Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

जो बायडन: कोव्हिडशी युद्धपातळीवर लढण्यासाठी 10 एक्झिक्युटिव्ह ऑर्डर्सवर राष्ट्राध्यक्षांच्या सह्या

Webdunia
शुक्रवार, 22 जानेवारी 2021 (17:56 IST)
अमेरिकेमध्ये थैमान घालणाऱ्या कोव्हिड 19विरुद्धचा लढा प्रखर करण्यासाठी राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी 10 महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत.
 
यानुसार लसीकरणाचा वेग वाढवण्यात येणार आहे सोबतच कोव्हिड चाचण्यांचं प्रमाणही वाढवण्यात येईल. मास्कसारख्या अत्यावश्यक वस्तूंचं उत्पादन वाढवण्यासाठीही तातडीचे निर्णय घेण्यात आले आहेत.
 
या साथीवर मात करण्यासाठी काही महिन्यांचा कालावधी लागणार असला तरी सगळेजण एकत्र आल्यास आपण नक्कीच यातून बाहेर पडू, असं बायडन यांनी हे 10 निर्णय जाहीर करताना म्हटलंय.
 
अमेरिकेचे 46वे राष्ट्राध्यक्ष म्हणून शपथविधी झाल्याच्या दुसऱ्याच दिवशी बायडन यांनी हे निर्णय घेतले आहेत.
 
माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांच्या धोरणांशी नवीन प्रशासनाने फारकत घेतली आहे. राज्यांनी स्वतःसाठीचे निर्णय घेण्याऐवजी आता एक राष्ट्रीय उपाययोजना वा कार्यपद्धती ठरवण्याचं धोरण असेल.
 
ट्रंप प्रशासनाने ज्याप्रकारे कोव्हिडच्या साथीचा प्रश्न हाताळला, त्यावर मोठी टीका झाली होती.
 
जगभरात अमेरिकेला कोरोना व्हायरसचा सर्वांत मोठा फटका बसला असून आतापर्यंत यामुळे 4 लाख 6 हजारांपेक्षा जास्ती जीव गेल्याचं जॉन्स हॉपकिन्स विद्यापीठाची आकडेवारी सांगते. आतापर्यंत तब्बल 2.45 कोटी अमेरिकन नागरिकांना कोरोनाचा संसर्ग झालेला आहे.
 
'युद्धजन्य परिस्थिती'
आपण घेत असलेल्या 'ठोस व्यवहारी निर्णयांसाठी' मोठी किंमत मोजावी लागणार असल्याचं बायडन यांनी म्हटलंय.
 
"एक गोष्ट मी स्पष्ट करतो - परिस्थिती आणखी चिघळेल आणि मग त्यात सुधारणा होईल," असा इशारा बायडन यांनी दिलाय. पुढच्या महिन्यापर्यंत अमेरिकेतल्या कोव्हिड बळींची संख्या 5 लाखांवर जाण्याचा अंदाज असल्याचं त्यांनी म्हटलंय.
 
'ही युद्धजन्य परिस्थिती आहे,' ते म्हणाले. दुसऱ्या महायुद्धाच्या तुलनेत या साथीदरम्यान अधिक अमेरिकन नागरिकांचा मृत्यू झाल्याचं त्यांनी म्हटलंय.
 
आपल्य कार्यकाळाच्या पहिल्या 100 दिवसांमध्ये 10 कोटी लोकांना लस देण्याची आपली योजना असून 'हे आपल्या देशाने स्वीकारलेलं आतापर्यंतच सर्वांत मोठं प्रशासकीय आव्हान' असल्याचं बायडन म्हणाले आहेत.
 
अस्तित्वात असणाऱ्या लसीकरण योजनेची क्षमता आणि आवाका बायडन प्रशासन वाढवत असल्याचं मुख्य वैदयकीय सल्लागार अँथनी फाऊची यांनी म्हटलंय.
 
अपेक्षेनुसार जर उन्हाळा संपेपर्यंत 70 ते 85 टक्के लोकसंख्येला लस देता आली तर हिवाळा येईपर्यंत आयुष्यं काहीसं नॉर्मल होण्याची शक्यता असल्याचं त्यांनी म्हटलंय.
 
लस घेण्याबद्दल साशंक असणाऱ्यांना ही लस घेण्यासाठी राजी करणं हे महत्त्वाचं ठरणार असल्याचंही डॉ. फाऊची यांनी म्हटलंय.
 
लशीचं उत्पादन वाढवण्यासाठी प्रशासन काही उत्पादकांशी चर्चा करत असल्याचं त्यांनी म्हटलंय. लसीच्या पुरवठ्यात अडथळा येत असून काही ठिकाणी लशीचा साठा संपल्याचं काही स्थानिक अधिकाऱ्यांनी म्हटलं होतं.
 
अमेरिकेत आतापर्यंत 1.65 कोटी लसीचे डोस देण्यात आले आहेत.
 
नवीन योजना काय आहे?
प्रशासनाने सात टप्प्यांची एक योजना जाहीर केली आहे. यामध्ये लसीचं अधिक चांगलं वितरण करण्यापासून ते कोरोनाच्या योग्य चाचण्या उपलब्ध करून देण्यापर्यंतच्या उपाययोजना आहेत.
 
कोव्हिडचा धोका सर्वात जास्त असणाऱ्यांचं आणि अत्यावश्यक सेवांमध्ये काम करणाऱ्यांचं संरक्षण करण्यासाठी आणि त्यांना मदत करण्यासाठी झपाट्याने आणि आक्रमकपणे पावलं उचलणं महत्त्वाचं असल्याचं बायडन प्रशासनाचं मत असल्याचं या योजनेत म्हटलंय.
 
बायडन यांनी मंजूर केलेल्या एक्झिक्युटिव्ह ऑर्डरना अमेरिकन काँग्रेसकडून मान्यता मिळण्याची गरज नाही. मात्र त्यांनी जाहीर केलेल्या योजनांसाठी लागणारा वित्तपुरवठा हा बायडन यांनी गेल्या आठवड्यामध्ये जाहीर केलेल्या 1.9 ट्रिलीयन डॉलर्सच्या मदत पॅकेजमधून येणार आहे. त्यामुळे हे पॅकेज लागू होण्यासाठी त्यांना सिनेट आणि हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्ह्जचं पाठबळ लागेल.
 
स्टेडियम्स आणि स्थानिक समाजांसाठीच्या इमारतींमध्ये लसीकरण केंद्र सुरू करणं आणि 100 दिवसांच्या आत बहुतेक शाळा पुन्हा सुरू करण्याचं प्रशासनाचं उद्दिष्टं आहे.
 
यासोबतच अमेरिकेत येण्यासाठीचा प्रवास सुरू करण्याआधी आता प्रवाशांना कोव्हिड चाचणी करून त्याचे रिपोर्ट निगेटिव्ह असल्याचं दाखवावं लागेल आणि अमेरिकेत दाखल झाल्यानंतर 14 दिवस क्वारंटाईन व्हावं लागेल.
 
मास्क वापरणं आणि सोशल डिस्टंसिंग पाळणं सगळ्या सरकारी कार्यालय परिसरात अनिवार्य असेल आणि विमानतळ, बहुतेक विमानं, ट्रेन्स आणि बसेसमध्येही मास्क वापरणं सक्तीचं असेल.
 
राज्य आणि स्थानिक प्रशासनाच्या अधिकाऱ्यांना अधिक आर्थिक मदत देण्यात येईल आणि देशभरातल्या अंमलबजावणीवर लक्ष ठेवण्यासाठी नवीन कार्यालयाची स्थापना करण्यात येईल.
 
PPE किट्स आणि लस निर्मितीसाठी गरजेच्या गोष्टींचं उत्पादन वाढण्यात येईल.
 
ट्रंप प्रशासनाच्या धोरणांपासून फारकत घेणारा आणखी एक निर्णय बायडन प्रशासनाने घेतलाय. गरीब देशांना कोव्हिड लस पुरवण्यासाठीच्या कोव्हॅक्स योजनेत अमेरिका सहभागी होणार असल्याचं डॉ. फाऊची यांनी म्हटलंय.
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

मंदिरात जाण्यापूर्वी केस का धुवावेत ?

अभ्यासाचे टेबल कसे असावे? वास्तु टिप्स जाणून घ्या

योनिमार्गाच्या खाज सुटण्याने त्रास होतो का या 3 उपायांनी काही मिनिटांत आराम मिळेल

पंचतंत्र कहाणी : विश्वासघाताचे फळ

आरोग्यवर्धक व्हेजिटेबल ज्यूस

पुढील लेख