Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

अशोक गेहलोतः काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणुकीचं रण नको, राजस्थानच बरं

अशोक गेहलोतः काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणुकीचं रण नको, राजस्थानच बरं
, गुरूवार, 29 सप्टेंबर 2022 (19:47 IST)
राजस्थानमध्ये मुख्यमंत्रिपदावरून पुन्हा एकदा प्रदेश काँग्रेसमधील गटबाजी चव्हाट्यावर आली आहे. काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणुकीत त्यामुळे नवं वळण आलं आहे.
 
ज्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीवरुन अशोक गेहलोत आणि राजेश पायलट समर्थकांमध्ये राजकारण सुरू झाले, त्या निवडणुकीत भागच न घेण्याचा निर्णय गेहलोत यांनी घेतला.
 
आपण राहुल गांधींना ही निवडणूक लढवण्याची विनंती केली होती पण त्यांनी नकार दिला. म्हणून मी निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला. परंतु आता राजस्थानात झालेल्या घडामोडींमुळे मी निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतला आहे, असं गेहलोत म्हणाले.
 
आज 29 सप्टेंबर रोजी अशोक गेहलोत यांनी काँग्रेसच्या नेत्या सोनिया गांधी यांची 10 जनपथवर भेट घेतली.
 
या दोघांनी राजस्थानात माजलेल्या राजकीय सुंदोपसुंदीवर चर्चा केली.
 
या घडामोडी सुरू असतानाच आता मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री दिग्विजय सिंह यांनीही काँग्रेस अध्यक्षपदाची निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे.
 
गेले काही दिवस काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणुकीची चर्चा सुरू आहे. यामध्ये गेहलोत यांना काँग्रेसअध्यक्षपदाचे दावेदार मानले जात होते. परंतु त्यांच्या निर्णयांतर राजस्थानात घडलेल्या घडामोडींमुळे काँग्रेस पक्षातील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आला.
 
गेहलोत यांनी अध्यक्षपदासाठी मुख्यमंत्रिपद सोडायचे ठरवल्यावर राजस्थानात खळबळ माजली. अशोक गहलोत यांचे समर्थकही आक्रमक झाले. ज्या गटाने सरकार वाचवलं त्याच गटाचा मुख्यमंत्री असावा अशी त्यांची भूमिका होती.
 
रविवारी (25 सप्टेंबर) रात्री उशिरापर्यंत राजस्थान काँग्रेसमध्ये यावरून खलबतं सुरू होती.
 
अशोक गहलोत यांच्या समर्थक आमदारांनी नाराजी व्यक्त करत राजीनामा देण्याचा इशारा दिला, विधानसभा अध्यक्ष डॉ. सी. पी. जोशी यांच्या निवासस्थानी गहलोत समर्थक आमदारांनी त्यांची भेट घेतली.
 
सचिन पायलट आणि त्यांचे समर्थक आमदार, मंत्री शांती धारीवाल, प्रताप सिंह खाचरियावास, अपक्ष आमदार संयम लोढा यांच्यासह अनेक आमदार रविवारी रात्री उशिरा मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी पोहचले होते.
 
या ठिकाणी बैठकीत तिढा सोडवण्याबाबत चर्चा झाली होती. राजस्थानमधला विरोध शांत करण्यासाठी दिल्लीहून पक्षाने अजय माकन आणि मल्लिकार्जुन खरगे यांना जयपूरला पाठवलं. पण दोन्ही नेते विधिमंडळ पक्षाच्या आमदारांची साधी भेटही घेऊ शकले नाहीत.
 
त्यामुळे आमदारांची समजूत काढण्यासाठी गेलेले दोन्ही नेते दिल्लीत परतले.
 
त्यांनी सोनिया गांधी यांची भेट घेतली. या चर्चेत दोन्ही नेत्यांना याबाबत लेखी अहवाल दिला. या प्रकरणामुळे काँग्रेस हायकमांड संतप्त असल्याचं सांगितलं गेलं.
 
आमदारांनी बैठकीत प्रस्ताव मंजूर करण्याऐवजी अनुपस्थित राहाण्याचा निर्णय गेल्याने काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नाराजही झाल्याची चर्चा होती.
 
अशाप्रकारे गटाचं राजकारण करण्यात आघाडीवर असणाऱ्या काही नेत्यांवर काँग्रेसची खप्पामर्जीही झाली. त्यामुळे हे प्रकरण अधिकच चिघळत गेले. आता गेहलोत यांनीच निवडणूक न लढवण्याचा निर्णय धेतल्यामुळे पायलट-गेहलोत गटातील वाद तात्पुरता शमला आहे असं म्हणता येईल.
 
गेहलोत आणि पायलट यांच्यातला वाद कायम का?
अशोक गेहलोत आणि सचिन पायलट यांच्यातला वाद नवीन नाही. मग पक्षाने हा वाद सोडवण्याचा प्रयत्न का केला नाही. हा प्रश्न यापूर्वीच सोडवला असता तर आज ही परिस्थिती उद्भवली नसती.
 
यासंदर्भात बोलताना राजकीय विश्लेषक आणि ज्येष्ठ पत्रकार शेखर अय्यर सांगतात, "2018 ची निवडणूक सचिन पायलट यांच्या नेतृत्त्वात लढवली गेली. त्यावेळी ते राजस्थानचे प्रदेशाध्यक्ष होते. पायलट यांनी संपूर्ण राज्याचा दौरा केला. ते राज्यभरात सगळीकडे फिरले. पण मुख्यमंत्री बनले अशोक गेहलोत. त्यामुळे दोघांमधला वाद कधीच शांत झाला नाही. वाद सोडवण्याचा प्रयत्नही झाला नाही."
 
काँग्रेसच्या कमकुवत नेतृत्वावर अय्यर प्रश्न उपस्थित करतात.
 
ते म्हणाले, "राष्ट्रीय अध्यक्ष बनण्यासाठी हायकंमाड ज्या नेत्यावर विश्वास ठेवतात तोच नेता त्यांचं ऐकत नाही. काँग्रेससाठी याहून मोठी अडचण काय असू शकते? यामुळे पक्षात सोनिया गांधी यांच्या वर्चस्वावरही प्रश्न उपस्थित होतात."
 
शेखर अय्यर पुढे सांगतात, "गेहलोत यांनी अजय माकन आणि खरगे यांना काँग्रेस आमदारांना स्वतंत्र भेटूही दिलं नाही. सर्व आमदारांना एकाच वेळी भेटायचं असं त्यांना सांगितलं. हा शिस्तभंग आहे असं माकन म्हणाले. पण तरीही घटनाक्रम हेच सिद्ध करतो की सध्या काँग्रेस नेतृत्त्वाची स्थिती काय आहे."
 
अशोक गेहलोत कोण आहेत?
अशोक गेहलोत राजस्थानचे मुख्यमंत्री आहेत आणि मुख्यमंत्री म्हणून हा त्यांचा हा तिसरा कार्यकाळ आहे.
अशोक गेहलोत 1968 ते 1972 या काळात गांधी सेवा प्रतिष्ठान बरोबर सेवाग्राममध्ये काम करायचे.
1973 मध्ये नव्याने स्थापन झालेल्या राष्ट्रीय छात्र संगठनेशी त्यांचा संबंध आला. त्यावेळी ते एम.ए. करत होते.
गहलोत यांनी अर्थशास्त्रात एम. ए. केलं आणि त्यानंतर कायद्याचा अभ्यास केला आणि राजकारणाकडे वळले.
पक्षाने 1974 मध्ये त्यांची विद्यार्थी संगठनेच्या राजस्थान प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती केली.
गहलोत यांनी 1977 मध्ये पहिल्यांदा जोधपूरमधून विधानसभा निवडणूक लढले तेव्हा ते चार हजार मतांनी पराभूत झाले.
जोधपूरमधून पहिल्यांदाच 1980 मधून ते खासदार म्हणून निवडून आले. ते जोधपूरमधून पाच वेळा खासदार झाले.
1982 मध्ये इंदिरा गांधी यांच्या मंत्रिमंडळात ते राज्यमंत्री होते.
1991 मध्ये जेव्हा ते कपडा मंत्री झाले तेव्हा त्यांच्या कामचं मोठं कौतुक झालं होतं.
गुजरातमध्ये गेल्या विधानसभा निवडणुकीत त्यांना प्रभारी म्हणून पाठवलं होतं.
याआधी सीताराम केसरी यांच्या रुपात स्वातंत्र्यानंतर काँग्रेसला गांधी कुटुंबाच्या बाहेरचा अध्यक्ष मिळाला होता. नंतर 1998 मध्ये सोनिया गांधीनी पक्षाची कमान त्यांच्या हातात घेतली होती.
 
त्यावेळी काँग्रेसची परिस्थिती अतिशय बिकट होती. राजीव गांधींच्या हत्येनंतर सोनिया गांधी राजकारणापासून दूर होत्या. 1998 मध्ये त्यांनी कार्यभार सांभाळला आणि 2004, 2009 या निवडणुकांमध्ये त्यांनी पक्षाला विजय मिळवून दिला होता.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

शिवसेना कोणाची? उद्धव ठाकरेंकडे आता आहेत 'हे' 4 पर्याय