Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

महाराष्ट्र लॉकडाऊन: सार्वजनिक वाहतूक बंद होणार का? लॉकडॉऊनसाठी कोणत्या नियमांचा विचार सुरू?

Webdunia
बुधवार, 31 मार्च 2021 (11:45 IST)
दीपाली जगताप
"लॉकडॉऊन रात्री लागू झाले तरी चालेल पण दिवसाचे लॉकडॉऊन परवडणार नाही. आमचे कर्जाचे हफ्तेही आता बाकी आहेत. आमची रोजी-रोटी पूर्ण बंद होईल. लोक बाहेर पडले नाहीत तर आम्हाला ग्राहक कसे मिळणार? आमच्या मुलांना आम्ही काय खायला देणार?" मुंबईत गेल्या 17 वर्षांपासून रिक्षा चालवणाऱ्या ड्रायव्हरने बीबीसी मराठीशी बोलताना आपल्या व्यथा सांगितल्या.
 
लॉकडॉऊनचे नियम शिथिल होऊन काही महिने उलटत नाहीत तोपर्यंत सामान्य जनतेवर पुन्हा लॉकडॉऊनची टांगती तलवार आहे.
 
मुंबईतील दादार परिसरात चहाचे दुकान चालवणारे मयूर धुरी सांगतात, " नागरिक म्हणून लॉकडॉऊनला समर्थन आहे. पण व्यावसायिक म्हणून विरोध आहे. जवळपास नऊ महिने व्यवसाय ठप्प होता. आमच्या चहाच्या दुकानात आता कुठे लोक येत होते. पण आता जमावबंदी लागू केल्यापासून ग्राहकांची संख्या कमी झाली आहे. लॉकडॉऊनमध्ये तर पूर्ण धंदा बंद पडेल."
महाराष्ट्रात लॉकडॉऊन लागू करण्यासंदर्भात नियोजन करण्याचे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी प्रशासनाला दिले आहेत. पण हे लॉकडॉऊन पूर्वीप्रमाणे नसेल असं आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी बीबीसी मराठीशी बोलताना स्पष्ट केलं.
 
ते म्हणाले, "अर्थकारण आणि लोकांचे आरोग्य यातील मधला मार्ग शोधावा लागेल आणि त्यानुसार उपाययोजना करण्यात येतील."
 
आताच्या घडीला राज्यातील मुंबई, पुणे, नांदेड, नागपूर, औरंगाबाद यांसारख्या जिल्ह्यांत यापूर्वीच कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. त्यामुळे आगामी काळात राज्यात कोणकोणत्या गोष्टी सुरू राहतील आणि कोणत्या बंद होतील? याबाबत सामान्य नागरिकांमध्येही संभ्रमाचे वातावरण आहे.
उद्धव ठाकरे सरकार लॉकडॉऊन अंतर्गत नेमके काय निर्बंध लागू करणार? प्रशासकीय पातळीवर लॉकडॉऊनची काय तयारी सुरू आहे? महाराष्ट्रात पुन्हा एकदा वाहतूक व्यवस्था, कार्यालय, दुकानं, मॉल्स सर्वकाही बंद होणार का? अशा लॉकडॉऊनसंदर्भातील प्रश्नांचा आढावा आपण या बातमीत घेणार आहोत.
 
'सार्वजनिक वाहतूक बंद करणे हा शेवटचा पर्याय'
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या निर्देशानुसार लॉकडॉऊनच्या दृष्टीने नियोजन करण्यासाठी मंत्रालायत सध्या प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या बैठकांचे सत्र सुरू आहे.
 
मदत आणि पुनर्वसन सचिव असिम गुप्ता यांनी बीबीसी मराठीशी बोलताना सांगितलं, "आम्हाला लॉकडॉऊनसंदर्भात नियोजन करण्याचे आदेश मिळाले आहेत. प्रशासकीय अधिकाऱ्यांची बैठक आणि नियोजन सुरू आहे. आज सर्व जिल्हाधिकारी, आयुक्त, आयसीएमआरचे अधिकारी यांच्यासोबत बैठक पार पडली आहे. काही जिल्ह्यांमध्ये परिस्थिती अधिक गंभीर आहे. त्यामुळे त्याठिकाणी अधिक कडक नियम लागू केले जातील."
"पूर्वीप्रमाणे पूर्ण लॉकडॉऊन लागू करावे लागणार नाही यासाठी आमचेही प्रयत्न सुरू आहेत. पण कोरोना रुग्णसंख्या प्रचंड वाढत आहे. त्यामुळे आताच्या तुलनेत आणखी कडक निर्बंध लागू करावे लागतील,"
 
"सार्वजनिक वाहतुकीवर निर्बंध आणणे किंवा ती बंद करणे हा शेवटचा पर्याय असेल. कारण वाहतूक बंद केल्यास त्याचा थेट फटका अर्थव्यवथेला बसणार आहे. त्यामुळे यापेक्षा इतर पर्यायांचा आम्ही विचार करत आहोत. उदाहरणार्थ, रेस्टॉरंट दिवसाही बंद राहू शकतात,"
 
"कोणताही निर्णय तातडीने लागू केला जाणार नाही. सामान्य जनतेला पूर्वसूचना दिली जाईल," असंही त्यांनी स्पष्ट केलं.
 
'लॉकडॉऊन कोणालाच नको आहे पण...'
आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी बीबीसी मराठीला दिलेल्या मुलाखतीत ते म्हणाले, "लॉकडॉऊन कोणालाच नको आहे पण अर्थकारण आणि आरोग्य दोन्हीचा मध्यबिंदू गाठावा लागतो."
 
गर्दी टाळण्यासाठी काय करता येईल? त्यादृष्टीने प्रशासन नियोजन करत असल्याचंही ते म्हणाले.
"लोकांचे आर्थिक नुकसान होणार नाही याचीही काळजी घेतली जाईल. पण लोकांचे आरोग्यही महत्त्वाचे आहे. सगळ्या मंत्र्यांचे मत ऐकून घेतल्यानंतर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री अंतिम निर्णय घेतील," असंही त्यांनी स्पष्ट केलं.
 
ते पुढे म्हणाले, "महाराष्ट्राला लसीकरणात प्रथम क्रमांकावर ठेवायचे आहे. लसीकरणाची गती वाढवायची आहे. लसीकरणाचा वेग दुप्पट करण्याच्या दृष्टीने काम करत आहोत. वाढती रुग्णसंख्या कमी करण्यासाठी लसीकरण हा मोठा पर्याय आहे."
 
आरोग्य व्यवस्थेवरील ताण वाढतोय तर आगामी काळात बेड्सची संख्याही अपुरी पडेल अशीही भीती व्यक्त करण्यात येत आहे.
 
राज्यात सध्या लागू असलेले निर्बंध:
रात्री आठ ते सकाळी सात वाजेपर्यंत सर्व सार्वजनिक स्थळं बंद आहेत. तसंच जमावबंदीही लागू करण्यात आली आहे.
नियमांचे उल्लंघन केल्यास तसंच पाचपेक्षा अधिक लोक एकत्र आल्यास एक हजार रुपये दंड आकारला जात आहे.
मास्कशिवाय फिरल्यास 500 रुपये दंड तर सार्वजनिक ठिकाणी थुंकल्यास एक हजार रुपये दंड
सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय, धार्मिक कार्यक्रमांना परवानगी नाही.
रात्री आठ ते सकाळी सातपर्यंत हॉटेल्स, सिनेमाहॉल, मॉल्स, सभागृह बंद राहणार
लग्नकार्यासाठी 50 लोक उपस्थित राहू शकतात. तर अंत्यविधीसाठी 20 लोकांनाच उपस्थित राहण्याची परवानगी
मास्क आणि पुरेसे अंतर राखून सार्वजनिक वाहतूक सुरू राहिल.
खासगी कार्यालयांमध्ये 50 टक्के कर्मचाऱ्यांनाच उपस्थित राहण्याची परवानगी
रुग्णसंख्या कमी करण्यासाठी नियमांची कडक अंमलबजावणी करण्याच्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सूचना दिल्या आहेत.
"जनतेने ही कोरोनाचे नियम पाळले नाहीत, तर नाईलाजाने येत्या काही कालावधीत अधिक कडक निर्बंध लावावे लागतील हे लक्षात घ्यावे," असा इशाराही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिला.
 
सत्ताधारी पक्षांचाही लॉकडॉऊनला विरोध?
विरोधकांसह सत्ताधारी पक्षांनीही लॉकडॉऊनला विरोध दर्शवला आहे. "मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी लॉकडॉऊनचा निर्णय घेऊ नये यासाठी आम्ही आग्रही," असल्याचं अल्पसंख्याक विकासमंत्री नवाब मलिक यांनी म्हटलं आहे.
नवाब मलिक म्हणाले, "महाराष्ट्रात कोरोना रुग्णसंख्या झपाट्याने वाढत आहे. 24 तासांत 40,000 नवीन रुग्णांची नोंद महाराष्ट्रात झाली. यामुळे मुख्यमंत्र्यांनी प्रशासनाला लॉकडॉऊनच्यादृष्टीने नियोजन करण्याचे निर्देश दिले. पण याचा अर्थ लॉकडॉऊनबाबत निर्णय झालेला नाही. लोकांनी नियमांचे काटेकोरपणे पालन करावे. लॉकडॉऊन राज्याला किंवा जनतेला कोणालाही परवडणारे नाही."
 
मलिक पुढे म्हणाले, "आम्ही सर्वांनी मुख्यमंत्र्यांना लॉकडॉऊन हा उपाय होऊ शकत नाही असे सांगितले आहे. आपण आरोग्य व्यवस्था निर्माण केली पाहिजे. पण वाढत्या रुग्णसंख्येमुळे बेड्सची व्यवस्था अपुरी पडू शकते. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी तसे निर्देश दिले असावेत."
 
तर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी लॉकडॉऊन लागू केल्यास बुडणाऱ्या रोजगाराची भरपाई सरकारने रोख रकमेद्वारे लाभार्त्यांच्या बँक खात्यात जमा करावी अशी प्रतिक्रिया दिली आहे.
 
राज्य पातळीवर लॉकडॉऊनची अपरिहार्यता निर्माण झाल्यास सरकारने काही गोष्टी विचारात घ्याव्यात असंही पृथ्वीराज चव्हाण म्हणाले.
"लॉकडॉऊनची अंमलबजावणी करण्यापूर्वी सर्वसामान्य जनतेला पूर्वसूचना देण्यात याव्या. तसंच लॉकडॉऊनचा कालावधी कमीत कमी असावा. बुडणाऱ्या रोजगाराची भरपाई थेट लाभार्थ्याच्या खात्यात जमा करावी आणि यासाठी वेळप्रसंगी आमदार-खासदारांचा निधी वापरावा लागला तरी वापरावा," अशा सूचनाही त्यांनी केल्या.
 
"शेतमाल आणि इतर औद्योगिक मालाची वाहतूक चालू ठेऊन पुरवठा साखळीवर परिणाम होऊ देऊ नये," असंही त्यांनी सूचवलं आहे.
 
'मातोश्री'त बसून मुख्यमंत्र्यांना कसे कळणार?'
विरोधकांनीही लॉकडॉऊनला विरोध केला आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी लॉकडॉऊन हे कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येला उत्तर नाही अशी भूमिका मांडली आहे.
 
ते म्हणाले, "आता तुम्ही लॉकडॉऊन केलं तर एक रुपयाचं पॅकेज तुम्ही देणार नाही. वर्षभर लोक कसे जगले हे तुम्हाला मातोश्रीत बसून कसे कळणार? त्यासाठी तुम्हाला बाहेर फिरावे लागेल." असा टोला त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लगावला.
'लॉकडॉऊन से डर नहीं लगता साहेब, गरिबीसे लगता है' अशी प्रतिक्रिया मनसे नेते बाळा नांदगावर यांनी दिली.
 
"मागील वर्षभरात गरिबांना प्रचंड अडचण झाली आहे. त्यांना रोज काम केल्याशिवाय पर्याय नाही. सरकारचे नियम जनतेने पाळले आहेत. थाळ्या पण वाजवल्या. कोमट पाणीही प्यायले. पण तरीही महाराष्ट्रात कोरोना रुग्णांची संख्या का वाढते आहे? याचे गूढ उकलेना. बंगाल, तामिळनाडूमध्ये सर्व नियम पायदळी तुडवून लाखोंच्या सभा सुरू आहेत. तिथे कोरोना कसा वाढत नाही?" असा प्रश्नही बाळा नांदगावर यांनी उपस्थित केला.
 
महाराष्ट्रातील कोरोना रुग्णसंख्या
राज्यामध्ये 30 मार्च रोजी 27,918 नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. राज्यातल्या अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या आता 3 लाख 40 हजार 542 एवढी झाली आहे.
 
महाराष्ट्रात आतापर्यंत कोरोना व्हायरसचा संसर्ग झालेल्या रुग्णांची संख्या आता 27 लाख 73 हजार 436 एवढी झाली आहे.
राज्यात मंगळवारी, 30 मार्च रोजी 23,820 रुग्ण बरे होऊन घरी गेले. तर कोरोनामुळे 139 मृत्यूंची नोंद झाली.
 
मुंबईमध्ये 4760 नवीन रुग्णांची नोंद झाली.
 
पुणे महापालिका क्षेत्रात 3287 तर नागपूर महापालिका क्षेत्रात 766 रुग्णांची नोंद झाली.
 
नाशिक महापालिका क्षेत्रातही रुग्णसंख्या झपाट्याने वाढताना दिसतेय. इथे शुक्रवारी 1723 रुग्णांची नोंद झाली.
 
राज्याचा रिकव्हरी रेट सध्या 85.71% आहे. गेल्या काही दिवसांमध्ये राज्याचा रिकव्हरी रेट कमी होताना दिसतोय.
 
सध्या महाराष्ट्रात 3 लाख 40 हजार 542 रुग्ण अॅक्टिव्ह आहेत. तर, राज्यातल्या एकूण मृत्यूंचा आकडा 54 हजार 422 वर पोहोचला आहे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

मार्गशीर्ष गुरुवारी महाविष्णूच्या पूजेचे महत्त्व आणि उपासनेची सोपी पद्धत जाणून घ्या

हे 3 गुण असलेल्या महिला भाग्यवान असतात, नवरा आणि सासरचे लोक नेहमी आनंदी राहतात !

घरात या 5 पक्ष्यांचे फोटो लावा, ज्ञान- समृद्धी वाढते, तिजोरी धनाने भरलेली राहते

आपले नाते कसे मजबूत करावे, 5 गोष्टी लक्षात ठेवा

त्वचेच्या कर्करोगाच्या संरक्षणासाठी हे उपाय खूप प्रभावी आहेत

पुढील लेख