Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

विज्ञानाच्या इतिहासातील सुवर्णक्षण

श्री. अरविंद रानडे
ND
ND
तीस ऑगस्ट २००९. 'चांद्रयान-१ मोहिम अयशस्वी' अशी बातमी प्रसारमाध्यमातून झळकली आणि आपल्यापैकी अनेक जण उच्चरवात बोलू लागले, ३८६ कोटी रूपयांचा चुराडा करायची काही गरज होती काय? हा म्हणजे पैशाचा शुद्ध अपव्यय आहे. भारत असल्या मोहिमांत कधीच यशस्वी ठरू शकणार नाही. टीकेचा नुसता भडिमार झाला. पण या चांद्रयानाला करायचे होते ते त्याने कधीच साध्य केले होते, याची कल्पनाही या टीकाकारांना होती काय? अर्थात, हे यान त्याच्या निश्चित कालावधीइतके त्याच्या कक्षेत राहिले असते तर चंद्राविषयी आणखी माहिती कळू शकली असती हे मान्य. पण आता मिळालेली माहितीही काही कमी नाही. किंबहूना, त्या आधारवरच नासा आणि भारताने चंद्रावर पाणी असल्याचो शोधून मैलाचा दगड गाठला आहे.

सूर्यमालेत अनेक ग्रह आणि उपग्रहांत पाण्याचे अस्तित्व आहे. पण पृथ्वीचा उपग्रह असलेल्या चंद्रावर पाणी सापडणे ही घटना व्यावहारिक अर्थाने आणि अभ्यासकांसाठीही महत्त्वाची आहे. वैश्विक प्रक्रिया कशी चालते? हे समजून घेण्याबरोबरच थेट मानवाला या पाण्याचा उपयोग इंधनासाठी हायड्रोजन आणि ऑक्सिजन बनविण्यासाठी होऊ शकतो. चंद्रावर हायड्रोजन आणि ऑक्सिजन मुबलक प्रमाणात मिळाल्यास भविष्यातील मोहिमांसाठी तेथेच एखादा तळ तयार करण्यासाठीही या शोधाचा उपयोग करता येईल, असाही या मोहिमेचा एक उद्देश होता.

या चांद्रयानात एकूण ११ वेगवेगळी उपकरणे ठेवण्यात आली होती. त्यात मून मिनरॉलॉजी मॅपर अर्थात ( M3) हे नासाचेही उपकरण होते. यामुळेच चंद्रावरील पाण्याचे कण शोधणे शक्य झाले. चांद्रयान मोहिम गुंडाळली जाण्यापूर्वीच पाण्याचा पुरावा शोधणारी छायाचित्रे याच M3 ने घेतली होती. यापूर्वीही उपग्रहाद्वारे घेतलेल्या छायाचित्रातून चंद्रावर पाणी असल्याचा अंदाज बांधण्यात आला होता. मात्र, M3 च्या छायाचित्रांनी या अंदाजाला बळकटी येऊन पाणी असल्याचा निष्कर्ष अंतिमतः जाहीर करता आला. तब्बल पाच दशकांपासून चंद्राचा वेध घेण्यासाठी मोहिमा सुरू आहेत. त्यानंतर आता कुठे हे लक्षणीय यश लाभले आहे.

चंद्र हा पृथ्वीचा अगदीच शेजारी असल्याने अर्धशतकापूर्वी अवकाश मोहिमांची सुरवात झाली तेव्हापासूनच शास्त्रज्ञांचे त्याच्याकडे लक्ष होते. या विश्वात पृथ्वीबाहेर केवळ चंद्रावरच मानवी पाऊल पडले आहे. १९६९ मध्ये ही ऐतिहासिक घटना घडली. सुरवातीच्या मोहिमांमधून चंद्राचा पृष्ठभाग कोरडा आणि खडकाळ असून तेथे वातावरण नाही, एवढेच समजले होते. पण चंद्रावर पाणी आहे की नाही याची उत्सुकता वाढली ती १९९४ मध्ये झालेल्या क्लेमेंटाईन मोहिमेने. त्यानंतर कॅसिनी फ्लायबाय (१९९९) आणि ल्युनार रिकन्सान्स ऑर्बिटर (२००८) यांनीही चंद्रावर पाण्याचा शोध घेण्याचा प्रयत्न सुरूच ठेवले. अखेर चांद्रयान १ या मोहिमेतून अखेर चंद्रावर पाणी गवसले.

आता चंद्रावर पाणी कुठून आले असेल हे पाहूया. यासंदर्भात दोन शक्यता आहेत. एक म्हणजे धुमकेतू आणि उल्कापाताने ते तिथे आले असेल. साडेतीन ते चार अब्ज वर्षांपूर्वी पृथ्वी आणि चंद्र या दोहोंवर उल्का आणि धुमकेतूंचा वर्षाव होत होता. चंद्राच्या पृष्ठभागावर खाचखळगे आहे, यावरूनही त्याची कल्पना येऊ शकते. धुमकेतूंनी हे पाणी चंद्रावर आणल्याची शक्यता असू शकते. यातले बरेचसे पाणी जाऊनही त्यातले काही शिल्लक असण्याची शक्यता आहे. दुसर्‍या एका तर्कानुसार, सौर वार्‍यांमुळे हे पाणी निर्माण झाल्याची शक्यता आहे. सूर्याकडून चंद्राच्या पृष्ठभागावर एक लाख किलोमीटर प्रति सेकंद या वेगाने हायड्रोजन आयन (विद्युतभारीत कण) किंवा प्रोटॉन आदळले जातात. चंद्राचा पृष्ठभाग दगड आणि धुळीने बनला आहे, ज्यात ४० टक्के ऑक्सिजन आहे. प्रचंड वेगाने येणार्‍या या वार्‍यांमुळे या दगड, धुळीतला ऑक्सिजन सुटा होऊन हाय‍ड्रोजनला जाऊन मिळत असावा. या ऑक्सिजन-हायड्रोजनच्या मीलनातून आणखी हायड्रोजनचे विद्युतभारीत कण आकर्षित होऊन पाण्याची निर्मिती होण्याची शक्यता आहे.

यातली पहिली शक्यता आपण गृहित धरली आणि चांद्रयानाने काढलेले निष्कर्ष खरे मानले तर चंद्रावरील पाणी हे जमिनीच्या एका स्तराखाली दडून बसलेले असावे. या पाण्याचे बाष्पीभवन करण्यापासून हा थर त्या पाण्याला रोखून धरत असावा. हा थर काही मिलीमीटर जाडीचा असला तरी त्यातून जेमतेम लीटरभर पाणी मिळू शकेल. अर्थात, चंद्रावरील या पाण्याचा व्यवहारीक उपयोग ही अद्यापही फार दूरची गोष्ट आहे. पण नुसते पाणी सापडले ही घटनाही अवकाशशास्त्रात मैलाचा दगड ठरणारी आहे.

शेवटी, या अफाट विश्वात मानवाचे स्थान काय याचा शोध घेण्यासाठी विज्ञानाला या जगात कोणत्याही भौगोलिक मर्यादा नसतात आणि असू नयेत. म्हणूनच भारताच्या या चांद्रयानाने लावलेल्या या शोधाचे विज्ञानाच्या इतिहासात आपले म्हणून एक स्थान निर्माण झाले आहे. शिवाय चांद्रयानाच्या यशस्वीतेबाबत शंका उत्पन्न करणार्‍यांची तोंडेही त्यामुळे बंद झाली आहेत.

आतापर्यंत झालेल्या महत्त्वाच्या चांद्रमोहिमा अशा-
१९५९- ल्युना १ हे पहिले अंतराळयान चंद्राच्या दिशेने झेपावले. ल्युना ३ ने चंद्राची अंतर्गत छायाचित्रे पहिल्यांदाच पाठवली.
१९६६- सोव्हिएत ल्युना ९ हे यान चंद्रावर उतरले.
१९६७- चंद्रावर उतरण्यासाठी योग्य जागेचा शोध घ्यावा यासाठी ४ सर्व्हेअर लॅंडिंग आणि ३ ऑर्बिटर मोहिमा अमेरिकेने राबविल्या.
१९६८- अपोलो ८ हे यान पहिल्यांदाच मानवाला घेऊन अंतराळात गेले आणि यशस्वी परत आले.
१९६९- अपोलो ११ या यानाने नील आर्मस्ट्रॉंग आणि एडविन आल्ड्रिन चंद्रावर उतरले. त्यांच्या रूपाने पहिल्यांदाच चंद्रावर मानवी पाऊल पडले.
१९९४- अमेरिकेच्या क्लेमेंटाईन मोहिमेने चंद्राची विविध छायाचित्रे घेतली.
१९९८- अमेरिकेच्याच प्रॉस्पेक्टर यानाने चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर जाऊन पाणी किंवा बर्फ सापडते का याचा शोध घेतला.
२००८- भारताचे पहिले अवकाश यान अर्थात चांद्रयान अवकाशात झेपावले. पण मुदत पूर्ण होण्यापूर्वीच ही मोहिम गुंडाळावी लागली.
२००९- नासाने रोबोमार्फत चंद्राचा अभ्यास करण्यासाठीची पहिली मोहिम हाती घेतली.
सर्व पहा

नक्की वाचा

हितोपदेशातील कहाणी ; आंधळा गिधाड आणि दुष्ट मांजर

Mesh Rashi Varshik Rashifal 2025 in Marathi : मेष रास 2025 राशिभविष्य: नवीन वर्ष कसे असेल, निश्चित उपाय जाणून घ्या

26 नोव्हेंबरपासून बुध दोषामुळे त्रास होईल, या क्षेत्रांवर नकारात्मक परिणाम होईल !

Premature Graying Hair मुलांचे केस आतपासूनच पांढरे होऊ लागले आहेत का? त्यांना हे 5 पदार्थ खाऊ द्या, केस नैसर्गिकरीत्या काळे होतील

कपालभाती प्राणायाम दररोज केल्याने हे 10 आरोग्य फायदे होतात, जाणून घ्या

सर्व पहा

नवीन

LIVE: छगन भुजबळ यांनी देवेंद्र फडणवीस यांचे समर्थन केले

छगन भुजबळ देवेंद्र फडणवीस यांना पाठिंबा देत म्हणाले 132 जागा जिंकल्या तर मुख्यमंत्री भाजपचाच असावा

प्रेयसीची हत्या करून प्रियकराने मृतदेहाचे 50 तुकडे केले

सांगलीतील कृष्णा नदीच्या पुलावरून कार खाली पडल्याने पती-पत्नीसह तिघांचा मृत्यू

नाना पटोले यांनी निवडणूक आयोगाला धारेवर धरत विचारले राज्यात सात टक्के मतदान कसे वाढले?

Show comments