Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

विधानसभा 2019: शरद पवार यांच्यावरील अमित शहा यांच्या टीकेवर राष्ट्रवादीचे नेते रोहित पवार म्हणाले...

Webdunia
बुधवार, 4 सप्टेंबर 2019 (10:04 IST)
अभिजीत कांबळे
"एका बाजूला सत्ताधारी शरद पवारांबद्दल चांगल्या गोष्टी बोलतात, त्यांच्या कामाचं कौतुक करतात. आणि राजकारणाचा विषय आला की त्यांच्यावर टीका केली जाते," असं राष्ट्रवादीचे नेते रोहित पवार यांनी म्हटलं आहे.
 
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बीबीसी मराठीला दिलेल्या खास मुलाखतीत रोहित पवार यांनी अमित शहा यांनी शरद पवारांवर केलेली टीका, राष्ट्रवादीतून होणारी पक्षगळती आणि या पक्षावरील घराणेशाहीचा आरोप, अशा वेगवेगळ्या प्रश्नांची उत्तरं दिली.
 
पाहा ही संपूर्ण मुलाखत
 
'शरद पवारांनी महाराष्ट्रासाठी काय केलं आहे, ते सांगावं. राष्ट्रवादी काँग्रेस हा लोकशाही मूल्य मानणारा पक्ष नाही, हा पक्ष घराणेशाही मानतो,' या अमित शहांच्या टीकेवर तुमची प्रतिक्रिया काय आहे?
रोहित पवार - निवडणुकीच्या काळात महाराष्ट्रात आल्यानंतर शरद पवारांच्या विरोधात बोललं जात आहे. लोकसभेच्या वेळी त्यांनी जे केलं, तेच विधानसभेच्या काळात करत आहेत. आता राष्ट्रवादीच्या काही ठरावीक नेत्यांना पक्षात घेतल्यानंतर ते बोलत आहेत.
 
पण याआधी नरेंद्र मोदी, अटलबिहारी वाजपेयी या सगळ्या नेत्यांनी पवारांच्या कामाबद्दल नेहमी चांगल्या गोष्टी बोलल्या आहेत. त्यामुळे एका बाजूला पवारांबद्दल चांगल्या गोष्टी बोलल्या जातात आणि राजकारण आल्यानंतर त्यांच्यावर टीका केली जाते.
 
यामुळे मग लोकांच्या मूलभूत समस्या, यामध्ये रोजगार, शेतीचे प्रश्न, यांकडे दुर्लक्ष केलं जातं. हे कुठंतरी थांबलं पाहिजे.
 
गेल्या निवडणुकीच्या निकालानंतर राष्ट्रवादीनं भाजपला पाठिंबा जाहीर केला होता, तो निर्णय चुकला होता, असं वाटतं का?
रोहित पवार - लोकांनी बहुमत दिल्यानंतर नवीन सत्ता स्थापन करण्यासाठी स्थिर सरकार देणं, ही आपली राजकीय जबाबदारी असते, असं शरद पवारांनी म्हटलं होतं. त्यामुळे त्यावेळच्या सरकारला अजून खर्चात न पाडता त्यांना थोडा वेळ देऊन ते काय करतात, हे बघण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला होता. पण त्यानंतर शिवसेना सत्तेत असतानाही सरकारच्या विरोधात बोलत आहेत. पण राजीनामे देण्याची त्यांची हिंमत नाही झाली.
 
राष्ट्रवादीतले अनेक नेते भाजपमध्ये जात आहेत, त्यामुळे पक्षाचं धोरण आणि नेतृत्व या नेत्यांना आपल्याकडे ठेवण्यात अपयशी ठरतंय, असं वाटतंय का?
रोहित पवार - स्थानिक प्रश्नांकडे बघून स्थानिक नेत्यांना पॉवर दिली गेली. पण आज पक्ष सत्तेत नाही, तेव्हा काम होत नाही म्हणून दुसऱ्या पक्षात जावं वाटतं, असं तुम्ही म्हणता. त्यामुळे पक्षातल्या कार्यकर्त्याचं जे स्ट्रक्चर आहे, त्याकडे दुर्लक्ष झालं असावं, असं मला वाटतं. त्यामुळे नेत्याला तोच म्हणजे सर्वस्व आहे, असं वाटतं.
 
राष्ट्रवादीचे नेते सरंजामदार आहे, असं म्हटलं जातं. याकडे कसं पाहता?
रोहित पवार - स्थानिक पातळीवर संस्थांना ताकद देण्याचा पवारांनी प्रयत्न केला. यामुळे त्या त्या भागाचा विकास होईल, असं त्यांचं धोरण होतं. पण ताकद देत असताना त्या संस्था ठराविक लोकांच्या हातात राहिल्या आणि या लोकांना आपणच म्हणजे सर्वस्व आहोत, असं वाटलं. या नेत्यांकडून कार्यकर्त्यांकडे दुर्लक्ष झालं. आता हे नेते कितीही रडत असले आणि दुसऱ्या पक्षात जात असले, तरी सामान्य कार्यकर्ता त्यांच्या पाठीशी नाही.
 
राष्ट्रवादी काँग्रेसवर घराणेशाहीची टीका होते, काय सांगाल?
रोहित पवार - मला असं वाटतं आधी विकासाविषयी बोलायला हवं. लोकांच्या अडचणी समजून त्या सोडवायला हव्यात. यानंतरही आम्ही काम केलं नसेल तर घराणेशाहीवर बोलायला हवं. आणि राष्ट्रवादी-काँग्रेसमध्येच नाही तर शिवसेना आणि भाजपमध्येही घराणेशाही आहे.
 
पद्मसिंह पाटलांवर प्रश्न विचारण्यात आल्यानंतर शरद पवार पत्रकारावर भडकले. यात रागावण्यासारखं काय होतं?
 
रोहित पवार - तो पत्रकार एकच प्रश्न सारखासारखा विचारत होता. त्या पत्रकाराच्या वागण्यावरून तो भाजपचा कार्यकर्ता आहे, असं वाटत होतं. पत्रकारितेची पातळी एवढी खराब झाली की काय, असा विचार साहेबांच्या मनात आला आणि ते रागावले.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

मंदिरात जाण्यापूर्वी केस का धुवावेत ?

अभ्यासाचे टेबल कसे असावे? वास्तु टिप्स जाणून घ्या

योनिमार्गाच्या खाज सुटण्याने त्रास होतो का या 3 उपायांनी काही मिनिटांत आराम मिळेल

पंचतंत्र कहाणी : विश्वासघाताचे फळ

आरोग्यवर्धक व्हेजिटेबल ज्यूस

पुढील लेख
Show comments