Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

'साध्वी' प्रज्ञासिंह ठाकूर यांच्या आशीर्वादाने भाजपचं हिंदुत्वाचं राजकारण

'साध्वी' प्रज्ञासिंह ठाकूर यांच्या आशीर्वादाने भाजपचं हिंदुत्वाचं राजकारण
, बुधवार, 24 एप्रिल 2019 (09:50 IST)
अलीकडेच भाजपने त्यांचे काही उमेदवार जाहीर केले त्यात साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर म्हणून एक उमेदवार आहेत. त्यांच्या प्रज्ञा या नावावरून त्या उत्तरेतल्या प्रज्ञा सिंह असाव्यात हे कळते. पण साध्वी ही काय भानगड आहे ते कळत नव्हते. तेवढ्यात त्या शाप वगैरे देतात असे कळाले तेव्हा मग साध्वी म्हणजे काय त्याचा उलगडा झाला. त्यांनी साधना काय केली आहे, हे तूर्त बाजूला ठेवू. पण त्या शाप देतात म्हणजे खूपच श्रेष्ठ साध्वी असणार हे उघडच आहे.
 
त्यांनी शाप दिल्यामुळे मुंबई पोलीस दलातले एक कर्तबगार अधिकारी हेमंत करकरे यांचा मृत्यू झाला असं त्यांनी स्वतःच सांगितलं आहे. साध्वी सांगतात म्हटल्यावर ते खोटं कसं असेल?
 
तेव्हा करकरे यांना दिलेलं मरणोत्तर अशोक चक्र सरकारने लवकरात लवकर परत घ्यायला पाहिजे. साध्वींचे समर्थक आणि त्यांना उमेदवारी देणार्‍या पक्षाचे समर्थक यांना तीव्रतेने साध्वींवर, आणि एकूणच हिंदूंवर, अन्याय झाल्यासारखे वाटते. त्यांच्या संतप्त भावना खुद्द नरेंद्र मोदी यांनीच व्यक्त केल्या आहेत.
 
पाच हजार वर्षांच्या प्राचीन संस्कृतीवर दहशतवादी असल्याचा आरोप करणार्‍यांना उत्तर म्हणून साध्वी प्रज्ञा सिंग यांना उमेदवारी दिली असे मोदींचे म्हणणे आहे. अर्थात, एवढ्या रागात सुद्धा, प्रज्ञा सिंह यांच्यावरचे आरोप सिद्ध झालेले नाहीत आणि कायद्याने आरोपींना (आरोप सिद्ध होईपर्यंत) निवडणूक लढवता येते असा अचूक वकिली युक्तिवाद प्रज्ञा सिंह यांचे समर्थक करतात. पण प्रश्न कायद्याचा नाहीच, प्रश्न राजकारणाचा आहे.
webdunia
दोन टप्प्यांचं मतदान संपून गेलेलं असताना भाजपने घेतलेला हा निर्णय काय सांगतो?
प्रज्ञा सिंह ठाकूर या मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणात आरोपी आहेत आणि मुख्यतः प्रकृतीच्या कारणावरून त्यांना जामीन मिळालेला आहे. त्यांना उमेदवारी देऊन पाच हजार वर्षांच्या जुन्या संस्कृतीचे काय रक्षण व्हायचे ते होवो, पण एक स्पष्ट संदेश भाजपाने दिलेला आहे.
 
न्यायालयीन आरोप आणि खटले यांना आपण महत्त्व देत नाही, हा त्यातला प्रास्ताविक मुद्दा आहे. खटले झालेच तर चौकशी करणार्‍या पोलीस अधिकार्‍यांची त्यांच्या मरणानंतर देखील बदनामी करून कोणी स्वतंत्र बाण्याने चौकशीच करणार नाही अशी तजवीज करू असाही संदेश यातून साध्वी आणि त्यांचे समर्थक देऊ पाहत आहेत. कारण पोलीस असो की प्रशासन, या यंत्रणांनी हिंदू धर्म आणि संस्कृती यांच्या चौकटीत काम केलं पाहिजे हा त्यांचा आग्रह आहे.
 
पण सरतेशेवटी, ही निवडणूक 'हिंदू धर्म आणि संस्कृती' या मुद्द्याभोवती असणार हा खरा या प्रज्ञा सिंह उमेदवारीच्या प्रकरणातला मध्यवर्ती मुद्दा आहे.
 
विकास हा भाजपचा अगदी आताआतापर्यंत मुख्य मुद्दा होता, त्याची अनेक मध्यमवर्गीयांना आणि किती तरी अर्थतज्ज्ञांना भुरळ पडलेली होती. २०१४ मध्ये तर त्या मुद्द्यावरच आपण निवडणूक लढवतो आहोत असं मोदींचं म्हणणं होतं. भाजपाचा गेल्या दोनेक महिन्यातला दुसरा कळीचा मुद्दा देशाची सुरक्षितता हा होता. अजूनही त्या मुद्द्यावर सर्वत्र प्रचार चालू आहे.
 
गेल्या दोनतीन आठवड्यांमध्ये विकास आणि संरक्षण या दोन्ही मुद्द्यांची जादू काहीशी ओसरली.
 
जसजसा प्रचार जोमात आला तसं गेल्या पाच वर्षांमधील विकासाचा हिशेब लोकांच्या मनात येऊ लागला असणार हे उघड आहे, भाजपचा २०१४ मधला प्रचार इतका प्रभावी होता की तो पाच वर्षांनंतरदेखील लोकांच्या कानात गुंजत असणार!
 
आता पुन्हा तीच विकासाची रेकॉर्ड लावणे अवघड वाटले असणार. आर्थिक प्रश्न, शेतीची दुर्दशा आणि उपजीविकेच्या साधनांची वानवा यांच्यामुळे विकासाच्या प्रचाराला मर्यादा पडतात हे भाजपाच्या एव्हाना लक्षात आलं असणार. मग नवे मुद्दे, नवे आक्रमक चेहरे, नवी प्रतीके, यांचा शोध सुरू झाला.
 
दुसरीकडे, पुलवामा हल्ल्यानंतर आणि विशेषतः भारताच्या हवाई दलाने केलेल्या कारवाईनंतर देशात दहशतवादी हल्ल्याबद्दल एक संतापाची आणि हवाई दलाच्या करवाईबद्दल अभिमानाची प्रतिक्रिया निर्माण झाली होती.
 
पण भाजपने त्या मुद्द्यावर श्रेय घेण्याचा अतिरेक केला, आणि त्यामुळे सरकार आणि पक्ष लष्कराचं श्रेय स्वतः लाटतं आहे अशी प्रतिक्रिया हळूहळू उभी राहात गेली. 'मोदी की सेना' असं आदित्यनाथांनी म्हटलं आणि आता अमित शहा यांनी मोदींनी 'त्यांचं हवाई दल' पाकिस्तानात पाठवलं असं म्हटल्याची बातमी आहे .
 
अशा अतिउत्साही पद्धतीने सैन्याचं स्वपक्षाच्या हत्यारात रूपांतर केल्यामुळे हवाई हल्ले आणि लष्करी प्रत्युत्तर यांचं आकर्षण जनमानसात कमी होणं स्वाभाविक होतं. परिणामी, राष्ट्रवाद, संरक्षण, हवाई हल्ले, ह्या मुद्द्यांचं भावनिक महत्व कमी-कमी होत गेलं.
 
अशा परिस्थितीत, नवे वादग्रस्त मुद्दे काढून आणि चर्चेचा रोख दुसरीकडे वळवून निवडणुकीतील उत्कंठित भावनिकता कायम ठेवण्यासाठी प्रज्ञा सिंह यांना पाचारण केलं गेलं.
 
शिवाय, या निवडीमागे भाजपच्या विचारांचा गाभा असलेल्या हिंदुत्वाचा भाग महत्त्वाचा आहेच.
 
गेल्या पाच वर्षांत मिळालेल्या सत्तेच्या आश्रयामुळे प्रोत्साहित झालेल्या भाजपाच्या हिंदुत्ववादी प्रेरणा या निवडणुकीच्या प्रचारात वारंवार उसळून वर येत आहेत हे गेल्या काही आठवड्यांमध्ये दिसलं होतंच. मुळात मोदी आणि भाजपा यांची सैद्धांतिक भूमिका नेहेमीच हिंदू राष्ट्रवादाची राहिली आहे हे विसरून चालणार नाही.
 
वाजपेयींच्या काळात अडवणींचा आग्रह बाजूला ठेवून पक्षाने सत्ता मिळवण्यासाठी आपली हिंदुत्ववादी भूमिका अंमळ खिशात लपवून ठेवली होती. २०१४ मध्ये मोदींनी आपली भूमिका विकासाची आहे असं सांगितलं होतं त्याला दोन कारणं होती.
 
एक म्हणजे तेव्हाचा देशाचा एकूण माहोल अर्थव्यवस्था ठप्प झाली आहे याच्या चिंतेचा, भ्रष्टाचाराबद्दलच्या रागाचा आणि मनमोहन सिंग सरकारला 'policy paralysis' ने ग्रासले आहे (हा शब्द माध्यमांचा!) या तक्रारीचा होता. तेव्हा जास्त प्रभावी मुद्दा विकासाचा ठरेल आणि त्यामुळे हिंदुत्वाचं आकर्षण नसलेला वर्गसुद्धा मत देईल हे ओळखून मोदी आणि भाजपाने हिंदुत्वाचा मुद्दा काहीसा मागे राहू दिला.
 
शिवाय, मोदी हे तोपर्यंत आक्रमक हिंदुत्वाचे प्रतीक बनलेले होतेच, त्यामुळे हिंदुत्वाची चर्चा न करता त्यांच्या प्रतिमेमुळे काम भागलं.
 
मग २०१९ मध्ये काय वेगळं घडलं?
वर म्हटल्याप्रमाणे विकासाचं नाणं चलनातून बाद झालं. पण केवळ त्यामुळे आता पिशवीतून हिंदुत्वाचा मुद्दा काढला आहे असं नाही; हिंदुत्वाचा वापर असा एक राजकीय बचावाचा मार्ग म्हणून तर होतो आहेच, पण त्याच्या पलीकडे, थेट हिंदुत्वाच्या मुद्द्यावर लोकांना उत्तेजित करण्याचा, कृतिप्रवण करण्याचा आणि त्याचा निवडणुकीत फायदा उठवण्याचा प्रयत्न भाजपा करतो आहे. शिवाय, देशाच्या राजकारणाची आणि सामाजिक-सांस्कृतिक चौकटीची वाटचाल हिंदुत्वाच्या दिशेने घडवण्याचा क्षण आला आहे असं वाटल्यामुळेही भाजप प्रचारात उघडपणे हिंदुत्वाचा मुद्दा आणतो आहे. प्रज्ञा सिंह ठाकूर हे त्या हिंदुत्वाच्या मुद्याचं एक रूप आहे.
 
यश मिळवणार्‍या कोणत्याही संघटनेत जसे हौशे, नवशे, सगळेच असतात, तसं भाजपामध्ये केवळ राजकारणाचा एक मार्ग म्हणून जाणारे आहेत; भाजपच्या हिंदुत्वाचा वापर करून सत्ता मिळवू पाहणारे आहेत, पण भाजपच्या कर्त्या अनुयायांमध्ये खरा मध्यवर्ती गट आहे तो हिंदुत्वाचा पाठिराखा, देशाच्या सार्वजनिक जीवनाला त्यांच्या मते हिंदुत्ववादी वळण देऊ इच्छिणारा गट होय.
 
मोदींच्या नेतृत्वाखाली राजकीय यश मिळाल्यावर ती संधी न दवडता, संस्था ताब्यात घेणं, संवैधानिक संस्था खिळखिळया करणं, याबरोबरच, हिंदुत्व विचाराला समाजात व्यापक स्वीकाहार्यता मिळवून देणं अशा विविध व्यूहरचनांवर भाजपाच्या या मध्यवर्ती किंवा गाभ्याच्या गटाने गेल्या पाच वर्षांत लक्ष केंद्रित केलं.
 
आता यावेळी मिळालेली आणि इथून पुढे मिळणारी सत्ता लांब पल्ल्याच्या हेतूंसाठी वापरायची, एका विशिष्ट विचाराच्या सांस्कृतिक वरचढपणाचा आग्रह धरायचा आणि खुले आम हिंदुत्वाच्या वर्चस्वाचा पाठपुरावा करायचा असा निग्रह करून ही निवडणूक लढवली जाते आहे.
 
वायनाड हा अल्पसंख्याकांचा मतदारसंघ आहे हा मोदींचा आरोप किंवा अलीला बजरंगबलीने प्रत्युत्तर देण्याचा आदित्यनाथ यांचा दावा या सारख्या जाहीर सभांमधल्या भाषेमधून या निवडणुकीत दिला जाणारा संदेश स्पष्ट आहे: एक, भाजपा हा हिंदूंचा पक्ष आहे; दोन, देशात 'हिंदू' बहुसंख्य आहेत म्हणून इथे हिंदूंना भावेल, पटेल अशा रीतीने कारभार आणि सांस्कृतिक व्यवहार झाले पाहिजेत; तीन, बिगर-हिंदू आणि विशेषतः मुस्लिम हे त्यांच्या राष्ट्रनिष्ठेच्या बाबतीत संशयित आहेत आणि म्हणून मुस्लिमांनी आपली राष्ट्रनिष्ठा तर सिद्ध केलीच पाहिजे, पण त्याखेरीज त्यांनी हिंदू संस्कृतीच्या चौकटीत वागायला हवं आणि त्यांच्या धर्माचं पालन करताना देखील इथल्या हिंदुत्वाच्या मर्यादांमध्ये करायला हवं; आणि चार, भाजपाच्या हिंदू राष्ट्रवादाच्या आग्रहामुळे आता भारताची प्राचीन हिंदू संस्कृती पुन्हा एकदा सशक्त होते आहे, त्यामुळे गेल्या (हजारो वर्षांच्या) अन्यायाची परतफेड करण्याची वेळ आता आली आहे.
 
म्हणूनच प्रज्ञा सिंह ठाकूर यांची उमेदवारी म्हणजे प्राचीन संस्कृतीच्या अवमानाच्या प्रतिशोधाचं प्रतीक आहे असं थेट देशाचे पंतप्रधान म्हणतात.
 
पुराणकथांमध्ये साधूंच्या शापाने कोणी पोपट झाल्याच्या तर कोणी दगड होऊन पडल्याच्या गोष्टी आपण ऐकल्या असतील. करकरे कर्तबगार होते त्यामुळे ते परकीय दहशतवाद्यांना प्रतिकार करताना मृत्यू पावले; प्रज्ञा सिंह यांच्या शापाने काही हेमंत करकरे मृत्यू पावले नाहीत, हे आपल्याला माहिती आहेच. पण, शाप नाही तर नाही, 'साध्वी' प्रज्ञा सिंह यांच्या आशीर्वादाने पक्षाला हिंदू मतांची बेगमी करता यावी, अशी चलाख योजना करून प्रज्ञा सिंह यांना भाजपने उमेदवारी तर दिली आहेच, पण शिवाय भारतीय संस्कृतीवरच्या अन्यायाचं त्यांना प्रतीक बनवून भाजपाने आपण राष्ट्रापेक्षा हिंदुत्व मोठं मानतो हे दाखवून दिलं आहे, आणि सध्याच्या निवडणुकीत मध्यवर्ती मुद्दा काय आहे याची स्पष्ट जाणीव करून दिली आहे.

सुहास पळशीकर
 
( लेखातील विचार लेखकाचे वैयक्तिक विचार आहेत. )

Share this Story:

वेबदुनिया वर वाचा

मराठी ज्योतिष लाईफस्टाईल बॉलीवूड मराठी बातम्या

Follow Webdunia marathi

पुढील लेख

बारामतीचे आलेले पार्सल तुम्ही परत पाठवा - मुख्यमंत्री