Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

कोरोना विषाणू : लसपर्यटन! लस घेण्यासाठी अनेकांची परदेशवारी

Webdunia
शनिवार, 22 मे 2021 (20:48 IST)
पाब्लो उचोआ
15 एप्रिलच्या आसपासची तारीख होती. मॉस्कोमध्ये भटकंती करणारे काही पर्यटक पुढच्या सफरीची रुपरेषा आखत होते. त्यांच्या कार्यक्रमात एका अशा स्थानाचाही समावेश होता जे पर्यटनासाठी तर खचितच नव्हतं.
 
ते एका खाजगी मेडिकल क्लिनिकला जाणार होते. या पर्यटकांना मॉस्कोतील सुप्रसिद्ध पर्यटनस्थळांमध्ये विशेष रस नव्हता. ते मॉस्कोत गेले होते ते केवळ रशियाची ज्या 'स्पुतनिक V' लशीची सध्या जगात चर्चा आहे ती लस घ्यायला.
 
या पर्यटकांमध्ये बहुतांश जर्मन होते. त्यांच्या मायदेशात लसीकरण मोहीम अत्यंत धीम्यागतीने सुरू होती आणि म्हणूनच लस घेण्यासाठी ते खास मॉस्कोला गेले होते.
 
या पर्यटकांपैकीच एक होते बर्लिनला राहणारे इनो लेंज. बीबीसीशी बोलताना ते म्हणाले, "नजिकच्या भविष्यकाळात जर्मनीत मला लस मिळण्याची आशा नाही. मी माझ्या डॉक्टरांना विचारलं की मला कधी लस मिळणार? त्यांचं उत्तर होतं - कदाचित ऑक्टोबर किंवा नोव्हेंबरमध्ये आणि तेही लसीचा पहिला डोस."
 
रशियामध्ये 'स्पुतनिक V' लस सर्वांना मोफत आहे. मात्र, पर्यटकांना मेडिकल अपॉइन्मेंटसाठी 240 ते 265 डॉलर्स भरावे लागतात.
'वर्ल्ड व्हिझिटर' ही नॉर्वेतील टूर अँड ट्रॅव्हल कंपनी रशियासाठी या 'लसपर्यटना'च्या सहली आयोजित करते. यात पर्यटकाच्या मेडिकल क्लिनिकपासून ते लसीकरणासाठीची अपॉन्मेंट, त्यांचा प्रवास, रहाण्याची व्यवस्था हे सगळं टूर कंपनी करते.
ही कंपनी लशीच्या प्रत्येक डोससाठी जाण्या-येण्याची आणि रहाण्याची व्यवस्था करते आणि एखाद्याला लशीचा दुसरा डोस घेईपर्यंत रशियातच रहायचं असेल तर त्याचीही व्यवस्था केली जाते.
 
रशियात येणाऱ्यांना कोव्हिड-19 साठीच्या रॅपिड टेस्टचं निगेटिव्ह सर्टिफिकेट असणं बंधनकारक आहे. तसंच हा टेस्ट रिपोर्ट केवळ 72 तासांसाठीच ग्राह्य धरला जातो. रशियात बाहेरून येणाऱ्यांसाठी क्वारंटाईन बंधनकारक नाही.
 
43 पर्यटकांचा एक गट 16 एप्रिलला रशियाला आला होता आणि तेव्हापासून आतापर्यंत 600 हून जास्त बुकिंग्ज झाल्यासचं टूर अँड ट्रॅव्हल्स कंपनीच्या मालकांपैकी एक असलेल्या अल्बर्ट सिगल सांगतात.
 
'गोंधळात टाकणारे नियम'
इनो लेंज 'बर्लिन स्टोरी' संग्रहालयाचे संचालक आहेत. ते कोव्हिड संसर्गाचं प्रमाण अधिक असलेल्या इराकमधल्या कुर्दिस्तानात नेहमीच जात असतात. आपण तिथे स्थलांतरितांना मदत करत असल्याचं ते सांगतात.
 
खरंतर जर्मनीत मानवसेवा करणाऱ्यांना लसीकरणात प्राधान्य देण्याची तरतूद आहे. मात्र, आपण स्वयंसेवक म्हणून काम करत असल्याने जर्मनीत लस मिळाली नसल्याचं इनो सांगतात.
इनो लोंज म्हणतात, "कधी-कधी नियम विचित्र असतात. मला लस मिळाली नाही." इनो लोंज यांनी मॉस्कोसाठी बुकिंग केलं तोवर त्यांच्या 70 वर्षांच्या वडिलांनाही लस मिळाली नव्हती.
 
जर्मनीमध्ये लसीकरणासाठीच्या प्राधान्यक्रम यादीत अडचण नाही, मात्र त्यामुळे लसीकरण खूप धीम्या गतीने सुरू असल्याचं त्यांचं म्हणणं आहे.
 
खरंतर लसीकरणातील या कथित 'असमतोला'विषयी जगभरातून तक्रारी येत आहेत. मात्र, ज्यांच्याकडे पैसे आहेत ते जगात कुठेही जाऊन लस घेऊ शकतात.
 
अशा ठिकाणांच्या यादीत सर्बिया, अमेरिका, संयुक्त अरब अमिराती इतकंच नाही तर मालदीवसारख्या देशांचाही समावेश आहे.
 
मालदीव पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी एका खास 'ट्रॅव्हल पॅकेज योजने'वरही काम करतोय. यात पर्यटकांना 'Three Vs' म्हणजेच 'Visit, Vaccination and Vacation'ची ऑफर आहे. म्हणजेच मालदीवला या, लस घ्या आणि मनसोक्त फिरा.
 
मालदीवच्या पर्यटन मंत्रालयाने बीबीसीला पाठवलेल्या एका ई-मेलमध्ये म्हटलं आहे, "आज सगळं जग बंद आहे. अशावेळी 'Three Vs' अभियान मालदीवला येण्याचा निर्णय घेणाऱ्या पर्यटकांचं प्रतिकात्मक कौतुक करण्यासारखंच आहे. ते घरी परततील त्यावेळी मी लसीकरण सर्टिफिकेट घेऊन आलोय, हे ते सांगू शकतात."
 
"आमची बेटं भौगोलिकरित्या एक-एकटी आहेत, हे आमचं सुदैवच म्हणावं लागेल. आमच्या रिझॉर्ट्समध्ये उत्तम कोव्हिड प्रोटोकॉल पाळला जातो."
 
सर्बियामध्येही आता-आतापर्यंत परदेशी पर्यटकांना लस मिळत होती. मात्र, लसीकरणात आपल्या नागरिकांना प्राधान्य देण्याच्या इराद्याने त्यावर बंदी घालण्यात आली आहे.
 
दरम्यान अमेरिकेतील कॅलिफोर्निया, टेक्सास आणि न्यूयॉर्कमध्ये जिथे मोठ्या संख्येने स्थलांतरित आणि वैध कागदपत्रांशिवाय राहणारे लोक आहेत तिथेही लसीकरणासाठी प्रयत्न करणाऱ्यांची संख्या अचानक वाढली आहे.
 
यात कॅनडा आणि लॅटिन अमेरिकेतून आलेले लोक आहेत. तिथल्या लसीकरण आणि क्वारंटाईनच्या सुलभ नियमांचा फायदा लाटण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. मात्र, त्यावरून वादही सुरू झाला आहे.
 
फ्लोरिडामध्ये श्रीमंत आणि परदेशातून आलेल्यांची संख्या मोठी आहे. इथे 65 वर्षांहून मोठ्यांना लसीकरणात प्राधान्य देतात. शिवाय, या लोकांना लस देताना ते कुठून आलेत, हे बघितलं जात नाही
काही दिवसांपूर्वी मेक्सिकोतील 73 वर्षांचे टिव्ही प्रेझेंटर जुआन जोस ओरिगेल यांनी ट्वीटरवरच्या आपल्या 13 लाख फॉलोअर्सना आपण मियामीमध्ये लस घेऊन किती आनंदी आणि समाधानी आहोत, हे सांगितलं होतं.
 
जानेवारी महिन्यात केलेल्या ट्वीटमध्ये ते लिहितात, "धन्यवाद अमेरिका. माझा स्वतःता देश मला ही सुरक्षा देऊ शकला नाही, ही किती खेदाची बाब आहे."
 
ज्यावेळी जुआन जोस ओरिगेल यांनी अमेरिकेत लस घेतली तोवर त्यांच्या स्वतःच्या देशात मेडिकल स्टाफ आणि फ्रंटलाईन वर्कर्सनाही लस मिळालेली नव्हती.
 
'नैतिकतेचा प्रश्न'
मात्र, लसपर्यटनावरून जे सोशल मीडियावर व्यक्त होत आहेत, त्यांच्यावर टीकाही होतेय.
 
'ग्लोबट्रेंडर' या पर्यटन क्षेत्राशी संबंधित संस्थेने सर्वात आधी 'व्हॅक्सीन व्हीआयपी' संज्ञा वापरली होती. ही संज्ञा त्या अभिजात पर्यटकांसाठी वापरली होती जे 'लसीच्या रांगेत सर्वात पुढची जाग विकत घेऊ इच्छितात'.
 
लस वितरणावरून जगभरात असमतोल दिसून येतो. ते बघता 'ग्लोबट्रेंडर'ने यावरून 'नैतिकतेचा प्रश्न' उपस्थित केला होता.
जानेवारीत लंडनमधली प्रसिद्ध ट्रॅव्हल एजंसी असणारी 'नाईट्सब्रिज सर्कल' दुबईसाठी लक्झरी व्हॅक्सिन हॉलिडे ट्रीप आयोजित करत असल्याचं कळलं. यासाठी तब्बल 40 हजार पाउंड बुकिंग रक्कम होती. भारतीय रुपयात ही रक्कम 41 लाख रुपयांहूनही जास्त आहे.
 
मात्र, ही सेवा 'नाईट्सब्रिज सर्कल'च्या त्या सदस्यांसाठीच होती ज्यांनी कंपनीच्या ट्रॅव्हल आणि लाईफस्टाईल सर्व्हिससाठी 25 हजार पाउंड भरले होते.
 
'नैतिकरित्या काहीच गैर नाही'
जगभरात कोव्हिड साथीचं व्यापक रुप बघता आरोग्य कर्मचाऱ्यांना लसीकरणात प्राधान्य द्यायला हवं, असं जागतिक आरोग्य संघटनेचं (WHO) म्हणणं आहे.
 
याशिवाय जागतिक आरोग्य संघटनेच्या गाईडलाईन्सनुसार वृद्ध आणि संसर्गाचा धोका असणाऱ्यांनाही प्राधान्य मिळायला हवं.
 
अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी ज्यांना प्रवास करावा लागतो, त्यांचाही या यादीत समावेश करता येऊ शकतो. तसंच स्थानिक पातळीवर संसर्गाचं प्रमाण वाढत असल्यास लसीच्या पुरेशा साठ्याची व्यवस्था करावी, असंही डब्लूएचओचं म्हणणं आहे.
 
मात्र, जे देश परदेशातून आलेल्या पर्यटकांना लस देत आहेत तिथे लसीचा तुटवडा असल्याचं जाणवत नाही.
 
सर्बियाच्या पंतप्रधान एना बर्नाबिक यांनी परदेशी पर्यटकांना लस ऑफर केली नसती तर देशात लसीचे हजारो डोस वाया गेले असते, असं म्हटलं आहे. सर्बियामध्ये आजही नागरिकांना लसीबाबत साशंकता आहे.
 
मालदीवमध्ये निम्म्याहून अधिक लोकसंख्येला लसीचा पहिला डोस मिळाला आहे. पर्यटन व्यवसायाशी संबंधित 99% लोकांना लस मिळाली आहे.
 
तर तिकडे रशियात जास्तीत जास्त नागरिकांनी स्पुतनिक V लस घ्यावी, यासाठी सरकार धडपडत असल्याचं दिसतं. रशियात केवळ 8% लोकांनीच लसीचा पहिला डोस घेतल्याचं आकडेवारीवरून स्पष्ट होतं. 60 हून अधिक देश रशियाची लस आपल्या नागरिकांना देत आहेत.
 
रशियामध्ये स्पुतनिक V लस उपलब्ध असून कुणालाही यापासून वंचित ठेवलं जात नाहीय आणि म्हणूनच 'यात नैतिकदृष्ट्या काहीही गैर नसल्याचं' मॉस्कोसाठी टूर सर्व्हिस देणारे अल्बर्ट सिगल म्हणतात.
 
लस पर्यटनाचा खर्च परवडू शकेल, अशा जर्मन नागरिकांसाठी ही संधी म्हणजे लसीकरणाच्या रांगेत एक पाऊल पुढे जाण्यासारखं आहे, असं 'वर्ल्ड व्हिझिटर' या टूर अँड ट्रॅव्हल कंपनीच्या वेबसाईटवर लिहिलं आहे.
 
जागतिक साथीमुळे पर्यटन व्यवसाय पूर्णपणे ठप्प झाला. या क्षेत्राला लॉकडाउनची मोठी झळ बसली. मात्र, लस पर्यटनामुळे थोडी आशा दिसत असल्याने हे एखाद्या संजीवनीपेक्षा कमी नाही, असं अलबर्ट सिगल यांना वाटतं.
 
बीबीसीशी बोलताना ते म्हणाले, "गेलं वर्षभर आमचं काम पूर्णपणे बंद होतं. त्यामुळे आमच्यापुढे एकतर गप्प बसून रहाणे किंवा लस पर्यटन सुरू करणे, हेच दोन पर्याय होते. आम्ही दर महिन्याला किमान 1800 लोकांना वेळेआधी लस घेण्यास मदत करतोय. या साथीत ही संख्या खूप मोठी नसली तरी यामुळे आमचा व्यवसाय रुळावर येतोय."
 
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

मार्गशीर्ष गुरुवारी महाविष्णूच्या पूजेचे महत्त्व आणि उपासनेची सोपी पद्धत जाणून घ्या

हे 3 गुण असलेल्या महिला भाग्यवान असतात, नवरा आणि सासरचे लोक नेहमी आनंदी राहतात !

घरात या 5 पक्ष्यांचे फोटो लावा, ज्ञान- समृद्धी वाढते, तिजोरी धनाने भरलेली राहते

आपले नाते कसे मजबूत करावे, 5 गोष्टी लक्षात ठेवा

त्वचेच्या कर्करोगाच्या संरक्षणासाठी हे उपाय खूप प्रभावी आहेत

पुढील लेख
Show comments