
 
इथं राज्य महाराष्ट्र आहे, समोर योजनेचं नाव प्रधानमंत्री फसल बिमा योजना निवडायचं आहे, त्यानंतर तिथं खरिप सिझन आणि वर्ष 2023 आपोआप येईल.
 
Land Details मध्ये पिकांची माहिती द्यायची आहे. इथल्या वर्तुळावर क्लिक केलं की खाली तुम्ही ती माहिती भरू शकता.
 
जर तुम्ही मूग, सोयाबीन, कापूस असं एकापेक्षा जास्त पिकांसाठी विमा भरणार असाल तर mix cropping ला yes करायचं आहे. पण, एकाच पिकाचा विमा भरणार असाल तर no करुन एक पीक निवडायचं आहे.
 
पुढे पेरणीची तारीख निवडायची आहे. त्यानंतर खाते क्रमांक आणि गट क्रमांक टाकायचा आहे. पुढच्या Verify पर्यायावर क्लिक करायचं आहे.
 
मग स्क्रीनवर तुमच्या नावावर किती क्षेत्र आहे, याची माहिती दाखवली जाईल.
 
इथल्या वर्तुळावर क्लिक करुन तुमचं क्षेत्र आधीच insured आहे की नाही ते बघायचं आहे. मग submit वर क्लिक करायचं आहे.
 
इथं तुम्ही Insured Area मध्ये तुम्हाला जेवढ्या क्षेत्राचा विमा उतरावयाचा आहे, तेवढे लिहू शकता. त्यानुसार विम्याची रक्कम कमी-जास्त होते.
 
पुढे त्या क्षेत्रासाठी तुम्हाला किती हप्ता भरावा लागेल, ते farmer shares मध्ये दाखवलं जाईल. आता इथं कितीही रक्कम दिसत असली तरी शेवटी पेमेंट करताना तुम्हाला 1 रुपयाच भरावा लागणार आहे. इथल्या next पर्यायावर क्लिक करायचं आहे.
 
आता तुम्हाला कागदपत्रं अपलोड करायची आहेत.
 
सुरुवातीला बँक पासबुक फोटो अपलोड करायचा आहे. त्यानंतर नुकताच काढलेला डिजिटल सहीचा सातबारा उतारा आणि ८-अ उतारा, एकाच पीडीएफ फाईलमध्ये घेऊन अपलोड करायचा आहे.
 
शेवटी पीकपेऱ्याचं घोषणापत्र अपलोड करायचं आहे. याचा साधारण फॉरमॅट तुम्ही खाली दिलेल्या फोटोत पाहू शकता. अशा आशयाचं पत्र साध्या कागदावर लिहून ते अपलोड करायचं आहे.
तिन्ही फोटो अपलोड करुन झाले की तिन्हीसमोरच्या upload पर्यायावर क्लिक करायचं आहे, मग तिथं तिन्ही फोटो अपलोड करण्यात आले, असं success म्हणून दाखवलं जातं.
 
Next वर क्लिक केलं की, शेतकऱ्याची , बँक खात्याची आणि पिकाची माहिती दाखवली जाईल. किती प्रीमियम भरायचा ते दाखवलं जाईल, इथं SUBMIT वर क्लिक करायचं आहे.
 
यानंतर तुमच्या मोबाईलवर एक मेसेज पाठवला जाईल. यात तुमचा अर्ज क्रमांक, विम्याची रक्कम याची माहिती नमूद केलेली असेल.
 
आता पेमेंट करायचं आहे. इथं तुम्हाला 1 रुपयाचं पेमेंट करायचं आहे. हे पेमेंट तुम्ही डेबिट कार्ड, इंटरनेट बँकिंग, यूपीआय, QR कोड वापरुन करू शकता.
 
पेमेंट झालं की शेतकरी अर्जाची पावती तुम्हाला तिथं येईल.
 
इथं खाली असलेल्या Print Policy Receipt पर्यायावर क्लिक करून पीक विमा योजनेत सहभागाची पावती तुम्हाला डाऊनलोड करता येईल.
 
अशाप्रकारे तुम्ही स्वत:हून पीक विमा योजनेसाठी अर्ज करू शकता.
 
महत्त्वाची सूचना
इथं एक गोष्ट लक्षात ठेवायची की, इथं तुम्ही अर्ज केला आहे योजनेत सहभागी होण्यासाठी. याचा अर्थ तुम्ही लाभार्थी ठरलात असा होत नाही.
 
तुमच्या शेतमालाचं नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झाल्यास तुम्हाला 72 तासांच्या आत ती माहिती विमा कंपनी द्यायची आहे.
 
त्यानंतर विमा कंपनी आणि सरकारी अधिकाऱ्यांच्या प्रत्यक्ष पाहणीनंतर पीक विमा योजनेच्या नियमानुसार तुम्ही लाभार्थी म्हणून पात्र आहात का हे ठरवलं जाईल.
 
दुसरं, म्हणजे तुम्ही गावातील सीएससी केंद्रावर अर्ज करणार असाल, तर त्यासाठी तुम्ही सीएससी केंद्र चालकाला 1 रुपयाशिवाय अधिक पैसे देण्याची गरज नाही. कारण पीक विमा योजनेच्या प्रत्येक अर्जासाठी विमा कंपनी सीएससी केंद्र चालकाला 40 रुपये देणार असल्याचं कृषी विभागानं स्पष्ट केलं आहे.
 
Published By- Priya Dixit 
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Margashirsha Purnima 2024: मार्गशीर्ष पौर्णिमेला लक्ष्मी देवीची कृपा मिळविण्यासाठी कोणते उपाय करावेत?

Annapurna Jayanti 2024: अन्नपूर्णा जयंतीच्या दिवशी स्वयंपाकघरात किती दिवे लावावेत?

वृश्चिक राशीत बुधाचा उदय या राशींसाठी खूप शुभ राहील

बाळासाठी भगवान दत्तात्रेयाच्या नावावरुन सुंदर नावे

दत्त जयंती विशेष रेसिपी : सुंठवडा

सर्व पहा

नवीन

एका पोलीस कर्मचाऱ्याने 60 पुऱ्या खाऊन नवा विक्रम केला

धुळ्यात धनादेशावर बनावट स्वाक्षरी करून 51 लाखांची फसवणूक, 6 जणांवर गुन्हा दाखल

Secular Civil Code लागू करेल मोदी सरकार, पंतप्रधानांनी लोकसभेत घोषणा केली

LIVE: रमेश चेन्निथला 17 डिसेंबरला आमदार आणि उमेदवारांची बैठक घेणार,

रमेश चेन्निथला 17 डिसेंबरला आमदार आणि उमेदवारांची बैठक घेणार, महाराष्ट्राच्या पराभवावर काँग्रेस मंथन करणार

पुढील लेख