Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

फादर फ्रान्सिस दि'ब्रिटो: माझी भूमिका धर्मप्रचाराची वाटत असेल तर माझा नाईलाज आहे

फादर फ्रान्सिस दि'ब्रिटो: माझी भूमिका धर्मप्रचाराची वाटत असेल तर माझा नाईलाज आहे
, सोमवार, 30 सप्टेंबर 2019 (10:46 IST)
फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांची साहित्य संमलेनाच्या अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर त्यांच्या निवडीला काही जणांनी विरोध केला. दिब्रिटो यांनी बीबीसी मराठीशी वेगवेगळ्या विषयांवर चर्चा केली त्यात अभिव्यक्ती स्वातंत्र्य, महिलांचा सन्मान आणि इतर अनेक विषयांवर त्यांनी आपली मतं मांडली.
 
दिब्रिटोंचं साहित्य धर्मप्रसारासाठीचं साहित्य असल्याचा आरोप सोशल मीडियावर होत आहे. त्याबाबत बीबीसी मराठीला त्यांनी सांगितलं, "मी धर्मप्रसार करतो म्हणजे काय करतो? जे प्रभूने सांगितलंय ते सांगतो, की शत्रूवर प्रेम करा, सगळ्यांना सामावून घ्या. गोरगरिबांना कवेत घ्या. याच्यात कोणाला धर्मप्रचार वाटत असेल तर माझा नाईलाज आहे."
 
"साहित्य कधी सुरू झालं? रामायण - महाभारत लिहिलं तेव्हा सुरू झालं. भगवद्ग गीता लिहिली गेली तेव्हा सुरू झालं. बायबल लिहीलं गेलं तेव्हा साहित्याला सुरुवात झाली. संताचं साहित्य हे साहित्य नाही का? तुकारामाची गाथा, ज्ञानेश्वरी, दासबोध साहित्य नाही का? तो एक प्रांत आहे. धर्माची अॅलर्जी का? पण धर्माने कायद्याच्या चौकटीत राहून आपलं कार्य केलं पाहिजे. मानवी हक्कावर गदा आणू नका. बंदी ही भीतीतून आणली जाते, "असं दिब्रिटो सांगतात.
 
सध्याच्या काळात अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गदा आलेली असली तरी आपण आपलं अभिव्यक्ती स्वातंत्र्य जपणार असल्याचं 93 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांनी बीबीसी मराठीशी बोलताना सांगितलं.
 
चांगल्या विचारांवर बंदी का?
ते म्हणाले, "अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गदा आलेली आहे. वर्तमानपत्रं एकसुरी होत आहेत. जवळजवळ राजकीय पक्षाची मुखपत्रं ठरत आहेत. मी आणीबाणी दरम्यान भूमिका घेत साधनामध्ये लिहिलं होतं. लोकांनी बोलायला हवं. साहित्यिकांनी न भिता बोलावं. नयनतारा सहगल सारख्या बोलणाऱ्या लोकांना संधी नाकारली जाते. ही असहिष्णुता आहे आणि हे भारतीयत्वाच्या विरुद्ध आहे."
 
"अध्यक्ष म्हणून मी जिथे जाईन तिथे अभिव्यक्ती स्वातंत्र्याविषयी माझी भूमिका मांडणार आहे. अभिव्यक्ती स्वातंत्र्य हे लेखन आणि वाचा इथपर्यंत मर्यादित नाही. आदिवासी त्यांच्या हक्कासाठी मोर्चे काढतात, तुम्ही लाठीमार करता त्यांच्यावर? त्यांचं अभिव्यक्ती स्वातंत्र्य तुम्ही नाकारत आहात."
 
"आम्हाला चांगलेचांगले वक्ते ऐकायची सवय होती. ते गेले कुठे? त्यांना घालवलं कोणी? हे भीतीतून झालेलं आहे. चांगल्या विचारांवर बंदी का?"
 
संमेलन अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर त्यांच्या धर्मगुरू असण्यावरून सुरू झालेल्या वादाविषयी ते म्हणतात, "संस्कृतमध्ये म्हटलंय, 'वादे वादे जायते तत्त्वबोधः' म्हणजे वाद जर बौद्धिक असतील तर त्यांचं आपण स्वागत केलं पाहिजे. मतमतांतरं असतात. अशा वादाला न घाबरता त्याचं स्वागत करायचं. पण अशा प्रकारचा वाद हा निर्माण करण्यात आलेला आहे. त्यांनी त्यांचं मत लोकशाही मार्गाने मांडावं."
 
"त्यांना त्यांचं स्वातंत्र्य आहे. आपले सगळे आपण लोकशाही मार्गाने सोडवायला हवेत. भारतीय घटनेचं उल्लंघन करू नये. संविधानाने आपल्याला खूप स्वातंत्र्य दिलेलं आहे. पण आमनेसामने वाद न करता, लांबून- दुरून करणं मला जरा अप्रशस्त वाटतं. वाद करणारे सगळे माझे मित्र - भाऊ आहेत. जो सगळ्यांचा बंधू, तो हिंदू."
 
पण हा वाद राजकीय हेतूने होत असल्याचं आपल्याला वाटत नसल्याचं फादर फ्रान्सिस दिब्रिटो म्हणतात. मुख्यमंत्री आपलं काम चोख करतील, असा विश्वासही त्यांनी बीबीसी मराठीसोबत बोलताना व्यक्त केला.
 
धर्मगुरू असण्यावरचा लोकांचा आक्षेप
सोशल मीडियावरच्या पोस्टद्वारे अनेकांनी फ्रान्सिस दिब्रिटो यांच्या 'धर्मगुरू' असण्यावर आक्षेप घेतला. त्याविषयी ते म्हणतात, "मी धर्मगुरू असल्याचं कधीही नाकारलेलं नाही. ते स्वीकारलेलं आहे. त्या पदाच्या अडचणीही मी स्वीकारलेल्या आहेत. पण धर्मगुरूने चर्चच्या कंपाऊंडमध्ये राहता कामा नये, अशी माझी भूमिका आहे. लोकांच्या सुखदुःखाच्या प्रश्नांशी आमचं नातं आहे. "
 
"इतर धर्मांमध्ये खूप चांगल्या गोष्टी आहेत. डबक्यामध्ये राहू नका. बाहेर पडा. तुमचं व्यक्तिमत्त्वं विकसित होईल."
 
धमक्या आणि फादर दिब्रिटो
फादर दिब्रिटोंची साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर महामंडळाच्या कार्यालयात धमक्यांचे फोन आले. पण यामुळे आपल्याला भीती वाटत नसल्याचं ते सांगतात. त्यांनी स्वतःसाठी संरक्षणही मागितलेलं नाही.
 
ते म्हणतात, "मी वादांमध्ये - धमक्यांमध्येच वाढलेलो आहे. गेली तीस -चाळीस वर्षं मी पर्यावरणाचा लढा देतोय. यातल्या माझ्याविरोधातल्या शक्ती तेव्हा भयानक होत्या. त्यांचे हितसंबंध होते. तेव्हा मला धमक्या आल्या होत्या. तेव्हा मला जाणवलं, की जेव्हा आपलं जीवन धोक्यात असतं, तेव्हा आपलं आयुष्य खऱ्या अर्थाने अर्थपूर्ण असतं. मी कधीच संरक्षण मागितलेलं नाही. प्रभूने सांगितलंय की एका गालावर कोणी मारलं तर दुसरा गाल पुढे करा. तर माझ्या या सगळ्या विरोधकांसाठी माझा गाल पुढे आहे. मला संरक्षणाची गरज नाही."
 
ज्ञानोबा - तुकोबांचा प्रभाव
ज्ञानोबा - तुकोबांच्या संतसाहित्याचा आपल्या विचारांवर आणि लेखनावर मोठा प्रभाव असल्याचं दिब्रिटो सांगतात. "मी घरी बायबल शिकलो. आणि शाळेत माझी ज्ञानोबा - तुकोबांशी, जनाबाईंशी ओळख झाली. मला त्यांचा लळा लागला. तुकोबा जे सांगतात तेच येशू सांगतो. फक्त त्यांची पद्धत निराळी आहे. मी पुण्याला वारीतही काही वेळ घालवलेला आहे. मला वारीविषयी प्रचंड आकर्षण आहे. मी एम.ए. साठी ज्ञानेश्वर अभ्यासला. त्यांनी सांगितलेली स्थितप्रज्ञतेची लक्षण मी चिंतनासाठी घेतो, प्रवचनातून सांगतो. ही शिकवण मला अचंबित करते. मग हे माझ्या बोलण्यात - लेखनात येणारच"
 
"मी प्रथम भारतीय आहे. मी जन्मलो ख्रिस्ती कुटुंबात आणि माझा बाप्तिस्मा झाला तेव्हा मी ख्रिस्ती झालो. पण माझी नोंद एक भारतीय म्हणून करण्यात आलेली आहे. मी म्हणीन 'ख्रिस्तनामाच्या सेतूवरुनी आलो मी संतचरणी'."

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

कांदा निर्यातीवर बंदी