Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

फालुन गोंग : चीनमधली बंदी असलेली गूढ अध्यात्मिक चळवळ ‘ज्यांचा औषधोपचारावर विश्वास नाही’

Webdunia
सोमवार, 18 डिसेंबर 2023 (15:25 IST)
-डॅनी व्हिन्सेंट
एक महिला बूट न घालता छत्रीखाली पसरलेल्या प्लास्टिकच्या कागदावर उभी आहे. पोर्टेबल स्पीकरमधून भक्तिसंगीत, आध्यात्मिक प्रवचनाचा आवाज येतोय आणि ती ध्यान करत आहे.
 
चीनने दिलेल्या वागणुकीच्या विरोधात उभी राहणारी ती फालुन गोंग पंथाची एकमेव निदर्शक आहे. ती ज्या इमारतीसमोर उभी आहे ते हाँगकाँगमधील चिनी सरकारचं कार्यालय आहे.
 
पूर्वी इथे भरपूर लोक निदर्शन करण्यासाठी जमायचे. पण 2020 मध्ये, चीनने हाँगकाँगमध्ये राष्ट्रीय सुरक्षा कायदा लागू केल्यामुळे इथल्या सरकारला आंदोलकांवर खटला चालवण्याची परवानगी मिळाली. त्यामुळे फालुन गोंगचे सदस्य इथं निदर्शनं करण्याचं धाडस करत नाहीत.
 
खरंतर, स्वतःला फालुन गोंगचे सदस्य म्हणवणाऱ्या लोकांना शोधण्यासाठी तुम्हाला देशाबाहेर जावं लागेल.
 
फालुन गोंग पंथ काय आहे?
फालुन गोंगचे अनुयायी तैवानची राजधानी, तैपेईच्या बाहेरील एका इमारतीच्या वरच्या मजल्यावर पालथी मांडी घालून ध्यानाला बसतात.
 
या पंथाचे संस्थापक ली हाँग शी यांची शिकवण ते मोठ्याने वाचतात. त्यांच्या गुरूचं फ्रेम केलेलं चित्र भिंतीवर टांगलेलं असतं. त्यांचे शब्द खोलीत घुमत असतात.
 
तैवानच्या स्वशासित बेटावर हा पंथ आपल्या श्रद्धांचं पालन करण्यास स्वतंत्र आहे, त्यांना अटकेची भीती नाही.
 
मात्र चीनच्या कम्युनिस्ट पक्षाने या अध्यात्मिक पंथावर बंदी घालून या अध्यात्मिक चळवळीला 'दुष्ट पंथ' घोषित केलंय याला दोन दशकं उलटली.
 
फालुन गोंगचा आरोप आहे की, त्यांच्या सदस्यांना चीनमध्ये दडपशाहीचा सामना करावा लागतो. त्यांच्याकडून जबरदस्तीने काम करवून घेतलं जातं आणि त्यांचे अवयव मिळविण्यासाठी त्यांची हत्या देखील केली जाते.
 
चिनी प्रशासनाने हे आरोप फेटाळले आहेत, परंतु एका स्वतंत्र आंतरराष्ट्रीय न्यायाधिकरणाने हे खरं असल्याचं म्हटलंय.
 
डिसेंबर 2018 मध्ये एका अंतरिम निर्णयात असं म्हटलं होतं की, "चीनमध्ये कैद्यांचे अवयव काढण्याचा प्रघात फार पूर्वीपासून सुरू आहे आणि बळींची संख्या लक्षणीय आहे."
 
फालुन गोंग हा चिनी सरकारचा सर्वांत मोठा संघटित विरोधक असल्याचं म्हटलं जातं, परंतु प्रत्यक्षात हा पंथ नेमका काय आहे ते जाणून घेऊ.
 
चमत्काराचा दावा
तैवानमधील फालुन गोंग गुरु लियाओ म्हणतात की, "ही एक आध्यात्मिक चळवळ आहे. यात व्यायाम आणि ध्यान या दोन्हींचा समावेश आहे."
 
या पंथाचे गुरू ली होंग झी यांच्याविषयी बोलताना निवृत्त व्यापारी असलेले वांग म्हणतात, "आम्ही त्यांना देव मानतो. हे अगदी येशू किंवा मोहम्मद पैगंबरांसारखे आहेत. आमचा विश्वास आहे की त्यांच्याकडे खूप ज्ञान आहे."
 
वांग आणि त्यांची पत्नी चेन हे एक दशकापासून फालुन गोंगचे अनुयायी आहेत. चेन म्हणतात, "फालुन गोंग चमत्कारिक आहे."
 
दोन दशकांपूर्वी त्यांना हिपॅटायटीस बी आजाराचं निदान झालं होतं. फालुन गोंगच्या एका सत्रात गेल्यानंतर त्यांना जो अनुभव आला त्याचं वैद्यकशास्रात उत्तर मिळत नाही.
 
त्या सांगतात, "माझ्या संपूर्ण शरीरावर लाल पुरळ उठले, पण जस जसे पुरळ निघून गेले, तसा अजारही बरा होत गेला."
 
चेन म्हणतात, "मला वाटतं की मास्टर ली यांनी माझ्या शरीराचं शुद्धीकरण केलं आहे. माझा आजार बरा केल्याबद्दल मी मास्टर ली यांची खरोखर आभारी आहे. बहुतेक आजारी लोक, अगदी कॅन्सर असलेले लोक देखील फालुन गोंगमुळे बरे झाले आहेत."
 
मात्र, फालुन गोंगने रोगांबद्दल जे दावे केले आहेत त्यासाठी स्वतंत्र वैद्यकीय पुरावे मिळत नाहीत.
 
अनुयायी काय म्हणतात?
चेन म्हणतात, "जे लोक फालुन गोंगचे व्यायाम करतात ते आजारी पडत नाहीत. मास्टर ली यांनी आम्हाला सांगितलं होतं की जर तुम्ही आजारी पडलात तर ते तुमच्या कर्माचं फळ आहे. यासाठी तुम्हाला औषध घेण्याची गरज नाही."
 
चिनी कम्युनिस्ट पक्षाचं म्हणणं आहे की, या शिकवणीमुळेच फालून गोंग धोकादायक आहे.
 
फालुन गोंग पंथाचं म्हणणं आहे की, त्यांच्या चळवळीला बदनाम करण्यासाठी सरकारने प्रचार मोहिम राबवली आहे.
 
परंतु संस्थापक ली हाँग झी आणि त्यांच्या पंथाच्या आरोग्यावरील शिकवणीवर टीका करणारे देखील आहेत.
 
या पंथाचे माजी सदस्य सॅम (नाव बदललं आहे) यांनी नाव न सांगण्याच्या अटीवर बीबीसीला सांगितलं की, "ते आजार बरे करणारे म्हणून त्यांची प्रतिमा तयार करतात. लोकांचा विश्वास जिंकण्यासाठी ते जीवन आणि मृत्यूची परीक्षा म्हणून आजाराचा वापर करतात.
 
जेव्हा एखादा आपल्या मनाने बरा होतो तेव्हा तो चमत्कारिकरित्या बरा झाल्याचं सांगितलं जातं, रुग्णाचाही यावरील विश्वास दृढ होतो. जेव्हा लोक मरतात तेव्हा त्यांचा यावरील विश्वास आणखीन वाढत जातो आणि ते या पंथाच्या आहारी जातात."
 
त्यांनी सांगितलं, "मी अनेक लोकांना ओळखतो जे उपचाराविना मरण पावले. जे लोक बरे झालेत किंवा जिवंत आहेत ते फालुन गोंगच्या शिकवणीमुळे नाही तर स्वतःमुळे जिवंत आहेत."
 
दडपशाहीचे आरोप
1992 मध्ये जेव्हा ईशान्य चीनमध्ये फालुन गोंगचा प्रसार होऊ लागला तेव्हा चिनी अधिकाऱ्यांनी याकडे सार्वजनिक आरोग्यासाठी उपयुक्त म्हणून पाहिलं.
 
यानंतर देशात क्विगोंग विषयी कुतूहल निर्माण झालं. ही एक अशी मुद्रा आहे जी शरीराच्या हालचाली आणि श्वासोच्छवास नियंत्रित करते.
 
1990 च्या दशकाच्या उत्तरार्धात, फालुन गोंगने त्यांचे कम्युनिस्ट पक्षापेक्षा जास्त अनुयायी असल्याचा दावा केला. 1999 मध्ये त्यांचे जगभरात 10 कोटी अनुयायी असतील असा त्यांच्या संस्थापकाचा अंदाज होता.
 
फ्रीडम हाऊस या अमेरिकन एनजीओच्या मते, चीनमधील 2 ते 4 कोटी लोक त्याचे अनुयायी आहेत, ते गुप्तपणे त्याचं अनुसरण करतात.
 
सरकारच्या हस्तक्षेपाविरुद्ध हजारो लोकांनी निषेध केला आणि पंथ दडपल्याचा आरोप केला, त्यानंतर त्यावर कठोर कारवाई करण्यात आली.
 
हे आंदोलन समाजासाठी घातक असल्याचा दावा कम्युनिस्ट पक्षाने केला.
 
टीकाकारांचं म्हणणं आहे की ते फालुन गोंगच्या लोकप्रियतेमुळे आणि प्रभावामुळे घाबरले होते आणि त्यांनी आध्यात्मिक गटाला दूर करण्याचा संकल्प केला होता.
 
चीनच्या बाहेर लोकप्रियता
फालुन गोंगचे जगभरात 70 देशांमध्ये अनुयायी असल्याचा दावा केला जातो आणि त्याच्या शिकवणींचे 40 भाषांमध्ये भाषांतर करण्यात आलेलं आहे. परंतु त्याचा उदय कुठे झाला याचे नेमके पुरावे उपलब्ध नाहीत.
 
वांग म्हणतात, "आम्ही मानतो की कम्युनिस्ट पक्ष वाईट आहे. म्हणूनच ते फालुन गोंग पंथाचा आवाज दाबतात."
 
हा पंथ औषध घेऊ नका असं म्हणत असल्याचे आरोप चीनच्या कम्युनिस्ट पक्षाने केले आहेत. मात्र या पंथाने या आरोपाचं खंडन केलं आहे.
 
स्थानिक गुरू असलेले लियाओ म्हणतात, "आमच्या पंथात असं मानलं जातं की वेगवेगळ्या लोकांमध्ये रोगाची वेगवेगळी कारणे असतात. तुम्ही दवाखान्यात जाऊ नका असं आम्ही अजिबात सांगत नाही."
 
ते पुढे सांगतात, "आजार हे आपल्या वाईट कर्माचं फळ आहे. वाईट कर्म म्हणजे लोकांना दिलेली वाईट वागणूक. म्हणजे, अशी गोष्ट जी तुम्ही नैतिकदृष्ट्या केली नाही पाहिजे."
 
वांग म्हणतात की, "लोक मरतात. तुम्ही राष्ट्राध्यक्ष असाल किंवा शक्तिशाली व्यक्ती असलात तरी त्याने काही फरक पडत नाही, प्रत्येकजण आजारी पडतो. आजारपण हे एक प्रकारचं कर्म आहे. जेव्हा तुम्ही पृथ्वीवर आलात तेव्हाच तुम्ही आजारी पडणार की नाही हे ठरलेलं. त्यामुळे औषधोपचार करण्यात काही अर्थ नसतो."
 
सायन्स फिक्शनची नक्कल केल्याचा आरोप
सॅम (नाव बदललेलं आहे) सांगतात, "हा वाद दोन अविश्वसनीय संस्थांमधील आहे. कम्युनिस्ट पक्षाने फालुन गोंगवर जी टीका केली आहे त्याला काही प्रमाणात खरं मानता येईल. कारण त्यांनी ज्या प्रकारच्या गोष्टी करायला सुरुवात केली त्यावर विश्वास ठेवणं कठीण आहे."
 
ते म्हणतात, "फालुन गोंग हा पंथ स्वतःला आरोग्याविषयी जागरूक असलेल्या लोकांचा समूह म्हणतो आणि स्वतःच्या गोष्टी स्वतः करू इच्छितो. त्यांना आध्यात्मिक प्रगती करायची आहे. पण फालुन गोंग याहीपेक्षा वेगळा पंथ आहे. ती एक अतिशय कडक नियंत्रण असलेली संघटना आहे."
 
या पंथाचे संस्थापक हाँग झी यांच्यावरही ते टीका करतात, जे अमेरिकेत असल्याचं मानलं जातं. सॅम हे एकटेच टीकाकार नाहीत. शिक्षणाशी संबंधित अनेक लोकांनी त्यांच्या लोकप्रिय विज्ञान कथा चोरीला गेल्याचा दावा केला आहे.
 
फालुन गोंगच्या शिकवणी मध्ये पृथ्वीवरील अलौकिक जीवनाविषयी सांगितलं जातं. त्यांना बाह्य जगाकडे परत जायचं आहे.
 
फालुन गोंगचे अनुयायी आणि गुरू असलेले लियाओ म्हणतात, "पृथ्वीवर प्रत्येकाला कायमस्वरूपी राहता येणार नाही."
 
"आपण वेगवेगळ्या ठिकाणाहून आलो आहोत असा आमचा विश्वास आहे. आणि इथे येण्याचा उद्देश साधना करणं हा आहे जेणेकरून आपण जिथून आलो आहोत तिथे परत जाऊ शकतो."

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

कातरवेळ म्हणजे नेमकी कोणती? या दरम्यान काय करावे?

आयुष्य संकटांनी वेढलेले आहे, त्यामुळे सोमवारी करा हे सोपे उपाय

हे 5 रत्न करतील रातोरात श्रीमंत !

केळी सतत 30 दिवस खा, तुमच्या आरोग्यासाठी हे 3 आश्चर्यकारक फायदे होतील!

मुरमुरे अप्पे रेसिपी

पुढील लेख
Show comments