Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

बाळू पालवणकर: पहिल्या दलित क्रिकेटरने डॉ. बाबासाहेब आंबेडकरांविरोधात निवडणूक का लढवली होती?

Webdunia
बुधवार, 14 एप्रिल 2021 (21:25 IST)
-पराग फाटक
बाळू पालवणकर या 17 वर्षांच्या मुलाला पूना क्लबमध्ये नोकरी मिळाली, ते वर्षं होतं 1892. पगार होता दर महिन्याला चार रुपये. युरोपियन मंडळींकरता तयार करण्यात आलेल्या खेळपट्टीची देखभाल करणं, रोलर फिरवणं, नेट प्रॅक्टिसची व्यवस्था बघणं ही सगळी कामं त्याला करावी लागणार होती.
 
त्यावेळी भारतात ब्रिटिश जी. जी. ग्रेग नावाचे क्रिकेटपटू होते. त्यांनीच बाळूला बॉल टाकायला सांगितलं. बाळूच्या फिरकीचं कौशल्य पाहून ग्रेग चकित झाले. त्याच्या फिरकीचा सराव व्हावा, यासाठी ग्रेग आधी एक तास येऊ लागले.
 
ग्रेग यांना आऊट केलं तर बाळूला आठ आणे मिळत असत. यातून दोन गोष्टी झाल्या-ग्रेग यांना चांगल्या दर्जाच्या फिरकीचा सामना करता येऊ लागला आणि त्या मुलाला बॉलिंगची, खेळण्याची नियमित संधी मिळाली.
 
बाळूच्या फिरकीची जादू ग्रेग यांच्या सहकाऱ्यांनाही उमगली. त्यावेळी पुण्यातले हिंदू हे ब्रिटिशांच्या संघाला आव्हान देऊ इच्छित होते. बाळूच्या फिरकीच्या बळावर आपण जिंकू शकतो, असा विश्वास त्यांना होता.
 
पण अनेकांसाठी बाळू 'अस्पृश्य' होता! अस्पृश्य मुलाला टीममध्ये घेण्यावरून अनेक वाद झाले. पण त्याला घेतल्याशिवाय ब्रिटिशांना हरवता येणार नाही, ही जाणीव झाल्यामुळे त्याला टीममध्ये स्थान मिळालं.
 
'लगान' सिनेमातला वाटावा असा हा प्रसंग प्रत्यक्षात घडला होता. 'एपिक' या टीव्ही वाहिनीवरच्या 'मिडविकेट टेल्स' या कार्यक्रमात बाळूंसंदर्भात ही माहिती देण्यात आली होती.
 
चहाचा कप वेगळा
भारतीय क्रिकेट प्लेयर म्हटल्यावर चाहत्यांचा गराडा, सेल्फी आणि ऑटोग्राफसाठी झुंबड, मुलाखती-पत्रकार परिषदांची लगबग, इन्स्टाग्राम-फेसबुक-ट्वीटर अकाऊंट हँडल करण्यासाठी स्वतंत्र टीम असं चित्र डोळ्यांपुढे उभं राहतं. पण सव्वाशे वर्षांपूर्वी असं काहीच नव्हतं.
 
तेव्हा क्रिकेट हा ब्रिटिश राज्यकर्त्यांचा खेळ होता. भारतीय लोक हळूहळू तो शिकत होते, पण ब्रिटिशांना हरवणं त्यांना कठीण जायचं.
 
त्या काळात 1875 साली महाराष्ट्र-कर्नाटक सीमेलगत धारवाडला बाळू पालवणकरांचा जन्म झाला. चामड्याशी संबंधित काम करणारे म्हणजेच चर्मकार कुटुंबात ते जन्मले. लहानग्या बाळूचे वडील सैन्यात होते. त्यांना बाळूसह चार मुलं. सैन्याने निकाली काढलेल्या वस्तूंच्या साह्याने बाळू आणि त्याचे भाऊ क्रिकेट खेळायला शिकले.
 
तेव्हा अस्पृश्य मानलेल्या जातीत जन्म झाला होता, पण वडील सैन्यात असल्यामुळे घरातली परिस्थिती बरी होती.
 
"ब्रिटिशांच्या आगमनानंतर आपल्या व्यवस्थेत तळाशी असणाऱ्या वर्गाला थोड्या सुविधा मिळू लागल्या. ब्रिटिशांतर्फे तयार करण्यात आलेल्या सैन्यात काम मिळाल्याने नियमित पगार मिळू लागला. या कामातूनच प्रतिष्ठा मिळू लागली. प्रदीर्घ काळ दुर्लक्षित राहिलेल्या समाजाला वाव मिळू लागला. कामाच्या माध्यमातून इंग्रज लोकांशी त्यांचा संपर्क होत असे. कँप भागात राहता येत असे. राहणीमान सुधारू लागलं, वेगळ्या जगाची ओळख या समाजाला झाली," असं सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील इतिहासाच्या प्राध्यापिका श्रद्धा कुंभोजकर सांगतात.
 
बाळू पुढे पुण्याला आले आणि पूना क्लबमध्ये ग्रेग या ब्रिटिश खेळाडूकडून क्रिकेटचे धडे गिरवू लागले. त्यांचं बॉलिंगमधलं कौशल्य पाहून पुण्याच्या क्लबमध्ये त्यांना स्थान मिळालं खरं, पण बरोबरीची वागणूक मिळत नव्हती.
 
बाळूंना खेळण्याआधी आणि खेळून झाल्यावर वेगळं वागवलं जायचं. त्यांना वेगळ्या कपात चहा दिला जात असे. त्यांच्या जेवणासाठी वेगळी ताटवाटी असे आणि ती त्यांनाच धुवून ठेवावी लागत असे. त्यांना हातपाय धुवायचे असतील तर वेगळा माणूस पाणी आणून देत असे.
 
या अस्पृश्यतेच्या वागणुकीचा बाळूंनी कधी खेळावर परिणाम होऊ दिला नाही. युरोपीय संघाविरुद्ध जिंकून देण्यात त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. बाळूंच्या फिरकीचा करिश्मा चालला आणि पुणे क्लबने युरोपीय संघाला नमवण्याची किमया केली.
 
पुण्यात प्लेग, मुंबईत क्रिकेट
क्रिकेट अभ्यासक, संशोधक आणि इतिहासकार रामचंद्र गुहा यांच्या 'ए कॉर्नर ऑफ ए फॉरेन फिल्ड: द इंडियन हिस्ट्री ऑफ ए ब्रिटिश स्पोर्ट' या पुस्तकात तसंच 'क्रिकेट, कास्ट अँड द पालवणकर ब्रदर्स' या सबऑल्टर्न स्पोर्ट्स पुस्तकात बाळूंच्या कारकिर्दीविषयी तपशीलवार लिहिलं आहे.
 
गुहांनी लिहिलं आहे की युरोपीय संघाला हरवल्यानंतर बाळूंचा साताऱ्यात हत्तीवरून सत्कार करण्यात आला. पुण्याला परतल्यानंतर विचारवंत, अभ्यासक आणि समाजसुधारक महादेव गोविंद रानडे यांच्या हस्ते बाळूंना गौरवण्यात आलं. 'बाळूंबरोबर खेळत असाल तर त्यांच्याबरोबरीने खा-प्या,' असा सल्लाही रानडेंनी दिला.
 
एका सार्वजनिक सभेत लोकमान्य टिळकांनी बाळूंच्या कामगिरीचं कौतुक केलं. समाजरचनेत तळाशी असणाऱ्या वर्गातील व्यक्तीचं जाहीर कौतुक केल्याने टिळकांवर टीकाही करण्यात आली, असं गुहा लिहितात.
 
1896 मध्ये पुण्यात प्लेगची साथ आली. महाभयंकर अशी ती साथ होती. त्याच काळात मुंबईत क्रिकेटला बहर आला होता. म्हणून बाळू मुंबईत गेले. बॉम्बे बेरार अँड सेंट्रल इंडियन रेल्वे कंपनीने त्यांना नोकरी दिली.
 
हिंदू जिमखान्याकडून ते खेळू लागले. मुंबईत त्यावेळी क्वाड्रँग्युलर म्हणजेच चौरंगी स्पर्धा होत असे. हिंदू, पारशी, ब्रिटिश आणि मुस्लीम असे धर्मनिहाय संघ होते.
 
1906 मध्ये या स्पर्धेत हिंदू विरुद्ध ब्रिटिश संघ असा मुकाबला रंगला. बाळूंचा समावेश असलेल्या हिंदू संघाने 242 धावा केल्या. प्रत्युत्तरादाखल खेळताना ब्रिटिशांचा डाव 191 धावांतच आटोपला. हिंदू संघाने दुसऱ्या डावात 160 धावांची मजल मारली आणि ब्रिटिश संघासमोर 212 धावांचं लक्ष्य ठेवलं. मात्र बाळू आणि इरशा या दोन गोलंदाजांनी प्रत्येकी पाच विकेट घेतल्याने ब्रिटिशांचा डाव 102 धावांतच आटोपला.
 
मॅचदरम्यान दोन्ही संघांचे खेळाडू एकत्र जेवले. हिंदू जिमखान्याने बाळू आणि त्यांचे बंधू शिवराम यांना कॅफेतही प्रवेश दिला होता. एका क्रिकेट सामन्याच्या निमित्ताने जातिभेदाच्या भिंती तुटल्या, असं 'द ट्रिब्यून'ने म्हटलं होतं. 'इंडियन सोशल रिफॉर्मर' या वृत्तपत्राने क्रिकेट सामन्याच्या निमित्ताने स्पृश्य-अस्पृश्य भेदाभेद मिटवला यावर प्रदीर्घ लेख छापला.
 
बारोनेट क्रिकेट क्लबचे डॉ. एम.ई. पावरी यांनी बाळूंना 'भारताचे विल्फ्रेड ऱ्होड्स' असं म्हटलं. ऱ्होड्स हे तत्कालीन श्रेष्ठ फिरकीपटू होते.
 
बाळूंची कीर्ती मुंबईपुरती मर्यादित राहिली नाही. ती कलकत्त्यापर्यंत पोहोचली. नाटोरच्या महाराजांनी देशभरातील सर्वोत्तम हिंदू क्रिकेटपटूंचा एक संघ बनवला. या संघाने ऑल युरोपियन कलकत्ता क्रिकेट क्लबला आव्हान दिलं. नाटोरच्या महाराजांनी तयार केलेल्या संघाने युरोपियन संघाला हरवलं.
 
या संघात बाळू आणि त्यांचे छोटे बंधू शिवराम हेदेखील होते. बाळू यांच्यापेक्षा सात वर्षांनी लहान असलेले शिवराम आक्रमक फटकेबाजीसाठी प्रसिद्ध होते.
 
भारतीय टीममध्ये 3 पालवणकर!
भारताबाहेर भारताचं प्रतिनिधित्व करू शकेल, अशी टीम तयार करण्याचे प्रयत्न एव्हाना बारा वर्षं सुरू होता. तीन वेळा संघबांधणीचा प्रयत्न यशस्वी होऊ शकला नाही. अखेर 1911 मध्ये देशातले राजेमहाराजे, उद्योगपती यांनी ब्रिटिश प्रशासन, सनदी अधिकारी, पत्रकार, प्रशिक्षक यांच्या समन्वयातून भारतीय संघ तयार केला.
 
हा संघ निवडण्यासाठी मुंबईत निवड चाचणी सामने खेळवण्यात आले. सहा पारसी, तीन मुस्लीम, पाच हिंदू असा हा संघ होता. संघाचं नेतृत्व केलं पतियाळाचे 20वर्षीय महाराज भूपेंद्र सिंग यांनी.
 
या संघात बाळू, त्यांचे छोटे बंधू शिवराम आणि विठ्ठल असे एकाच कुटुंबातले तिघे होते. यावरून त्या काळी या त्रिकुटाचा क्रिकेटविश्वातला दबदबा लक्षात यावा.
 
प्रशांत किदंबी यांच्या 'क्रिकेट कंट्री: द अनटोल्ड हिस्टरी ऑफ द फर्स्ट ऑल इंडिया टीम' या पुस्तकात या ऐतिहासिक दौऱ्याविषयी विस्तृतपणे लिहिलं आहे.
 
हा संघ इंग्लंड दौऱ्यावर गेला. या दौऱ्यात 23 सामने खेळवण्यात आले. त्यांपैकी 14 सामन्यांना प्रथम श्रेणी दर्जा देण्यात आला. तत्कालीन भारतीय संघाने यांपैकी 10 सामने गमावले, 2 अनिर्णित झाले तर 2 मध्ये भारतीय संघाने विजय मिळवला.
 
बहुतांश सामन्यांमध्ये पराभूत होऊनही बाळूंचं मोठ्या प्रमाणावर कौतुक झालं. बाळूंनी त्या दौऱ्यात 18.14च्या सरासरीने 114 विकेट्स पटकावल्या. इंग्लंडमधल्या पत्रकारांनी, क्रिकेट समीक्षकांनी बाळूंच्या प्रदर्शनाची प्रशंसा केली. कोणत्याही काउंटी संघाला बाळूंना आपल्या संघात घ्यायला आवडेल, अशा शब्दात बाळूंचं कौतुक झालं.
 
भारतीय संघाने जेव्हा इंग्लंडचा दौरा केला, तेव्हा भारतात स्वातंत्र्यासाठी विविध चळवळी सुरू होत्या. त्याच काळात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा सामजिक आणि राजकीय हक्कांसाठी लढा सुरू होत होता.
 
बाळू भारतात परतल्यानंतर, मुंबईत डिप्रेस्ड क्लासेस ऑफ बॉम्बे संघटनेतर्फे त्यांचा सत्कार करण्यात आला. जातीपातींची कर्मठ चौकट भेदल्याबद्दल बाळूंचा गौरव करण्यात आला. त्या कार्यक्रमात बाळूंना जे सन्मानपत्र देण्यात आलं, ते लिहिलं होतं भीमराव आंबेडकर अर्थात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी.
 
आंबेडकरंचा सार्वजनिक जीवनातला हा पहिलाच कार्यक्रम असल्याचं काही पुस्तकांमध्ये नमूद करण्यात आलं आहे.
 
वर्षभरात बाळू यांचा आणखी एक भाऊ गणपत यानेही क्रिकेटची मैदान गाजवायला सुरुवात केली. आक्रमक शैलीत खेळणाऱ्या गणपतच्या फलंदाजीचे अनेक चाहते निर्माण झाले.
 
दलित कॅप्टन होण्याला विरोध
1913 मध्ये हिंदू संघात बाळू यांच्याबरोबरीने शिवराम, विठ्ठल आणि गणपत हे तिघे भाऊही खेळू लागले. हिंदू संघाचे कर्णधार एम.डी. पै होते. पै यांचा गौड सारस्वत ब्राह्मण मित्र मंडळातर्फे सत्कार करण्यात आला. सत्काराला उत्तर देतानाच्या भाषणात पै यांनी बाळूंना टीमचा कॅप्टन करण्याची मागणी केली. बाळू हे संघातले अनुभवी खेळाडू आहेत आणि त्यांची कामगिरी सर्वोत्तम झाली, असा पै यांचा युक्तिवाद होता.
 
समाजरचनेत तळाशी असलेल्या 'अस्पृश्य' माणसाला कॅप्टनपदी नियुक्त करणं हे त्याकाळी जातीची उतरंड फिरवून टाकण्यासारखं होतं. हा मुद्दा केवळ मैदानावरील कामगिरीचा नव्हता, तर खोलवर रुजलेल्या मानसिकतेचा होता.
 
हिंदू जिमखाना संघाचे बाळू कॅप्टन झाले नाहीत. 'बॉम्बे क्रोनिकल' वर्तमानपत्रात यासंदर्भात अग्रलेखही छापून आला. तत्कालीन वाचकांच्या पत्रांमध्येही याचा उल्लेख दिसला होता. या वादामुळे बाळूंना टीम सोडावी लागली. त्यावर टोकाच्या प्रतिक्रिया तत्कालीन वर्तमानपत्रांमध्ये पाहायला मिळाल्या. याचदरम्यान महात्मा गांधींनी अस्पृश्यतेविरोधात आवाज उठवला होता.
 
1920मध्ये आयोजित चौरंगी स्पर्धेत, नियमित कर्णधार पै आजारी पडले. बाळूंना वगळण्यात आलं होतं, मात्र त्यांचे बंधू विठ्ठल आणि शिवराम संघात होते. निवड समितीने पै यांच्याऐवजी देवधर यांची कॅप्टनपदी निवड केली. विठ्ठल आणि शिवराम पालवणकर देवधर यांना वरिष्ठ होते.
 
बाळू संघात नसणं, गणपत या चौथ्या भावाचा अकाली मृत्यू आणि कर्णधारपदापासून दूर राहावं लागणं या एकापाठोपाठ एक धक्क्यांतून विठ्ठल आणि शिवराम यांनी माघार घेतली.
 
कर्णधारपद नियुक्तीवेळी जातीचा मुद्दा अग्रणी ठरला यावरून या दोघांनी सविस्तर निवेदन दिलं. पालवणकर बंधूंच्या समर्थनार्थ निधीही जमा झाला. लोकांच्या विनंतीला मान देऊन बाळू आणि त्यांचे बंधू पुन्हा संघात परतले. बाळू यांना उपकर्णधारपद देण्यात आलं.
 
बाळूंचे धाकटे भाऊ विठ्ठल यांना काही वर्षांच्या संघर्षानंतर हिंदू संघाचं कर्णधारपद मिळालं. त्यांनी यशस्वी नेतृत्व करत विश्वास सार्थ ठरवला.
 
बाळू विरुद्ध बाबासाहेब
बाळूंच्या कारकिर्दीबद्दल डॉ. बाबासाहेब आंबेडकर नियमितपणे बोलत असत. युवा वर्गाला 'बाळूंकडून प्रेरणा घ्या' असं सांगत. 27 जुले 1927 मध्ये बाबासाहेबांनी 'मूकनायक'मध्ये त्यांच्यावर लेखही लिहिला होता.
 
पण हेच बाळू आता बाबासाहेबांच्या विरोधात उभे राहणार होते. निमित्त होतं पुणे कराराचं.
 
'अस्पृश्यां'साठी राखीव जागा आणि स्वतंत्र मतदारसंघाच्या मुद्यावर डॉ. बाबासाहेब आंबेडकर आग्रही होते. मात्र महात्मा गांधींचा याला विरोध होता. यासाठी गांधीजी पुण्यातल्या येरवडा तुरुंगात आमरण उपोषणाला बसले.
 
अस्पृश्यता हा हिंदूंचा अंतर्गत, नैतिक आणि धार्मिक प्रश्न आहे, अशी गांधीजींची भूमिका होती. अस्पृश्यांना स्वतंत्र मतदारसंघ दिल्यास हिंदू समाजाचे विघटन होईल आणि शिवाय त्यातून अस्पृश्यांनाही लाभ होणार नाही, असं गांधीजींना वाटत होतं.
 
गांधीजींच्या उपोषणामुळे अखेर डॉ. आंबेडकर आणि गांधीजी यांच्यात पुणे करार झाला. 'अस्पृश्यां'ना स्वतंत्र मतदारसंघाऐवजी कायदेमंडळात जागा वाढवून देण्यात आल्या.
 
पुणे करार घडवून आणण्यात दाक्षिणात्य सामाजिक नेते एम. सी. राजा आणि बाळू पालवणकर यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती. याविषयी मराठी विश्वकोशात विस्तृत माहिती उपलब्ध आहे.
 
पुणे कराराच्या तरतुदी 1935 च्या कायद्यात अंतर्भूत होत्या, पण त्यानुसार झालेल्या प्रांतिक निवडणुकांमध्ये अस्पृश्यांच्या राखीव 151 जागांपैकी 72 जागांवर काँग्रेसचे उमेदवार निवडून आले. उरलेल्या 78 जागा अस्पृश्यांमधील विभिन्न गटांत वाटल्या गेल्याने निर्वाचित विधिमंडळांमध्ये त्यांचा एक संघटित पक्ष उभा राहू शकला नाही. त्यामुळे दलितांची निराशा झाली.
 
पुणे करार ज्यासाठी झाला ते उद्दिष्ट फलद्रूप न झाल्याने डॉ. आंबेडकरांनी अस्पृश्यांच्या हक्कांसाठी स्वतंत्र पक्ष काढायचं ठरवलं.
 
काँग्रेसला आंबेडकरांविरुद्ध तुल्यबळ उमेदवार हवा होता. 1937मध्ये झालेल्या निवडणुकीत काँग्रेसने बाळू पालवणकरांना मैदानात उतरण्यासाठी प्रवृत्त केलं. बाळूंनी निवडणूक लढवावी हा सरदार वल्लभभाई पटेलांचा आग्रह होता.
 
मैदानावरील दमदार कारकीर्द हा मुद्दा होताच, मात्र बाळू ज्या समाजाचं प्रतिनिधित्व करतात त्या चर्मकार समाजाचा मुद्दाही महत्त्वाचा होता. डॉ. आंबेडकर या मतदारसंघाच्या निवडणूक प्रचारात व्यग्र राहिले तर त्यांना अन्य ठिकाणी लक्ष देता येणार नाही असाही काँग्रेसचा विचार होता.
 
'बाळूंना मत म्हणजे पुणे कराराला मत' असा नारा आंबेडकरांच्या बाजूने देण्यात आला. अस्पृश्यांचे, वंचितांचे नेते म्हणून डॉ. आंबेडकर यांची ओळख प्रस्थापित झाली होती. दुसरीकडे मैदान गाजवल्यामुळे बाळू लोकांना ज्ञात होते. बाळू आणि बाबासाहेबांमध्ये काही मुद्द्यांवर ठळक मतभेद होते - त्यातला एक मुद्दा होता धर्मांतर.
 
चुरशीच्या निवडणुकीत डॉ. आंबेडकरांनी बाळू पालवणकरांना नमवलं. डॉ. आंबेडकरांना 13245 तर बाळू यांना 11,225 मतं मिळाली.
 
लेखक-समीक्षक डॉ. रावसाहेब कसबे सांगतात, "मुळात बाळू हे राजकीय नेते नव्हते. राजकारणात प्रवेश करून सत्ताधीश होणं अशी मनिषा त्यांच्या ठायी नव्हती. क्रिकेटच्या माध्यमातून त्यांनी जो बदल घडवून आणला त्याचा उपयोग करून घेण्याचं काँग्रेसने ठरवलं. मात्र हे डावपेच यशस्वी झाले नाहीत. अस्पृश्य, वंचित समाजाचे नेते म्हणून डॉ. आंबेडकर यांच्या नेतृत्वावर शिक्कामोर्तब झालं."
 
या निवडणुकीत पोटजातींचं राजकारण झालं, असं सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील इतिहासाच्या प्राध्यापिका श्रद्धा कुंभोजकर सांगतात: "बाळू पालवणकर यांनी सुरुवातीला हिंदू महासभेच्या माध्यमातूनही काम केलं होतं. डॉ. आंबेडकरांविरुद्ध ते काँग्रेसच्या तिकिटावर लढले. पक्ष बदलण्याचा परिणाम कदाचित झालेला असू शकतो. बाळू आणि डॉ. आंबेडकर यांच्या निवडणुकीला महार-चर्मकार असा कंगोराही होता. त्या निवडणुकीपर्यंत डॉ. आंबेडकरांच्या नेतृत्वाला मान्यता मिळाली होती हे निकालातून सिद्ध झालं."
 
पुस्तकं, नाटक, सिनेमा
निवडणुकीतल्या पराभवाने बाळूंचं मैदानावरचं कर्तृत्व कमी झालं नाही, असं इतिहासाचे अभ्यासक सदानंद मोरे सांगतात. त्यानंतर बाळूंनी भारतीय दलित सेवा संघाचे उपाध्यक्ष म्हणून कार्य केलं. या कालावधीत अस्पृश्यता निवारणासंदर्भात त्यांचं काम महत्त्वाचं होतं.
 
अस्पृश्य म्हणून शतकानुशतं हिणवलेल्या समाजाला क्रिकेटच्या मैदानात प्रतिष्ठा मिळवून देणाऱ्या बाळू पालवणकरांचं 1955 साली मुंबईत निधन झालं. मामा वरेरकरांनी बाळूंच्या आयुष्यापासून स्फूर्ती घेऊन 'तुरुंगाच्या दारात'हे नाटक लिहिलं.
 
पालवणकर असं भलंमोठं आडनाव असलेल्या बाळ यांनी पी. बाळू अशी आद्याक्षरं स्वीकारली होती. मुंबईतल्या प्रभादेवी या भागात एका रस्त्याचं 'पी.बाळू मार्ग' असं नामकरण करण्यात आलं आहे.
 
इतिहासाच्या कप्प्यात दुर्लक्षित राहिलेला बाळूंचा काळ जागवण्याचं दिग्दर्शत तिग्मांशू धुलिया यांनी निश्चित केलं. त्यासंदर्भात 2017मध्ये त्यांनी घोषणाही केली. वरुण ग्रोव्हर या चित्रपटाच्या कथा-पटकथा प्रक्रियेत असणार होते. मात्र हा प्रकल्प अजूनपर्यंत आकारास येऊ शकलेला नाही.
 
संदर्भ
-रामचंद्र गुहा लिखित- ए कॉर्नर ऑफ ए फॉरेन फिल्ड-द इंडियन हिस्ट्री ऑफ ए ब्रिटिश स्पोर्ट
 
-रामचंद्र गुहा लिखित- क्रिकेट, कास्ट अँड द पालवणकर ब्रदर्स (सबऑल्टर्न स्पोर्ट्स)
 
-पुणे विद्यापीठ प्रकाशित भारतातील दलित चळवळ व चर्मकार समाज
 
-माधव गाडगीळ लिखित गिरकी गिरकी, चेंडूची फिरकी (दैनिक सकाळ) 7 जानेवारी 2017
 
-पुणे करार: मराठी विश्वकोश
 
-ध्रुबो ज्योती लिखित व्हाय इंडिया हॅज फरगॉटन इट्स फर्स्ट दलित क्रिकेटर
 
-रामचंद्र गुहा यांनी भारत: काल, आज या व्याख्यानमालेत केलेलं भाषण (साप्ताहिक साधना)
 
-रोनोजॉय सेन लिखित 'अ नेशन अट प्ले'
 
-प्रशांत किदंबी लिखित फ्रॉम डिसडेन टू हिरोज- द जर्नी ऑफ टू दलित ब्रदर्स इन इंडिया'ज फर्स्ट क्रिकेट टीम

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

अनेक महिने खराब होणार नाही मिठाई, या सोप्या टिप्स अवलंबवा

Healthcare Tips : दिवाळीच्या काळात दमा रुग्णांनी आरोग्याची काळजी घेण्यासाठी टिप्स

आर्थिक संकटातून सुटका हवी असेल तर दिवाळीत हे नक्की खरेदी करा

दिवाळीचे साप्ताहिक राशिभविष्य, जाणून घ्या या आठवड्यात कोणत्या राशींवर देवी लक्ष्मीची कृपा असेल 28 ऑक्टोबर ते 03 नोव्हेंबर 2024

दिवाळीत या जीवांना पाहणे शुभ मानले जाते, जाणून घ्या काय महत्त्व

पुढील लेख
Show comments