Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

उद्धव ठाकरे यांचं सरकार खरंच अस्थिर आहे का?

Webdunia
बुधवार, 27 मे 2020 (15:56 IST)
प्राजक्ता पोळ
देशभरात कोरोनाचं संकट असताना महाराष्ट्रात राजकारण रंगलं आहे. राज्यात कोरोना रूग्णांचा आकडा 52 हजारांहून अधिक झाला आहे. त्यातले 80% रूग्ण हे मुंबई महानगर परिसरात आहेत. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे पूर्णपणे अपयशी ठरल्याची टीका विरोधकांनी सुरू केली आहे.
 
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यासह अनेक भाजप नेत्यांच्या राजभवनातील फेर्‍या सुरू झाल्या. राज्यपालांनी वेगवेगळ्या विषयांवर सरकारला सूचना करण्यास सुरुवात केली. राज्यपालांनी राजभवनावर सचिवांच्या बैठका घेणंही सुरू केलं आहे.
 
राज्यातल्या परिस्थितीबाबत राज्यपालांचा हस्तक्षेप वाढू लागलाय. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी राजभवनवर होणाऱ्या एका बैठकीला दांडी मारली. यामुळे सरकार आणि राजभवन यांच्यातलं शीतयुद्ध समोर येऊ लागलं. गेल्या दोन दिवसांत राजभवनवर मोठ्या हालचाली बघायला मिळाल्या.
 
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि प्रफुल्ल पटेल हे दोन नेते सोमवारी (25 मे) राजभवनावर गेले. ही सदिच्छा भेट असल्याचं राष्ट्रवादीकडून सांगण्यात आलं. त्यानंतर नारायण राणे यांनीही राज्यपालांची भेट घेतली आणि महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी केली.
 
रात्री उशिरा शरद पवार यांनी मातोश्रीवर जाऊन मुख्यमंत्री उध्दव ठाकरेंशी दीड तास चर्चा केली. या बैठकीमागचं गूढ नक्की काय आहे? शरद पवार आणि उद्धव ठाकरेंमध्ये मतभेद आहेत का? सत्तेची गणितं बदलू शकतात का? महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवटीची मागणी का केली जातेय? हे सगळे या निमित्तानं उपस्थित व्हायला लागले. त्यातूनच हे सरकार अस्थिर झालंय का, अशी चर्चा सुरू झाली.
 
त्यातच २६ मे रोजी संध्याकाळी केंद्राच्या गृह खात्याच्या समितीवर असलले माढ्याचे खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांनी राज्यपालांची भेट घेतली. त्यांच्याबरोबर भाजप आमदार जयकुमार गोरे सुद्धा उपस्थित होते.
 
त्यामुळे राजकीय चर्चांना आणखी उधाण आलं.
 
शरद पवार आणि उद्धव ठाकरेंमध्ये मतभेद?
कोरोनाच्या परिस्थितीत शरद पवार हे सुरवातीला लोकांशी संवाद साधून त्यांच्या प्रश्नांची उत्तरं देत होते. त्यांच्या अडचणी मंत्र्यांपर्यंत पोहचवत होते. त्यानंतर रूग्णांची संख्या जशी वाढायला लागली तसे शरद पवार बाहेर पडून मुख्यमंत्र्यांच्या काही बैठकांमध्ये दिसले.
 
19 मे रोजी शरद पवार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना वाहतूक, उद्योग, शेती, बेरोजगारी याबाबत जाहीर सूचना केल्या.
सरकारमध्ये कुठल्या गोष्टी होत नाहीत हेही त्यांनी लक्षात आणून दिलं. त्यानंतर शरद पवारांनी राजभवनवर जाण्यामागे काय कारण असू शकतं याबद्दल राज्याचे अल्पसंख्याक मंत्री आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते नवाब मलिक यांनी सांगितलं,
 
"शरद पवार आणि उध्दव ठाकरे यांच्यात कुठलेही मतभेद नाहीत. ते मार्गदर्शन करत असतात. राजभवनावर राज्यपालांनी शरद पवारांना बोलवलं होतं. त्यानंतर उद्धव ठाकरे आणि शरद पवार भेट ठरली. तेव्हा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे शरद पवारांना भेटायला येणार होते. पण शरद पवार यांनी बरेच दिवस मातोश्रीवर आलो नाही म्हणून मीच येतो असं सांगितलं. त्यामुळे मतभेद या अफवा आहेत."
 
राजकीय विश्लेषक अभय देशपांडे यांनी या घडामोडींबद्दल बोलताना म्हटलं, की "केंद्र सरकार आणि राज्य सरकार हे वेगवेगळ्या पक्षांचं असल्यावर राजभवन कायम सत्ताकेंद्र असतं.
 
अशावेळी केंद्राकडून राज्य सरकारवर राज्यपालांमार्फत हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न होतो. जो सध्या महाराष्ट्रात होतोय. मुख्यमंत्र्यांना बोलवून राज्याच्या परिस्थितीचा आढावा घेणं हा राज्यपालांचा अधिकार आहे. पण सचिवांना राजभवनवर बोलवून बैठक घेणं हा हस्तक्षेप म्हणता येईल."
 
विरोधकांकडून सरकार अस्थिर करण्याचा प्रयत्न केला जातोय. अशा परिस्थितीत शरद पवारांना राजभवनवर बोलवून राजकीय परिस्थितीचा अंदाज हा राज्यपालांनी घेतला असण्याची शक्यता असल्याचं अभय देशपांडे यांनी म्हटलं.
 
"या भेटीसाठी राज्यपालांनी शरद पवारांना राजभवनवर निमंत्रित केल्याचं राष्ट्रवादी पक्षाकडून सांगण्यात आलं. त्यानंतर शरद पवार हे मातोश्रीवर गेले. त्यांच्यामध्ये दीड तास चर्चा झाली. यावरून शरद पवार हे नाराज असल्याचं कुठे दिसत नाही. उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्या निश्चितपणे मतभेद असतील पण सध्या ते मतभेद इतके टोकाचे दिसत नाहीत ज्यामुळे सरकार पडू शकेल."
 
शिवसेना खासदार संजय राऊत यांनी याबाबत बोलताना म्हटलं, "शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांचा चांगला संवाद आहे. ते सरकारला मार्गदर्शन करतायेत याचं आम्ही स्वागत करतो. सरकारच्या स्थिरतेबद्दल जर कोणी धुरळा उडवत असेल तर ती निव्वळ पोटदुखी समजावी. सरकार मजबूत आहे."
पार्श्वभूमी तयार करण्याचा प्रयत्न?
भाजपचे खासदार नारायण राणे यांनी शरद पवार यांच्यानंतर राज्यपालांची भेट घेतली आणि त्यानंतर राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी केली.
 
ते म्हणाले, "या सरकारची कोरोनाशी सामना करण्याची क्षमता नाही. हे सरकार राज्यात उपाययोजना करण्यात सपशेल अपयशी ठरलंय. त्यामुळे या सरकारला नारळ देऊन राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करावी."
 
नारायण राणे यांच्या वक्तव्यावरून शिवसेनेनेही प्रतिहल्ला केलाय. संजय राऊत याबाबत बोलताना म्हणतात, जर राष्ट्रपती राजवटी विषयी बोलायचं झालं तर आधी गुजरातची परिस्थिती पाहावी.
 
"केंद्र सरकार आणि राज्य सरकारचे आरोप प्रत्यारोप, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे अपयशी ठरल्याची टीका करत राज्यात भाजपने घेतलेला आक्रमक पवित्रा, राजभवनवर वाढलेली वर्दळ आणि त्यातून राष्ट्रपती राजवटीची मागणी या सगळ्या घडामोडींमुळे हे सरकार लगेच पडण्याची शक्यता कमी असली तरी त्यादृष्टीने पार्श्वभूमी तयार करण्याचा विरोधक प्रयत्न करतायेत," असं राजकीय विश्लेषक अभय देशपांडे यांना वाटतं.
 
"पण महाराष्ट्र आणि गुजरात यांची परिस्थितीत फार फरक नाही. त्यामुळे जोपर्यंत हे सरकार निष्क्रिय आहे हे विरोधकांना सिद्ध करता येत नाही तोपर्यंत महाविकास आघाडीचं सरकार बरखास्त होणं सोपं नाही," असं देशपांडे पुढे सांगतात.
 
लोकमतचे वरिष्ठ सहायक संपादक संदीप प्रधान सांगतात, "या सरकारची स्थिरता लोकांमध्ये काय मतप्रवाह तयार होतोय यावर सर्व अवलंबून आहे. जर विरोधी पक्ष उध्दव ठाकरे सरकार अपयशी ठरलं हे जनमाणसात ठासवू शकला तर वेगळं चित्र बघायला मिळेल आणि जर ठाकरे सरकार केंद्र सरकार कशी मदत करत नाही म्हणून आम्हाला काम करणं शक्य होत नाही हे दाखवू शकलं तर हे सरकार यशस्वी ठरेल. त्यामुळे सर्व काही भविष्यात कसं चित्र उभं राहतंय यावर अवलंबून आहे."
 
तर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनीही भाजपची भूमिका मांडली. मंगळवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते म्हणतात, "राणे साहेब अन्याय सहन करत नाहीत, आणि ते थेट बोलतात. पण भाजपला आता राजकारणात रस नाही. सरकार बनवण्याची आम्हाला घाई नाही. कोरोनाशी लढण्यावर आमचा फोकस आहे. आता जी चर्चा सुरू आहे, त्यामध्ये आम्ही सामील नाही. कोरोनाची लढाई इफेक्टिव्ह व्हावी, यासाठी आम्ही दबाव तयार करू."
 
सरकार अस्थिर करणं अंगलट येईल?
महाविकास आघाडीचं सरकार हे अस्थिर असल्याची जरी चर्चा होत असली तरी आमचं सरकार पाच वर्षं टिकणार हे तिन्ही पक्षांकडून ठासून सांगितलं जातंय.
 
"भाजपचे नेते सत्तेसाठी लोभी आहेत. त्यामुळे सरकारला त्रास देण्यासाठी राष्ट्रपती राजवटीची मागणी करत आहेत. आम्ही सर्वजण मिळून कोरोना संकटात काम करतोय. त्यामुळे शंका घेण्याचं काहीच कारण नाही. हे सरकार स्थिर आहे आणि पुढेही राहील," असं महसूल मंत्री आणि कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी म्हटलं आहे.
 
"कावळ्याच्या शापाने गाय मरत नाही तसं भाजपने कितीही प्रयत्न केला तरी सरकार पडणार नाही," असं राष्ट्रवादीचे नेते आणि मंत्री नवाब मलिक यांनी म्हटलंय.
 
तर कोरोनाची लस आणि ठाकरे सरकार पाडण्याचा डोस विरोधकांना सापडायचाय. महाराष्ट्र अस्थिर करण्याचे प्रयत्न अंगलट येतील असा इशारा संजय राऊत यांनी दिलाय.
 
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मात्र सत्ता स्थापन करण्याचा प्रयत्न आम्ही करणार नसल्याचं म्हटलं.
 
"हे सरकार अंतर्गत वादांमुळेच पडेल. सरकारला जागं करण्याचा आमचा प्रयत्न आहे. पळवून लावण्याचा नाही," असं फडणवीस यांनी म्हटलंय.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

फायनान्शिअल मॅनेजमेंट कोर्स मध्ये एमबीए करा

Vaginal Itching योनीला दररोज खाज येते? या 3 प्रभावी घरगुती उपायांनी आराम मिळवा

Beauty Advice : घरीच बनवा केमिकल फ्री ब्लश

शिंक येणे नेहमीच अशुभ नसते, जाणून घ्या कधी शुभ असते

Margashirsha Guruvar 2024 मार्गशीर्ष गुरुवार कधी पासून? किती गुरुवार, संपूर्ण माहिती जाणून घ्या

पुढील लेख
Show comments